उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 54मैत्रीपर्व : गुरुदेव, स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद
१९ व्या आणि २० व्या शतकाचे वैशिष्ट्य असे म्हणता येईल की १९ व्या शतकाच्या अखेरीस आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या देशात ज्या महापुरुषांनी जन्म घेतला, त्यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबरच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, सुभाष बाबू यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता. या अर्थाने हे महापुरुषांचे युग होते असे म्हणता येईल. या सर्व महापुरुषांच्या वयात थोडेफार अंतर असले तरी ते सगळे समकालीनच होते. त्यापैकी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाष बाबू ही मंडळी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी राजकीय कार्यात सक्रिय होती. आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि योगी अरविंद यांनी देखील भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. योगी अरविंद तर क्रांतिकारक होते. परंतु नंतर त्यांच्या कार्याची आणि प्रयत्नांची दिशा बदलली. स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव यांच्यात साम्य हे होते की या दोघांनी भारतीय संस्कृतीचा देशात आणि विदेशात प्रसार आणि प्रचार केला.
या सगळ्या महापुरुषांमध्ये एक समान धागा होता तो म्हणजे ही सगळी मंडळी गुरुदेवांच्या कवितांची चाहती होती. एवढी एकच गोष्ट गुरुदेवांच्या कवितांचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे असे मला वाटते. स्वामी विवेकानंदांनी तर गुरुदेवांच्या कवितांचे स्वतः गायन केले. रवींद्र संगीतांचे ते चाहते होते. आपल्या काही कविता गुरुदेवांनी स्वामीजींना नोटेशनसह शिकवल्या होत्या.
पुढील काळात स्वामीजींच्या शिष्या भगिनी निवेदिता या नंतर गुरुदेव आणि स्वामी विवेकानंद यांच्या भेटीमधील आणि संपर्कातील दुवा बनल्या. १८९८ साली मिस मार्गारेट नोबल स्वामी विवेकानंदांचे शिष्यत्व स्वीकारून भारतात आल्या आणि भगिनी निवेदिता म्हणून त्यांच्या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. याच सुमाराला कलकत्त्यामध्ये प्लेगची भयंकर साथ आली होती. या साथीतून लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी भगिनी निवेदिता सक्रिय होत्या. त्यांच्या याच कार्यामुळे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचा संपर्क आला आणि एकमेकांशी दृढ परिचय झाला. भगिनी निवेदितांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी मग गुरुदेव, जगदीशचंद्र बोस, प्रफुल्लचंद्र राय, यदुनाथ सरकार आदी मंडळी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येऊ लागली.
हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते. तिथे भारतीय संस्कृतीची पताका फडकवत साऱ्या विश्वसमुदायाला मानवतेच्या सूत्रात एकत्र बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या या प्रयत्नांचा प्रचंड जयजयकार झाला. उपनिषदातील तेजस्वी विचारांचा परिचय त्यांनी जगाला करून दिला. उपनिषदांच्या शिकवणुकीकडे डोळे उघडून पहा, समर्थ व्हा. पौरुषत्वाचा संचार तुमच्या अंगी येऊ द्या. उपनिषदात काय सांगितले आहे ते डोळे उघडून पहा. त्या प्रकाशमय, ज्ञानदायी आणि बलदायी ग्रंथांकडे वळा असा संदेश त्यांनी आपल्या विचारातून जगाला दिला. त्यांच्या शिकागो येथील या विश्वविजयी परिषदेनंतर त्यांचे भारतात परतणे म्हणजे भारतासाठी एक शुभ शकून आहे असे गुरुदेवांना वाटले आणि ते खरेच होते.
स्वामीजींनी नंतर आपल्या कार्याच्या विस्तारासाठी संन्याशांचा संघ स्थापन केला आणि त्या माध्यमातून हिंदू धर्म जागृतीच्या चळवळीला प्रारंभ केला. असे करताना ते केवळ जुन्या धर्मकल्पना किंवा रुढीपरंपरांना चिकटून बसले नाहीत तर पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या या प्रयत्नांचे गुरुदेवांना कौतुक होते. स्वामीजी तरुणांना स्वाभिमान आणि स्वावलंबनाची शिकवण देत होते ही गोष्टही गुरुदेवांना अतिशय आवडणारी होती. किंबहुना त्यांचेही जीवनध्येय तेच होते. स्वामीजींप्रमाणेच गुरुदेवांनी उज्वल भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रचार आणि प्रसार केला. स्वामीजींच्या अल्प आयुष्याच्या तुलनेत गुरुदेवांना या कार्यासाठी दीर्घायुष्य लाभले.
योगी अरविंद हे गुरुदेवांपेक्षा वयाने अकरा वर्षांनी लहान होते परंतु त्यांची वैचारिक प्रगल्भता जबरदस्त होती. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षीच इंग्लंडला पाठवले. ते अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे आयसीएस परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकले असते परंतु हेतूपुरस्सर त्यांनी त्या परीक्षेत घोडेस्वारीची परीक्षा देणे टाळले आणि मुद्दाम अनुत्तीर्ण झाले कारण त्यांना इंग्रजांची चाकरी करायचीच नव्हती. पुढे त्यांनी काही काळ बडोद्याच्या सयाजीराव महाराजांकडे सेवा केली आणि नंतर काही काळ इंग्रजी आणि फ्रेंच भाषेचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. पुढे त्यांनी ' वंदेमातरम ' या इंग्रजी दैनिकाचे संपादन केले आणि विविध विषयांवर लेखन करून बंगाली तरुणांमध्ये नवचैतन्य जागृत करण्याचे कार्य केले.
त्यांचा कोणताही गुन्हा नसताना इंग्रजांनी त्यांना एका बॉम्ब हल्ल्याच्या खटल्यात गोवले होते. त्यातून दोषमुक्त झाल्यानंतर ते परागंदा झाले. पण ते पळून वगैरे गेले नव्हते तर त्यांनी पाँडेचेरीला प्रयाण केले आणि तेथे जवळपास ४० वर्षे योगसाधना केली आणि त्यातून अध्यात्मातील एका उच्च अवस्थेपर्यंत त्यांचा प्रवास झाला. इथेच गुरुदेवांची आणि त्यांची पुन्हा भेट झाली यावेळी गुरुदेव परदेश दौऱ्यासाठी निघाले होते परंतु त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी विश्रांती घेण्याचे ठरवले आणि त्यादरम्यान योगी अरविंद यांची भेट घेण्याचे निश्चित केले. त्या काळात योगी अरविंद आपल्या ध्यान साधनेमुळे कोणालाही भेटत नव्हते. योगी अरविंद यांच्या फ्रेंच शिष्य मीरा अल्फासा त्यावेळी आश्रमाचे काम पाहत होत्या. त्यांना माताजी म्हणून सर्व ओळखत होते. गुरुदेवांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि योगी अरविंद यांच्या भेटीची विनंती केली. रवींद्रनाथ आपली भेट घेऊ इच्छित आहेत हे कळल्यानंतर योगी अरविंद यांनी आपले सर्व नियम बाजूला ठेवून गुरुदेवांची भेट घेतली. योगी अरविंदांकडे पाहिल्यानंतर पहिल्याच दृष्टिक्षेपात गुरुदेवांना त्यांच्या उच्च अध्यात्मिक साधनेची जाणीव झाली. त्यांनी इतर योग्यांप्रमाणे आपल्या देहाला क्लेश दिले नव्हते तर त्यांच्या चेहऱ्यावर शांत आणि सौंदर्यपूर्ण असे हास्य आणि तेज विराजमान होते. एका योग्याची ती तेजस्वी मुद्रा होती. त्यांची ती आत्मसाक्षात्कारी अवस्था पाहिल्यानंतर गुरुदेवांनी त्यांना ' अरविंद रोबिंद्रेर लह नमस्कार ' ( हे अरविंदा, तुला रवींद्रचा नमस्कार असो ) असे मनातल्या मनात म्हटले आणि त्यांचा निरोप घेतला. योगी अरविंद गुरुदेवांच्या कवितांचे चाहते होते. त्यांनी गुरुदेवांना साक्षात्कारी कवी म्हटले आहे.
स्वामी विवेकानंद योगी अरविंद आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या तिघांनाही हे माहिती होते की राजकारण हा काही मानवाच्या विकासाचा आणि कल्याणाचा मार्ग नाही. माणूस घडवणे हे महत्त्वाचे आहे. आज माणूस जाणिवेच्या ज्या पातळीवर उभा आहे त्यापेक्षाही अधिक पुढच्या पातळीवर किंवा पायरीवर गेल्याशिवाय त्याला पुढील गोष्टी नीट दिसणार नाही किंवा परिस्थितीचे योग्य आकलन होणार नाही याबाबत या तिघाही महामानवांचे एकमत होते. हेच त्यांचे मोठेपण आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२४/३/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा