मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ५०

 उगवतीचे रंग

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ५० 

दिव्यत्वाची जेथ प्रचिती...

( गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विषयीचे 49 लेख लिहून झाले आणि पुढील भाग कोणता लिहावा अशा विचारात असताना याविषयीचे हे काही विचार मला मध्यरात्रीनंतर स्फुरले. हे विचार म्हणजे गुरुदवांचे जीवनकार्यच जणू ! ते आपल्या समोर ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न )

अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या डोळ्यांसमोर साकार झाले ते पश्चिम बंगालचे विशाल आकाश 
आणि त्या आकाशाच्या विस्तीर्ण पटावर चमकू लागले अनंत तारे. 
कोणी घोष, कोणी मुखर्जी, कोणी चटर्जी, कोणी बॅनर्जी, कोणी उपाध्याय, कोणी बंदोपाध्याय, कोणी दत्त, कोणी चक्रवर्ती, कोणी रॉय...

प्रत्येकाचे तेज वेगळे होते पण त्या सगळ्या ताऱ्यांमध्ये उठून दिसणारा तारा होता रवींद्रनाथ टागोर या नावाचा आणि त्या ताऱ्याने पश्चिम बंगालचे आकाश उजळून निघाले होते.
त्याच्या उगवतीच्या रंगात पूर्व दिशा न्हाऊन निघाली होती.

सुरुवातीला छोटा असणारा हा बालरवी पाहता पाहता विशाल झाला आणि अवघे गगन त्याने व्यापले. 

जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हटले जात असताना हा रवी त्याला जणू अपवाद ठरला आणि त्याची सर्वस्पर्शी प्रतिभा जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करती झाली.
या रवी किरणांचा स्पर्श झाल्यानंतर बागेतील कळ्या उमलू लागल्या.

 या कळ्या होत्या कवितेच्या, नाटकाच्या, कथांच्या, कादंबरीच्या, शिक्षणाच्या, चित्रकलेच्या, नृत्यकलेच्या, गानकलेच्या, संगीतकलेच्या, अध्ययनाच्या अध्यापनाच्या...
 अशा सगळ्या कळ्या विकसित होऊ लागल्या आणि त्यांचे सुरेख कमलपुष्पात रूपांतर झाले अशी जादू होती तुमच्या प्रतिभेच्या स्पर्शात ! 

तुम्ही झालात प्रकाश आणि शिकवले आम्हाला प्रकाशाकडे पाहणे. रोपटे प्रकाशाकडे पाहते आणि त्याचा वृक्ष होतो. त्याला कळी येते ती प्रकाशाकडे पाहते आणि कळीचे फुल होते.
 फुल प्रकाशाकडे पाहते आणि त्याचे फळ होते.

 अशाच कुतूहलाने तुम्ही जीवनातील सर्व गोष्टींकडे पाहिले. अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत जीवनाकडे कुतूहलाने पाहणारे तुमच्यातील बालक जिवंत होते. 
असे म्हणतात की तुम्हाला केवळ चार ते पाच तासांची निद्रा पुरेशी होत असे. रात्री झोपताना आकाशातील तारकांचे निरीक्षण आणि सकाळी उठल्यानंतर उगवतीचा सूर्य, उमरलेली फुलं, पक्ष्यांचे थवे पहायला तेवढ्याच उत्साहाने आपला चेहरा देखील फुलासारखा उमललेला असायचा. हेच बघायला आपणआपण मुलांना शिकवलं...

तुमच्या शिक्षणात हे चैतन्य, हा आनंद भरून राहिला होता. मन, बुद्धी आणि मेंदू यांची शिकताना एकरूपता होती...
 व्यवहाराबरोबरच सौंदर्याची जाणीव होती.  विश्व भवत्येकनिडम म्हणजे एक घरटे व्हावे, सर्व धर्म, भाषा, प्रांत एकत्र नांदावे अशी आपली भावना होती...

त्यातूनच उमलली शांतीनिकेतन, श्रीनिकेतन आणि विश्वभारतीची कमलपुष्पे. या कमलपुष्पातील मकरंद सेवन करण्यासाठी देशोदेशीचे भ्रमर येऊ लागले शांतिनिकेतनात, श्रीनिकेतनात आणि विश्वभारतीत.

तुम्ही लिहिलीत गीते आणि ती गीते झालीत अजरामर गीतांजली !
तुमच्या कथा आणि कादंबऱ्यांचे चित्रपट झाले.

कसं शिकावं आणि कसं शिकवावं याचा आदर्श तुम्ही घालून दिला आणि झालात गुरुपासून गुरुदेव. 

बंगालमध्ये बंगाली बोलली जात होती ती एक भाषा म्हणून... 
पण त्या भाषेला तुम्ही दिले रंग रूप गीत...
तुम्ही दिले सौंदर्य, तुम्ही दिला आकार, 
तुमच्याच लेखणीतून बंगालीचे सौंदर्य झाले साकार... तुमच्याच लेखणीतून जन्मले साहित्याचे नानाविध प्रकार...!

तुम्ही फिरलात विविध प्रांत आणि विविध देश केला परिधान भारतीय संस्कृतीचा वेश 
झालात तुम्ही भारतीय संस्कृतीचा दूत. आणि पोचवली भारतीय संस्कृती सातासमुद्रापार...

तुम्ही केला एक आगळा वेगळा व्यापार...!
 इथे जे जे चांगले होते ते ते तुम्ही मुक्तहस्ते परदेशी इतरांना वाटले... आणि तुम्हाला तिथे जे जे चांगले दिसले ते ते घेऊन आला इथे आमच्यासाठी... 
खरंतर घेण्यासाठी आमचीच ओंजळ अपुरी पडली...

तुमच्या काळात सर्वत्र राज्य होते इंग्रजांचे,
प्राबल्य होते इंग्रजीचे इंग्रजी शिष्टाचारांचे.
 पण तुम्ही नाकारले इंग्रजाळलेले जिणे 
आणि दाखवला प्रकाश विश्वाला भारतीय संस्कृतीचा...!

पदवीदान समारंभ असो की अन्य कोणताही समारंभ, व्यासपीठावरून तुम्ही बोलला फक्त बंगालीत आणि केले अधोरेखित मायबोलीचे महत्त्व...! बंगालची भाषा आणि बंगाली माती धन्य झाली तुमच्यामुळेच...!

महिला दिन साजरा करतो आज आम्ही पण शंभर वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या कथा - कवितांतून  केली प्रतिमा उजळ महिलांची.
दाखवला त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रकाश जगाला...
दाखवली त्यांची विविध रूपे.
समाजाचा विरोध असतानाही खुले केले महिलांनाही व्यासपीठ, रंगमंच...

जन -गण -मन लिहिताना ही भारतमाताच फक्त होती तुमच्या डोळ्यासमोर...
 नाकारले तुम्ही विदेशी राजपुत्रांचे गुणगान करणे...

 तुम्ही होता निर्भय आणि जगला ताठ मानेने.
जपानने जेव्हा केले होते चीनवर आक्रमण तेव्हा जपानमध्येच होता तुम्ही 
त्यांचा हा साम्राज्यवाद नाही आवडत तुम्हाला आणि उघड बोललात तुम्ही जपान मध्येच आणि जपान्यांवर...
पण तुमचे निर्भय जगणे आम्हाला कधी कळलेच नाही.

तुमचे जगणे होते सत्य शिव आणि सुंदराची आराधना.
तुमच्या जगण्यामध्ये होती निर्भयाची उपासना...!

मोक्ष - स्वर्ग कदाचित परलोकात असेलही... कुणास ठाऊक...
पण तुम्हाला या धरेवरच फुलवायचा होता स्वातंत्र्याचा स्वर्ग 
आणि त्यासाठीच अर्पण केलेस तुम्ही अवघे आयुष्य.

राहिलात तुम्ही अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत आणि 
मावळतीलाही फिके झाले नाहीत तुमचे रंग...
तुम्ही होता इहलोकीच्या सौंदर्याचे पुजारी आणि मानवतेची सेवा करणारे परमेश्वराचे दूत.
उमटली आहेत काळाच्या मार्गावर तुमची दिव्य पदचिन्हे आणि पडला आहे तुमच्या कार्याचा दिव्य प्रकाश...
प्रश्न फक्त एवढाच आहे की तुमच्या या सत्कर्मांच्या खुणा आज पुसट होत चालल्या आहेत का ?

हे तेजोनिधी तुझ्या तेजाचा थोडासा का होईना पण दे अंश आम्हाला
आणि दे शक्ती तू दाखवलेल्या मार्गावरून चालण्याची...!

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
११/३/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...