उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३७
चित्रकार रवींद्रनाथ - भाग दोन
शब्दांचा चित्रकार असलेल्या रवींद्रनाथांना आपण खरेखुरे रेषांचा चित्रकार व्हावे असे प्रकर्षाने वाटू लागले. कारण त्यांच्यातील कलावंत एवढा मोठा होता की केवळ शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणे त्याला कुठेतरी अपूर्ण वाटत होते आणि त्यातूनच चित्रकार रवींद्रनाथांचा जन्म झाला असे म्हणावे लागेल. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी चित्रकलेच्या आराधनाला सुरुवात केली आणि नंतर त्यात कोणालाही तोंडात बोट घालायला लावेल एवढे प्राविण्य प्राप्त केले. यावरून आपल्या हे लक्षात येते की चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेण्याचे त्यांचे वय निघून गेले होते. आपल्याला कोणतीही नवीन गोष्ट शिकायची असेल तर वयाचे बंधन कधीही आडवे येत नाही. कोणत्याही वयात एखादी नवीन गोष्ट शिकण्याची सुरुवात आपण करू शकतो हेच रवींद्रनाथांच्या या उदाहरणावरून दिसते.
चित्रकलेसाठी लागणारे वातावरण खरंतर त्यांच्या घरात पूर्वीपासूनच होते. त्यांचे मोठे बंधू ज्योतीरिंद्रनाथ हे उत्तम चित्रकार होते. तसेच त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेले अवनींद्रनाथ यांनी बेंगॉल स्कूल ऑफ आर्ट ची स्थापना केली होती. त्यांची ही शाळा रवींद्रनाथांच्या निवासस्थानाच्या परिसरातच होती. अवनींद्रनाथांचा स्टुडिओ हा विविध चित्रकारांचे एक आकर्षणाचे केंद्र होता. अनेक देशी-विदेशी चित्रकार या स्टुडिओला भेट देत असत. पण तरीही त्यावेळी चित्रकला हा विषय रवींद्रनथांना आकर्षित करू शकला नाही. त्याचे कारण म्हणजे रवींद्रनाथ साहित्य लेखनामध्ये गुंतले होते. त्यामुळेच वयाची साठी उलटल्यानंतर त्यांच्यातील कलाकाराला चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त व्हावे असे वाटू लागले. ते मोठ्या ओढीने चित्रकलेकडे जरी वळले तरी साहित्य निर्मितीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले नाही. पण त्यानंतर झाले एवढेच की साहित्य निर्मिती हे त्यांचे एकमेव आकर्षण राहिले नाही. त्यांच्या चित्रकलेचा हळूहळू विकास होत गेला आणि त्यांचे चित्त वेधून घेणारे ते एक महत्त्वाचे माध्यम ठरले.
त्यांनी चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. या गोष्टीचा तसा त्यांना फायदाच झाला कारण त्यांना आपल्या मनाने ह्या कलेचा विकास करण्यासाठी नवनवीन प्रयोग करता आले. त्यासाठी त्यांच्यावर कोणतेही बंधन नव्हते. परंपरेला चिकटून राहण्याची आवश्यकता नव्हती. त्यांच्या चित्रात जे वेगळेपण दिसते त्याचे कारण त्यांनी आपल्या चित्रकलेत पारंपारिक दृष्टिकोन अवलंबला नाही हे असावे.
आपल्या साहित्य लेखनात दुरुस्ती करण्यासाठी किंवा नको असलेला भाग दर्शविण्यासाठी रवींद्रनाथ लहानपणी निळ्या रंगाच्या पेन्सिलचा वापर करीत असत. १९२४ पासून आपल्या लेखनातील अशा चुकांच्या दुरुस्त्यांकडे आणि खाडाखोडीकडे त्यांचे प्रकर्षाने लक्ष जाऊ लागले. या दुरुस्त्या त्यांना बघवत नसल्यामुळे त्या दुरुस्त्यांना एक चांगला कलात्मक आकार देण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यातूनच ते चित्रकलेकडे वळले.
चित्रकलेच्या प्रकटीकरणात रवींद्रनाथांनी नवनवीन प्रयोग केले. कुंचला हाताळण्याचे शिक्षण घेतले नसल्यामुळे रवींद्रनाथांनी त्यांच्या प्रथम चित्र रेखाटनात आणि रंगकारीत एका वेगळ्याच तंत्राचा अवलंब केला. त्यांच्याजवळ उपलब्ध असलेले साहित्य म्हणजे लेखणी आणि शाई. त्याचाच वापर त्यांनी सुरुवातीला करून घेतला. जेव्हा त्यांना कागदाच्या पृष्ठभागावर शाई पसरवायची असे तेव्हा ते लेखणीचा ( म्हणजेच टाकाचा ) मागचा भाग वापरत. नंतरच्या काळात मात्र त्यांनी आपल्या बोटांची टोके आणि कापडी बोळ्यांचाही वापर केला. त्यानंतरच्या पुढील काळात रंगीत पेन्सिली, ब्रश आणि रंगांचा उपयोग त्यांनी चित्र रंगवण्यासाठी केला.
एकलव्याप्रमाणे ते शिकत गेले, साधना करीत राहिले आणि त्यांच्या तंत्रात सुधारणा होत गेली. परिणामी त्यांच्या चित्रकलेचाही विकास होत गेला. वास्तव जगतातील प्राणी आणि पक्षी यांच्यापेक्षा नवनवीन आकार आणि आकृत्या त्यांच्या चित्रांमधून उदयाला येत होत्या. त्यांच्या विचार आणि भावनातून स्त्रियांचे चेहरे आणि मुखवटे आकार घेऊ लागले होते आणि ही नंतरची वाटचाल वास्तवतेकडे होणारी होती. त्यानंतरच्या त्यांच्या निसर्गचित्रांनी चित्रकलेच्या प्रांतात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले. त्यांच्या बऱ्याचशा चित्रांमध्ये सोनेरी रंगात तळपणारे दुपारचे निरभ्र आकाश आणि त्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या झाडांच्या विविध आकृत्या पाहायला मिळतात.
त्यांच्या अनेक चित्रांमध्ये घुंघट घेतलेल्या स्त्रीचा लांबट चेहरा, धारदार नाक, पाणीदार बोलके डोळे या गोष्टी विशेषत्वाने आढळतात. त्यांच्या चित्रकलेतील या अविष्कारामागे कोणाची प्रतिमा त्यांच्या मनात असावी असा प्रश्न सर्वांना पडत असे. प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांनी त्यांना एकदा हा प्रश्न विचारला होता. तेव्हा रवींद्रनाथांनी हे रहस्य उघड केले. ते म्हणाले की त्यांच्या चित्रातील घुंघट घेतलेल्या स्त्रीचा चेहरा, धारदार नाक, बोलके आणि पाणीदार डोळे या सगळ्या गोष्टी त्यांची वहिनी कादंबरीदेवी हिची प्रतिमा त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांच्या चित्रात सहजपणे आल्या. वहिनीची प्रतिमा त्यांच्या मनामध्ये चिरकाल टिकून होती. ते म्हणाले की वहिनीचे डोळे माझ्या मनावर इतके खोलवर ठसले होते की मी ते कधीच विसरू शकत नाही आणि जेव्हा जेव्हा मी चेहरा काढतो तेव्हा नेहमीच तिचा चेहरा आणि डोळे माझ्या दृष्टीसमोर साकार होतात. यातून त्यांचे आपल्या वहिनीवर असणारे प्रेम देखील आपल्याला दिसते.
हा वहिनींचा चेहरा अगदी उतारवयात देखील त्यांच्या स्मृतीत अगदी लख्ख होता. त्यांची पूर्वी लिहिलेली एक कविता बघा. त्यातून ही जाणीव आपल्याला होते. ही कविता त्यांच्या जोराशांको वाड्यातील एका संध्याकाळच्या वेळेस केलेली आहे. ते म्हणतात -
खांद्याच्या आधाराने
टेकलेल्या व्हायोलिनवर
रियाझ चाले दादाचा
त्याचवेळी वरच्या गच्चीवर
चमकून उठे संध्यातारा
संपताच इंग्रजीचे अध्ययन
जाई सांगाया मी वहिनीस
तेव्हा तिच्या घुंगटाची लाल
दिसे किनार साडीची. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
४/१/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा