मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग ४१

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४१

भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी रवींद्रनाथ - भाग दोन

रवींद्रनाथांच्या परदेश दौऱ्याचा दुसरा टप्पा १९२० पासून सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, स्वीडन, फ्रान्स आणि इतर देशांना भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि सून होते. 

 त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन लोकांपर्यंत भारतीय संस्कृती आणि परंपरा प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या अमेरिका भेटीच्या दरम्यान त्यांची भेट एका उच्चशिक्षित अमेरिकन तरुणाशी झाली त्याचे नाव एल्म हर्स्ट असे होते. हे एल्म हर्स्ट कृषी आणि अर्थतज्ञ होते. त्यांचा नुकताच डोरोथी व्हिटने स्टेट या श्रीमंत कुटुंबातील तरुणीशी विवाह ठरला होता. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव या दोघांवरही जबरदस्त होता. एल्म हर्स्ट यांनी तर नंतर आपल्या नोकरीतून निवृत्त होऊन रवींद्रनाथांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील ग्रामीण भागाच्या पुनर्रचना आणि विकासाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतले.

ब्रिटन आणि अमेरिकेखेरीज फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, ऑस्ट्रिया आदी देशांमध्ये रवींद्रनाथांचे अभूतपूर्व असे स्वागत झाले. जर्मनीत तर त्यांच्या भेटीसाठी लोकांनी गर्दी केली. त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा मुलगा या संदर्भात असे लिहितो, " मध्य आणि उत्तर युरोपातल्या लोकांनी त्यांची पायधूळ घेतली. गर्दीच्या सभांमध्ये आणि रेल्वे स्टेशनवर लोक एकमेकांशी रेटारेटी करून वडिलांच्या अंगरख्याला तरी स्पर्श व्हावा म्हणून पुढे झेपावत होते. त्यांच्या पुस्तकांची विक्री विलक्षण होती. जर्मनीत तर लाखो प्रती विकल्या गेल्या. "

या युरोपभेटीच्या ( १९२४ ) दरम्यान रवींद्रनाथांचा युरोपातील अनेक विद्वान आणि महान लोकांशी परिचय झाला. पुढे त्यातील बऱ्याच लोकांनी रवींद्रनाथांना त्यांच्या कार्यात मदत केली. माणसे जोडून ठेवण्याची कला रवींद्रनाथांना अवगत होती. केवळ आपल्या कामापुरते लोकांशी संबंध त्यांनी कधीच ठेवले नाहीत तर वेळोवेळी अशा लोकांशी प्रेमपूर्वक पत्रव्यवहार करून त्यांचे संबंध जपून ठेवले. 

आपल्या पुढील प्रवासात रवींद्रनाथ चीनमधील शांघाय, हानचाऊ, नानकिंग आणि पेकिंग या ठिकाणी थांबले. तेथील लोकांनी त्यांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. रवींद्रनाथ भारतीय प्राचीन संस्कृती आणि सभ्यता यांचा परिचय करून देण्यासाठी चीनमध्ये आले आहेत हे चिनी नागरिकांनी ओळखले आणि त्यांचा योग्य तो सन्मान केला. चीनमधील एक विद्वान आणि विचारवंत प्रोफेसर लिआंची चाऊ रवींद्रनाथांच्या गौरवपर भाषणात म्हणाले, " भारतीय संस्कृती सभ्यता, प्रेम आणि स्वातंत्र्य यावर आधारलेली आहे. या गोष्टींचे प्रतिबिंब आपल्याला रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वात आणि कवितांमध्ये आढळते. भारतीय संस्कृतीमधील प्रेम, सभ्यता आणि स्वातंत्र्य या गोष्टी अनुकरणीय आहेत. "

यानंतर त्यांनी जपानला भेट दिली. त्यांना असे आढळले की युरोपमध्ये आपापसात युद्ध घडवून आणणारा स्वार्थी राष्ट्रवाद जपाननेही अंगीकारला आहे. जपानने पाश्चिमात्य देशांच्या पावलावर पाऊल ठेवले हे पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांनी तिथे केलेल्या भाषणात आपली ही खंत स्पष्टपणे बोलून दाखवली. ते म्हणाले," ही काय राष्ट्राची मूल्ये आहेत ? विध्वंसक यंत्र आणि नफेबाज दुहेरी नीतीमुळे नीतीमूल्ये ढासळत चालली आहेत. आणि मानवातील परस्पर बंधूभावाची भावना ही नष्ट होते आहे. एक तर तुम्ही लालचावले आहात किंवा तुम्हाला याचा स्वीकार करणे भाग पडत आहे. " 

त्यानंतरचा त्यांचा प्रवास समुद्रमार्गे झाला. अटलांटिक महासागरातून प्रवास करत ते ब्यूनॉस आयर्सला पोहोचले. या सततच्या प्रवासाने मात्र ते आजारी पडले. परंतु त्या ठिकाणी त्यांची एक चाहती असलेल्या व्हिक्टोरिया उकांपू  या तरुणीने त्यांची अतिशय हळुवार आणि प्रेमपूर्वक शुश्रुषा केली. तिच्या काळजीपूर्वक केलेल्या सेवा आणि शुश्रुषा यामुळे रवींद्रनाथ या मोठ्या आजारातून बरे झाले. त्या दोघांमध्ये स्नेहबंध निर्माण झाले. रवींद्रनाथांनी त्या ठिकाणी आपल्या काही कविता लिहिल्या आणि त्या कवितांचे पुस्तक व्हिक्टोरियाला अर्पण केले.

बरे झाल्यानंतर त्यांनी नेपल्स, इटली, स्विझर्लंड या देशांना भेटी दिल्या. त्यातही अनेक लोकांना ते भेटले. नंतर पुन्हा १९२७ मध्ये ते विविध देशांच्या दौऱ्यावर बाहेर पडले. या त्यांच्या दौऱ्यात सिंगापूर, इंडोनेशिया आदी देशांचा समावेश होता. या दौऱ्यात त्यांच्याबरोबर सुप्रसिद्ध भाषा शास्त्रज्ञ प्रोफेसर सुनीती कुमार चॅटर्जी आणि चित्रकार सुरेंद्रनाथ कार हे दोघे होते. ईस्ट इंडीज मधील वास्तव्यात चित्रकार सुरेंद्रनाथ यांना तिथे कापडावर छापलेली एक डिझाईन खूप आवडली. तिला बाटीक असे म्हटले जात होते. एका विशिष्ट पद्धतीचा वापर करून वक्ररेषांमुळे तयार झालेल्या या मनोवेधक प्रकाराला स्वतःचे असे खास सौंदर्य आहे. सुरेंद्रनाथ यांनी ते बाटिक तंत्रज्ञान आत्मसात केलं आणि आपल्या सोबत श्रीनिकेतनला आणलं. तिथे त्यांनी ही कला शिकवली. या कलेच्या सौंदर्याने लोकांना तिच्याकडे आकर्षित केले आणि आता तर एक आधुनिक डिझाईन म्हणून या कलेला खूपच लोकप्रियता मिळाली आहे.

नंतर त्यांना कॅनडाला येण्याचे निमंत्रण मिळाले. महान साहित्यिक म्हणून लोक रवींद्रनाथांना ओळखत होतेच पण आता रवींद्रनाथांची कीर्ती एक महान शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही पसरली होती. त्यामुळे त्यांना एका अधिवेशनात शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावले गेले. त्यांचे कॅनडातील वास्तव्य फक्त दहा दिवसांचे होते. त्यावेळी कॅनडातील श्रीमंत लोकांना एक छोटासा पंखा हातात बाळगण्याची सवय होती. चाहत्यांच्या आग्रहामुळे रवींद्रनाथांना या पंख्यावर सही करणे भाग पडत होते. ती सही करताना ते काही स्वरचित ओळी त्यावर लिहून देत. त्यांच्या या अशा त्यांच्या छोट्या रचनाही एक पुस्तक सहज प्रकाशित होईल इतक्या जमा झाल्या. आणि त्यांचे पुढे ' फायर फ्लाईज ' ( विचारांच्या छोट्या ठिणग्या ) नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यातील एक रचना उदाहरण म्हणून या ठिकाणी पाहू. 

" दिवस म्हणजे रंगीबेरंगी बुडबुडे. 

रात्रीच्या अथांग पृष्ठभागावर तरंगणारे..."

यादरम्यान युरोप अमेरिकेत त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली. त्यांच्या चित्रकलेच्या नवीन वैशिष्ट्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. खरंतर  वयाच्या साठाव्या वर्षानंतर रवींद्रनाथांनी चित्रकला शिकायला सुरुवात केली होती. आपल्या लेखनात दुरुस्त्या करत असताना ते त्यात लय साधलेला एखादा आकार काढत आणि मजेशीर आकृत्या तयार होत. मग त्यांनी चित्रे काढायला सुरुवात केली. आणि कलेच्या या प्रांतात लेखणी आणि कुंचला ( ब्रश ) या दोन्हींचाही वापर ते करू लागले. आणि ओघानेच इतर चित्रेही रेखाटू लागले. त्यांच्या या अनोख्या शैलीच्या रंगचित्रांमुळे युरोपीय जनतेत त्यांच्या चित्रांबद्दल आकर्षण निर्माण झाले. याविषयीची दुसरी बाजू अशी म्हणता येईल की आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात देखील नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि प्रयोग करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्याजवळ होती. त्यांच्या सृजनशील मनाची प्रगल्भता यात आपल्याला आढळून येते. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२८/१/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...