मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर: वारसा आणि कार्य - भाग 40

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 40

भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी रवींद्रनाथ

गीतांजलीचे इंग्रजीत भाषांतर झाले आणि इंग्रजी आवृत्ती प्रसिद्ध झाली. इंग्लंडमधील  ख्यातनाम साहित्यिकांच्या वर्तुळात त्यांच्या कवितांचे वाचन होऊ लागले आणि रवींद्रनाथांना थोर साहित्यिक म्हणून जागतिक मान्यता प्राप्त होऊ लागली. त्यानंतर लगेचच त्यांच्या ' गीतांजली ' या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार मिळाला आणि जागतिक कीर्तीचे साहित्यिक म्हणून त्यांच्यावर जणू शिक्कामोर्तब झाले. ब्रिटिश सरकारने देखील त्यांचा गौरव करून त्यांना ' सर ' ही पदवी दिली. तर कलकत्ता विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. 

रवींद्रनाथ भारतीय संस्कृतीचे आणि परंपरांचे अभिमानी होते. कोणीतरी देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून भारतीयांची ही दिव्य संस्कृती आणि परंपरेची ओळख जगाला करून द्यावी असे त्यांना वाटत होते. पण रवींद्रनाथ स्वतःच स्वक्षमतेचा विकास आणि आपले  साहित्य समृद्ध करून स्वतःला यासाठीच जणू सिद्ध करत होते. 

 एखाद्या भारतीय व्यक्तीने अभ्यासपूर्वक भारतीय संस्कृतीचा आणि परंपरांची ओळख जगाला करून द्यावी या रवींद्रनाथ यांच्या भूमिकेला त्या काळातील महान राजकीय नेते लोकमान्य टिळक यांचा पाठिंबा होता. रवींद्रनाथच भारताचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अग्रदूत बनून भारतीय स्वातंत्र्य चळवळीला अप्रत्यक्षपणे मदत करू शकतील याची त्यांना खात्री होती. त्यामुळे रवींद्रनाथांना केवळ पाठिंबा देऊनच लोकमान्य थांबले नाहीत तर त्यांनी एका व्यक्तीमार्फत पन्नास हजारांची रक्कम त्यांना पाठवली आणि राजकीय घडामोडीत न पडता भारताच्या वतीने परदेशात भारतीय संस्कृतीचे अग्रदूत म्हणून कार्य करावे असा संदेश पाठवला.

यामध्ये आपल्याला लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी आणि रवींद्रनाथांवरील असलेला विश्वास दिसून येतो. रवींद्रनाथांचे संवेदनशील मन, तीव्र बुद्धी, भारतीय संस्कृतीचे ज्ञान आणि विचारांचे उपजत सामर्थ्य यावर लोकमान्य टिळकांचा विश्वास होता. रवींद्रनाथ यांना युरोपात एक महान कवी म्हणून गौरव प्राप्त झाला होताच. त्यामुळे तेच आता भारताचे प्रतिनिधी म्हणून उत्तम कार्य करू शकतील याची त्यांना खात्री होती. सुदैवाने रवींद्रनाथांना प्रवासाची आवड होतीच. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी व्यक्त केलेल्या बऱ्याच अपेक्षांची पूर्ती रवींद्रनाथांकडून  झाली. त्यांनी व्यक्त केलेला विश्वास रवींद्रनाथांनी सार्थ ठरवला.

रवींद्रनाथांना व्याख्यानासाठी जगभरातील ठिकठिकाणची निमंत्रणे येत. बऱ्याच प्रसंगी ते आपल्या सोबत आपले मित्र आणि चाहते यांनाही सोबत घेऊन जात असत. आपल्याला आलेल्या अनुभवाच्या नोंदी रवींद्रनाथ करून ठेवत असत किंवा पत्रातून त्या इतरांपर्यंत पोहोचवत. १९१४ ते १९३२ या कालावधीत रवींद्रनाथांनी अनेक पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांना अनेक वेगवेगळ्या अनुभव आले. अनेक महनीय व्यक्तींच्या गाठीभेटी झाल्या.  त्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी त्यांना त्यांच्या पुढील कार्यात मदतही केली. अनेक ठिकाणी त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली. प्रत्येक ठिकाणी पाहिलेल्या आणि त्यांना भारतासाठी चांगल्या वाटलेल्या गोष्टींची दखल त्यांनी घेतली. त्यातील बऱ्याच गोष्टी शांतिनकेतन आणि श्रीनिकेतनच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. 

जपानमध्ये तीन महिने त्यांचे वास्तव्य होते तेथील त्यांच्या वास्तव्यात जपान मधील ग्रामीण भागातील लोकजीवन त्यांनी जवळून पाहिले. जपानमधील निसर्गसौंदर्य त्यांना खूप आवडले. जपान म्हणजे पर्वतांच्या रांगा, झुळझुळणारे झरे, विस्तीर्ण किनाऱ्यावर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि संरक्षण करण्यासाठी उभा ठाकलेला आणि बर्फाची टोपी परिधान केलेला फुजियामा पर्वत ! त्यांना असे आढळले की जपानी लोकांजवळ मोठ्या प्रमाणावर सौंदर्यदृष्टी आहे आणि तेथील अगदी गरीबातील गरीब माणूस ज्याला दोन वेळेचे पुरेसे अन्न सुद्धा मिळत नाही असा माणूस सुद्धा एका पेनीची फुले विकत घेतो. त्याच्या दृष्टीची आणि सौंदर्याची भूक त्याच्या पोटाच्या भुकेपेक्षा काकणभर देखील कमी नाही. जपानमध्ये अनेक ठिकाणी सादर करण्यात आलेले नृत्य पाहून रवींद्रनाथ भारावून गेले. त्यांच्या नृत्यात त्यांना विनय आढळला. कारण ते ( जपानी लोक ) फक्त सौंदर्यदृष्टीने त्याकडे बघत होते. रवींद्रनाथ त्यांच्या नृत्याबद्दल बोलताना म्हणतात," एक दिवस मी जपानी नृत्याचा कार्यक्रम पाहायला गेलो, तेव्हा मला असं दिसलं की हे नृत्य म्हणजे अंगप्रत्यंगाच्या हालचालीचे संगीत आहे. आपल्या देशातील वीणेवर छेडल्या जाणाऱ्या संगीताशी याची तुलना होऊ शकते. दोन भागात हे सादर करीत असतानाही मध्ये थांबत नाही. वेगवेगळ्या टप्प्यात अंतर भासत नाही. अगर दोन भाग सांधत असताना जाणवत देखील नाही. पूर्ण अंग चढत जाणाऱ्या वेलीसारखं उंचावतं आणि जणू सौंदर्य फुलांची उधळण करतं. जपानी नृत्य हे शुद्ध नृत्य आहे. या नृत्याच्या पोशाखात थोडेही अंग उघडे पडण्यास वाव नाही. इतर देशातील नृत्यात अंगप्रत्यंगाच्या हालचाली बरोबर कामुक हावभावांचे देखील मिश्रण असते. ह्या नृत्यात मात्र अशा भावना सुचित सुद्धा होत नाहीत."

त्यानंतर मेजर पाँड यांच्या आमंत्रणावरून ते अमेरिकेला गेले. तेथे अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने झाली. तिथे त्यांच्या शांतीनिकेतनच्या शाळेविषयी ते बोलले. "सृष्टीद्वारे मानव स्वतःचे क्षितिज उंचावू शकतो आणि पुनर्जन्म घेऊ शकतो " ही कल्पना त्यांनी तिथे मांडली. तेथील त्यांची व्याख्याने ' पर्सनॅलिटी ' या पुस्तकात संकलित करून प्रसिद्ध करण्यात आली. त्यांनी हे पुस्तक आपले त्यावेळचे जवळचे मित्र सी एफ अँड्रयुज यांना अर्पण केले. 

त्यांच्या इंग्लंड आणि अमेरिकेच्या केलेल्या पुढील दौऱ्यात मात्र त्यांचे व्हावे तसे स्वागत झाले नाही. त्याचे एक कारण म्हणजे इंग्रजांनी जालियनवाला बाग येथे केलेल्या निष्पाप लोकांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथांनी आपली ' सर ' ही पदवी परत केली होती. ब्रिटिश लोक  साधारणपणे स्वभावाने अतिथ्यशील असतात. परंतु जिथे त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेशी विपरीत असलेली कोणतीही गोष्ट घडते, तेव्हा मात्र ते तितक्याच अलिप्ततेच्या भावनेने वागतात हा अनुभव त्यांना इंग्लंडमध्ये आला. 

त्यांच्या या प्रवासादरम्यान इंग्लंड आणि अमेरिकेत झालेली औद्योगिक क्रांती त्यांनी पाहिली. प्रचंड यंत्रे आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या वस्तूंनी मानवी जीवनावर आक्रमण केले आहे हे त्यांच्या लक्षात आले. काही गोष्टींची माणसाला गरज नसतानाही केवळ मुबलक निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या उपभोगासाठी कृत्रिम गरजा निर्माण केल्या जात आहेत असे त्यांना जाणवले. अतिरिक्त तांत्रिक आणि यांत्रिक विकासामुळे मानवाभोवती एक कवच निर्माण होऊन तो नैसर्गिक गोष्टींपासून दूर जाईल अशी भीती त्यांना वाटू लागली. मानव यंत्राद्वारे संपत्ती निर्माण करतो आहे पण आध्यात्मिक मूल्यांचा त्याग करून त्यासाठी मोठी किंमत तो मोजतो आहे. मानवाने स्वतःभोवती निर्माण केलेला पिंजरा जरी सुवर्णाचा असला तरी तो बाहेरच्या जगाचा संबंध तोडून टाकतो. 

आपले हे विचार स्पष्ट करण्यासाठी त्यांनी घरटे आणि पिंजरा यांचे रूपक वापरतात. ते म्हणतात, " पाखराला घरट्याची गरज असते ती निवाऱ्याचे स्थान म्हणून. त्यामुळे त्याला भराऱ्या मारण्यासाठी अटकाव होत नाही. परंतु जेव्हा तो पिंजऱ्यात असतो तेव्हा त्याला राहण्यासाठी उत्तम निवारा मिळतो. पण तो आकाशात भरारी मारण्याचे त्याचे स्वातंत्र्य गमावून बसतो. तांत्रिक ज्ञान हे काही मर्यादेपर्यंतच आर्थिक सुरक्षितता आणि आराम देऊ शकते. परंतु दुसऱ्या बाजूने जर तंत्रज्ञानाचा विकास असाच अनंत काळापर्यंत सुरू राहिला तर वस्तुस्थिती अशी होते की मानव स्वतःच्या गरजा गुणकाने वाढवून घेऊन स्वतःलाच त्या पिंजऱ्यात बंद करून घेतो. रवींद्रनाथांचे हे विचार आजही कालवाह्य झालेले नाहीत किंबहुना आज त्यावर विचार करण्याची अधिक आवश्यकता आहे. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२३/१/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...