मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 51

 उगवतीचे रंग

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 51

गुरुदेवांची स्वतंत्र राजकीय विचारसरणी 

गुरुदेवांचे जीवन समजून घ्यायचे असेल तर त्यांची राजकीय विचारधाराही लक्षात घेतली पाहिजे. ते टिळक युग आणि गांधी युग  या दोन्हींचेही साक्षीदार होते. पण राष्ट्र, राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रहित याबाबतीत त्यांचे विचार काहीसे वेगळे होते. अतिरेकी राष्ट्रवाद त्यांना मान्य नव्हता. त्यांना त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी जेव्हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी त्यांच्यासोबत या पुरस्कारासाठी ऑस्ट्रियातील  कवी पीटर रॉसेगर यांचाही विचार केला जात होता. परंतु पीटर रॉसेगर हे प्रखर राष्ट्रवादी असल्याने त्यांचे नाव या स्पर्धेत मागे पडले आणि गुरुदेवांना हा पुरस्कार जाहीर झाला असे असले तरी नंतर पाश्चात्य देशांनी प्रखर राष्ट्रवादाचीच कास धरली आणि पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. पहिल्या महायुद्धातूनच दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली. सारे जग युद्धाच्या खाईत लोटले गेले.

पाश्चात्य देशात प्रबळ झालेला राष्ट्रवाद सर्वांनाच विनाशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे असे त्यांना वाटत होते. त्यांची राष्ट्रवादी नीती स्वार्थातून आली आहे. भारताची ती संस्कृती नाही. आम्हाला आमचे स्वातंत्र्य प्रिय आहे पण त्याचबरोबर कोणाचेही पारतंत्र्य मान्य नाही. विज्ञानाने आपली भौतिक सुखसमृद्धी वाढवली. नवीन संपत्ती निर्माण झाली पण विज्ञानाने वाढलेली संपन्नता गरीब राष्ट्रांच्या आणि बहुजनांच्या पिळवणुकीसाठी वापरली जात असेल तर विश्वाचा प्रलय लांब नाही असा सावधगिरीचा इशारा देखील त्यांनी आपल्या लेखातून वेळोवेळी दिला.

गुरुदेवांना इतरांप्रमाणेच आपले राष्ट्र प्रिय होते. राष्ट्र अभिमानाची प्रखर ज्योत त्यांच्याही अंतःकरणात ठेवत होती. परंतु त्यांच्या काळातील इतर राजकीय नेत्यांची वागणूक आणि विचारसरणी त्यांनी पाहिली. त्यातील काही गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. त्यामुळे प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीपासून त्यांनी काही अंतर राखणेच पसंत केले. 

त्या काळात इंग्रजांविरुद्ध समान हक्कांसाठीची चळवळ ( एजिटेशन मुव्हमेंट ) सुरू होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या हक्कांची भीक इंग्रजांकडे मागणे त्यांना मंजूर नव्हते. समानतेचा हक्क भीक मागून मिळत नसतो तर तो स्वकर्तृत्वाने मिळवावा लागतो. त्यासाठी आपल्याला स्वतःच्या समाजाचा, राष्ट्राचा गौरव वाढवावा लागेल असे त्यांचे स्पष्ट मत होते. ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले होते, असे लोक आपल्या देशाला, धर्माला संस्कृती आणि परंपरेला मागासलेले समजत होते. त्याला नावे ठेवत होते. जे लोक स्वतःच आपल्या देशाचा आणि परंपरांचा सन्मान करीत नाहीत, त्यांचा सन्मान परकीय लोक कसे आणि कशासाठी करणार असे त्यांना वाटत होते.

आपली भाषा, आपले साहित्य, आपली संस्कृती यांचा अभिमान बाळगून आणि स्वावलंबनावर भिस्त ठेवून आपण स्वतःची उन्नती करून घेतली पाहिजे. आपला गौरव आपण स्वप्रयत्नांनी वाढवला पाहिजे. मग दुसऱ्यांकडून सन्मान मागण्याची गरजच नाही असे त्यांना वाटत होते. आपण परतंत्र का झालो याचा विचार करताना त्यांना वाटत होते की आपणच आपल्या भाषा, धर्म, जाती यांच्यामध्ये भेदाच्या भिंती निर्माण केल्या. उच्चनीचतेच्या कल्पनांमध्ये अडकून राहिलो. त्यामुळे आपल्यातील एकी नष्ट होऊन आपण परतंत्र झालो. धर्म, जाती, पंथ यांचा भेद न बाळगता आपण एक व्हायला हवे. सर्वांना प्रेमाने वागवण्याची आणि नांदवण्याची भारताची उदात्त परंपरा होती. ती नष्ट होऊ देता कामा नये. आपण बाहेरून अनेक भासलो तरी आतून आम्ही सारे एकच आहोत आणि एकच राहू ही भावना सदैव जागृत राहिली पाहिजे हे त्यांचे सांगणे आजही महत्त्वाचे ठरते.

ज्या इंग्रजांनी आपल्यातील एकी नष्ट करण्यासाठी हातभार लावला त्यांनी आपल्या परिस्थितीविषयी बोलणे योग्य नाही आणि तो त्यांना अधिकारही नाही. रौलेट ऍक्टला विरोध करण्यासाठी १३ एप्रिल १९१९ मध्ये जालियनवाला बागेत भरलेल्या सभेत जनरल डायरने बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले. या घटनेने गुरुदेवांना कमालीची अस्वस्थता आली आणि त्यांनी इंग्रज सरकारने दिलेली ' सर 'ही पदवी परत केली. आणि त्यासोबतच त्यांचा निषेध करणारे एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी इंग्रज सरकारच्या या कृत्याचा स्पष्ट निषेध करताना असे लिहिले, " आम्हाला मिळालेल्या सन्मानाची पदके ही त्या मानसन्मानाच्या आडून अपमानाची चिन्हेच वाटतात आणि मी कितीही मोठा व ख्यातनाम असलो तरी मी माझ्या देशबांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहीन. माझ्या मूक व भयग्रस्त बांधवांच्या भावनांना वाचा फोडणे व माझा स्वतःचा निषेध नोंदवणे हे कमीत कमी मला केलेच पाहिजे. याचे परिणाम काहीही होवोत. आजच्या अपमानास्पद वागणुकीमुळे अशी मानाची बिरुदे मिरवणे हे आमच्यासाठी लाजिरवाणे आहे. "

१८८६ मध्ये कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. त्यांनी या अधिवेशनात आपले विचार मांडताना म्हटले की आपला देश निर्धन आणि विपन्नावस्थेत येण्याचे कारण परकीय अंमल आणि त्यांची एकतंत्र राज्यपद्धती आह राजा हा प्रजेकरता असतो. प्रजाच त्याला राजत्व देत असते. राजाकरता प्रजा नसते, हे राजाने ध्यानी बाळगून वागायला हवे. गुरुदेवांच्या मनावर दादाभाई नौरोजींच्या बोलण्याचा परिणाम झाला. राजकीय दास्यापेक्षा बौद्धिक दास्य भयावह आहे. देश स्वतंत्र व्हायचा असेल तर आपल्या देशातील लोकांचे मने आणि बुद्धी निर्भय असली पाहिजे आणि त्यांची वागण्याची नैतिक पातळी त्यांच्या राज्यकर्त्यांपेक्षाही उच्च असायला हवी असे प्रतिपादन ते करू लागले.

भारतातील जनतेच्या वस्तुस्थितीची कल्पना गुरुदेवांना आली होती. आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्या परीने ग्रामीण भागातील परिस्थिती सुधारण्यासाठीची सुरुवातही केली होती. त्यांनी शेतकऱ्यांचे सहकारी संघ, पतसंस्था सुरू केल्या. ते स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. ते त्याबद्दल फक्त बोलूनच थांबले नाहीत तर बलेंद्रनाथ या आपल्या पुतण्याला त्यांनी कलकत्ता येथे व स्वदेशी वस्तू भांडार ' काढून चालवायला दिले. जोपर्यंत पुढील विधायक कार्यक्रम दृष्टीपथात येत नाही तोपर्यंत तरुणांनी शाळा कॉलेजांवर बहिष्कार टाकू नये असे त्यांना वाटत होते. तरुणांची विचारसरणी स्वतंत्र असावी, त्यांनी स्वयंप्रज्ञेने निर्णय घ्यावेत असे त्यांना वाटत होते. भावनेच्या आहारी जाऊन बरेच तरुण सत्याग्रहाच्या, असहकाराच्या चळवळीत सामील झाले होते. केवळ भावनेच्या आहारी जाऊन असे निर्णय जेव्हा घेतले जातात तेव्हा बऱ्याच वेळा विधायक कार्याच्या ऐवजी विघातक कार्ये तरुणांकडून घडतात असे त्यांना वाटत होते आणि ते बरोबरही होते. 

गुरुदेवांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे महत्त्व लोकमान्य टिळकांनी ओळखले होते. भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा जगामध्ये नेण्याचे कार्य गुरुदेवांच्या हातून घडत होते. त्यांच्या या कार्याचा गौरव करणारे पत्र लोकमान्य टिळकांनी त्यांना पाठवले होते. गुरुदेवांनाही लोकमान्यांच्या कार्याबद्दल आदर होता. गुरुदेवांच्या मनात राष्ट्रोद्धाराचे असलेले विचार स्पष्ट होते. वंगभंग चळवळीच्या साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरून त्यांनी याबाबतचे आपले विचार मांडले होते. गाव पातळीवर पाच कार्यकर्ते निवडून आपल्या गावाचा कारभार आपणच करावा अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले. विध्वंसक वृत्तीने न वागता विधायक वृत्तीने देश समर्थ करावा असे त्यांचे मत होते. गुरुदेवांची ही राजकीय विचारसरणी त्या काळातील बरेच लोकांच्या पचनी पडणारी नसली तरी त्यांनी निष्ठेने आपले कार्य सुरूच ठेवले होते. राष्ट्रवादी राष्ट्राचे हित आणि राष्ट्राचा स्वार्थ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे त्यांचे मत होते राष्ट्र कारण आणि विश्व करण
 या दोन गोष्टी वेगळ्या असू शकत नाहीत त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि एकमेकांना पूरक आहेत असे त्यांना वाटत होते. हीच भावना त्यांच्या प्रत्येक कृती आणि उक्ती मागे होती. आपला राष्ट्राभिमान जर विश्वकल्याणाच्या आड येत असेल तर तो हित करण्याऐवजी मानवजातीचे नुकसानच करतो. म्हणूनच स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय भाग न घेता साहित्य आणि शिक्षण ही दोन कार्यक्षेत्रे त्यांनी निवडली आणि आयुष्यभर त्या माध्यमातून कार्य केले. आपल्या विचारांशी ते प्रामाणिक राहिले. त्यांच्या कार्याची आणि विचारांची दिशा ' यत्र विश्वम भवत्येक निडम '  विश्वभारतीकडे वाटचाल करणारी होती. ज्ञानदेवांच्या पसायदानातील उदात्तताच त्यांच्या विचारात भरून राहिली होती.  हे विश्वचि माझे घर, अवघे जग एक कुटुंब व्हावे अशी त्यांचे मनोमन इच्छा होती.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
१४/३/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...