उगवतीचे रंग
एक अफलातून गाणं
आठ नऊ वर्षांपासून एका गाण्यानं लोकांना वेड लावलं आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी हे गाणं असतं. बरं हे गाणं कोणत्याही चित्रपटातलं नाही, तरी ते लोकांच्या तोंडी आहे. असं कोणतं गाणं आहे बुवा हे ? तर हे गाणं आहे रोज आपल्या दाराशी येणाऱ्या आणि कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर वाजणारं ! ' गाडीवाला आया घरसे कचरा निकाल ' हेच ते जादुई गाणं. सकाळी एकदा त्याचे स्वर कानावर पडले की दिवसभर ते मनात घॊळत राहतं. आमच्या दारावर भाजी विकण्यासाठी येणारा एक भाजीवाला या चालीवर भाजी विकत घेण्यासाठी आवाहन करताना पाहून माझी एकदा मोठीच करमणूक झाली होती. तो म्हणायचा, ' भाजीवाला आया ताई पैसे निकाल '
सुरुवातीला तर हे गाणं ऐकून माझी मोठीच करमणूक झाली होती. या गाण्याचा आवाज मला अमिताभने गायलेल्या गाण्यासारखा वाटायचा. आणि संगीत तर अफलातूनच. मधूनच त्याला दिलेला, ' तो क्या करे भैय्या ' सारख्या शब्दांचा तडका त्याची मजा वाढवतो. साधी सोपी रचना लोकांना आवडते. ती लोकप्रिय होते आणि त्यांच्या लक्षातही राहते. माधुरी दीक्षितचं ते गाणं नाही का ? एक दो तीन चार पाच ... ' बाकी काही असो पण सगळ्या लहान मुलांचे अंक पाठ झाले त्यामुळे ! तसंच हे गाणं. सोप्या शब्दात आणि मनोरंजक पद्धतीने लोकांना स्वच्छतेचं महत्व सांगणारं !
या गाण्याच्या जन्माची कथाही तितकीच रंजक आहे बरं का ! आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून बोलताना जनतेला स्वच्छता अभियानाचे आवाहन केले होते. आपलं गाव, शहर, देश स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहभाग द्यायला हवा अशा प्रकारचं हे आवाहन होतं. ते ऐकलं सगळ्या देशवासीयांनी. पण त्या शब्दांनी एका माणसाच्या मनात घर केलं. ती व्यक्ती होती मध्य प्रदेशातील एका अत्यंत दुर्गम भागात राहणारे एक शिक्षक. श्याम बैरागी हे त्यांचं नाव. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी काय करता येईल या विचारांनी त्यांच्या मनात घर केलं होतं. मंडला जिल्ह्यातील दुर्गम भागातील एका शाळेत शिक्षक असणारे हे श्याम बैरागी मंडला येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याना जाऊन भेटले. स्वच्छता अभियानासाठी एखादं गाणं लिहिलं तर चालेल का असा प्रश्न त्यांनी मुख्याधिकाऱ्याना केला. ते मुख्याधिकारी म्हणाले की काही हरकत नाही. पण गाणं असं हवं की ते गाडीवर वाजवता यायला हवं. लोकांना कचरा आणा म्हणून ओरडून सांगण्याची गरज पडायला नको. बैरागी हे उपक्रमशील आणि कल्पक शिक्षक. ते लगेच कामाला लागले. यापूर्वीही लेखनाचा अनुभव त्यांना होताच. मग काय झालं गाणं तयार ! साध्या सोप्या शब्दात. या गाण्याला चालही लावली ती श्याम बैरागी यांनीच. आणि त्यातील भारदस्त आवाजही त्यांचाच ! मध्य प्रदेशातील मंडला नगरपालिकेच्या कचरा गाडीवर हे गाणं वाजायला लागलं. ही गोष्ट आहे २०१६ मधील. पाहता पाहता ते लोकांच्या ओठी रुळलं. मग या गाण्याची व्याप्ती आणि लोकप्रियता वाढतच गेली. संपूर्ण मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान आदी राज्यातही हे गाणं वाजू लागलं. रोज सकाळी आपल्या घरातील केरकचरा टाकून द्या. आपलं घर, परिसर स्वच्छ ठेवा असं आवाहन लोकांना करू लागलं. कचरा गाडी आणि हे गाणं एक समीकरण झालं.
यापूर्वी कचरा गोळा करणाऱ्या गादीवर एक घंटा बसवलेली असायची. ती घंटा वाजवून लोकांना कचरा टाकण्याचं आवाहन केलं जायचं. अजूनही आपण त्या गाडीला घंटागाडीच म्हणतो. पण आता जवळपास प्रत्येक गावात घंटेच्या ऐवजी हे गाणं गाडीवर वाजतं. कोरोनाच्या काळात तर स्वच्छतेला अपार महत्व होतं. तसं ते कायमच आहे. पण कोरोना काळात तर या गाण्यानं लोकांना स्वच्छतेचं महत्व अगदी तीव्रतेनं जाणवून दिलं.
या गाण्याची लोकप्रियता इतकी वाढली की काही शाळांच्या वार्षिक समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये त्यावर नृत्य केलं जाऊ लागलं आणि बच्चेकंपनी त्यातून स्वच्छतेचा संदेश लोकांना देऊ लागली. अनेकांनी यु ट्यूबवर या गाण्यांचे व्हिडीओ करून टाकले. २२ देशातील लोकांनी हे गाणं यु ट्यूबवर पाहिलं. या गाण्याला ६ मिलियन व्ह्यूज मिळाले.
पण पण पण....! ज्यानं हे गाणं लिहिलं तो बिचारा बाजूलाच राहिला. त्याला ना सन्मान मिळाला ना पैसे. बऱ्याच जणांना तर त्याचं नावही माहिती नव्हतं. त्याचं कारण म्हणजे श्याम बैरागींनी आपल्या गाण्याचा कॉपीराईट घेतला नव्हता. त्यांना जेव्हा या बाबतीत विचारलं गेलं की तुम्ही यासाठी अर्ज का करत नाही ? तेव्हा ते म्हणाले, ' अर्ज करून सन्मान मिळणार असेल तर तो काय कामाचा ? अशा गोष्टींची दखल स्वतःहूनच सरकारने घ्यायला हवी. शिवाय आपण सर्वांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपलं गाव सुधारण्यासाठी स्वतःहूनच काहीतरी करायला हवे. स्वच्छता अभियान ही संपूर्ण समाजाची चळवळ व्हायला हवी. ' खरोखरच किती मोलाचे आणि तळमळीचे विचार मांडले आहेत श्याम बैरागी यांनी.
कचरा मग तो घरात किंवा परिसरात कुठेही असो, पडून राहता उपयोगी नाही. त्याची योग्य विल्हेवाट लावलीच पाहिजे. आता आपल्याला कचरा टाकायला लांब कुठेही जायला लागत नाही. फक्त कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा असे नीट वर्गीकरण करायचे आणि गाडी आली की कचरा टाकून मोकळे व्हायचे. कचरा मग तो मनातला असो की घरातला, राहू देता उपयोगी नाही. ' तोरा मन दर्पन कहलाये ' असं एक सुंदर गाणं आहे. आपलं मन हेच आरसा. ते निर्मळ असलं तरच स्वच्छ प्रतिबिब दिसेल. म्हणून तर ' देख देख देख तू यहाँ वहा न देख...गाडीवाला आया घरसे कचरा निकाल. '
Ⓒ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२८/३/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा