माझी अभिजात मराठी माय
अंगावर तिच्या होता शालू भरजरी
हाती होता तिच्या कलश अमृताचा.
शालू असला भरजरी
तरी झाला होता जीर्ण
दुर्लक्ष अन् उपेक्षेने
झाली होती मनी खिन्न.
पाहून तिची अवस्था
अश्रू नयनी दाटले.
तिजसाठी काही करावे
महाराष्ट्र सरकारला वाटले.
अभिजातता तिची तर
पूर्वापारच होती
सामर्थ्याबद्दल तिच्या
मनी जराही शंका नव्हती.
तीच झाली होती
बोल अमृताचा
तिच्यामुळे शब्द श्रीमंत
माझ्या ज्ञानिया तुकयाचा.
करण्या विराजमान तिला
पुन्हा वैभवाच्या शिरी
महाराष्ट्र शासनाने
गाठली केंद्राची पायरी.
केंद्रालाही होतीच
माझ्या मायमराठीच्या
श्रीमंतीची जाणीव.
अभिजाततेचा दर्जा देऊन
केली दूर उणीव.
आभार केंद्राचे
आभार राज्याचे
उजळेल भाग्य आता
माझ्या मायमराठीचे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
६/३/२०२५
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा