उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३८
चित्रकार रवींद्रनाथ - भाग तीन
रवींद्रनाथांनी चित्रकलेच्या प्रांतात जरी उशिरा प्रवेश केला तरी त्यांनी भारतीय चित्रकलेचे उत्तम निरीक्षण आणि अभ्यास केलेला होता. साहित्याच्या अन्य प्रांताप्रमाणेच भारतीय चित्रकलेचे सुद्धा पुनरुज्जीवन कसे करता येईल याचा विचार त्यांच्या मनात नेहमी असायचा. अवनींद्रनाथ हा रवींद्रनाथांचा पुतण्या कलकत्त्यामध्ये एक उत्तम चित्रकार म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या चित्रकलेचे निरीक्षण आणि अभ्यास रवींद्रनाथ करीत असत. त्याला चित्रकलेमध्ये आणखी प्रगती करता यावी म्हणून त्याला अनुकूल वातावरण कसे निर्माण करता येईल याकडेही त्यांचे लक्ष होते. काही भारतीय चित्रकारांना त्यांनी जपान आणि इतर देशांमधील चित्रकलेचे निरीक्षण आणि अभ्यास करता येईल अशी व्यवस्था केली आणि त्यांच्यात एक नवी प्रेरणा निर्माण केली. त्याचप्रमाणे एका प्रसिद्ध जपानी चित्रकाराला भारतात बोलावून प्राचीन भारतीय चित्रकलेच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न केले. भारतीय चित्रकारांनी पाश्चात्य चित्रकलेचे अंधानुकरण न करता प्राचीन भारतीय आणि पौर्वात्य चित्रकलेचे पुनरुज्जीवन घडवून आणावे यासाठी ते आग्रही होते.
स्वतः उत्तम कलाकार असले तरी रवींद्रनाथांना इतर कलाकारांबद्दलही आदर होता. हे त्यांचे कलाकार म्हणून मोठेपण आहे. त्यांना ते प्रोत्साहन देत असत. शांतिनकेतनमध्ये मुकुल नावाचा एक विद्यार्थी अभ्यासापेक्षा चित्रकलेत अधिक रस घेत असे. त्याची चित्रकलेत प्रगती व्हावी म्हणून रवींद्रनाथांनी त्याला वेळोवेळी उत्तेजन दिले. एवढेच नव्हे तर त्यांना जेव्हा जपानला जाण्याचा योग आला तेव्हा ते त्याला आपल्या सोबत जपानला घेऊन गेले आणि तेथील चित्रकारांसोबत त्याची भेट घडवून आणली.
पुढे मुकुलला त्यांनी एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्याला चित्रकलेबद्दल बहुमोल मार्गदर्शन त्यांनी केले. ते म्हणतात," सौंदर्य म्हणजे भ्रम नव्हे, चेटूक नव्हे किंवा नजरबंदीही नव्हे. सौंदर्य म्हणजे सत्य. तुमच्याभोवती असंख्य क्षुद्र आणि कुरूप वस्तू असतात, पण तुमच्या ध्यानामुळे त्यांच्यातले सौंदर्य तुम्हाला पाहता आले पाहिजे. " आणखी एका पत्रात ते त्याला लिहितात,"आपल्या भोवतालचे जग नीट बघा आणि तुम्हाला असे आढळून येईल की ते बळकट आहे, भक्कम आहे आणि टणक आहे. जगाचे विराट सौंदर्य आपला विरुप भाग लीलया आणि नि:संकोचपणे पेलू शकते. तुमचा कुंचला असा नसावा की, जो एखाद्या भ्रामक सरस्वतीच्या पावलांना अळीता लावण्यातच गर्क राहील. "
गगनेंद्रनाथ हा त्यांचा पुतण्या देखील एक उत्तम चित्रकार होता. त्याला एका पत्रात मार्गदर्शन करताना ते म्हणतात," गगन, तू कधी घराबाहेर पडून आजूबाजूचे जग पाहणार आहेस ? तुझे नाव तू सार्थक केले पाहिजे." कारण बाहेर पडून निसर्गाचे अवलोकन केल्याशिवाय चित्रकलेमध्ये प्रगती होणार नाही हे त्यांना माहिती होते.
अवनींद्रनाथ या आपल्या पुतण्याला लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात," अवन, मी जितका येथे जपान मध्ये फिरतो आहे तेवढ्या तीव्रतेने मला असे वाटते की तू येथे असायला हवे होते. जपानच्या जिवंत कलेला जाणून घेणे हे किती महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपलीही कला पुनरुज्जीवित होऊन बहरेल .मात्र हे तुला तुझ्या दक्षिणेकडील व्हरांड्यात बसून कधीही कळणार नाही. तू येथे असता तर तुझ्या डोळ्यांवर असलेली जाड पट्टी गळून पडली असती आणि तुझ्यातील कलादेवतेला तिची योग्य भेट मिळाली असती." रवींद्रनाथांच्या आपल्या पुतण्यांना आणि शिष्यांना दिलेल्या या सर्व सूचना आजही चित्रकला शिकू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शक ठराव्यात अशाच आहेत. चित्रकलेच्या अध्यापकांना देखील आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देखील या सूचना मोलाच्या ठराव्यात अशाच आहेत.
आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात चित्रकलेकडे वळलेल्या रवींद्रनाथांना त्याची एवढी गोडी लागली होती की ते एकदा म्हणाले" माझी पहाट फुलांनी डवरली होती, माझे मावळते दिवस रंगांनी बहरून निघोत. "
चित्रकलेच्या जरी अनेक पद्धती असल्या तरी रवींद्रनाथांनी कुठल्याही शैलीचे अनुकरण केले नाही. त्यांची शैली ही त्यांची स्वतःची होती. त्यात वास्तवतेला, नाविन्याला आणि सौंदर्याला महत्त्व होते. चित्रकार म्हणून साधारणपणे १७/१८ वर्षांची त्यांची कारकीर्द होती. एवढ्या कालावधीत त्यांनी दोन हजारांवर चित्रे काढली. विश्वभारतीने रवींद्रनाथांची चित्रे छापून त्यांचे दोन खंड ' चित्रलिपी ' या नावाने प्रकाशित केले. आपल्या बऱ्याच चित्रांवर रवींद्रनाथांनी निवेदनपर अशी काही इंग्रजी वाक्ये लिहिली आहेत. त्यामुळे या चित्रांमधील खुबी समजण्यासाठी मदत तर होतेच पण त्या चित्रात त्यांना काय सांगायचे आहे हेही लक्षात येते. त्यांच्या पेंटिंगच्या खास पद्धतीवरही प्रकाश पडतो.
त्यांच्या या चित्रांमधील काही चित्रांबद्दल या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल. एका चित्रात त्यांनी एका प्रचंड अजगरावर एक मनुष्य बसलेला दाखवला आहे. या चित्रातून त्यांचा एक आवडता विचार व्यक्त होतो. या चित्रातून मानवी मनाची उत्क्रांती त्यांना दाखवायची आहे. हा प्रचंड अजगर म्हणजे इतिहासपूर्वकालीन प्रचंड शारीरिक वाढ. पण जसजसा मानवाचा विकास किंवा बौद्धिक उत्क्रांती होत गेली तसतसा तो या प्रचंड अजगरावर स्वार झाला आहे.
आणखी एका चित्रात रस्त्याच्या कडेला एक दगड आहे. त्यातील कडेच्या भेगेतून दोन फुले फुलली आहेत आणि जणू असे सुचवत आहेत की हे राकट दगड पृथ्वीचा सूर आणि फुलणारे जीवन दडपून टाकू शकत नाही. त्यातून त्यांना असेही सुचवायचे आहे की मानव आधुनिकीकरणामुळे निसर्गापासून दूर जात आहे. त्याने निसर्गाकडे परत यावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या ' रक्तकरबी ' या नाटकात हीच प्रतीकात्मक मध्यवर्ती कल्पना आहे.
रवींद्रनाथांची चित्रे कलेच्या नावाखाली चाललेल्या सर्व प्रकारच्या गोंधळापासून कोसो दूर होती. आपल्या स्वतंत्र प्रतिभा शैलीने या चित्रात रंग आणि रेषांच्या माध्यमातून काव्य आणि उच्च मुल्यात्मक विचार ते व्यक्त करतात. त्यांनी रंगरखांचा कल्पकतेने आणि काटकसरीने वापर केला. माणसाचा चेहरा रेखाटताना डोळे, ओठ, नाक इत्यादी काढण्याची गरज त्यांना वाटत नसे तर केवळ लंबाकृतीद्वारे चेहऱ्याची आकृती ते सुचित करत आणि उरलेले सारे पाहणाऱ्याच्या कल्पनेवर सोडून देत. त्यामुळेच नंदलाल बोस यांच्यासारख्या प्रसिद्ध चित्रकाराला रवींद्रनाथांच्या चित्रात आणि रेखाटनात वास्तवता नसूनही ती ' वास्तव ' वाटली.
स्त्री म्हणजे रवींद्रनाथांच्या दृष्टीने एक गूढ रहस्य होते. त्यांनी स्त्रियांची जी चित्रे काढली त्यात अश्लीलता किंवा कामुकता कुठेही आढळून येत नाही. त्यांच्या चित्रातील स्त्रियांमध्ये लज्जा, शालीनता आणि कारुण्य या स्त्री सुलभ वैशिष्ट्यांचे दर्शन आपल्याला घडते. त्यांनी केलेले फुलांचे अथवा निसर्गाचे चित्रण म्हणजे जणू त्यांनी अनुभवलेला निसर्ग ! त्यांच्या चित्रातील फुले, पाने आपल्याला निसर्गात आढळणार नाहीत कारण निसर्ग चित्रित करताना एकूणच वातावरण निर्मिती करणे हा त्यांचा प्रमुख हेतू असे. ही चित्रे त्यांनी शांतीनिकेतनच्या परिसरातील टवटवीत निसर्गाकडून प्रेरणा घेऊन साकारली आहेत.
आपल्या चित्रांबद्दल बोलताना रवींद्रनाथ एका ठिकाणी म्हणतात," मला माझ्या चित्रांचा अर्थ लोक नेहमीच विचारतात. मी गप्प राहतो. तशी माझी चित्रेही गप्प राहतात. यातले सारे अभिव्यक्तीसाठी आहे, स्पष्टीकरणासाठी नाही. आणि ह्या चित्राच्या अभिव्यक्तीत विचार करण्याजोगं आणि शब्दांनी वर्णन करण्यासारखं सुप्त, गुप्त असं काहीच नसतं आणि त्या चित्रात खरोखरच काही दृश्य सत्य असेल तरच ती टिकतात नाहीतर नापसंत ठरवून विस्मृतीत गडप होतात. मग जरी त्यात शास्त्रीय अगर नैतिक तथ्य असलं तरीही..."
जगभरात अनेक ठिकाणी रवींद्रनाथांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आणि अनेक पाश्चात्य चित्रकारांनी त्यांच्या चित्रांची प्रशंसा केली. बर्लिनमध्ये जेव्हा त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले तेव्हा एका वर्तमानपत्राने असे लिहिले की टागोरांनी अत्यंत विस्मयकारक असा रंगांचा चोखंदळपणा दाखवला. त्यांची रंगचित्रे संपूर्ण लय आणि माधुर्याने भरलेली आहेत.
बर्मिंगहॅम शहरातील सिटी आर्ट गॅलरीत रवींद्रनाथांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. ते पाहिल्यानंतर जोसेफ साऊथ हॉल या नावाचा कलासमीक्षक थक्क झाला. रवींद्रनाथांच्या चित्रांबद्दल त्याने प्रशंसोदगार काढले आहेत. त्याने त्यांच्या चित्रातील आध्यात्मिक गुणांचीही नोंद घेतली. तो म्हणतो," टागोरांची जी चित्रे मी पाहिली, त्यात प्रतिभासंपन्न कलाविष्कार आहे. त्यात रंग आणि रेखातील पौर्वात्य शैली दिसते. आकृती आणि लय यातली त्यांची जाण आम्हाला पर्शियन अथवा भारतीय वस्त्राप्रमाणे वा हस्तशिल्पाप्रमाणे सुंदर वाटते. त्यांचे रंगज्ञान तर अतिशय अपूर्व आहे. "
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
९/१/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा