उगवतीचे रंग
स्पर्श मानव्याचा : एक अस्वस्थ करणारे आत्मकथन
विजयाताई लवाटे यांचे ' स्पर्श मानव्याचा ' हे पुस्तक हातात पडले आणि या पुस्तकाने अक्षरशः अस्वस्थ केले. खरे तर २००६ मध्येच हे पुस्तक प्रकाशित झाले आहे परंतु माझ्या हातात ते उशिरा आले. वेश्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी विजयाताईंनी आपले आयुष्य खर्च केले. आपला देह चंदनासारखा झिजवला. आजकाल समाजसेवेचा आव आणणारी आणि प्रतिष्ठितपणाची झूल पांघरणारी अनेक माणसे आपण समाजात पाहतो. व्यासपीठावर मिरवणे वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळवणे यापलीकडे त्यांचे काम फारसे जात नाही. या अशा मंडळींमध्ये बऱ्याच वेळा नेते किंवा मंत्री यांचाही समावेश असतो. व्यासपीठावरून मदत जाहीर केली जाते परंतु प्रत्यक्षात ती पोचतेच असे नाही.
वेश्यांच्या जीवनातील दाहकता काय असते ती हे पुस्तक वाचल्यानंतर समजते. कोणीही हौसेने या व्यवसायात येत नाही. खरे सांगायचे तर आपल्या सामाजिक व्यवस्थेचेच हे बळी असतात. पण समाज त्यांच्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघतो. विकृत पुरुषी मनोवृत्ती त्यांचा उपभोग घेण्यासाठी तयार असते पण त्यांना मदत करण्यासाठी मात्र पुढे येण्याचे नाकारते. समाजातील तथाकथित प्रतिष्ठित देखील अशावेळी आपले पाऊल मागे घेतात. विजयाताईंचं हे आत्मकथन वाचल्यानंतर त्यांना कोणकोणत्या अग्निदिव्यातून जावे लागले असेल त्याची पुसटशी कल्पना आपल्याला येते. पण ती पुसटशी कल्पना देखील आपल्याला अस्वस्थ करणारी आहे. पण जे कार्य करायला सहसा कोणी धजावले नसते, ते कार्य विजयाताईंनी करून दाखवले. ' विजया ' हे नाव त्या अर्थाने त्यांनी सार्थ केले. त्या दीन, उपेक्षित, दुःखी, परिस्थितीने गांजलेल्या, गुप्त रोगाने आणि एड्स सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्या वेश्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या आई झाल्या. प्रसंगी स्वतः उपाशी राहून त्यांना खायला घातले. आपल्या घरातील जबाबदाऱ्या सांभाळून आणि प्रसंगी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आरोग्याची काळजी या माऊलीने घेतली. त्यांच्यात आरोग्य विषयक आणि कुटुंब नियोजन विषयक जागृती घडवून आणली हे काम सामान्य नाही.
विजयाताई या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या. पण त्यांनी ही जी समाजसेवा केली, तिला तोड नाही. आणि ती देखील कमालीच्या व्रतस्थ वृत्तीने. कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीची आणि पारितोषिकाची हाव न धरता. वेश्यावस्ती म्हणजे समाजातील एक दुर्लक्षित आणि उपेक्षित अंधार कोठडी. त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले काय आणि नाही दिले काय, कोणाला फारसा फरक पडत नाही. पण अशा या अंध:कारमय जगात आपल्या सेवेचा आणि मानव्याचा दीप त्यांनी आपल्या परीने तेवता ठेवला. समाजातील अशा दुर्लक्षित आणि उपेक्षित अंधाऱ्या कोपऱ्याकडे काही जण सहानुभूतीने पाहतातही. पण प्रत्यक्षात कार्य करणे मात्र त्यांना जमत नाही. ते कार्य विजयाताईंनी केले.
कुटुंबातील अडचणींना तोंड देऊन त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. विवाहानंतर सासरी देखील त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. एका मुलाची आई असताना आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी दोन महिन्यांचे कुटुंब नियोजनाचे प्रशिक्षण घेतले. हे त्यांचे प्रशिक्षण पुढे त्यांना आयुष्यभर कामी आले. पुणे महानगरपालिकेच्या कुटुंब नियोजन विभागात त्यामुळे नोकरी मिळाली. आपले काम प्रामाणिकपणे करीत असताना पुढे त्याच खात्यात गुप्तरोग विभागात त्यांची नेमणूक झाली. इथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.
वेश्यावस्तीत काम करीत असताना त्यांनी वेश्यांना आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी हे सांगितले. सुरुवातीला त्यांच्या गुप्त रोगाची माहिती घेताना त्यांना किळस वाटत होती. पण हळूहळू त्याची सवय होत गेली आणि त्यांनी अतिशय निष्ठेने हे सर्व काम केले. त्यांच्यावर उपचार कसे करायचे हे शिकून घेतले. हे काम करत असताना त्यांना लक्षात आले की या व्यवसायात अनेक स्त्रियांना जबरदस्तीने आणि परिस्थितीच्या रेट्यामुळे यावे लागते. त्यांच्या स्पर्श मानव्याचा या पुस्तकात वेश्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या अनेक हृदय द्रावक हकीगती दिल्या आहेत त्यातील एक दोन प्रसंग नमुन्या दाखल याठिकाणी सांगतो. ते त्यांच्याच शब्दात...
" एकदा एका वेश्येकडे गेले होते. तिला नुकतेच मूल झाले होते. शस्त्रक्रिया करून ती घरी आली होती. तिची विचारपूस करणे हा माझ्या कामाचा भागच होता. ती फरशीवर पोते टाकून मुलाला मांडीवर घेऊन बसली होती. समोर कॉट रिकामीच होती. मी म्हटले, " खाली का बसलीस ? वर बस ना. " ती म्हणाली, " ती खाट पैसे कमावण्यासाठी आहे. आता महिनाभर कमावणार नाही. अशीच दैना होणार माझी. ज्याला हवं त्याला देव देत नाही आणि इथे मात्र...? "
अशाच एका प्रसंगी एका वेश्येकडे त्या गेल्या असतानाचा प्रसंग. तिलाही नुकतेच बाळ झाले होते. पण तिने शस्त्रक्रिया करून घेतली नव्हती. म्हणून मी चौकशीला गेले. ती बाहेर गॅलरीत पुढे बसली होती. अंगावर एक लहानसे चिरगुट होते. समोरच तिचे बाळ टाहो फोडून रडत होते. एका कोपऱ्यात एक वयस्कर माणूस बसला होता. तो तिचा बाप होता. खिडकीजवळ एक गलेलठ्ठ मुलगी रंगरंगोटी करून बसली होती. घरवाली खुर्चीत बसली होती. मी मुलाच्या आईला म्हटले," अगं, बाळाला घे की." घरवाली म्हणाली," कशाला घ्यायचं ? काय पाजणार त्याला ? सातव्या महिन्यापासून धंदा नाही. इतके दिवस मीच हिला खायला प्यायला घातलं. मिळवत काही नाही. वर पोराचा ताप आणि त्यातही या तिच्या बापान सातशे रुपये कर्ज घेतलय. कसं फेडणार ही ? वर्षाला पोरं मात्र जन्माला घालते..." या पुस्तकातील असे अनेक प्रसंग मन विदीर्ण करणारे आहेत.
या सगळ्या प्रसंगांना विजयाताई आईच्या मायेने तर सामोऱ्या गेल्याच. त्यांनी त्या स्त्रियांमध्ये स्वतःबद्दल विश्वास निर्माण केला. त्यानंतरच त्या स्त्रिया त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू लागल्या आणि आपले दुःख उघड करू लागल्या. त्यांच्या दुर्लक्षित मुलांसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले त्यातूनच त्यांच्या या वेगळ्या कामाची सुरुवात झाली.
वेश्यांच्या मुलांसाठी त्यांनी जवळच्याच एका धर्मशाळेत जागा मिळवून शाळा सुरू केली. परंतु तिथे मुलांना विविध अडचणीला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे पुढे त्यांनी आकुर्डी या ठिकाणी जागा मिळवली. आणि तिथे मुलांची राहण्याची, जेवणाची आणि शाळेत जाण्याची सोय केली. आपल्या नोकरीच्या वेळे व्यतिरिक्त आणि घरचा व्याप सांभाळून त्यांना हे सगळे काम करावे लागे. तिथेही काही अडचणी आल्या. मग त्यांनी पुढे उरुळीला जागा मिळवली. त्यानंतर पौड रस्त्यावर भुकूमला आणि नंतर केडगाव बेटावर जागा मिळवली. प्रत्येक ठिकाणी अनंत अडचणी येत होत्या. वेश्यांची मुले म्हटल्यानंतर लोक सहकार्य करायला तयार नसत. मुलांना उपास पडत होते. अशावेळी विजयाताई स्वतः भाकरी आणि मसुराची आमटी करून प्रथम त्यांना जेवायला वाढत असत. या नवीन कामामुळे त्यांना घरी जायला उशीर होत असे. त्यांचे यजमान नाराज होत. परंतु तरी देखील विजयाताईंनी आपल्याला शक्य होईल तेवढे या मुलांसाठी केले. हे सगळे वाचल्यानंतर त्यांच्या धैर्य आणि सहनशक्तीला सलाम करावासा वाटतो.
आईच्या मायेने हे काम करीत असताना पुढे एका प्रतिष्ठित संस्थेने गुंडगिरी करून त्यांच्या वस्तीगृहातील मुले पळवून नेली. सर्वेषां सेवा संघाची ही शाखा संपुष्टात आली. हे काम करीत असताना विजयाताईंना दोन हृदयविकाराचे झटके आले. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देण्याचे ठरवले. परंतु त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. त्यांनी तसेच आपले काम सुरू ठेवले. काही दिवसानंतर विलास चाफेकर त्यांना भेटले. विलास चाफेकर हे वंचित विकास संस्थेचे काम करीत होते. त्यांच्या आवाहनानुसार विजयाताई त्या संस्थेत काम करू लागल्या. या संस्थेने मग लोहगाव येथे वेश्यांच्या मुलांसाठी निहारमध्ये वस्तीगृह सुरू केले. हे काम करतानाही विजयताईंनी अनेक अडचणींना तोंड दिले पण निष्ठापूर्वक या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
नंतर त्यांनी एड्सग्रस्तांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे ठरवले. आणि एड्सग्रस्तांच्या मुलांसाठी मानव्य ही संस्था स्थापन करून बालवाडी आणि पाळणाघराला ' गोकुळ ' हे नाव दिले. संस्थेच्या विश्वस्तांनी भूगाव येथे त्यासाठी जमीन विकत घेतली आणि मग मानव्याचे गोकुळ या जागेत उभे राहिले. या कामातील विजयाताईंच्या आठवणी आणि अनुभव अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यानंतर त्यांच्या कामाचे महत्त्व समाजाला उमगले आणि त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला. त्यांच्यावर अनेक पुरस्कारांचाही वर्षाव झाला. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत निरपेक्षपणे त्या हे काम करीत राहिल्या. असे समर्पण क्वचितच बघायला मिळते. आज गरज आहे ती विजयाताईंचे कार्य पुढे नेण्याची आणि अशा संस्थांना मदतीचा हात देण्याची. मृणालिनी ढवळे यांनी त्यांचे हे अनुभव शब्दबद्ध केल्यामुळे आपल्यापर्यंत त्यांचे कार्य पोहोचू शकले आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१२/१/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा