मुख्य सामग्रीवर वगळा

निसर्गरम्य श्रीक्षेत्र बदामी


उगवतीचे रंग 

निसर्गरम्य श्रीक्षेत्र बदामी

डिसेंबर २०२३ मध्ये मला श्रीक्षेत्र बदामीला जाण्याचा योग आला. बदामी येथील श्री शाकंभरी देवी आमची कुलदेवता असल्याने यापूर्वीही अनेक वेळा या ठिकाणी जाण्याचा आणि दर्शनाचा योग आला होता. पण यावेळची अनुभूती काही औरच होती. मातेचे मंदिर खूपच सुंदर सजवले होते. सगळीकडे स्वच्छता होती आणि अतिशय प्रसन्न वातावरण होते. बदामी येथे एक दिवस मुक्काम केला आणि तेवढ्या वेळात देवीच्या त्रिवार दर्शनाचा योग आला. गाभाऱ्यात उभे राहून अतिशय जवळून दर्शन झाले. नंतर समोरील सभामंडपात बसून देवीचे निवांत दर्शन घेतले. सुदैवाने भाविकांची फारशी गर्दी नसल्याने देवीचे दर्शन खूपच शांत आणि निवांतपणे घेता आले.

पूर्वीच्या विजापूर आणि आताच्या बागलकोट जिल्ह्यात हे निसर्गरम्य आणि पवित्र ठिकाण आहे. हुबळी रेल्वेस्टेशन पासून साधारणपणे शंभर किमीच्या अंतरावर हे ठिकाण आहे. सोलापूर-गदग रेल्वे मार्गावर बदामी स्टेशन आहे. या स्टेशनवर फारसा गजबजाट किंवा गोंगाट नसतो. इथून देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी अनेक प्रकारच्या वाहनांची सोय आहे. बदामी हे तालुक्याचे ठिकाण असून येथील बाजारपेठ मोठी आहे. भाविकांच्या सोयीसाठी अनेक हॉटेल्स, लॉजेस उपलब्ध आहेत. बऱ्याचशा हॉटेलमध्ये यात्रेकरूंना अत्यंत कमी दरात जेवण, नाश्ता मिळू शकतो. अन्य जीवनोपयोगी वस्तूंच्या किमतीही बऱ्यापैकी कमी आहेत.

बदामी येथील शाकंभरी देवीचं हे मंदिर अतिशय पुरातन आहे. याची दगडी बांधणी पाहताक्षणीच नजरेत भरते. या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे सांगितले जाते. शके ६०३ ( इ.स. ६८१ ) मध्ये या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला असावा असा अंदाज केला जातो. मंदिराच्या आवारात एका खांबावर केलेल्या कोरीव कामात राष्ट्रकूट काळातील राजांची नावे कोरली आहेत. त्यावर कानडी भाषेत १०१९ या वर्षाचा उल्लेख असून त्या काळी युद्धात पराक्रम गाजवलेल्या राष्ट्रकूट घराण्यातील राजा भीमदेव याच्या सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्तंभाची निर्मिती करण्यात आली.

सकाळी या मंदिरातील देवीला जेव्हा स्नान, पंचोपचार आणि अभिषेक इ. नित्यपूजा केली जाते, तेव्हा आपल्याला अतिशय सुंदर अशा शाकंभरी मातेच्या सिंहारूढ भव्य मूर्तीचे दर्शन घडते. देवी अष्टभुजा असून मूर्ती  सालंकृत आहे. देवीच्या उजव्या हातामध्ये खङग, डमरू आहे. गळ्यामध्ये हार असून अंगाखांद्यावर विविध अलंकार आहेत. मस्तकावर नावरत्नांचा मुकुट भगवतीने परिधान केला आहे. मुद्रा अत्यंत प्रसन्न आहे. गाभाऱ्यासमोर कासव आहे. शाकंभरी मातेची ही मूर्ती काळ्या पाषाणातून घडवली आहे. मूर्ती इतकी सुंदर आहे की त्यावरून नजर हटत नाही. या नित्यपूजेच्या वेळी मंत्रोच्चाराच्या गजरात पुजारी देवीला उष्णोदकाचे जे स्नान घालतात ते पाहण्यासारखे असते. त्यानंतर मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो. सर्व भाविकांनी भक्तिभावाने आणलेल्या साड्या देवीला अशा कौशल्याने पुजारी नेसवतात की आपण बघतच राहतो.

देवीच्या मंदिराभोवती विशाल असे आवार आहे. या आवारात उभ्या असलेल्या दोन भव्य दगडी दीपमाळा आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराभोवती तटबंदी आहे. आतील बाजूला ओवऱ्या आहेत तसेच प्रदक्षिणा आणि पालखी सेवेसाठी मोकळी जागा आहे. प्रदक्षिणेच्या मार्गावर केदारेश्वर, हनुमान, सहदेव, श्रीचक्र ही मंदिरे आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भक्तांच्या निवासासाठी खोल्या बांधलेल्या आहेत. मंदिराभोवतीचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून नारळ, केळी, सुपारी, नागवेली, चिंच आदी झाडांनी वेढलेला आहे. मंदिरासमोर दगडी बांधकाम केलेले सुंदर असे हरिद्रातीर्थ आहे. मंदिराच्या बाहेर पूजासाहित्याची भरपूर दुकाने आहेत. त्याचप्रमाणे त्या भागात ऋतूनुसार उपलब्ध असणाऱ्या फळांची रेलचेल पाहायला मिळते. आरती, पूजा इ. नित्योपचार झाल्यानंतर दुपारी १२।। ते दोन या वेळेत भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था केली जाते. शाकंभरी मातेला गव्हाची खीर आणि पुरणाचे कडबू हे पदार्थ प्रिय आहेत. तेथील नैवेद्यात आणि प्रसादात या पदार्थांचा समावेश अवश्य असतो.

शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. या काळात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. दरवर्षी वैशाख अमावास्येच्या आदल्या दिवशी म्हणजे कृष्ण चतुर्दशीला देवीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. याचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी देवीला आमरसाने अभिषेक केला जातो. त्या दिवशी प्रसाद म्हणूनही भाविकांना आमरसच दिला जातो. दर शुक्रवारी पालखी सेवा असते. तसेच नित्योपचारातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे ' वट्टलसेवा ' म्हणजेच शेजारती. सायंकाळी पूजाविधी संपल्यानंतर मंत्रघोषात देवीच्या अंगावरील अलंकार उतरवले जातात. रात्री नऊच्या सुमारास दूध,फळे ठेवण्यात येतात. पाळण्यात अक्षदा घालून उत्सवमूर्तीला झोपवले जाते. अत्यंत भक्तिभावाने पाळणा हलवत देवीसाठी अंगाईगीत म्हटले जाते.

हलकेच गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो.

बदामीच्या परिसरात बदामी लेणी असून ती प्रेक्षणीय आहेत. देशविदेशातील लोक ही लेणी पाहण्यासाठी येतात. सहाव्या शतकातील चालुक्य राजांच्या काळातील त्यांची निर्मिती आहे. या लेण्यांमध्ये उत्तर आणि दक्षिण भारतीय शिल्पकलेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. या परिसरात एकूण चार लेणी असून तीन हिंदू देवतांची असून एक जैन धर्मियांची आहे. सर्वच लेण्या प्रेक्षणीय आहेत. त्याचप्रमाणे ऐहोळे, पट्टदकल येथील पुरातन मंदिरे प्रेक्षणीय आहेत. ही लेणी आणि मंदिरे पाहताना आपल्यासोबत जर गाईड असेल तर त्या लेण्यांचा इतिहास अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर उलगडला जातो आणि आपण त्यांचा अधिक आंनद घेऊ शकतो. आपल्याकडे अधिक वेळ असेल तर आपण हम्पी, तुंगभद्रा डॅम आधी ठिकाणी पण पाहू शकतो.

शाकंभरी मातेच्या अवताराची कथा अतिशय रम्य आहे. दुर्गम नावाच्या असुराने तपसामर्थ्याच्या बळावर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वराने तो अजिंक्य आणि उन्मत्त झाला. इंद्रादी देवांना त्याने पराभूत करून बंदी बनवले. इंद्रादी देव बंदिवासात असल्याने पाऊस पडेनासा झाला. पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला. नद्या, सरोवर, तलाव आटले. विहिरी कोरड्या पडल्या. वनस्पती, मानव आणि पृथ्वीवरील यच्चयावत प्राणी अन्नपाण्याविना तडफडू लागले. देवांना हे पाहवेना म्हणून त्यांनी देवी भगवतीची प्रार्थना केली. या संकटातून आम्हाला सोडावं म्हणून साकडे घातले. अन्नपाण्याविना तडफडत असलेली प्रजा पाहून देवीच्या नेत्रात करुणा दाटून आली. तिने शंभर नेत्र असलेले रूप धारण केले. त्या नेत्रातून कृपारूपी जलधाराची वृष्टी झाली. तहानलेल्या धरतीला त्या जलधारांनी शांत केले. नद्या, सरोवरे,तलाव, विहिरी भरल्या. धरित्रीने हिरवा शालू परिधान केला. अन्नधान्याचा सुकाळ झाला. अनेकविध भाज्यांची निर्मिती झाली. देवीने प्रजेचे दुःख हरण केले. विविध भाज्या म्हणजे शाक निर्मिती तिच्या कृपेने झाली म्हणून ती शाकंभरी झाली. शंभर नेत्र असलेले रूप तिने धारण केले म्हणून तिला शताक्षी म्हणू लागले. त्यानंतर देवीने ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेल्या दुर्गम राक्षसाचा त्याच्याशी भयंकर युद्ध करून संहार केला. त्यामुळे शाकंभरी दुर्गा या नावाने प्रसिद्ध झाली. देवीने वनात निवास केला म्हणून तिला बनशंकरी असेही म्हटले जाऊ लागले. याच देवीला रक्तदंती, भ्रामरी अशी विविध नावे आहेत. त्या प्रत्येक नावामागे एक विशिष्ट अशी कथा आहे.

बदामी व्यतिरिक्त शाकंभरी देवीची देशभरात अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. त्यातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या शिवालिक पर्वत श्रेणीमध्ये वेगवेगळ्या रूपांनी ही आदिशक्ती वास करते आहे. महाराष्ट्रात सोलापूर, बेळगाव, नागेवाडी ( सातारा ), बनाळी ( सांगली जिल्हा, जत तालुका ), कुरुंदवाड ( ता. शिरोळ, जि . कोल्हापूर ), बुधगाव ( सांगली ), विटा ( ता. खानापूर जि सांगली ), कुंभोज ( ता. हातकणंगले जि कोल्हापूर ), पुणे परिसरात वडगाव शेरी, पिंपळे निलख तसेच बारामती, आष्टा, इचलकरंजी इ. ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे विजयवाडा, आंध्र प्रदेश येथे कनकदुर्गा या नावाने शाकंभरी मातेचे मंदिर आहे. बंगळुरू, धारवाड, बेळगाव, चेन्नई, वारंगळ, सकराय आणि सांभर ( राजस्थान ) आदी ठिकाणी पण देवीची मंदिरे आहेत. मूर्ती आणि मंदिरांच्या रूपाने स्थूल रूपाने ही देवी विविध ठिकाणी वास्तव्य करीत असली तरी ती सर्वव्यापी आहे. शाकंभरी देवी शीघ्र फलदायिनी, वरदायिनी आहे. मनोभावे भक्ती करणाऱ्यांचे मनोरथ देवी पूर्ण करते. चारही वर्णातील लोकांची ही कुलदेवता आहे. ज्यांची कुलदेवता शाकंभरी आहे, त्यांनी दररोज तिची उपासना अवश्य करावी. ज्यांना तेही शक्य होत नाही त्यांनी या पौषमासातील शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा अशी तरी तिची विशेषोपासना करावी.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२१/०१/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...