उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३७
चित्रकार रवींद्रनाथ - भाग एक
रवींद्रनाथांना आपण एक महान साहित्यिक म्हणून ओळखतो. त्यांनी वाङ्मयाचे सर्व प्रकार हाताळले. परंतु तरी त्यांना असे वाटत होते की आपल्याला जे जे जाणवते किंवा ज्याची आपण अनुभूती घेतो त्या सर्व गोष्टी केवळ शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करणे अशक्य आहे. आपल्या मनात असणारे काहीतरी सांगायचे राहून जाते आहे. साहित्याचे सर्व प्रकार हाताळले तरी आपल्याला आपल्या उभ्या आयुष्यात आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्चाचा सखोल शोध घेता आला नाही अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात उतारवयात घर करू लागली होती. त्यासाठी दुसरे कुठले तरी माध्यम हवे आणि चित्रकलेच्या रूपाने ते माध्यम त्यांना गवसले. आतापर्यंत शब्दांच्या माध्यमातून वाचकांसमोर चित्र उभे करणारे रवींद्रनाथ आणखी व्यक्त होण्यासाठी चित्रकलेकडे वळले.
रवींद्रनाथानी सुधीन्द्रनाथ दत्त या कवीला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे,"शब्द मला संतुष्ट करत नाहीत. त्यांचे नियम कडक असतात. माझ्या रेषा मात्र त्यांच्या मनाप्रमाणे हसतात. त्या मला सीमित करत नाहीत. "
आणखी एका ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणतात," मला वाटते मला इतर सर्व गोष्टींपासून मुक्तता मिळून केवळ चित्रनिर्मिती करता आली असती तर ! आज मनापासून मला चित्रनिर्मितीची उर्मी दाटून आली आहे."
तसे पूर्वीपासून चित्रकलेचे त्यांना आकर्षण नव्हते किंवा ज्ञान नव्हते अशातला भाग नव्हता. परंतु त्यांनी ते माध्यम आतापर्यंत हाताळले नव्हते किंवा त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नव्हते. आपल्याला हे जाणून घेतल्यानंतर आश्चर्य वाटते की ते जेव्हा चित्रकलेकडे वळले त्यावेळी त्यांचे वय होते सुमारे ६५ वर्षे. १९२४ च्या काळात त्यांनी चित्रकलेची आराधना करण्यासाठी सुरुवात केली. आणि एवढ्या उशिरा सुरुवात करूनही त्यात त्यांनी किती प्राविण्य मिळवले हे त्यांनीच लिहिलेल्या एका पत्रावरून लक्षात येते. हे पत्र त्यांनी आपल्या सुनेला १९३० मध्ये लिहिले आहे. प्रतिमादेवी या त्यांचा मुलगा रथींद्रनाथ यांची पत्नी. ते तिला लिहिलेल्या पत्रात म्हणतात..
सूनबाई,
इथल्या नॅशनल गॅलरीने माझी पाच चित्रे स्वीकारली आहेत असे मी ऐकले म्हणजे आता ती पोहोचली आहेत चित्रांच्या अमरावतीला त्यांना किमतीची अडचण होती. पैसा नाही. काय करायचे ? मी लिहून दिले की मी ती चित्रे जर्मनीला दान केली आहेत. त्यांचे पैसे नकोत. ते खूष झाले. आणखी बऱ्याच ठिकाणाहून प्रदर्शनासाठी मागण्या आल्या आहेत. स्पेनहून एक मागणी आली आहे. त्यांना नोव्हेंबरमध्ये प्रदर्शन हवे आहे. व्हिएन्नालाही हवे आहे. माझ्या कवी नावाने त्यांनी प्रसिद्धी केली आहे. "
रवींद्रनाथांच्या चित्रांना किती मागणी होती आणि त्यांचा दर्जा किती उच्च होता ते सांगण्यासाठी हे पत्र पुरेसे बोलके आहे.
आपले साहित्य मग ते कविता किंवा नाटक असो, ते लिहिताना त्यांना बऱ्याच वेळा खाडाखोड करावी लागत असे. सौंदर्याची अंगभूत जाण आणि आवड असलेल्या रवींद्रनाथांना ही खाडाखोड डोळ्यांना खूपत असे. मग त्यातून त्या खाडाखोडीला त्यांनी कलात्मक वळण द्यायला सुरुवात केली. त्यातून आपोआप लक्षवेधी आकृत्या निर्माण होऊ लागल्या. शब्दांचे आकार कलात्मक रूप घेऊ लागले त्यांच्या आकारात लय आणि तालबद्धता साधली जाऊ लागली.
रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे जी जी गोष्ट त्यांना करावीशी वाटली, ती ती त्यांनी मनापासून केली. आपण सर्वसामान्य माणसे हाती घेतलेली एखादी गोष्ट मनापासून करत नाही किंवा त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांचा कंटाळा आला की ती सोडून देतो. रवींद्रनाथांचे तसे नव्हते. त्यामुळेच हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यांना न्याय देता आला. त्यामुळेच वयाच्या उत्तरार्धात सुरुवात करूनही ते आधुनिक चित्रकलेचे प्रणेते ठरले.
रवींद्रनाथ चित्रकलेकडे कसे वळले त्याची कथाही मजेशीर आहे. १९२४ मध्ये ते दक्षिण अमेरिकेत गेले होते. तेथील ब्यूनॉस आयर्स या शहरातील वास्तव्यात ते आजारी पडले. तिथे असणारी स्पॅनिश कवयित्री आणि लेखिका व्हिक्टोरिया उकाम्पू ही रवींद्रनाथांच्या साहित्यावर अपार प्रेम करणारी थोर विदुषी होती. त्यांना बरं वाटावे म्हणून ती त्यांना एका मोठ्या सुंदर उद्यानगृहात घेऊन गेली. तेथील सुंदर वातावरणात रवींद्रनाथ रमले आणि त्यांना बरे वाटले. तेथे त्यांच्या काही कविता जन्माला आल्या. त्या ' पूरबी ' कविता संग्रहात प्रकाशित झाल्या आहेत. या कविता लिहीत असताना रवींद्रनाथ सहज म्हणून काही चित्रे काढत. ते अशा रेषांची निर्मिती करीत की ज्या रेषा जिवंत होऊन प्राणी, पक्षी आदींचा आकार घेत. रवींद्रनाथांमध्ये लपलेला चित्रकार या व्हिक्टोरिया नावाच्या या विदुषीने ओळखला आणि त्यांना चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. एका दष्टीने हे तिचे रवींद्रनाथांवर आणि पर्यायाने भारतावर देखील मोठे उपकार आहेत.
' पुरबी ' च्या हस्तलिखितात या कविता आणि चित्रे आहेत. यातील चित्रे म्हणजे केवळ आकृत्या नसून ताल आणि लयीचे नियम सांभाळून निर्माण झालेल्या रचना आहेत. जिवंत भासणारे डोळे, तीक्ष्ण दात, विविध भाव व्यक्त करणारे मानवी चेहरे, नागमोडी वळवळणारे साप, पक्षी अशा विविध प्रकारच्या कलाकृती या हस्तलिखितात आहेत. हे हस्तलिखित म्हणजे रवींद्रनाथांच्या कल्पना आणि प्रतिभाशक्तीचे द्योतक आहे. या चित्रांमधील प्राणी आणि पक्षी सर्वस्वी वेगळे आणि रवींद्रनाथांच्या कल्पनेतून निर्माण झालेले आहेत. ते वास्तविक जगातील नाहीत. स्वतः रवींद्रनाथ त्यांच्याबद्दल बोलताना म्हणतात," हे प्राणी म्हणजे ज्यांना या जगातील अस्तित्वच नाकारले आहे, त्यांचे नेमस्त अतिशयोक्तीपूर्ण चित्रण असून या रचनांमधील पक्षी म्हणजे केवळ तुमच्या आमच्या स्वप्नात येऊन आपली झोप उडवणारे भयंकर असे जीव आहेत, ज्यांना त्यांचे घरटे आपण अगत्याने बहाल केलेल्या रेषांद्वारे केवळ आपल्या कॅनवासवर प्राप्त होईल. " या चित्रांचा संबंध रवींद्रनाथांच्या बालपणीच्या आठवणींशी, अनुभवांशी आणि स्वप्नांशी निगडित असावा. त्यांना त्यावेळी जाणवलेल्या अतिमानवी ( supernatural) गोष्टी या रेषांच्याद्वारे जिवंत झाल्या असाव्यात.
चित्रकलेत अनेक पद्धती असतात, शैली असतात. त्या प्रत्येकातून काहीतरी शिकण्यासारखे असते. अमुक एक पद्धती चांगली आणि दुसरी वाईट अशा प्रकारचे वर्गीकरण यात करणे योग्य नाही. याबाबत रवींद्रनाथांची भूमिका अशी होती की आपल्या परंपरेतील शाश्वत मूल्यांचा वारसा सांभाळावा आणि जीवनाला सन्मुख राहून तो समृद्ध करावा. त्यातूनच त्यांनी चित्रकलेच्या विविध नव्या-जुन्या शैली पाहिल्या, विविध प्रकारांचे निरीक्षण केले आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच त्यांची चित्रकला विषयक जाणीव अधिकाधिक समृद्ध होत गेली.( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१/१/२०२५
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा