मुख्य सामग्रीवर वगळा

पुलंचे एक अप्रतिम व्यक्तीचित्र - विनोद दा

 उगवतीचे रंग 

पुलंचे एक अप्रतिम व्यक्तीचित्र - विनोद दा

पुलंच्या सिद्धहस्त लखणीतून जे जे काही कागदावर उतरले, ते ते अजरामर झाले असेच म्हणावे लागेल. पुलंच्या अनेक व्यक्तीचित्रांशी आपण परिचित असतो. नारायण, हरीतात्या, सखाराम गटणे, अण्णा वडगावकर, चितळे मास्तर, नामू परिट यासारख्या त्यांच्या अनेक व्यक्तीचित्रांशी मराठी माणसाचे हृदयाचे नाते जुळले आहे. ही माणसे आपल्याला आपल्यातीलच एक वाटतात. हे त्यांचे शब्दचित्र रेखाटतानाचे कौशल्य आहे. त्या कथा वाचताना किंवा पुलंच्या तोंडून ऐकताना, ती माणसे अक्षरशः जिवंत होतात आणि आपल्या मनात कायमचे स्थान पटकावतात. पुलंच्या सिद्धहस्त लेखणीचा परिसस्पर्श ज्या ज्या विषयांना झाला, त्यांचे सोने झाले. त्यांचे असेच एक फारसे परिचित नसलेले व्यक्तीचित्र आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

हे व्यक्तिचित्र आहे विनोद दांचे. ' वंगचित्रे ' हे त्यांचे पुस्तक वाचत असताना हे विनोद दा आपल्याला भेटतात आणि कायमचे आपल्या हृदयात स्थान मिळवतात. आपल्याकडे आपण आपल्यापेक्षा वयाने जेष्ठ असलेल्या व्यक्तीला दादा असे सर्वसाधारणपणे म्हणतो. परंतु बंगालमध्ये साधारणपणे ' दा 'असे म्हणण्याचा प्रघात आहे. ' दा ' शब्दच कानाला किती गोड लागतो ! 

वयाची पन्नाशी उलटल्यानंतर पु ल देशपांडे १९७० मध्ये शांतिनिकेतनला गेले. तिथे अनेक दिवस राहिले आणि बंगाली भाषा त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केली. रवींद्रनाथ टागोरांच्या ' गीतांजली ' चा अनुवाद करणारे वामन मंगेश दुभाषी उर्फ ' ऋग्वेदी ' हे पुलंचे आजोळचे आजोबा. त्यांच्याकडूनच रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य आणि बंगाली भाषेची आवड पुलंकडे आली. कोणतीही भाषा शिकायची तर ती जिथे बोलली जात असते तिथे जाऊन अनुभवावी तिच्या विविध रूपांचा आस्वाद घ्यावा आणि त्यातून ती शिकावी अशी त्यांची धारणा होती. त्याप्रमाणेच पुलं शांतिनिकेतनात राहिले. ते कोलकात्यासारख्या शहरात राहिले तसेच बंगालमधील खेड्यापाड्यांमधूनही हिंडले. त्यातूनच त्यांचे ' वंगचित्रे ' हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकातीलच एक प्रसंग आणि हे एक व्यक्तीचित्र आहे.

आपल्या शांतिनिकेतनमधील पुलंनी तिथली भाषा, संस्कृती त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एखाद्या ठिकाणी काही दिवस वास्तव्य केल्याशिवाय तेथील संस्कृती खऱ्या अर्थाने कळत नाही. त्यांनी शांतिनिकेतनमध्ये बराच काळ वास्तव्य केले. त्यातूनच त्यांची ' मुक्काम शांतिनिकेतन ' आणि ' वंगचित्रे ' ही पुस्तके जन्माला आली. अशाच एका प्रसंगी ते शांतीनिकेतनमध्ये हिंडत असताना कलाभवनातल्या बंगलीवजा वसतिगृहातल्या छतावर त्यांनी सुंदर म्युरल्स पाहिली. ती पाहिल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या सलील यांना त्यांनी त्याबद्दल विचारले. तेव्हा सलील यांनी ती म्युरल्स विनोद - दांनी काढली असे सांगितले. त्या उत्सुकतेपोटी पुलं आणि सलील विनोद दा यांना भेटायला गेले आणि मग त्या प्रसंगाचे सजीव चित्रणच पुलं यांनी केले आहे. तो प्रसंग आणि ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याची ताकद पुलंच्या शब्दांमध्ये आहे.

विनोद दा ज्या वातावरणात बसले होते, त्याचं हे बोलकं चित्रण त्यांच्याच शब्दात...!

" अंधारातच दार उघडले गेले. हा चित्रकार अंधारात का बसला होता ते मला कळेना. तेवढ्यात एक मोलकरीण आली आणि तिने बटण ओढून दिवा लावला. काळोखातल्या रंगमंचावर प्रकाश पडावा आणि एकदम अनपेक्षित अशा प्रकारच्या देखाव्याने चकित व्हावे तसे मला झाले. एका ईझीचेअरवर काळा चष्मा घालून एक अतिशय सौम्यदर्शन वृद्ध गृहस्थ बसले होते. बराच वेळ ते तिथे बसलेले असावेत. समोर एक लहानशी तिपाई होती. तिच्यावर वीत सव्वावीत उंचीची एक मातीची मूर्ती घडत होती. बाजूला मातीचा गोळा होता. त्यामुळे अंधारातच ही शिल्पकलेची आराधना चाललेली असावी. भिंतीवर नाना प्रकारची चित्रे होती. आणि फडताळ पुस्तकांनी भरलेले होते..."

हे गृहस्थ म्हणजेच सुंदर म्युरल्स तयार करणारे सुंदर चित्रे काढणारे विनोद दा. त्यांनी सलील आणि पुलंची चौकशी केली. त्यांच्याबद्दल बोलताना पुढे पुलं लिहितात...

" मी त्याच्याकडे पाहण्यातच गर्क होतो. किती विलक्षण प्रसन्न व्यक्तिमत्व ! बोलणं तर खडीसाखरेसारखं.  तप: पूत चेहरा. डोक्यावर पांढरे शुभ्र केस, सडसडीत देहयष्टी. अंगात शुभ्र कुडता, पायजमा. दोन-चार मिनिटातच मला त्यांच्या अंधत्वाचा विसर पडला. मी सहज त्यांनी केलेल्या म्युरल्सविषयी बोलणे काढले.

विनोद दा म्हणाले, ' खूप वर्षे झाली त्या म्युरल्सला. त्यावेळी थोडे थोडे दिसत असे मला. '  मग मला कळले की चित्रकलेचे वेड आणि डोळ्यांचे अधूपण घेऊनच विनोद दांनी जगात प्रवेश केला. कागदाच्या अगदी जवळ डोळे नेल्याशिवाय त्यांना दिसत नव्हते. त्याकाळी कुठलीही चित्रशाळा त्यांना प्रवेश देत नव्हती. तसल्या त्या अधूदृष्टीच्या बालचित्रकाराला सरकारी चित्र शाळेचे दरवाजे बंद होते. "

येथे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची महानता आणि द्रष्टेपण आपल्याला कळते. " गुरुदेवांनी या मुलाची प्रतिभा पाहिली आणि त्याला जवळ घेतले. चित्रशाळा फक्त नियम जाणत होत्या. टागोरांना या मुलाच्या अधू डोळ्यातले तेज दिसत होते. त्यांनी त्याला रंग आणून दिले, कुंचले दिले आणि सांगितले,' काढ तुला हवी तेवढी चित्रे. ' गुरुदेवांचा आधार लाभला नसता तर कुठली चित्रे काढणार होतो मी...! असे भावपूर्ण उद्गार विनोद दांनी काढले. "

त्यांच्याबद्दल बोलताना पुढे पुलं लिहितात," सत्तरीच्या घरातल्या वृद्धाकडून ते वाक्य ऐकताना काळजाचे पाणी झाले. सहा चौरस इंचाहून एका दमात अधिक पृष्ठभाग दिसू न शकणारे विनोद दा. त्यांनी मुकाबला घेतला तो विस्तीर्ण भिंतीशी त्या विस्ताराच्या इंचा इंचात डोळा घालून त्यांनी भव्य म्युरल्स उभे केले. सलीलच्या वडिलांनीच त्यांना लहानपणी गुरुदेवांपुढे आणल्यामुळे घोष कुटुंबावर त्यांचं विशेष लोभ. अनेक गोष्टी सांगत होते. मात्र गोष्टीवेल्हाळपणा नव्हता. बोलणे ही लोभस असून रेखीव. विनोद दा म्हणजे शांतिनिकेतनातल्या गेल्या ३०/४० वर्षातल्या कलासाधनेचा चालता बोलता इतिहास आहे. केवळ चित्रकलाच नव्हे तर महाभारत, रामायण या महाकाव्यांचा त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला आहे. शांतिनिकेतनातल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आठवणी ऐकताना वाटत होते की केवळ कुंचल्यानेच नव्हे तर लेखणीने देखील हा माणूस काय सुरेख व्यक्तिचित्रे काढू शकला असता !"

" पूर्वी डोळे कागदाजवळ नेऊन का होईना पण दिसत होते. आता संपूर्ण अंधत्व. पण या अंधारात त्यांच्या प्रज्ञाचक्षुंपुढे आजही रंगरेषांचे विलास चालू असतात. आता त्यांनी शिल्पकलेशी मैत्री जमवली आहे. स्पर्शातून आकाराचा अंदाज घेत छोटी छोटी मृत्तिका शिल्पे घडवीत असतात. दिवस आणि रात्र यांच्यात आता अभेद आहे. आता रात्र झाल्यावर झोपलेच पाहिजे ही सक्ती नाही आणि दिवसा काम केलेच पाहिजे ही देखील सक्ती नाही. आता मानू ती वेळ ! "

पुढे एके दिवशी पुलंना कलाभवनाच्या वाटेवर विद्यार्थ्यांचा एक घोळका आढळला. ती मुले रंगसाहित्य घेऊन धावपळ करीत होती. पुलंनी थांबून पाहिले तर एका भिंतीपाशी विनोद दा उभे. भिंत हाताने चाचपीत म्हणायचे, ' इथे. ' बंगालीत विद्यार्थ्यांना छात्रच म्हणतात.मग एखादा छात्र किंवा छात्री तिथे वर्तमानपत्राचा एक कपटा चिकटवीत असे. पुन्हा विनोद दा भिंत चाचपीत म्हणायचे, ' इथे '. मग तिथे एक कपटा. असे काही कपटे चिकटवल्यावर विनोद दांनी हाताने त्या जागांना स्पर्श केला. एका शिष्याकडून खडू मागून घेतला आणि भिंतीवरच्या त्या कपट्यांना स्पर्श करीत सरसर सरसर रेखाकृती काढायला सुरुवात केली. केवळ स्पर्शाच्या आधाराने रेखली जाणारी ती चित्रे मुले मुली श्वास कोंडून पाहत होती. रेषा काढणाऱ्या त्या हातांना केवळ तपस्येतूनच मिळणाऱ्या आत्मविश्वासाचे वरदान होते. रेषा कुठे कापत नव्हती. थरथरत नव्हती. धीट रेषा, हातातले सामर्थ्य दाखवणाऱ्या रेषा. मनात रंगलेला चित्रपट इतका स्पष्ट होता की तो भिंतीवर रेखताना त्या भिंतीकडे डोळ्यांना दिसत असले तरी पाहण्याची गरज नसावी. तयार सतारियाची बोटे जशी पडद्याकडे न पाहता त्याच जागी पडतात त्याप्रमाणे त्या चित्राविषयी च्या चतु:सीमा स्पर्शून झाल्यावर प्रमाणबद्धतेत सुताइतकाही फरक नव्हता. लता मंगेशकरला जसे चेष्टेत सुद्धा बेसूर होणे अशक्य तसे विनोद दांच्या बोटांना प्रमाणहीन रेखाटन अशक्य. हाताच्या त्या हमखास हालचालीकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या त्या चित्रबंधाकडे मी अवाक् होऊन पाहत होतो. डोळ्यापुढे सदैव अंधाराचा पट असताना प्रकाशाची उपासना करणारा हा चित्रकार - चित्रकार कसला ? चित्रयोगी ! वार्धक्य, अंधत्व यांना परौते सरा असे म्हणणारा ! नव्या नव्या कल्पनांचे स्वागत करणारा ! पुढे पुलं म्हणतात, " रवींद्रनाथांनी आपल्या बगीच्यात अशी ही अलौकिक रोपटी आणून लावली. त्याचे किती सुंदर वृक्ष झाले ! त्यातले आज काळाने काही नष्ट केले. पण जे काही आहेत त्यांच्या सावलीला मात्र पुन्हा पुन्हा जावेसे वाटते. "

धन्य आहेत ते अशी सुंदर शब्दचित्रे रेखाटणारे पुलं, सुंदर म्युरल्स आणि चित्रे काढणारे विनोद दा आणि अशा व्यक्तींच्या जीवनाला आकार देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. या सर्वांना मनोमन प्रणाम !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१/३/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...