मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४८

 उगवतीचे रंग

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४८

कर्मयोगी रवींद्रनाथ

कॅलिडोस्कोप किंवा शोभादर्शक यंत्र आपण सर्वांनी पाहिले असेल किंवा हाताळले असेल. ते आपण जसजसे फिरवू, तसतश्या वेगवेगळ्या नयनरम्य मनोहर आकृत्या दिसायला लागतात. प्रत्येक वेळी वेगळी आकृती ! गुरुदेव रवींद्रनाथांचे व्यक्तिमत्व देखील मला असेच कॅलिडोस्कोपसारखे वाटते. प्रत्येक वेळी वेगळे दिसते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपण शोध घेऊ तेवढा कमी. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या आकाशात दिसणाऱ्या सगळ्या रंगछटा कागदावर प्रकट करणे थोडेच शक्य असते ! तसाच हा ' रवी ' ! त्याची किरणे इतकी विविध रंगांची आणि मनोहारी की शब्दात पकडणे अवघडच ! 

तुकाराम महाराजांच्या शब्दात त्यांच्याबद्दल बोलायचे तर ' बोले तैसा चाले 'असे हे व्यक्तिमत्व होते. समाजात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा असणारा, शिक्षणात क्रांतिकारक बदल घडवून आणणारा, ग्रामविकासाचे विविध प्रकल्प हाती घेणारा, शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सदोदित प्रयत्नशील असणारा, साहित्यक्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारा, संगीत क्षेत्रातील जुन्या नव्या परंपरांची सांगड घालणारा, चित्रकलेतील प्रयोग करून स्वतःची नवीन शैली निर्माण करणारा हा अवलिया होता. केवळ पुस्तकी पांडित्य त्यांच्या जवळ नव्हते. किंबहुना पुस्तकी पांडित्याचा त्यांना तिटकाराच होता. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांनी केवळ सांगितली नाही किंवा तिचा व्यासपीठावरून उपदेश केला नाही. ' आधी केले मग सांगितले ' असा हा कर्मयोगी. या लेखापासून त्यांचा उल्लेख ' गुरुदेव ' म्हणूनच आपण करूया. 

गुरुदेवांचा काळ अनेक अंधश्रद्धा आणि जाचक रुढी परंपरा यांनी प्रभावित झालेला होता. अशा या काळात आपल्या मुलाचा रथिंद्राचा विवाह त्यांनी एका विधवा मुलीशी केला. त्यांनी ठरवले असते तर अनेक चांगल्या मुली त्यांच्या मुलासाठी चालून आल्या असत्या परंतु गुरुदेव केवळ इतरांना फुकाचा उपदेश करणाऱ्यातले नव्हते. त्यांनी स्वतःच एका विधवेशी आपल्या मुलाचा पुनर्विवाह करून समाजापुढे आदर्श घालून दिला. या मुलीचे नाव प्रतिमा. १९१० मध्ये ही प्रतिमा गुरुदेवांची सून म्हणून आली. त्यावेळी ती अगदी लहान होती परंतु शांतीनिकेतनशी आणि गुरुदेवांच्या कार्याशी ती एकरूप झाली.  दुर्दैवाने तिला अपत्य होऊ शकले नाही परंतु शांतिनिकेतनमधील मुलांची ती आई झाली. गुरुदेवांवर सुद्धा तिने आईचीच माया केली.  गुरुदेवांच्या पत्नी मृणालिनीदेवी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षीच त्यांना सोडून गेल्या. त्यावेळी मुले लहान होती. आणि गुरुदेवांचा संसार उघड्यावर पडला होता. हा संसार सांभाळण्याचे महान कार्य या प्रतिमादेवीने केले.

शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन या गुरुदेवांनी स्थापन केलेल्या दोन महत्त्वाच्या संस्था. शांतिनिकेतनमध्ये बालविकासाचे कार्य चाले तर श्रीनिकेतनमध्ये ग्रामविकासाचे कार्य चाले. प्राचीन काळातील ऋषींनी नुसती वेदपुराणे लिहिली नाहीत तर शेती देखील केली. त्यांचे हात मातीत मळले. मातीत त्यांनी घाम गाळला. त्यांचे जीवन म्हणजे उक्ती आणि कृती यांचा सुरेख संगम होता. त्याच ऋषीकुलांचा वारसा सांगणाऱ्या परंपरेतील आधुनिक ऋषी म्हणजेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. 

तसे पाहिले तर गुरुदेवांचे घराणे हे जमीनदार घराणे होते परंतु सामान्य शेतकऱ्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या सुखदुःखाशी ते एकरूप झाले होते म्हणूनच स्वतः शेतीत राबण्यासाठी, त्यात घाम गाळण्यासाठी ते पुढे सरसावले. त्यात त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. त्यांनी नुसतीच शेती केली असे नाही तर ते त्यातील उत्तम जाणकारही होते आणि आपल्या कृषीविषयक प्रयोगातून त्यांनी अनेक चांगले निष्कर्ष आपल्या विद्यार्थ्यांपुढे आणि शेतकऱ्यांपुढे ठेवले. 

जमीन किंवा शेती ही आपली आई आहे. तिला आपण जेवढे देऊ त्यापेक्षा अनेक पटींनी  ती आपल्याला ते परत देते. त्यामुळे या काळया आईची हात राबवून मशागत कशी करावी याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. ते केवळ धरतीची गाणी गाणारे भाट नव्हते. दौत आणि औत या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत या मताचे ते होते परंतु दुर्दैवाने इंग्रजी सत्ता आल्यानंतर इंग्रजांनी दौत आणि औत वेगळे केले. शेतकऱ्याचा आणि शिक्षणाचा संबंध तोडला. शहरात इंग्रजी शिक्षण घेणारी मुले शेतात राबायला किंवा कष्ट करायला कमीपणा मानू लागली. शहरी संस्कृती आणि ग्रामीण संस्कृती यात अंतर पडत गेले आपल्या समाजाचा किंवा देशाचा विकास करायचा असेल तर आधी खेड्यांचा विकास झाला पाहिजे हे तत्व गांधीजींनी प्रतिपादन करण्याच्या आधी अनेक वर्षे गुरुदेवांनी सांगितले होते. 

गुरुदेवांनी ठरवले असते तर आपल्या मुलाला तत्कालीन श्रीमंतांप्रमाणे इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी पाठवले असते. परंतु त्याने कृषीविषयक शिक्षण घेऊन ग्रामीण भागात काम करावे आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य करावे असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी त्याला कृषीविषयक आधुनिक शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला पाठवले. शेतीचे नवनवीन प्रयोग अमेरिकेमध्ये होत होते. शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पादन वाढवले पाहिजे. त्यासाठी रसायनशास्त्राचे ज्ञान त्यांनी करून घ्यायला हवे असे त्यांना वाटत होते. नवी बीजे पेरा, नवीन अवजारे वापरा, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा असा नव्या युगाचा मंत्र या दार्शनिकाने शेतकऱ्यांना दिला. 

परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालणारा हा आधुनिक ऋषी होता. भूतकाळाला वर्तमानकाळाशी जोडणारा एक अनोखा दुवा होता. समाजाच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणारा हा कर्मयोगी होता. त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात पदार्थविज्ञानशास्त्रावर ग्रंथरचना केली. बुद्धीच्या विकासासाठी विज्ञान विचार करणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. विश्वभारतीतल्या प्रमथनाथ सेनगुप्त या फिजिक्सच्या प्राध्यापकांना बरोबर घेऊन विश्वपरिचय नावाचा आधुनिक विज्ञान कोश त्यांनी तयार केला. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात हातात जपमाळ घेऊन न बसता अखंडपणे कार्यरत राहणारा हा कर्मयोगी होता.

' मऊ मेणाहुन आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे ' ही उक्ती सार्थ करणारे हे व्यक्तिमत्व होते. मातीत रमणारी ही बोटे काव्यलेखन आणि गायन वादनातही रमायची. घरामध्ये पाहुणे असतील तर गृहिणीला स्वयंपाकातही मदत करायची. अशा या नाजूक आणि कलाप्रेमी बोटांसोबतच कुस्तीचे डावपेच लढू शकणारे बलदंड बाहू देखील त्यांना लाभले होते. गुरुदेवांचे शरीर एखाद्या पंजाबी शेतकऱ्याप्रमाणे धडधाकट होते. त्यांना मल्लविद्या शिकण्यासाठी त्यांच्या वडिलांनी एक पहिलवान सुद्धा ठेवला होता. इथे भगवान कृष्णाची आठवण येते. कृष्णाची नाजूक बोटे बासरीचे मधुर स्वर देखील छेडत असत आणि अनेक राक्षसांना आणि मल्लांना अस्मान दाखवणारे त्याचे बळकट बाहू देखील होते.

प्रख्यात वनस्पती शास्त्रज्ञ डॉ जगदीशचंद्र बोस हे गुरुदेवांचे घनिष्ठ मित्र होते. पद्मा नदीत पद्मा नावाच्या आपल्या आवडत्या बोटीत बसून गुरुदेवांनी आपल्या आयुष्याची काही वर्षे काढली. या काळात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कष्टकऱ्यांच्या सुखदुःखांशी ते एकरूप झाले आणि याच काळात त्यांची साहित्य निर्मिती देखील झाली. या काळात शनिवार रविवारी डॉ जगदीशचंद्र बोस त्यांच्याकडे बोटीवर मुक्कामी असत. गुरुदेवांची नवीन कथा, कविता किंवा नाटक यांचे ते प्रथम वाचक किंवा श्रोते असत. दोघेही एका दृष्टीने संशोधक होते एक वनस्पतींचे रहस्य शोधणारा आणि दुसरा मानवी जीवनाचेच गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारा.

विद्यार्थ्यांना मातृभाषेतच शिक्षण दिले पाहिजे. इंग्रजीतले ज्ञानभांडार, तत्त्वज्ञान, विचारधन मातृभाषेत विद्यार्थ्यांसाठी खुले केले पाहिजे असे त्यांचे मत होते. परंतु ते केवळ बोलणाऱ्यातले नव्हते. उत्तम इंग्रजी जाणत असताना सुद्धा व्यासपीठावरून ते बंगाली भाषेतच श्रोत्यांशी संवाद साधत. कलकत्ता विद्यापीठामध्ये पदवीदान समारंभात बंगालीतून भाषण करणारे गुरुदेव हे पहिले भारतीय विचारवंत होते. त्यावरून त्यांची तथाकथित इंग्रजाळलेल्या शिक्षित लोकांनी कुचेष्टा केली. परंतु गुरुदेवांना त्याची पर्वा नव्हती. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते गुरुदेवांचे !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३/३/२०२५
 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )




















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...