उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 53मैत्रीपर्व : गुरुदेव आणि महात्मा गांधी
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी. थोर देशभक्त असलेल्या या दोन्ही नेत्यांची १९१५ च्या मार्च महिन्यात गाठ पडली आणि त्यांच्यामध्ये असलेल्या काही वैचारिक मतभेदांशिवायही मैत्री आयुष्यभर कायमस्वरूपी टिकून राहिली. गांधीजींना ' महात्मा ' म्हणून संबोधले ते गुरुदेवांनीच. आणि रवींद्रनाथांना ' गुरुदेव ' ही अतिशय सार्थ उपाधी दिली ती गांधीजींनी. या दोघांची महानता एवढी की त्यांनी एकमेकांना दिलेल्या उपाधी त्यांच्या मृत्यूनंतर आजही चिरंतन आहेत आणि कायम राहतील.
गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांची मुले तिथे त्यांच्याच फिनिक्स या आश्रमात शिकत होती. परंतु ते जेव्हा १९१५ मध्ये भारतात परत आले तेव्हा आपल्या मुलांच्या शिक्षणाचे कसे होईल याची काळजी त्यांना लागून राहिली होती. त्यावेळी दिनबंधू अँड्र्यूज यांनी त्यांना तुम्हाला अपेक्षित असे शिक्षण देणारी शिक्षणसंस्था भारतातच आहे आणि तिचे नाव शांतीनिकेतन असे सुचवले. शिक्षणाबद्दल आपल्यासारखाच विचार करणारी कुणीतरी व्यक्ती भारतात आहे हे पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यानुसार गांधीजी शांतिनिकेतनला भेट देण्यासाठी आले आणि शांतिनिकेतनचे आणि गुरुदेवांचे कार्य पाहून भारावून गेले. आणि तेव्हापासून ते दोघेही मित्र झाले ते कायमचेच ! त्यांची मैत्री एवढी घट्ट होती की १९४० साली जेव्हा गुरुदेवांना जाणवले की आपला मृत्यू आता जवळ आला आहे, तेव्हा त्यांनी गांधीजींना शांतीनिकेतनची जबाबदारी घेण्याची विनंती केली आणि गांधीजींनी सुद्धा शांतिनिकेतन हे माझे घरच आहे, मी त्याची जबाबदारी घेईन, आपण कोणतीही काळजी करू नका असे गुरुदेवांना आश्वस्त केले.
गुरुदेव आणि महात्मा गांधी या दोघांमध्ये समानतेचे अनेक धागे आहेत. दोघेही थोर देशभक्त. मातृभूमीसाठी कोणताही त्याग करण्याची दोघांचीही तयारी. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा या दोघांनाही अभिमान. दोघेही स्वदेशीचे पुरस्कर्ते. भारताचा विकास व्हायचा असेल तर ग्रामीण भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे या गोष्टीवर या दोघांचेही एकमत होते. १९०५ मध्ये झालेली बंगालची फाळणी आणि तिचे दुष्परिणाम गुरुदेवांनी अनुभवले होते. तसेच १९२१ मध्ये कलकत्त्यात भीषण जातीय दंगल उसळल होती. त्यातून दोन समुदायांमध्ये तेढ वाढली होती. या दंगलीची भीषणता आणि त्यातील क्रौर्य पाहून हे दोन्हीही महापुरुष व्यथित झाले होते. Divide and rule म्हणजे फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिश सरकारची नीती या दोघांनाही मान्य नव्हती. तिचा विरोध दोघेही आपापल्या पद्धतीने करीत होते.
या दोघांची जडणघडण मात्र वेगळ्या कौटुंबिक आणि सामाजिक वातावरणात झाली होती. त्याचा परिणाम त्यांच्या विचारसरणीवर झाला होता. गुरुदेवांच्या जोरासांको वाड्यात नाट्य, काव्य आणि विविध कलांची उपासना होत होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये गुरुदवांना लहानपणापासूनच रस होता. अभिजात रसिकता गुरुदेवांच्या व्यक्तिमत्वात काठोकाठ भरली होती. दुर्दैवाने गांधीजींना अशा प्रकारची पार्श्वभूमी लाभली नव्हती. त्यांच्या घरातील वातावरण कर्मठ आणि धार्मिक होते. त्यामुळे गांधीजी मौनात आनंद मानणारे होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणि स्वभावातील काहीसा रुक्षपणा त्यामुळे आला असावा.
सत्य, शिव आणि सुंदर ही भारतीय संस्कृतीची त्रिसूत्री. या तीन तत्त्वांची आराधना आणि उपासना भारतीय समाज प्राचीन काळापासून करत आला आहे. म्हटलं तर ही संस्कारत्रयी ! तिचा संस्कार गुरुदेवांच्या मनावर बालपणापासून झालेला होता. गांधीजींचा सत्य आणि शिव या दोन तत्त्वांवर अधिक भर होता तर गुरुदेवांचा त्या जोडीलाच सौंदर्यावरही भर असायचा. सत्य आणि शिवाची उपासना तर करायचीच परंतु त्याच्या जोडीला सौंदर्यवादी दृष्टिकोनही असायला हवा. त्यातूनच मानवाची रसिकता, सौंदर्यदृष्टी प्रत्ययास येते असे गुरुदेवांचे मत होते. त्या दोघांमधील एक प्रसंग त्यांच्या या दृष्टीकोनाची साक्ष म्हणून सांगितला जातो. तो कितपत खरा आहे याची माहिती नाही. परंतु गुरुदेवांचा सौंदर्यवादी दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी तो महत्त्वाचा ठरतो.
गांधीजी एकदा शांतीनिकेतन मध्ये राहायला गेले होते त्यावेळेसची ही गोष्ट आहे. गांधीजी नियमितपणे रोज फिरायला जात. त्यावेळी बरेचदा गुरुदेवही सोबत जात असत. अशाच एका प्रसंगी गांधीजी बाहेर फिरायला जाण्यासाठी निघाले असताना गुरुदेवांनी त्यांना आपल्याला सोबत येऊ देण्याची विनंती केली. गांधीजी त्यांच्यासाठी थांबले. गुरुदेवांनी आरशासमोर उभे राहून आपले केस विंचरले, आपले कपडे ठाकठीक केले. परंतु त्यांना तयार होऊन येण्यासाठी बराच वेळ लागला. तेवढ्या वेळात वाट पाहून गांधीजी कंटाळले. ते गुरुदेवांना म्हणाले, " एवढा सगळा जामानिमा करण्याची काही गरज होती का ? आता या वयात तुमच्याकडे कोण बघणार आहे ? " त्यावर गुरुदेवांनी हसतमुखाने मोठे सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, " मी कुरूप दिसलो तर बघणाऱ्यांच्या मनाला वेदना होतील. देखणा दिसलो तर त्यांना आनंद होईल. कुरूपता ही हिंसा आहे आणि सुंदरता ही अहिंसा !" गांधीजी हे अहिंसेचे पुजारी होते हे आपल्याला माहिती आहे. परंतु अहिंसेची ही नवीन व्याख्या गुरुदेवांनी गांधीजींना सांगितली. यातून गुरुदेवांचा सौंदर्यवादी दृष्टिकोन स्पष्ट होतो. सुंदर दिसायचे किंवा चांगले राहायचे ते केवळ आपल्या स्वतःसाठी नव्हे तर इतरांनाही ते चांगले वाटते आणि वाटावे म्हणून !
गुरुदेव आणि महात्माजी यांच्यामध्ये काही बाबतीत मतभेद होते परंतु या महापुरुषांनी आपले मनभेद त्यामुळे कधीही होऊ दिले नाहीत. केवळ चरखा चालवून आणि सूत कातून शेतकरी स्वावलंबी होणार नाहीत आणि स्वराज्य मिळणार नाही. समोर कुठलातरी विधायक कार्यक्रम असल्याशिवाय शाळा कॉलेजवर तरुणांनी सरसकट बहिष्कार टाकू नये. नंतरच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उतरावे नाहीतर ते विध्वंसक बनतील असे गुरुदेवांचे मत होते. १९२२ च्या आंदोलनात सत्याग्रही हिंसक झाले आणि त्यांनी चौरीचौरा येथे एक पोलीस चौकी जाळली आणि गुरुदेवांच्या या विचारांचे प्रत्यंतर आले. अर्थातच गांधीजी सुद्धा या गोष्टीमुळे व्यथित झाले आणि त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
गांधीजी जेव्हा जेव्हा उपोषणाला बसत तेव्हा त्यांच्या प्रकृतीचा विचार मनात येऊन गुरुदेव काळजीत पडत. पुण्यात जेव्हा येरवड्याच्या तुरुंगात गांधीजींनी जेव्हा उपोषण सुरू केले तेव्हा त्यांची काळजी वाटून त्यावेळी ७२ वर्षे वय असलेले गुरुदेव त्यांच्या भेटीसाठी धावून गेले. यावेळी गांधीजींनाही त्यांचीच आठवण येत होती. आणि गांधीजींच्या मनात त्यांच्या कवितेच्या ओळी घोळत होत्या.
जीबॉन जॉखॉय शुकाये जाय
कोरूणाधाराय एशो
शकल माधुरी लुकाये जाय
गीतोसुधारशे एशो.
( जीवन जेव्हा सुकुनि जाते
करुणाधारा होऊनि ये
सकल माधुरी लोपून जाता
गीत सुधारस होऊनि ये )
गुरुदेवांच्या कवितेतील हे धीर देणारे शब्द त्यावेळी गांधीजींनाही जणू धीर देत होते. गांधीजींनी त्याही अवस्थेत गुरुदेवांना हे गीत म्हणण्याची विनंती केली आणि त्या ७२ वर्षांच्या वृद्ध कवीने त्यांचे हे म्हणणे लगेच मान्य केले.
गुरुदेव आणि महात्माजी हे दोन्हीही भारतमातेचे थोर सुपुत्र. त्या दोघांच्या विचारसरणीत काही बाबतीत किरकोळ मतभेद असले तरी त्या दोघांमध्ये समानतेचा एक मोठा धागा होता आणि तो म्हणजे सर्वसामान्य भारतीय माणसाबद्दल त्यांना वाटणारी आत्मीयता. तशी दोघांचीही कार्यक्षेत्रे वेगळी होती. राजकारण हे गांधीजींचे कार्यक्षेत्र तर साहित्य आणि संस्कृती हा गुरुदेवांचा प्रांत. पण आपल्याला कोणते कार्य करायचे आहे याबाबत दोघांच्याही विचारांमध्ये स्पष्टता होती. मार्ग वेगवेगळे असले तरी मातृभूमीच्या उद्धारासाठी आणि विकासासाठी दोघेही झटत होते.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२०/३/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा