उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 52मैत्रीपर्व : गुरुदेव आणि लोकमान्य टिळक
सत्य, सुंदर आणि मंगलाचा शोध घेणाऱ्या गुरुदेवांनी आपल्या आनंदी स्वभावाने आणि सकारात्मक वृत्तीने अनेक माणसे जोडून ठेवली होती. अनेक व्यक्तींशी त्यांचे जिवाभावाचे नाते होते. ही सगळी नाती त्यांनी भेटीच्या किंवा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आजन्म जपून ठेवली. अशा व्यक्तींमध्ये स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यासारखी महान व्यक्तिमत्वे होती. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक हे तसे समकालीन. त्यांच्या वयात केवळ पाच वर्षांचे अंतर होते. लोकमान्य त्यांच्या पेक्षा केवळ पाच वर्षांनी जेष्ठ होते पण दोघांमधील मैत्रीचे धागे मात्र घट्ट होते.
या दोन्ही महापुरुषांमध्ये तसे समानतेचे अनेक धागे होते. परंतु ते पाहण्याआधी या दोन्ही महापुरुषांची प्रत्यक्ष भेट कधी झाली ते पाहणे मनोरंजक ठरेल. कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते (१९१७- १८ ). या अधिवेशनाच्या निमित्ताने महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, ऍनी बेझंट, पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासारखी मान्यवर मंडळी तिथे उपस्थित होती. या प्रसंगी गुरुदेवांनी ठाकूरवाड्यात ' विचित्रा ' या नाटकाचा प्रयोग करण्याचे ठरवले. या नाटकात ठाकूरदांची भूमिका स्वतः गुरुदेवांनी केली. गगनेंद्रनाथ, अवनींद्रनाथ, रथिंद्रनाथ ही मंडळी इतर भूमिकांमध्ये होती. हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, ऍनी बेझंट, पंडित मदन मोहन मानवीय ही मंडळी उपस्थित होती. नाटक संपल्यानंतर लोकमान्य टिळक आणि ऍनी बेझंट गुरुदेवांशी बोलण्यासाठी थांबल्या. त्यांच्या बराच वेळ गप्पा सुरू होत्या. लोकमान्य जाण्यासाठी निघाले तेव्हा गुरुदेवांनी अतिशय नम्रतेने त्यांना प्रणाम केला. तेव्हा लोकमान्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे हात हातात घेतले आणि आपल्या मस्तकाशी धरले. लोकमान्यांना गुरुदेवांबद्दल वाटणारा आदर त्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होता. अशी होती ही या दोघांची पहिली संस्मरणीय भेट !
महाराष्ट्रात आणि देशात लोकमान्य टिळकांच्या प्रखर आणि तेजस्वी वाणी आणि लेखणीने लोकांच्या मनात चैतन्य जागृत होत होते आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण होत होता तशाच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये आणि अन्यत्रही गुरुदेवांच्या देशभक्तीपर गीतांनी क्रांतिकारकांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग जागृत होत होते. लोकमान्यांनी आपल्या धारदार लेखणी आणि वाणीने इंग्रजांचा रोष ओढवून घेतला कारण त्यांचे विचार देशातील स्वातंत्र्य चळवळीला बळ देणारे होते. लोकमान्यांच्या तेजस्वी विचारांचे अनुकरण गुरुदेवांनी बंगालमध्ये केले. त्यासाठी त्यांची लेखणी आणि वाणी कार्यरत होती. त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये अंतर नव्हते.
पुण्यामध्ये १८९८ साली प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. याप्रसंगी मदत करण्याऐवजी इंग्रज अधिकाऱ्यांनी निर्दयपणे महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय, अत्याचार केले त्यामुळे व्यथित होऊन गुरुदेवांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करणारा एक खरमरीत लेख ' भारती ' या मासिकात लिहिला होता. नेमका याचवेळी इंग्रज सरकारने लोकमान्यांवर खटला दाखल करून त्यांना दीड वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली होती. अशावेळी गुरुदेव स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. गुरुदेवांनी लोकमान्यांच्या मदतीसाठी बंगालमधील जनतेला मदतीचे आवाहन केले आणि ती मदत गोळा करून पुण्याला पाठवली.
गुरुदेव आणि लोकमान्य टिळक या दोघांनाही एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता. जेव्हा पहिले महायुद्ध अंतिम टप्प्यात आले होते तेव्हा ते जिंकण्यासाठी ब्रिटिशांना भारताची मदत हवी होती. भारतातील नेत्यांना आवाहन करण्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये एका युद्ध परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचे निमंत्रण मात्र लोकमान्य टिळकांना नव्हते. परंतु त्यांच्या विश्वासातील दादासाहेब खापर्डे यांना या परिषदेचे निमंत्रण होते. लोकमान्यांनी त्यांना गुरुदेवांची भेट घेण्याचा सल्ला दिला. तसेच बंगालमधील व्योमकेश चक्रवर्ती, कामिनीकुमार चंदा या मंडळींना देखील या परिषदेचे निमंत्रण होते. ही सगळी मंडळी या युद्धपरिषदेला जाण्यापूर्वी गुरुदेवांना भेटली आणि त्यांचा सल्ला घेतला. गुरुदेवांनी त्यांना या परिषदेत कोणती भूमिका घ्यावी याबद्दल सुयोग्य असे मार्गदर्शन केले. रवींद्रनाथ हे एक महान साहित्यिक असले तरी देशाच्या हिताच्या दृष्टीने विचार करणारे एक थोर पुरुष आहेत याची जाणीव या निमित्ताने सर्वांना झाली.
गुरुदेवांनी राष्ट्रीय चळवळीचा युरोपात प्रसार करावा आणि त्यासाठी ठिकठिकाणी व्याख्याने द्यावी या हेतूने लोकमान्यांनी त्यांना त्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी म्हणून पन्नास हजार रुपये पाठवले होते. परंतु गुरुदेवांनी ती रक्कम नम्रतापूर्वक परत केली आणि त्यांना असा निरोप पाठवला की राष्ट्रीय चळवळीच्या प्रचारार्थ मी युरोपात व्याख्याने देत फिरावे हे माझ्या मानसिक प्रकृतीला मानवण्यासारखे नाही. पुढे या दोघांची मुंबईला भेट झाल्यानंतर या विषयावर त्यांचे मनमोकळे बोलणे झाले. लोकमान्य गुरुदेवांना म्हणाले की तुम्ही राजकीय व्याख्याने देत फिरावे अशी माझी मुळीच इच्छा नाही. भारताचा जो सत्य संदेश जगाला तुम्हाला सांगावासा वाटतो तोच तुम्ही सांगा. तेच तुमचे खरे कार्य आहे. मला वाटते की मी पाठवलेली रक्कम तुम्ही स्वीकारावी. परंतु राजकीय कामासाठी लोकमान्यांना लोकांनी दिलेली रक्कम आपण स्वीकारावी असे गुरुदेवांना वाटले नाही. त्यांनी याबद्दल लिहिताना असे म्हटले आहे की टिळकांची ही निरपेक्ष उदारता गीतेचे रहस्य सांगणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेशी अशीच होती. गीतेवर भाष्य लिहिण्याचा अधिकार अशा उदार व निरपेक्ष वृत्तीच्या महान व्यक्तिमत्त्वालाच असू शकतो.
राष्ट्रीय सभेचे अधिवेशन दिल्ली येथे भरणार होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून गुरुदेवांनी कार्य करावे अशी लोकमान्यांची इच्छा होती. परंतु गुरुदेवांनी सक्रिय राजकारणात भाग घेण्याचे नाकारले. असे असले तरी राष्ट्रीय चळवळीच्या निमित्ताने या महापुरुषांमधील राजकीय आणि सामाजिक विषयांवरील चर्चा सुरूच होत्या. १ऑगस्ट १९२० या दिवशी लोकमान्यांचे निधन झाले. त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी गुरुदेवांचे पुण्यात आगमन झाले. त्यावेळी त्यांनी पुण्यात लोकमान्यांना आदरांजली वाहणारे एक व्याख्यान दिले. लोकमान्यांच्या स्मृती त्यांच्या हृदयात सदैव जागत्या होत्या.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१८/३/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा