उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३९
नृत्यकलेचे पुनरुज्जीवन
नृत्यकला ही ६४ कलांमधील एक प्रमुख कला आहे. भारतीयांना प्राचीन काळापासून या कलेचे उत्तम ज्ञान होते. भरत मुनींचा नाट्यशास्त्रावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. जेव्हा भाषेचा विकास झाला नव्हता तेव्हा नृत्य हेच अविष्काराचे. संपर्काचे आणि प्रकटीकरणाचे माध्यम होते. भाषा जेव्हा प्रगत झाली तेव्हा असे लक्षात आले की प्रकटीकरणासाठी किंवा भावनांच्या अविष्कारासाठी भाषिक अभिव्यक्ती जेव्हा अपूर्ण वाटते तेव्हा तिला संगीत आणि नृत्याची जोड दिली जाते. प्राचीन काळी धार्मिक कथा, पुराणे सांगण्यासाठी त्यांना नृत्याची जोड दिली जात असे. नृत्याची समृद्ध परंपरा प्राचीन भारतात होती. अनेक मंदिरांवरील शिल्पांमधून आपल्याला नृत्य कलेतील मुद्रा, पदन्यास प्रत्ययास येतात.
भरतनाट्यम, कथ्थक, कथकली, मणिपुरी इत्यादी नृत्य प्रकारांची समृद्ध परंपरा भारतात आहे. अनेक धार्मिक आणि पौराणिक कथांच्या सादरीकरणसाठी हे नृत्य प्रकार प्राचीन भारतात वापरले जात असत. आजही त्यांचा वापर विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी केला जातो.
परंतु पुढे काळाच्या ओघात नृत्यकला मागे पडली. तमाशा, राजदरबारातील मुजरे इत्यादींच्या माध्यमातून ही कला केवळ मनोरंजनापूर्ती अस्तित्वात होती. रवींद्रनाथांनी संगीत आणि नृत्याचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व जाणले होते. आणि इतर अनेक कलाप्रकारांप्रमाणे त्यांनी नृत्यकलेचेही पुनरुज्जीवन केले. रवींद्रनाथांनी शिशुतीर्थ, चित्रांगदा, श्यामा, चंडालिका यासारख्या ज्या नाटिका सादर केल्या, त्यामध्ये त्यांनी संगीत आणि काव्याबरोबरच नृत्याचा मिलाफ घडवून आणला. नृत्याची आणि सुरांची योजना आवश्यक ते बदल करून त्यांनी या नाटकांमध्ये केली. नाटकातील पात्रांच्या मनातील द्वंद्व दाखवण्यासाठी त्यांनी छायानृत्य हा प्रकार कौशल्यपूर्वक वापरला.
आपल्या नाटिकांमध्ये रवींद्रनाथ मुद्राभिनयापेक्षा काव्य, सूर, संगीत आणि नृत्याला अधिक महत्त्व देत असत. त्यामुळे या नाटकांची कलात्मक उंची वाढत असे. त्यांच्या अनेक नाटिकांमध्ये स्वतः रवींद्रनाथांनी आपले वय विसरून नृत्य केले आहे. ' फाल्गुनी ' या नाटकात बाऊल कवीच्या भूमिकेत रवींद्रनाथांनी नृत्य केले. त्यावेळी त्यांचे वय ५६ वर्षे होते.
शास्त्रशुद्ध नृत्याचा अभ्यास करून ते सादर केल्यास हालचालींमध्ये देखणी लयबद्धता तर येतेच पण त्याच जोडीला शारीरिक व्यायामही होतो असा रवींद्रनाथांचा विश्वास होता. इतर अनेक कलाप्रकारांप्रमाणे नृत्यकलेतही रवींद्रनाथांनी परंपरांचे अंधानुकरण केले नाही. आपल्या नाटकात ते मिश्र ताल, मिश्र नृत्यमुद्रांची योजना करत. त्याचप्रमाणे नृत्यात सहजता कशी साधेल याकडे त्यांचे लक्ष असे. नाटक नृत्यप्रधान जरी असले तरी केवळ नृत्याला प्राधान्य न देता त्यातील कथानक प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर कसे मांडता येईल याकडे त्यांचे जास्त लक्ष होते.
रवींद्रनाथांनी अनेक देशांना भेटी दिल्या त्यावेळी तेथील नृत्यप्रकारांचा सुद्धा त्यांनी बारकाईने अभ्यास आणि निरीक्षण केले. १९२७ मध्ये इंडोनेशियातील बाली बेटावर आपल्या सहकाऱ्यांसह ते साडेतीन महिने राहिले. या कालावधीत बालीमधील कला आणि संस्कृतीचा अभ्यास त्यांनी केला. तेथील लोकांकडून सादर केली जाणारी नृत्यकला त्यांना विशेष आवडली. तेथील लोकांच्या नृत्यात एक प्रकारची सहजता असून नृत्य हा त्यांच्या जीवनाचा एक भाग झाला होता असे म्हणता येईल तेथून त्यांनी आपला मुलगा रथींद्रनाथ याला एक पत्र लिहिले त्यात ते म्हणतात...
" ह्या देशातील उत्सवातील नृत्य हे प्रमुख अंग आहे. येथील नारळीची बाग समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांनी जशी डुलते, तसा येथील स्त्री पुरुष समुदाय नृत्याचा वारा वाहू लागला की डोलू लागतो. नारळीप्रमाणेच त्यांची शरीरे आंदोलित होतात. एक एक समाज एका विशिष्ट मार्गाने आत्मप्रकटन करत असतो. वंग देशाचे हृदय जेव्हा आंदोलित होऊन उठले, तेव्हा सारा भावनावेग त्याने कीर्तन- भजनाद्वारा प्रकट केला. हा भाव प्रकटनाचा विशिष्ट मार्ग अद्यापही लुप्त झालेला नाही. येथील (बलिद्वीपातील )लोकांचे हृदय जेव्हा भावावेगाने भरून जाते, तेव्हा ते शब्दांद्वारे बोलत नाही, नृत्यांद्वारे बोलते. स्त्री सुद्धा नाचते, पुरुषही नाचतो. इकडचा अभिनय मी पाहिला आहे. त्यात प्रारंभापासून अखेरपर्यंत इकडून तिकडे फिरणे असो, भांडण तंटा असो की युद्ध असो, थट्टा मस्करी असो की प्रेम प्रकटन असो, लोभ असो किंवा क्रोध असो या साऱ्यांचे प्रकटन नृत्यात व्हायचे. कथेतील सारे प्रसंग नृत्यातून प्रदर्शिले जायचे. वाणी अगदी स्तब्ध, शरीर पूर्णपणे बोलके. नृत्याची भाषा कळल्याशिवाय कथानक कळायचे नाही."
याच पत्रात पुढे ते गियानाच्या राजवाड्यात पाहिलेल्या एका नृत्याचे वर्णन करतात. ते म्हणतात," सुंदर साजशृंगार केलेल्या दोन छोट्या मुली मुकुटावरील फुलांचे झेले झुलवत झुलवत अन त्यांच्याच छंदात देह डुलवत डुलवत ' गामोलान ' ह्या वाद्यवृंदाच्या तालावर नाचत होत्या. आपल्या देशात ' जलतरंग ' हा पोरांचा खेळ समजला जातो. पण त्याच पद्धतीने विविध वाद्यांचे तरंग मिश्रित करून किती अपूर्व वाद्यसंगीत निर्माण होऊ शकते हे त्यांचे बहुवाद्यमिश्रित गामोलान ऐकल्यावरच कळते. गामोलानमध्ये मृदुंग, टाळ, छोट्या मोठ्या घंटा यांचा प्रामुख्याने समावेश असतो. पण आपल्याकडील नाट्यगृहातील कन्सर्ट किंवा युरोपीय विविध वाद्यांची हार्मनी ते मात्र हे वादन नव्हे. हे अगदी वेगळे आहे. भारी गोड लागते कानाला. युरोपीय लोकांना सुद्धा ते मानवते. बलिद्वीपीय लोकांचे नृत्य झिमझिम पडणाऱ्या पावसासारखे नाही. ते आहे निर्झराच्या तरंगित प्रवाहाप्रमाणे. त्यांच्या ग्रंथात गान भरले नाही, ते भरले आहे त्यांच्या नृत्यात."
विविध देशातील संस्कृतींचा आणि नृत्याचा रवींद्रनाथांनी अभ्यास जरी केला असला, तरी त्यांनी त्या सर्व पद्धती किंवा कलाप्रकार जसेच्या तसे उचलले नाहीत. तर आपल्याला हवे तेवढेच त्यातील घेऊन आपले कलाप्रकार आणखी समृद्ध केले. शांतिनकेतन मधील कला आणि संगीत शिक्षणाला नृत्याची जोड देण्यात आली. तेथील मुले नृत्यनाटिकांमध्ये सहभागी होत असत. स्वतः रवींद्रनाथ त्यांना नृत्याचे धडे देत असत. संगीत आणि नृत्य हे आत्मप्रकटीकरणाचे आणि व्यक्तिमत्व विकासाचे एक अनोखे साधन आहे अशी रवींद्रनाथांची श्रद्धा होती.
प्रसिद्ध भारतीय नर्तक उदयशंकर यांनी एकदा शांतिनिकेतनला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन विविध नृत्यप्रकार सादर केले. ते प्रकटीकरण पाहून रवींद्रनाथांना अतिशय आनंद झाला. त्याप्रसंगी त्यांचे कौतुक करताना रवींद्रनाथ म्हणाले," उच्च व आदर्श नृत्य तेच की जे जनतेत तेज, वीर्य, पौरुषत्व जागे करते. नृत्य हे केवळ रंजनाकरता राबवायचे नाही. तसे ते राबवल्यास त्याला कलावंतिणीच्या किंवा बाईजीच्या नृत्याचे स्वरूप येईल. त्याचा दर्जा ढासळेल. नर्तक हा कवी आणि चित्रकार यांच्याप्रमाणेच स्वतंत्र वृत्तीचा श्रेष्ठ ध्येयवादी असला पाहिजे. व्यापारी वृत्तीपासून व सवंग लोकप्रियतेच्या हावेपासून त्याने दूर राहिले पाहिजे. तरच नृत्यकलेचा दर्जा उंचावेल, कलाक्षेत्रात तिला मानाचे स्थान मिळेल." रवींद्रनाथांचे हे विचार आजही नृत्य कलेमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत.
प्राचीन भारतीय नृत्य कलेला रवींद्र नाथांनी नृत्यकलेतील आधुनिक वैशिष्ट्यांची जोड देत तिचा भारतीय बाज कायम ठेवला आणि भारतीय नृत्यकलेशी सुसंगत ठरेल अशा प्रकारे तिचा विकास घडवून आणला. आधुनिक भारताच्या नृत्यकलेच्या इतिहासात रवींद्रनाथांच्या या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख केल्याशिवाय कोणालाही पुढे जाता येणार नाही एवढे महत्त्वाचे योगदान त्यांचे या क्षेत्रातही आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१४/१/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा