मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 55

 उगवतीचे रंग

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 55

मैत्रीपर्व : गुरुदेव आणि पाश्चात्य विचारवंत

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे भारतातील महान व्यक्तींशी ज्याप्रमाणे स्नेहसंबंध होते, तशाच प्रकारचे मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे पाश्चात्य जगतातील शास्त्रज्ञ आणि विचारवंतांशी होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन, एच जी वेल्स हे प्रख्यात लेखक, रोमा रोलाँ हे प्रसिद्ध लेखक आणि तत्त्वज्ञानी यांच्यासारख्या मान्यवरांचा समावेश आहे.

अल्बर्ट आईन्स्टाईन हे जर्मनीतील प्रख्यात सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ. अनेक महत्त्वाचे शोध त्यांच्या नावावर आहेत त्यापैकी विशेष सापेक्षता सिद्धांत, प्रकाशीय विद्युत परिणाम, क्वांटम मेकॅनिक्स यासारखे महत्त्वाचे शोध त्यांच्या नावावर आहेत.  जर्मनीमध्ये नाझींकडून जेव्हा ज्यू लोकांचा छळ झाला, त्याचे चटके त्यांनाही सहन करावे लागले आणि आपला मायदेश जर्मनी सोडून अमेरिकेत स्थलांतर करावे लागले.

आईन्स्टाईन आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ही दोघेही महान व्यक्तिमत्वे.  दोघांमध्ये काही साम्याचे आणि काही फरकाचे मुद्दे आहेत.  गुरुदेव हे महान साहित्यिक तर आईन्स्टाईन हे महान संशोधक होते. गुरुदेव हे महान पौर्वात्य व्यक्तिमत्व. ते भारतीय संस्कृती आणि परंपरांचा आदर करणारे होते. तर आईन्स्टाईन हे सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ आणि एक महान पाश्चात्य वैज्ञानिक, विचारवंत आणि लेखक होते. परंतु आईन्स्टाईन हे केवळ वैज्ञानिक होते असे मानणे चुकीचे होईल कारण त्यांनी वैज्ञानिक शोध निबंधाव्यतिरिक्त तत्त्वज्ञान, राजकारण, समाजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, परमेश्वराचे अस्तित्व अशा विविध विषयांवर लेखन केले.  आईन्स्टाईन यांच्यासारखी कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली व्यक्ती शतकातून एखादीच होत असते.

गुरुदेव आणि आईन्स्टाईन या दोघांमध्ये अठरा वर्षांचे अंतर होते आईन्स्टाईन गुरुदेवांपेक्षा अठरा वर्षांनी लहान होते. परंतु हे अंतर त्यांच्या मैत्रीच्या आड कधीच आले नाही. त्यांच्या तीन ते चार वेळा भेटी झाल्या. त्यांच्यात पत्रव्यवहारही होत होता. दोघेही एकमेकांचा आदर करीत असत. दोघेही नोबेल पुरस्कार विजेते होते. आईन्स्टाईन यांना गुरुदेवांबद्दल प्रचंड आदर होता. ते मोठ्या आदराने त्यांना ' रब्बी टागोर ' असे म्हणत. ज्यू लोक आपल्या धर्मगुरूंना रब्बी असे म्हणतात. 

आपण साधारणपणे असे समजतो की गुरुदेव हे महान साहित्यिक होते आणि आईन्स्टाईन हे प्रख्यात शास्त्रज्ञ. परंतु गंमत म्हणजे आईन्स्टाईन यांनी केवळ वैज्ञानिक निबंध न लिहिता अनेक वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार व्यक्त केले आहेत. या दृष्टीने ते केवळ वैज्ञानिकच नसून साहित्यिकही होते असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे गुरुदेवांनी शिक्षण, काव्य, नाट्य, चित्रकला, ग्रामसुधारणा इ. अनेक प्रांतामध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले. यादृष्टीने ते देखील एक संशोधक होते असे म्हणता येईल. त्यांच्या भूमिका या परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत.

आईन्स्टाईन आणि गुरुदेव यांच्या विविध विषयांवर सखोल चर्चा झाल्या आहेत. तशा या चर्चा वैचारिक किंवा तात्विक स्वरूपातील आहेत. त्यातील काही भाग समजायला देखील कठीण आहे. या चर्चांचे विषय सत्य आणि सौंदर्य, मानवी मन, परमेश्वराचे अस्तित्व, पौर्वात्य आणि पाश्चात्य संगीत असे विविध आहेत. त्यांची या विषयांवरील मते जाणून घेतल्यानंतर या दोन्हीही व्यक्तींची महानता लक्षात येते.  दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत पण आपल्या मताचा कुठेही दुराग्रह नाही. दुसऱ्याच्या मताचा आदर करणे ही प्रमुख गोष्ट त्यांच्या चर्चेतून दिसून येते.

त्यांच्या संगीत विषयावर झालेल्या चर्चेचा काही अंश याठिकाणी देण्याचा मोह होतो. वाद्यवृंदांवर त्यांची चर्चा सुरू असताना एके ठिकाणी आईन्स्टाईन असे म्हणतात की बरेचदा वाद्यवृंद सुरुवातील गोडवा पूर्णपणे खाऊन टाकतो. याविषयी आपले मत व्यक्त करताना गुरुदेव म्हणतात, " सूर आणि वाद्यमेळ हे चित्रातल्या रेषा आणि रंगांसारखे असतात. एखादी साधी रेषा पूर्णपणे सुंदर असू शकेल पण रंग दिल्याने ती कमी महत्त्वाची आणि संदिग्ध वाटू शकते. मात्र रेषा आणि रंग यांच्यात योग्य तो तोल सांभाळला गेला तर म्हणजेच रंगाने रेषांवर मात केली नाही तर त्यांच्या परस्परसंगतीने उत्तम चित्रांची निर्मिती होऊ शकते."
आईन्स्टाईन : वा !फारच सुंदर तुलना आहे. रेषा ही रंगापेक्षाही जुनी असते. असे वाटते की तुमची सुरावट ही आमच्या रचनेपेक्षाही जुनी आहे. जपानी संगीतही तसेच असावे.
गुरुदेव : आपल्या मनावर पडणाऱ्या पाश्चात्य आणि पौर्वात्य संगीताच्या प्रभावाचे विश्लेषण करणे कठीण काम आहे. पाश्चिमात्य संगीताने मी खूपच प्रभावित झालो आहे. मला असे वाटते की ते महान आहे. त्याची सुरावट व्यापक आहे आणि रचनेच्या दृष्टीने ते विलोभनीय आहे. आमचे स्वतःचे संगीत मला मूलतः आवडते ते त्यातील गीतांच्या माधुर्यामुळे. युरोपीय संगीत हे महाकाव्यासारखे आहे. व्यापक पार्श्वभूमी लाभलेले आणि गॉथिक ( Gothik ) आणि रचना असलेले.

 अशाच प्रकारची चर्चा वैज्ञानिक कादंबऱ्यांचे प्रख्यात लेखक एच जी वेल्स यांच्याशी गुरुदेवांच्या युरोपदौऱ्या दरम्यान झाली. लहानपणी झालेल्या अपघातांमुळे वेल्स यांना अंथरुणाला खिळून राहावे लागले होते. यादरम्यान त्यांनी बरेच वाचन केले आणि त्यातूनच त्यांच्यातील वैज्ञानिक कथा लिहिणारा लेखक आकाराला आला. वैज्ञानिक तत्त्वांना काल्पनिकतेची जोड देऊन त्यांच्या अनेक विज्ञान कथा आकाराला आल्या आणि रसिकमान्य झाल्या. त्यामध्ये द टाईम मशीन, द इनविजीबल मॅन, द आउटलाइन ऑफ हिस्टरी, मॉडर्न युटोपिया या त्यांच्या गाजलेल्या कलाकृती आहेत. आपल्या लेखन कारकिर्दीच्या सुरुवातीला वेल्स हे युद्धाचे समर्थन करणारे होते परंतु जेव्हा त्यांनी महायुद्धाचे भयंकर परिणाम पाहिले तेव्हा त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला आणि ते युद्धविरोधी बनले.

गुरुदेवांचे आणि वेल्स यांची १९३० च्या जून महिन्यात जिनिव्हा येथे भेट झाली. त्याप्रसंगी त्यांच्यात आधुनिक विज्ञानामुळे जग जवळ येत चालले आहे परंतु त्याचे कोणते सुपरिणाम आणि दुष्परिणाम होऊ शकतात यासह विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये भाषा, संगीत, साहित्य, शिक्षण यासारख्या विषयांचाही समावेश होता. 

१९३० मध्ये त्यांची गाठ प्रसिद्ध पाश्चात्य विचारवंत आणि लेखक रोमा रोलाँ यांच्याशी पडली. रोमा रोलाँ हे फ्रेंच कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांना त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. गुरुदेव आणि रोमा रोलाँ या दोन महान नोबेल पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची भेट झाली आणि त्यांची विविध विषयांवर चर्चा झाली. रोमा रोलाँ हे युद्धविरोधी होते.  गुरुदेव आणि रोमा या दोघांनी पहिल्या महायुद्धाची भीषण परिणाम पाहिले आणि अनुभवले होते. साहित्य, शिक्षण, धर्म इ. विविध विषयांवर त्यांची सखोल चर्चा झाली. त्याशिवाय त्यांचातील पत्रव्यवहार वेळोवेळी सुरूच होता. अशा प्रकारे त्या काळातील महान भारतीय व्यक्तींबरोबरच पाश्चात्य जगातील महान व्यक्तिमत्वे गुरुदेवांच्या संपर्कात होती. त्यांनी हा मैत्रीचा धागा अखंड टिकवून ठेवला होता. गुरुदेवांच्या साहित्याबद्दल आणि त्याच्या विचारांबद्दल या सर्वांनाच खूप आदर होता.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
१/४/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...