उगवतीचे रंग
अनोखे अंदमान - भाग १
अंदमान म्हणजे निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न !अंदमान म्हणजे निसर्गानं भरभरून दिलेलं दान ! अंदमान म्हणजे क्रांतिकारकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. असं हे अनोखं अंदमान कधी एकदा बघायला मिळतं असं झालं होतं. लहानपणापासून अंदमानबद्दल ऐकत आणि वाचत आलो होतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांना अंदमानच्या भयानक काळ कोठडीमध्ये यातनांना तोंड देत काळ कंठावा लागला होता. अंदमानच्या भोवती सगळीकडे समुद्र. पाणीच पाणी चहूकडे ! अशा ठिकाणी ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे असे कैदी पळून पळून जाणार तरी कुठे ? शिवाय भोवती घनदाट जंगल, वन्य श्वापदांची भीती ! सुटकेचा कोणताही मार्ग नाही. मातृभूमीपासून हजारो कोस दूर. एकदा शिक्षा झाली आणि अंदमानच्या तुरुंगात रवानगी केली की जिवंत परत जाण्याची शक्यता जवळपास संपलेलीच. म्हणून तर कदाचित इथल्या शिक्षेला काळ्यापाण्याची शिक्षा असे म्हणत असावेत.
पण प्रत्यक्षात इथे खरोखरच काळे पाणी आहे का ? छे छे !अंदमान सारखे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे, निळे अथांग पाणी, सुंदर आणि स्वच्छ आभाळ अन्य कुठे क्वचितच पाहायला मिळायचे ! इथला निसर्ग, हिरवीगार वनराई, खारफुटीची जंगले विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी या सगळ्या गोष्टींमुळे अंदमान खरोखरच अद्वितीय आणि अनोखे ठरते.
आपल्या देशाबद्दल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता आहे. ' भारत जमीं का टुकडा नही, जीता जागता राष्ट्रपुरुष हैं. ' अंदमान बद्दल सुद्धा मला असेच म्हणावेसे वाटते. अंदमान केवळ जमिनीचा एक तुकडा नाही तर भारत वर्षाचे प्रतिनिधित्व करणारा एक जिवंत सळसळता भूभाग आहे. विविध जातीधर्माचे लोक इथे एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. इथे आपल्याला भारताच्या संमिश्र संस्कृतीचे दर्शन घडते.
तसं प्रत्यक्षात भारताच्या भूमीपासून हजार बाराशे किलोमीटर दूर असलेलं हे ठिकाण भारताचा एक अविभाज्य भूभाग आहे. अंदमान आणि निकोबार बेटे हे केंद्रशासित प्रदेश आहेत. अंदमानला जाण्यासाठी केवळ दोनच पर्याय आपल्याला उपलब्ध असतात. पहिले म्हणजे विमानप्रवास किंवा सागरी मार्गाने जलप्रवास. अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर ही हवाई मार्गाने तसेच जलमार्गाने आपल्या देशाशी जोडली गेली आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आदी ठिकाणाहून आपण पोर्ट ब्लेअरला पोहोचू शकतो. जहाजाने पोर्ट ब्लेअरला पोहोचण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे तिथे जाण्यासाठी हवाई मार्गाने जाणे जास्त सोयीचे आहे. आपल्या वेळेनुसार आपण त्याचे नियोजन करू शकतो. आपल्या उपलब्ध वेळेप्रमाणे सहा किंवा सात दिवस त्यांचा अंदमान पाहण्यासाठी पुरेसे होतात.
मी लोकसत्ता दैनिकात अंदमान यात्रेची जाहिरात पाहिली पुणे येथील श्री आनंद दवे हे अंदमानला सहल घेऊन जाणार होते. त्यांच्यासोबत आम्ही जाण्याचे ठरवले मी माझी पत्नी सौ श्रद्धा, माझे व्याही श्री आणि सौ दिंडोकार, सौ श्रद्धाची मोठी बहीण श्रीमती जयाताई मैराळ अशा पाच जणांची नाव नोंदणी आम्ही श्री आनंद दवे यांच्याकडे केली. आमच्या सोबत या सहलीमध्ये श्री आनंद दवे यांच्यासह एकूण २९ जणांचा सहभाग होता.
२० फेब्रुवारी २०२५ रोजी आम्ही पुणे येथून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आमचा प्रवास रात्रीचाच होता. विमान प्रवास दोन टप्प्यात होता आधी आम्ही चेन्नईला पोहोचणार होतो आणि तिथून दुसऱ्या विमानाने पोर्ट ब्लेअरला. चेन्नई विमानतळावर उतरल्यानंतर आम्हाला काही तास पुढील विमानाची वाट पहावी लागली आणि चेन्नई येथून पहाटे पुढील विमानाने आम्ही पोट ब्लेअरला रवाना झालो.
पोर्ट ब्लेअरला पोहोचेपर्यंत छान उजाडले होते. समुद्रावरून आमचे विमान जात होते. खिडकीतून खाली पाहिल्यानंतर अंदमान बेटांची लांब रांग दिसत होती. सकाळी बरोबर साडेसात वाजता आमचे विमान अंदमानच्या पवित्र भूमीवर उतरले. अंदमानचे विमानतळ छोटे परंतु सुंदर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डा असे या विमानतळाचे नाव आहे आम्ही आमचे सामान घेऊन बाहेर पडलो तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य पुतळा नजरेस पडला. या भूमीवर त्यांच्या झालेल्या या प्रथमदर्शनाने मनाला धन्य वाटले. त्यांना वंदन केले. आम्हाला घेण्यासाठी तेथील प्रेम या नावाचा नियोजित प्रतिनिधी विमानतळावर हजर होता. त्याच्याबरोबर आम्ही हॉटेल ब्ल्यू सी मध्ये पोहोचलो.
आमची बाकीची मंडळी अजून यायची होती. त्यांचे विमान हैदराबादहून येणार होते. ते सकाळी साडेनऊ वाजता पोहोचणार होते. तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन चहा नाश्ता घेतला आणि विश्रांती घेतली. दुपारच्या जेवणानंतर तीन वाजता आम्ही अंदमान येथील सेल्युलर जेल ला भेट देण्यासाठी निघालो. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२/४/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा