किर्तीकाव्यसरिता काव्यसंग्रह - अभिप्राय
डॉ. कीर्ती लोखंडे यांचा ' किर्तीकाव्यसरिता ' या काव्यसंग्रहाची सॉफ्ट कॉपी हाती आली आणि नुकत्याच उमललेल्या काव्यकुसुमांचा गंध मनाला स्पर्शून गेला. निसर्गातील आणि काव्यातील रूप, रस आणि गंध शब्दांच्या माध्यमातून त्यांच्या कवितांमध्ये अशा तऱ्हेने उतरला आहे की तो थेट मनाला भिडतो. एखादे गीत किंवा काव्य म्हणजे तरल संवेदनांची सुंदर अशी अभिव्यक्ती ! अशा तरल संवेदना शब्दांमध्ये पकडणे आणि सुंदर गेय रूपात वाचकांसमोर त्या प्रस्तुत करणे हे सिद्धहस्त कवीचेच काम ! त्यात डॉ कीर्ती लोखंडे या कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत.
या काव्यसंग्रहात विविध प्रकारच्या कवितांचा नजराणा त्यांनी रसिकांना पेश केला आहे. एकूण १०१ कविता असलेल्या या संग्रहात कवितांचे दहा विभाग आहेत. त्यामध्ये पावसाची गाणी, लहान मुलांची गाणी, सणांची गाणी, देवीदेवतांची व आध्यात्मिक गाणी, समारंभाची गाणी, नात्यांच्या कविता, राष्ट्रप्रेमाची गाणी, लेवा गणबोली गीते, निसर्ग पर्यावरण कविता, कलेसंबंधी भावनांची गाणी असे विविध विभाग आहेत. असे वेगवेगळे कवितांचे भाग केल्यामुळे रसिकांना आपल्या आवडीनुसार तो भाग वाचता येणे सोयीचे होणार आहे.
' पावसाची गाणी ' हा विभाग इंद्रधनुच्या सप्तरंगी रंगांच्या सात कवितांनी नटलेला आहे. मुळात पाऊस किंवा वर्षा ऋतू हा अनेकांच्या आवडीचा विषय. त्यात या अल्हाददायक कविता वाचून मनाला होणारा आनंद वेगळाच ! ' पाऊसगान ' या कवितेत शब्दांची छान पुनरावृत्ती झाली आहे त्यामुळे कविता वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो.
नवे नवे हिरवे धरतीलाही वस्त्र हवे
मंद मंद शिरवे शिरवे मृत्तिकेला नीर हवे
पावसामुळे धरित्रीच्या कुशीतून हिरवे कोंब डोकावू लागतात. त्याबद्दल बोलताना त्या म्हणतात...
खुळे खुळे हळवे हळवे कुशीमध्ये स्वप्न फुले.
त्यांच्या ' श्रावणगीत ' या कवितेत उपमा आणि रूपक अलंकारांची सुंदर बरसात जणू झाली आहे ! चमकणाऱ्या विजांना पाहून त्या म्हणतात
चपलेची एकतारी
क्षणात जगमग दुनिया सारी
किंवा
छतावरती वाजे ताशा
जलधारा वीणेच्या तारा.
' वसुंधरेच लगीन ' या कवितेत त्यांनी मजेदार कल्पना आपल्यासमोर मांडली आहे. पाऊस येतो आणि या पर्जन्यराजाचं जणू वसुंधरेशी लग्न ठरतं आणि हा लग्न सोहळा चार महिने चालतो अशी ही सुंदर कल्पना ! पावसावरची ही दीर्घ कविता आहे. या अनोख्या लग्न सोहळ्याचं तेवढंच सुंदर वर्णन त्या करतात
लग्ननिमंत्रण सृष्टीला देती वादळवारे
किंवा
साक्ष गंधे संपन्न ओटी भरले आम्रफळे.
याच विभागात मल्हार गीत, पाऊस, बळीराजा सुखावला अशा सुंदर रचना आपल्याला वाचायला मिळतात.
पुढील दुसऱ्या विभागात लहान मुलांची गाणी आहेत. ही गाणी अतिशय साध्या सोप्या भाषेत आणि मुलांना सहजपणे चालीवर म्हणता येणारी आहेत. यातील पहिली कविता मिठू मिठू पोपट भाऊ ही आहे या कवितेतील या ओळीत पहा. लहान मुलांना सहज आवडतील
चोच रंगली लालीलाल कोणता विडा खाता
गळा गोड कसा जरी तिखट मिरची खाता
खाता कमी सांडता फार दंगा करू नका.
पुढची सुंदर कविता आहे ' सा सा साखर रे रे रवा ' या कवितेतील ओळी सारेगमपधनिसा या सरगमच्या शब्दांनी सुरुवात होणाऱ्या आहेत. त्यातील कल्पना लहान मुलांना नक्कीच आवडतील. या गीतातील हे शेवटचे कडवे बघा
खाऊ खाऊ अंगतपंगत
गाणी गाऊ संगत संगत
खाण्याचे संगीत गाण्याचे संगीत
जीवन आपले बनवू आनंदी रंगीत
सा सा साखर रे रे रवा.
याच विभागातील बाप्पा ओ बाप्पा, गणपती बाप्पा, सणांची गाणी, अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, आली दिवाळी, आली आली दिवाळी, होळी गीत, संक्रांत गीत, वटसावित्रीचा वसा, राखी बांधते भाऊराया, आली श्रावण पौर्णिमा, बाप्पांचे विसर्जन, दीप उजळीता, दुर्गा मातेच्या अंगणी, आला आला दसरा, कोजागिरीचा चंद्र, भाऊबीज, दहीहंडी गीत, नागपंचमीचे गीत, वटपौर्णिमा यासारख्या कविता मुलांना गोड गाणी गाता गाता सणांची माहिती पण सहजपणे आणि सुंदर रीतीने देतात. आजकाल आपण आपल्या प्रथा, परंपरा चालीरीती विसरत चाललो आहोत. त्याची जाणीव सुंदर रीतीने कवयित्रीने या कवितांमधून करून दिली आहे. आपली संस्कृती जागृत ठेवण्याच्या दृष्टीने त्यांचे हे मोठेच योगदान म्हणावे लागेल !
पुढील चौथ्या विभागात देवदेवतांची आणि अध्यात्मिक स्वरूपाची गाणी आहेत. या भागात एकूण १३ अध्यात्मिक स्वरूपाची आणि विविध देवदेवतांची गाणी आहेत. त्यांची सुरुवात शारदास्तवनाने झाली आहे. या गीतात शारदेचे स्तवन करून तिचे आशीर्वाद प्रार्थिले आहेत. या विभागातील म्हाळसा मातेचे गाणे, शंकराचे गीत, निद्रादेवीचे गीत, मनूमातेचे गीत, माझी भवानी आई, मनमोहना, मोहन हृदयी रुते, अजब खेळ, जय श्रीराम दाशरथी, विठू माझा पाठीराखा, धन्वंतरी, मर्मबंध यासारखी विविध गीते भाविकांना आनंद देणारी आहेत.
पुढील पाचव्या भागात समारंभाची गाणी आहेत. आपल्या जीवनामध्ये आपण विविध सण समारंभ साजरे करतो, विविध प्रसंगांना सामोरे जातो. त्या प्रसंगांवर सुंदर अशी गीतरचना कवयित्रीने केली आहे. या भागात एकूण ११ गीते आहेत. यामध्ये साखरपुडा गीत, चला ग लग्नाला, गृहलक्ष्मी आली घरा, हळद फेडण्याचे गीत, बाळाचं बारसं, छकुलीचे बोरन्हाण, लाडकीचा साखरपुडा, लग्नसोहळा, लग्नगीत, जन्मदिनाच्या शुभेच्छा, डोहाळे यासारखी विविध प्रसंगांवर आधारित गीते आहेत. ही गाणी विविध प्रसंगी चालीवर म्हणता येणारी असून त्या त्या समारंभाची गोडी वाढवणारी आहेत. जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना अतिशय सुंदर शुभेच्छा या गीतातून कवयित्रीने दिल्या आहेत.
आरोग्य राहो निरोगी तनामनात
समृद्धीचा झरा वाहो घराकुटुंबात
मायेची माणसे प्रेमस्नेह नात्यात
लाभो आनंद सुख अपरिमित
जन्मदिनाच्या शुभेच्छा अगणित
यासारख्या सुंदर ओळी या गीतात आहेत.
पुढील विभाग नात्यांच्या कवितांचा आहे. या विभागात तब्बल १८ विविध प्रकारच्या कविता आहेत. सगळ्यात मोठं आणि मायेचं नातं आईचं. साहजिकच पहिली कविता आईवरच आहे. हा मायेचा झरा अखंडित झरत असतो. हे सांगताना कवयित्री म्हणते
झरझरे अखंडित
माय मायेचा ग झरा
छत्रछाया अखंडित
माय सुखाचा आसरा .
जेव्हा खूप वर्षांनी आपल्याला आपला एखादा बालमित्र भेटतो तेव्हा होणारा आनंद अपरिमित असतो हाच आनंद कवयित्री ' बालमित्र ' या कवितेत व्यक्त करताना दिसतात
मित्र आले असे दवबिंदू सुंदरसे नभातूनी आनंदाचे गीत बरसे असे नवचैतन्याची हिरवी पाने
अंकुरली काष्ठी.
तर ' मनीचे गुपित ', ' तन्मय ' या कविता प्रेमिकांच्या मनातील नाजूक तरल प्रेमभावना व्यक्त करतात.
नजरानजर होऊन एका तरुणाच्या प्रेमात पडलेल्या प्रेमिकेच्या अल्लड प्रेमभावना ' बावनकशी हिरकणी 'या कवितेत व्यक्त झाल्या आहेत.
या भागात शेतकऱ्याची शेतकरीण, Opposite Poles Attract ही इंग्रजी शब्दांचा वापर करून रचलेली धमाल विनोदी कविता, खुले माझे जीवन या कविता आहेत तर पाळीसारख्या स्त्री जीवनातील नाजूक गोष्टींवर सहसा कोणी लिहायला धजावत नाही पण त्या विषयावर ती आहे म्हणून पाळीचे गाणे, वयात येणाऱ्या कळीचे प्रश्न अशा कविताही त्या सहज लिहून जातात. त्या पेशाने डॉक्टर असल्याने त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनही या कवितांमधून प्रतिबिंबित झाला आहे. या भागात प्रतिबिंब, शिशुगीत, गर्भस्थ शिशुगीत, संसार दोघांचा, पितृछाया, संसाराचे लोणचं, गुरुविण कोण दाविल वाट यासारख्या सुंदर कविता समाविष्ट आहेत.
पुढील विभाग राष्ट्रप्रेमाची गाणी हा आहे. या विभागात देशभक्तीवर आधारित दहा गीते आहेत. भारताची यशस्वी चांद्रयान मोहीम या विषयावर मराठी आणि हिंदीतून कविता आहेत. तर भारताच्या राष्ट्रपती झालेल्या द्रोपदी मुर्मू यांच्यावरील आधुनिक द्रौपदी ही कविता त्यांनी आपल्या जीवनात भोगलेली दुःखी संकटे आणि त्यावर केलेली मात यावर आधारित आहे. स्वातंत्र्यवीरांना वंदन या कवितेत त्या लिहितात
ज्यांच्यामुळे गळले इंग्रज राजवटीचे बंधन सर्व मिळूनी स्वातंत्र्यवीरांना करूया वंदन.
याच भागात संविधान रचनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही त्यांचं गौरव करणारी काव्यरचना आहे.
या पुस्तकातील आठवा विभाग आगळावेगळा आहे. या भागात लेवा गणबोली गीते आहेत. कवयित्रीने लोकभाषेचा, शब्दांचा आणि चालीरीतींचा वापर करून लिहिलेली ही गीते लेवा मायबोली असणाऱ्या भाषिकांना निश्चितच आवडतील अशी आहेत. फैजपूरला होळी पौर्णिमेनिमित्त खंडोबाची यात्रा भरते त्या यात्रेचे बोलीभाषेत वर्णन करणारी खंडोबाची जतरा ही सुंदर कविता आहे. हिवाळा सरला की कडक उन्हं पडायला लागतात आणि खेड्यापाड्यांवर ग्रामीण भागात वडे पापड कुरडया बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. त्या धावपळीचे मनोरंजक वर्णन करणाऱ्या दोन कविता खिशीचा पापळ आणि बिबड्याचा घाटा या संग्रहात आहेत. त्यातून प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहते. लेवाबोलीत लिहिलेल्या या कविता त्या त्या भागातील रसिकांना नक्कीच आवडतील. या भागातील पार्लरमधील मजा ही कविता खरोखरच मजेशीर आणि पार्लरमधील वातावरणाचे वर्णन करणारी आहे. पण या कवितेचे शेवटी सुंदर मन हाच खरा दागिना असा संदेश कवयित्री देते. याच भागात खानदेशची केई ही शेतातील सुंदर वातावरणाची वर्णन करणारी कविता आहे.
या काव्यसंग्रहातील पुढील विभागात निसर्ग विषयक आणि पर्यावरण विषयक कविता आहेत. ' पहाटेची कविता ' ही नावाप्रमाणेच पहाटेच्या सुंदर वातावरणाचे वर्णन करणारी आहे. ' प्रकाश ' या कवितेत निसर्गातील वातावरणाचे सुंदर वर्णन आहे प्रकाशाच्या स्पर्शाने उमलणारी कळी, कळीचे फुल कसे होते, त्या फुलांवर भुंगे कसे फिरतात, पावसाच्या सरी आल्यानंतर ओढे खळाळून वाहू लागतात आणि वातावरणात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते, निसर्गाच्या विविध घटकांवर प्रकाशाची होणारी जादू या कवितेत कवयित्रीने सुंदररित्या वर्णन केली आहे. तापी नदी ही कविता तापी नदीचे महत्व सोप्या शब्दात वर्णन करते. या कवितेतून पाण्याचे महत्व सांगताना कवयित्री म्हणतात की पाण्याचे मोल ओळखा. त्याची नासाडी करू नका. पुढील कविता निसर्गसंतुलन गीत आहे. या कवितेत निसर्गातील विविध घटक किंवा ज्यांना आपण पंचमहाभूते म्हणतो असे पृथ्वी ,अग्नी, पाणी ,वायू, आकाश यासारख्या गोष्टींचे संतुलन निसर्गामध्ये कसे असते त्याचे सुंदर वर्णन ही कविता करते. या कवितेतूनच पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला आहे. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी हे निसर्गाचे स्रोत जपून वापरूया आणि त्यांची नासाडी टाळू या असाही संदेश कवियत्री देतात. सृष्टी का संगीत ही एक हिंदी कविता या भागात आहे या कवितेत निसर्गातील विविध घटकातून निर्माण होणाऱ्या संगीताचे मनोरम वर्णन केले आहे. या भागातील सूर्योदय ही कविता सूर्योदयाच्या वेळच्या सुंदर वातावरणाचे वर्णन करते. ' प्रीत पावा प चे गाणे ' ही कविता आगळीवेगळी आहे या कवितेत ' प ' या अक्षराची सुंदर पुनरावृत्ती झाली आहे. त्यातून निसर्गातील विविध रूपांचे वर्णन करण्याचे कवयित्रीचे कौशल्य आपल्याला दिसते. पहाटेच्या वेळी आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची माळ आपल्याला दिसते त्याचे सुंदर वर्णन बगळ्यांची माळ या कवितेत आले आहे. त्यात कवयित्रीने बगळ्यांची माळ पाहून सुंदर कल्पना केल्या आहेत.
किमया निसर्गाची की जादू ही खरी
शुभ्र फुलांना पंख फुटले मनोहरी
धाग्याविण कल्पसुमांची माळ रूपेरी बगळ्यांची माळ फुले उडती अंबरी.
काव्यसंग्रहातील दहावा आणि अंतिम भाग कलेसंबंधी आणि भावनांची गाणी वर्णन करणारा आहे. यातील पहिली कविता गीताचे स्वर्गीय गाणे ही आहे. गीताचे गाणे कसे तयार होते, ते सांगताना कवयित्रीने अतिशय कल्पक उपमा वापरल्या आहेत. शब्दांची घडली पणती
अर्थाच्या पेटल्या वाती
तालरूप तैल संगती
सुरांच्या ठिणग्या पडती.
तर या कवितेच्या शेवटच्या कडव्यात गाण्याबद्दलचे फार सुंदर शब्द आहेत
शब्दफुल झुल्यावरती
भावबंधने झोके घेती
आनंदाच्या सुरासंगती
गाणे स्वर्गीय गीत गाती.
संगीत, संगीताची जादू या कविता नावाप्रमाणेच संगीताचे महत्त्व सांगणाऱ्या आहेत. मानवी जीवनात आणि अध्यात्मातही अहंकार कसा घातक ठरतो याचे सुंदर वर्णन कवयित्री ' अहंकार ' या कवितेत करतात. मनाच्या सौंदर्याचे महत्त्व ' मनीचे सौंदर्य ' या कवितेत सांगितले आहे. वयानुसार भलेही सौंदर्य लोप पावेल, केस गळतील, पांढरे होतील परंतु उदारता, दया, क्षमा, शांती यासारखे गुण असतील तर ते उतारवयातही मनाचे सौंदर्य वाढवणारे आहेत. त्यांनीच आपले जीवन सुंदर होईल असं संदेश या कवितेत कवयित्रीने दिला आहे. या भागातील शेवटची कविता प्रीत चांदणे ही आहे. या कवितेत पौर्णिमेचे चांदणे आणि चंद्र या वातावरणात प्रेमिकेच्या मनातील नाजूक प्रेमभावना कवयित्री अत्यंत सूचक शब्दात व्यक्त करतात.
एकंदरीत या काव्यसंग्रहातील दहा विभागातील कविता वाचल्यानंतर असे लक्षात येते की कवयित्रीने कविता लिहिण्यासाठी विषयाचे कुठलेही बंधन स्वतःवर घालून घेतले नाही. वेगवेगळ्या विषयांवर सहजपणे आपल्या कवितांच्या माध्यमातून त्या व्यक्त होतात. एकदा तरी हे कवितांचे पुस्तक हातात घ्यावे आणि त्यातील कवितांचा आनंद घ्यावा इतके ते सुंदर आहे.
- विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा