मुख्य सामग्रीवर वगळा

समर्थांच्या घरी...

 उगवतीचे रंग 

समर्थांच्या घरी...

२२ डिसेंबर २०२४ चा दिवस ! वर्ष संपत आले होते पण या वर्षांनी जाता जाता मला सुरेखशी भेट दिली. मागील जन्मी काहीतरी पुण्य केले असावे म्हणून जांब समर्थ या पुण्यभूमीला भेट देण्याचा पुण्यप्रद योग आला. याच दिवशी जालन्यामध्ये सौ. स्वाती रत्नपारखी यांच्या काव्यकस्तुरी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माझ्या उपस्थितीत झाले आणि त्यानंतर समर्थ रामदासांच्या जन्मभूमीला भेट देण्याचा योग जुळून आला. लहानपणी मनाच्या श्लोकांचे पाठांतर केले होते. लहानपणी त्यांचा फारसा अर्थ कळला नव्हता पण मोठेपणी त्यांच्यातली सत्यता कळू लागली. पुढे यथावकाश दासबोधही थोडाफार वाचला. कधीतरी वेळ प्रसंगी समर्थ रामदासांवर थोडेफार बोलण्याचाही योग आला. जिथे समर्थांनी आपले अवतार कार्य समाप्त केले आणि जिथे त्यांचे समाधी आहे अशा सज्जनगडावर तीन वेळा जाण्याचा आणि राहण्याचा योगही आला. परंतु ज्या जांब गावी समर्थांचा जन्म झाला होता ते गाव पाहण्याची इच्छा खूप दिवसांपासून मनात होती. आणि २२ डिसेंबरला ती इच्छा पूर्ण झाली. जांब हे गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी या तालुक्यात आहे आणि जालन्यापासून अंबड मार्गे दीड तासात आपल्याला तिथे पोहोचता येते. तर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथून तिथे पोहोचण्यासाठी साधारणपणे दोन ते अडीच तास लागतात. 

मी जांब येथे जाणार असल्याचे बोलणे नाशिक येथील श्री अशोककाका धर्माधिकारी यांच्यासोबत झाले होते. ते त्या ठिकाणी कामानिमित्ताने पूर्वी अनेकदा जाऊन आले होते आणि त्यांच्या शुभ हस्ते तिथे काही कार्यही घडले आहे. त्यामुळे त्यांनी मला तिथे मुक्कामाला जा त्या ठिकाणी तुमची सोय होईल असे आवर्जून सांगितले आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही दोघे ( मी आणि सौ ) संध्याकाळी जांब येथे पोहोचलो. जांब समर्थ हे एक छोटेसे गाव आहे. गावात शिरल्याबरोबर आपण अगदी ग्रामीण भागात आलो आहोत याची जाणीव होते. तेथील शांत, गर्दी विरहित आणि निसर्गरम्य असलेले वातावरण गेल्याबरोबर आपले मन प्रसन्न करते. दुरूनच मंदिराचा दगडी कळस आपल्याला दिसतो. जवळ पोहोचल्यानंतर मंदिराचे प्रशस्त आणि रम्य आवार आपले मन मोहून टाकते. वातावरणात एक वेगळेच पावित्र्य जाणवायला लागते आणि आपण एका अतिशय पवित्र ठिकाणी आलो आहोत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. येथे पूर्वकल्पना देऊन गेल्यास आपली राहण्याची आणि जेवण्याची मोफत सोय संस्थानच्या वतीने केली जाते.

शुचिर्भूत होऊन आम्ही समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेलो. समर्थांच्या जन्मस्थळाची स्मृती म्हणून हे मंदिर उभारले आहे. मंदिरात समर्थ रामदासांची देखणी मूर्ती आहे. १९३२ मध्ये श्रीसमर्थ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एका भव्य सोहळ्याने करण्यात आली. सभामंडपात एका बाजूला त्यांची प्रतिमा लावली आहे तर दुसऱ्या बाजूला समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज एका प्रतिमेमध्ये दिसतात. मंदिराचा सभामंडप भव्य आहे. त्यामध्ये समर्थांच्या जीवनातील प्रसंगांची चित्रे लावलेली आहेत.

या परिसरात आपण आलो की समर्थांच्या चरित्रात वाचलेले त्यांच्या लहानपणीचे प्रसंग जणू जिवंत होतात. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत या भूमीत आपण आलो आहोत याचा खूप आनंद वाटतो. श्रीरामांची उपासना मारुतीची उपासना आणि सूर्याची उपासना ज्या घराण्यात होत होती अशा ठोसर ( कुलकर्णी )घराण्यात समर्थ रामदासांचा जन्म झाला. त्यांचे वडील सूर्याजीपंत आणि आई राणूबाई या सज्जन, सदैव भक्तिमार्ग आणि परोपकारात रत असलेल्या दांपत्याच्या पोटी समर्थ रामदासांचा जन्म झाला त्यांचे नाव नारायण असे होते आणि त्यांचे जेष्ठ बंधू गंगाधर उर्फ श्रेष्ठ हे होते.

हाच तो परिसर की ज्या ठिकाणी समर्थ रामदासांनी लहानपणी मित्रमंडळी जमवून नाना प्रकारचे खेळ खेळले, तेथील रानावनात ते हिंडले, झाडांवर चढले, झाडांवरून भिंतीवर उड्या मारल्या, शस्त्रे चालवण्याचा सराव केला, घोड्यावरून रपेट केली. या त्यांच्या बाललीला याच परिसरात घडल्या.

 समर्थ नेहमी बाहेर हिंडत असायचे आणि घरात त्यांचा वावर कमी म्हणून एकदा आई त्यांना म्हणाली की नारायणा, अरे तुझा भाऊ गंगाधर तुझ्यापेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठा आहे तरी तो कुळकर्णीपणाचे काम पाहतो. तू थोडा तरी घराकडे पहात जा, प्रपंचाची चिंता कर. हे ऐकल्यानंतर नारायण स्वतःच्या मनाशी विचार करू लागला आणि तिथेच असलेल्या एका अळगळीच्या खोलीत जाऊन चिंतन करीत बसला. कित्येक तास गेले तरी तो कोणाला दिसला नाही. त्यांची आई जेव्हा काही कामानिमित्त त्या खोलीत केली तेव्हा आईने त्यांना विचारले की नारायणा, इथे काय करतो आहेस रे ?  तेव्हा ते उतरले," आई चिंता करितो विश्वाची." आईने सांगितले होते प्रपंचाची चिंता करायला आणि लहानग्या नारायणाला पडली होती विश्वाची चिंता. ही चिंता त्याने आयुष्यभरच केली आणि जगाच्या कल्याणासाठीच आपले आयुष्य वेचले. " आई चिंता करितो विश्वाची," हे त्यांचे बोल अजूनही या परिसरात घुमत आहेत की काय असे वाटते.

पुढे समर्थांचे मोठे बंधू असलेले गंगाधरपंत यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे सूर्याजीपंतांनी अनुग्रह दिला. त्यांनी आपल्यालाही अनुग्रह द्यावा म्हणून समर्थ खूप मागे लागले. परंतु तू अजून लहान आहेस. इतक्यात गडबड करू नकोस असे वडिलांनी सांगितले. त्यामुळे समर्थ रुसून बसले आणि गावाबाहेरच असलेल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीरायाची मनधरणी करू लागले. संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी तेथून ते हलले नाहीत. शेवटी तिथेच त्यांना अति श्रमामुळे झोप आली. त्यावेळी प्रत्यक्ष मारुतीरायांनी दर्शन देऊन त्यांची समजूत घातली आणि त्यांना कृपाशीर्वाद दिला. हे मारुतीचे मंदिर आजही आपल्याला जांब गावात  बघायला मिळते. समर्थ ज्या ठिकाणी रुसून बसले होते आणि ज्या ठिकाणी त्यांना मारुतीरायाने दर्शन दिले ते मंदिर पाहता आल्यामुळे मला जो आनंद झाला तो शब्दातीत आहे. म्हणूनच इथली माती हे पवित्र माती आहे. कुसुमाग्रज यांच्या शब्दात थोडा बदल करून असे म्हणता येईल की 

जांब गावीच्या मातीचा 

 लावा ललाटास टिळा

हिच्या संगतीने घडल्या 

बाल समर्थांच्या लीला.

याच गावामध्ये समर्थांचे देवघर आहे म्हणजे समर्थांचे वडील ज्या मूर्तींची पूजा करीत असत त्या मूर्ती आजही आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तसेच समर्थांच्या वडिलांना प्रत्यक्ष सूर्यनारायणाने भेट दिलेली पंचायतन मूर्ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय सुंदर असलेल्या या मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. साधारणपणे सीतामाता रामाच्या डाव्या बाजूला उभी असते परंतु या ठिकाणी मात्र ती उजव्या बाजूला आहे. इथे ती आदीमायेच्या रूपात आहे म्हणून तिचे स्थान उजव्या बाजूला आहे असे म्हटले जाते.याच ठिकाणी समर्थकालीन वाड्याचे काही पुरातन अवशेष आपल्याला आढळतात. 

येथूनच साधारणपणे तीन किलोमीटर असलेल्या आसनगाव या गावी समर्थ रामदासांचे लग्न लागले होते. त्यावेळी समर्थ केवळ बारा वर्षांचे होते परंतु लग्न लागण्यापूर्वीच ' सावधान ' शब्द कानी पडल्यानंतर ते सावधान झाले आणि त्यांनी तेथून पळ काढला. संसारातील व्यर्थपणा त्यांना कळला. आणि पुढे समाजाला सावधान करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले त्यांनी समाजाचा संसार केला. अशा या आसन गावी ज्या बोहल्यावर समर्थांचे लग्न लागले होते तो बोहला आजही बघायला मिळतो. 

समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेली अशी अनेक ठिकाणी या परिसरात आहेत. ती पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे मला खरोखरच धन्यता वाटली. समर्थांच्या कार्याविषयी ज्यांना आदर आहे, ज्यांची समर्थांप्रती श्रद्धा आहे, अशा सर्व समर्थ भक्तांनी एकदा तरी या परिसराला अवश्य भेट द्यावी इतके हे ठिकाण सुंदर आणि पावन आहे.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

७/१/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...