उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४९गुरुदेवांची सजीव शिल्पे
गुरुदेवांसारखी प्रतिभासंपन्न माणसे युगायुगातून क्वचितच जन्म घेतात. अशा व्यक्तींचा परिस्पर्श ज्या ज्या गोष्टींना लाभतो, त्या त्या गोष्टींचे सोने होते. मग त्या गोष्टी सजीव असोत की निर्जीव ! त्यांच्या स्पर्शाने निर्जीव गोष्टींमध्ये देखील प्राण फुंकले जातात. शांतिनिकेतन, विश्वनिकेतन आणि श्रीनिकेतन या त्यांच्या संस्था म्हणजे गुरुदेवांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे आणि शिक्षणविषयक विचारांचे मूर्त रूप होत्या. त्या केवळ दगडमातीच्या इमारती राहिल्या नाहीत तर त्यांच्यातून वर्षानुवर्षे चैतन्य खेळत राहिले. शेतीचे, शिक्षणाचे नवनवीन प्रयोग झाले. शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीची पहाट झाली. क्रांती ही केवळ शस्त्रांनीच होत नसते. गुरुदेवांसारखी माणसे आपल्या विचारातून, कार्यातून आणि लेखणीच्या माध्यमातून क्रांती घडवून आणतात. मनामनात जी परिवर्तन घडवून आणते ती खरी क्रांती !
गुरुदेवांच्या विचारांचा वारसा घेऊन अनेक ध्येयवादी विद्यार्थी या संस्थांमधून बाहेर पडले. अनेक शिक्षक आणि संशोधक त्यांच्या विचारांनी भारले गेले. आणि त्यांनी पुढे गुरुदेवांच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. तर त्यांच्या सहवासात जी जी माणसे आली, ती अंतर्बाह्य बदलून गेली. अशा व्यक्तींची अनेक उदाहरणे आहेत. त्यातीलच काही उदाहरणे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. गुरुदेव नावाच्या शिल्पकाराने अशा अनेक सजीव शिल्पांना त्यांनी आकार दिला आणि त्यातून सुंदर मूर्ती घडत गेली.
मागील भागात आपण विनोद दा यांचे उदाहरण पाहिले आहे. विनोद दा यांना चित्रकलेची अतिशय आवड होती. परंतु दुर्दैवाने लहानपणापासूनच त्यांची दृष्टी अधू होती. त्यांची दृष्टी अधू असल्यामुळे कोणत्याही चित्रशाळेत त्यांना प्रवेश मिळत नव्हता. परंतु विनोद दा गुरुदेवांच्या संपर्कात आले. गुरुदेवांनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखली. त्यांच्या अधू डोळ्यातील प्रतिभेचे तेज गुरुदेवांसारख्या व्यक्तीने ओळखले. हा मुलगा पुढे चालून एक उत्तम चित्रकार, मूर्तिकार होऊ शकतो हे त्यांना जाणवले.
आणि त्यांनी विनोद दांना शांतीनिकेतनमध्ये प्रवेश दिला. गुरुदेवांच्या परिस स्पर्शाने त्यांच्यामधील चित्रकार, मूर्तिकार, शिल्पकार घडत गेला. आपल्या वयाच्या अखेरीपर्यंत विनोद दा कार्यरत राहिले. सुंदर चित्रे त्यांनी काढली, अनेक म्युरल्स निर्माण केली, सुंदर मूर्ती घडवल्या. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले.
अनेक विद्यार्थ्यांचे ते आदर्श झाले. अनेकांचे प्रेरणास्थान ठरले.
गुरुदेवांच्या मार्गदर्शनातून घडलेली आणखी एक अशीच व्यक्ती म्हणजे विनायकराव मसोजी. हे विनायकराव मसोजी मुळचे आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरचे. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेत गती होती. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल केले परंतु तेथील पाश्चात्त्य पद्धतीच्या धाटणीचे शिक्षण त्यांना पसंत पडले नाही. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी शांतिनिकेतनमध्ये गेले. तिथे त्यांचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने विकसित झाले. त्या ठिकाणी तेथील प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले जोडीला गुरुदेवांचे मार्गदर्शन होतेच. या ठिकाणी विनायकरावातील उत्तम चित्रकार तर घडलाच पण धातूकला,
एम्बॉसिंग, वूडकट आदी अनेक प्रकार ते शिकले. इसराज या नावाचे वाद्य वाजवायला ते शिकले. शांतिनिकेतनमधील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचं सहभाग असायचा. आपल्या आयुष्यातील तीन दशके ते शांतीनिकेतनमध्ये कार्यरत होते. आधी शिक्षक म्हणून नंतर उपप्राचार्य आणि नंतर प्राचार्य म्हणून त्यांनी मोठी कामगिरी केली. पुढे ते नागपूर येथे स्थायिक झाले.
विनायकराव मसोजी यांच्याप्रमाणेच गुरुदेवांचे प्रेम आणि मार्गदर्शन लाभलेले महाराष्ट्रातील दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे संगीताचार्य भीमराव हसुरकर शास्त्री. त्यांनी ग्वाल्हेरच्या गंधर्व महाविद्यालयातून संगीताचे शिक्षण घेतले. पुढे ते शांतिनिकेतन मध्ये स्थायिक झाले आणि तेथे त्यांनी एक प्रतिभा संपन्न संगीत शिक्षक म्हणून लौकिक प्राप्त केला. विद्यार्थ्यांना ते रवींद्र संगीत शिकवत असत. बंगाली विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांनी बंगाली लिपीत लिहिलेल्या हिंदी गीतांचे दोन खंड संपादित केले.
दीनबंधू सी एफ अँड्रयुज इंग्लंडमधून भारतात आले होते. परंतु भारतीय संस्कृतीशी एकरूप झाले होते. स्वातंत्र्यसंग्रामातही त्यांचा सहभाग होता. महात्मा गांधींशी त्यांची एवढी जवळीक होती की त्यांना मोहन या नावाने हाक मारणारे ते एकमेव होते. ते महात्मा गांधीजी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यातील दुवा होते अत्यंत सेवाभावी असे त्यांचे व्यक्तिमत्व शांतीनिकेतन मधील विद्यार्थ्यांना ते इंग्रजी शिकवत. गुरुदेवांचे वृद्ध बंधू द्विजेंद्रनाथ म्हणून शांतिनिकेतनात राहत होते. अँड्र्यूज त्यांना रिक्षेत बसवून स्वतः रिक्षा ओढायचे आणि शांतिनिकेतनात फिरवून आणायचे.
आपल्या सर्व सहकाऱ्यांबद्दल गुरुदेव फार आदराने आणि प्रेमाने लिहितात. नंदलाल बाबू त्यांना सगळेजण मास्टरमोशाय म्हणत, शिवाय नेपाळचंद्र राय, जगदानंद बाबू, काली मोहन बाबू ,भीमराव शास्त्री हे सगळे त्यांचे सहकारी.
त्यांच्याबद्दल गुरुदेव म्हणतात, " हे माझे सारे कर्मसंगी दारिद्र्यात दिवस काढत होते. इथे केवळ कामाचे कष्टच नव्हे तर शारीरिक- सांसारिक - किती प्रकारचे दैन्य भोगावे लागले त्यांना. प्रलोभनाचा तर इथे प्रश्नच नव्हता. जीवनयात्रेला आवश्यक सोयी नव्हत्या. प्रसिद्धीचीच काय पण भावी उत्कर्षाची ही आशा नव्हती. हल्ली वर्तमानपत्रात जसे प्रसिद्धीचे ढोल बडवले जातात, त्याचाही त्याकाळी कुठे मागमूस नव्हता. लोकांना कधीच कळणार नाही अशा हालात राहून ती दुःखी लपवीत त्यांनी तपस्या केली. पैशाचा किती अभाव होता याची तर कोणालाच कल्पना येणार नाही. त्यांच्या त्या कष्टाची कहाणी कुणाला कळणार नाही की कोणी त्यांचा इतिहासही लिहिणार नाही..."
ही माणसे अत्यंत ध्येयवादी आणि समर्पित वृत्तीने जगली स्वतः गुरुदेव तर किती निरपेक्ष होते नोबेल पुरस्काराची मिळालेली लक्षावधी रुपयांची रक्कम त्यांनी कोणताही लोभ न ठेवता शांतीनिकेतनला अर्पण केली त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांनी शांतिनिकेतनसाठी आणि गुरुदेवांच्या कार्यासाठी प्रचंड त्याग केला. या सगळ्यांची तपस्या आणि दिलेली आहुती एवढी मोठी होती की त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. परिस्थिती कशीही असो, पण आपल्या विद्यार्थ्यांचे जीवन असे घडवायचे की तो पुढे कोणत्याही परिस्थितीत आनंदाने, समाधानाने जगू शकेल आणि जीवनात यशस्वी होईल हे त्यांचे ध्येय होते. आजच्या काळात भरपूर वेतन घेऊन आपल्या कामाला न्याय न देऊ शकणाऱ्यांनी गुरुदेवांच्या आश्रमातील या सहकाऱ्यांचा त्याग डोळ्यासमोर ठेवला पाहिजे तरच त्यांना आपल्या कर्तव्याची थोडी तरी जाणीव होऊ शकेल.
गुरुदेवांना न्यूयॉर्कमध्ये भेटलेला एल्म हर्स्ट हा हा तरुण त्यांना भेटल्यानंतर अंतर्बाह्य बदलून गेला. गुरुदेवांकडून कोणतेही पैशांची अपेक्षा न करता तो भारतात आला आणि ग्राम विकासाचे कार्य करू लागला. स्वतःचे घर साफसूफ करण्यापासून त्याच्या कामाची सुरुवात झाली. रॉबरी ऑफ द सॉइल हा संशोधन पर प्रबंध त्याने लिहिला. त्यात त्याने ग्रामीण भागातील दुरावस्थेचे चित्र संशोधन करून मांडले व त्यावर उपाय सुचवले.
कोणतेही काम करताना त्यामध्ये सौंदर्यदृष्टी ठेवून केले असता ते चांगले होते असा गुरुदेवांचा नेहमीच आग्रह असायचा. त्यामुळे शांतिनिकेतन किंवा श्रीनिकेतनमधील सर्व कामांना व्यवहार्यतेसोबतच सौंदर्यदृष्टीची जोड लाभली होती.
गुरुदेवांना कामाची आणि शिकवण्याची ठोकळे बंद विभागणी कधीही मान्य नव्हती. त्यांच्या शांतीनिकेतनमधील लायब्ररीत कारकुनी करणारे चैतीबाबू संध्याकाळी संगीत भवनात दिलरुबा घेऊन विद्यार्थ्यांसमोर उत्साहाने हजर असायचे. ते वयाने कितीही थकलेले असले तरी त्यांचा हा दिनक्रम अखंडित सुरू होता. त्यांच्या शाळेतील चित्रकलेचे प्राचार्य दिनकर कौशिक दा संध्याकाळी मुलामुलींच्या मेळाव्यात गाण्याच्या बैठकीला हजर असायचे. अमुक एक विषय किंवा विभाग तेवढा माझा. बाकीच्या गोष्टींशी माझा काही संबंध नाही अशासारख्या विचारांना गुरुदेवांचा कायमच विरोध होता.
स्वतः गुरुदेव याचे उत्तम उदाहरण होते. ते युरोपात गेले असताना फावल्या वेळेत चर्मकला शिकले होते. आणि मग श्रीनिकेतनमध्ये त्यांनी त्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. येथील चामड्याच्या वस्तू आज जगभर नावाजलेल्या आहेत. त्यांच्या सुनबाई पॉटरी शिकल्या आणि त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आधुनिक गिलाव्याचे तंत्र शिकवले. सुरेंद्रनाथ कार हे ' जावा ' बेटावरून बाटीक कला शिकून आले होते. मुकुल डे इंग्लंडहून छापखान्याचे तंत्र शिकून आले होते. ते भारतात आल्यानंतर वेगळ्या प्रकारच्या आलेखनाचा छापखाना सुरू झाला. नंदलाल बोस यांच्या मुलाने वूड कट ब्लॉक तयार करण्याची पद्धत सुरू केली. श्रीनिकेतन हे हळूहळू शेती, गोपालन, कुक्कुटपालन याबरोबरच जव्हेरी काम सोन्या-चांदीची कलाकुसर, शिळाछपाई, लाखेवरील कलाकुसर, वस्त्रोद्योग अशा अनेक प्रकारच्या उद्योगांचे केंद्र बनले होते. माणसाच्या व्यावहारिक गरजांबरोबरच त्याची कलेची भूक भागवण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू बनवणे ही श्रीनिकेतनची खासियत होती. या वस्तूंना जगभरातील बाजारात चांगली मागणी होती. गुरुदेवांना फक्त कला आणि कलाकार जगवायचे नव्हते. तर एकूणच समाजात कलादृष्टी वाढावी असे त्यांचे मत होते. श्री, शांती आणि सरस्वती यांचा सुरेख संगम व्हावा असे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यामुळे शांतिनिकेतनमधील विद्यार्थी आणि शिक्षक- प्राध्यापक देखील गुरुदेवांना अपेक्षित असेच घडत गेले. गुरुदेवांनी अशी शिल्पे जाणीवपूर्वक घडवली.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
६/३/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा