मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४२

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४२

भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी रवींद्रनाथ - भाग तीन

जगभरातील विविध देशात रवींद्रनाथ भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून आपला ठसा उमटवत होते. बऱ्याच ठिकाणी त्यांची व्याख्याने होत होती. युरोपातील बऱ्याच ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आणि त्यांच्या चित्रकलेच्या वेगळ्या शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. याचवेळी आणखीही एक महत्त्वाची गोष्ट घडली. ते इंग्लंडमध्ये असताना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तेथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा हिबर्ट व्याख्यानमालेसाठी रवींद्रनाथांना आमंत्रित केले. यावेळी त्यांचे वय ६९ वर्षे होते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य असे होते की ही व्याख्याने युरोपातील विद्वान अशा तत्वज्ञ लोकांसाठी होत असत.  या व्याख्यानांमध्ये बोलणारी व्यक्ती देखील अत्यंत विद्वान तत्वज्ञ असावी अशी परंपरा होती. परंतु भारताच्या दृष्टीने एक सुखद आश्चर्य असे घडले की आतापर्यंत साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ख्याती असलेल्या रवींद्रनाथांना या व्याख्यानमालेसाठी तत्वज्ञ म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्यांना या व्याख्यानांसाठी आमंत्रित करणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की रवींद्रनाथांचे तत्त्वज्ञान त्यांच्या काव्यातून प्रकट झाले आहे आणि त्यांच्या प्रतिभेला आपण तत्त्वज्ञ म्हणून मान्यता देऊ शकतो. हा रवींद्रनाथांचा आणि त्यांच्या प्रतिभेचा मोठाच गौरव होता. 

१९३० साली त्यांनी दिलेल्या या अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे पुस्तक ऑक्सफर्ड विद्यापीठाने ' द रिलीजन ऑफ मॅन ' या नावाने प्रसिद्ध केले. ते स्वतः या पुस्तकाच्या संदर्भात बोलताना म्हणतात, " मानवतेतील आमच्या ईश्वराची कल्पना किंवा मानवात अंतर्भूत असलेले देवत्व हाच मुख्य विषय या पुस्तकात आहे. ईश्वराविषयी असलेल्या माझ्या विचारांचा विकास कुठल्याही वेगळ्या तत्त्वज्ञानाच्या आधारे झाला नाही. उलटपक्षी माझ्या बालपणी माझ्या तत्कालीन स्वभावानुसार हे घडले होते. " ज्याला पाश्चात्य विद्वान रवींद्रनाथांचे तत्त्वज्ञान असे म्हणत होते, ती तर त्यांची धारणा होती. एका कवीची ती धारणा होती. तो त्यांचा जीवनधर्म होता आणि त्यांच्या जीवनाला आकार देण्यामध्ये त्या गोष्टीची मोठी भूमिका होती.

या व्याख्यानांमधून रवींद्रनाथांचे एक तत्त्वज्ञ ( philosopher ) म्हणून विलोभनीय रूप जगासमोर आले. या व्याख्यानांमध्ये त्यांनी उदात्त अशा मानवता धर्माचा उद्घोष केला. त्यांनी जे सांगितले ते साररूपात असे सांगता येईल. ते म्हणाले की जगातील विविध धर्म हे परस्पर विरोधी नाहीत तर ते एक सार्वभौम, शाश्वत सत्य विविध प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतात. असे शाश्वत सत्य की जे मानवी मर्यादांच्या पलीकडे आहे. यालाच आपण व्यापक अर्थाने मानवता धर्म असे म्हणू शकतो. हा मानवता धर्म आपल्याला एकता, स्वातंत्र्य आणि प्रेम यांच्या मार्गावर अग्रेसर करतो. आपल्यामध्ये मानव म्हणून विविध प्रकारचे भेद असले तरी आपण एका मोठ्या मानव समाजाचा आणि मानवता धर्माचा भाग आहोत. म्हणून आपल्या मतभेद आणि मर्यादांच्या पलीकडे जाऊन आपण जी शाश्वत आणि सर्वकालीन मूल्य आहेत त्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. "

हिबर्ट व्याख्यानमाला संपल्यानंतर रवींद्रनाथ तेथून पुढे पॅरिस आणि बर्लिनला गेले. तेथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली. बर्लिन येथे त्यांची एक मैत्रीण डॉ सेलिंग हिने तेथील त्यांच्या चित्र प्रदर्शनाची जबाबदारी घेतली. आपल्याला कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत उपयोगी पडू शकतील अशा प्रकारचे मित्रत्वाचे संबंध रवींद्रनाथ यांचे सर्वांशी होते. परदेशातील व्यक्तीही त्याला अपवाद नव्हत्या. बर्लिनमध्ये रवींद्रनाथांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून त्यांच्याशी संवाद साधला. तेथून पुढे ते जिनिव्हाला गेले. तेथील वास्तव्यातच त्यांना सोविएट रशियात येण्याबद्दलचे निमंत्रण मिळाले. यापूर्वी त्यांचे रशियात जाणे झाले नव्हते. त्यामुळे रशियातील सामाजिक परिस्थिती, परंपरा इ. गोष्टी जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता होती. त्यांच्या या रशियाच्या भेटीत त्यांना तेथील ज्या ज्या गोष्टी चांगल्या आढळल्या, त्यांची त्यांनी मुक्तकंठाने स्तुती केली. नंतरच्या काळात भारत आणि रशिया या दोन देशांच्या दरम्यान संबंध दृढ होण्यास त्याची मोलाची मदत झाली. भारत रशिया दरम्यान मैत्रीचा पाया जणू त्यामुळे घातला गेला.

रशियात त्यावेळी कम्युनिझमची नुकतीच सुरुवात झाली होती. ही नवीन प्रणाली असल्याने तेथील सर्वसामान्य जनता त्याच्या विरोधात होती. या काळात रशियातील दोन वैशिष्ट्ये त्यांच्या नजरेत भरली. पहिली गोष्ट म्हणजे तेथील मोठ्या प्रमाणावर सामूहिक शिक्षण देण्याची व्यवस्था आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेथील अशिक्षित, दरिद्री समाजाने मोठ्या कष्टाने स्वतः मधील आत्मविश्वास जागृत करून स्वतःची प्रगती साधण्यात मिळवलेले यश.

या दोन चांगल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या तरी त्यातील उणीव सुद्धा त्यांच्या लक्षात आली. या सुधारणा एकांगी आहेत असे त्यांना वाटले कारण समाजात व्यक्ती आणि समष्टी असे दोन घटक असतात. या दोन्ही घटकांच्या परस्पर हिताचे समन्वयन घडवून आणणे महत्त्वाचे असते तरच व्यक्ती आणि समष्टी दोघांचेही कल्याण होऊ शकते असे त्यांचे मत होते. रशियातील आपल्या वास्तव्यामधील अनुभव त्यांनी ' रशियार चिठ्ठी ' या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. 

तेथील शिक्षणाबद्दल त्यांना असे वाटले की ही सामूहिक शिक्षण पद्धती सदोष आहे. त्यांनी शिक्षणाचा जणू एक साच्याच तयार केला आहे. परंतु साच्यातून स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार होत नाही. जर शैक्षणिक तत्वे जिवंत मनाला सामावून घेणारी नसली तर त्यातून मने दुभंगली जातात, व्यक्तिमत्व विकास होत नाही.

रशियाने जी नवीन आर्थिक प्रणाली स्वीकारली होती त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि हक्कांवरही गदा आली होती. या नवीन व्यवस्थेतील दोषही रवींद्रनाथांच्या लक्षात आले. त्याबद्दल आपले मत व्यक्त करताना ते म्हणतात, " संपत्तीचे वैयक्तिक हक्क ज्याच्या त्याच्याकडेच राहू देऊन एका मर्यादेपर्यंत ते उपभोगण्याचा अधिकार देण्यात यावा. मर्यादांपलीकडचा अतिरिक्त भाग मात्र समाजाच्या वापरासाठी दिला गेला पाहिजे. त्यामुळे अती द्वेष, मत्सराच्या भावनेतून आलेल्या फसवेगिरी पासून या सांपत्तिक हक्काचा बचाव करता येईल. व्यक्तिशः लोकांच्या आवश्यक गरजा भागल्या पाहिजेत. परंतु त्याच वेळेला प्रत्येक बाब अशी मर्यादित हवी की ती समाजाच्या फायद्याची ठरावी. कोणताही उपाय हा नेहमी समाज आणि व्यक्ती या दोघांनाही मानवणारा असावा. "

रवींद्रनाथ आता सत्तरीचे झाले होते सततच्या प्रवासाने त्यांची शक्ती पण क्षीण झाली होती. पण तरी देखील परदेशातून आलेली आमंत्रणे ते नाकारत नव्हते कारण त्यानिमित्ताने बाहेरील जगाशी सांस्कृतिक नाते निर्माण करता आले तर ते त्यांना हवेच होते. ती त्यांची आवड होती. त्यानंतर पर्शिया आणि इराणच्या आमंत्रणावरून ते त्या देशांमध्ये गेले तेथे त्यांचे मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत झाले. रवींद्रनाथ जागतिक कीर्तीचे महान कवी आणि साहित्यिक तर होतेच परंतु विशेष म्हणजे ते आशिया खंडातील असल्यामुळे या आशियाई देशांना रवींद्रनाथांचा विशेष अभिमान होता. ते त्यांच्याकडे ' इंडो आर्यन ' या नजरेने पाहत होते. आपला मूळ पुरुष एकच असून रवींद्रनाथांचा आणि आपला रक्ताचा संबंध आहे असे त्यामुळे ते मानत होते. त्यामुळे एक आशियाई व्यक्ती म्हणून रवींद्रनाथांचा प्रचंड अभिमान त्यांना होता. यानंतर इराकला भेट देऊन ते १९३२ मध्ये भारतात परतले. त्यानंतर त्यांनी एकदाच परदेश प्रवास केला. ते १९३४ मध्ये समुद्रमार्गे श्रीलंकेला गेले. तेथे त्यांनी व्याख्याने दिली आणि आपल्या चित्रांचे प्रदर्शनही भरवले. तेथील लोकांनी सुद्धा त्यांचे विशेष आदराने आणि आपुलकीने स्वागत केले. आता त्यांचे वय ७३ वर्षांचे झाले होते. परदेशात भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यात त्यांनी कोणतीही कसूर बाकी ठेवली नव्हती.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३०/१/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...