उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य भाग २९
नाटककार रवींद्रनाथ - भाग चार
वाल्मिकी प्रतिभा, कालमृगया, प्रकृतीर प्रतिशोध, मायार खेला या संगीत नाटकानंतर रवींद्रनाथांचा विविध विषयांवर आणि विविध सामाजिक प्रश्न घेऊन नाटके लिहिण्याचा आणि दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच होता. इंग्रज राजवटीने भारतीय कला आणि संस्कृती यांच्यावर आक्रमण केले होते. भारतीय कलांचा ऱ्हास होत होता. गौरवशाली असलेली भारतीय नाट्यपरंपरा लयास चालली होती. रवींद्रनाथांच्या नाटकांमुळे या नाट्यपरंपरेला संजीवनी मिळाली. तिचे पुनरुज्जीवन झाले.
१८८७ मध्ये त्यांनी ' राजर्षी ' ही लघु कादंबरी लिहिली. पुढे त्या कादंबरीचे नाट्यरूपांतर करावे असे त्यांना वाटले आणि मग १८९० मध्ये त्यांनी ' विसर्जन ' या नावाने ते प्रसिद्ध केले. रवींद्रनाथांसारख्या प्रतिभाशाली साहित्यिकाला एखादी छोटीशी घटना देखील एखादा कथा विषय देऊन जाते. या नाटकाच्या संदर्भात अशीच गोष्ट घडली. योगी अरविंद यांचे आजोबा ( आईचे वडील ) राजनारायण बोस यांना ते एकदा भेटायला गेले होते. त्यांचा प्रवास आगगाडीने झाला. येताना या आगगाडीच्या प्रवासात त्यांना थोडी झोप लागली आणि एक स्वप्न पडले आणि या स्वप्नातूनच या कादंबरीचे आणि नाटकाचे कथानक त्यांना मिळाले. हे नाटक कट्टर धार्मिक रुढी आणि परंपरा यांचे आंधळेपणाने केलेले पालन आणि आधुनिकता यांच्या संघर्षावर प्रकाश टाकते. माणसाच्या प्रगतीत रुढी परंपरांचे अंधपणाने केलेले पालन कसा अडथळा ठरते त्याचे चित्रण हे नाटक करते.
' लक्ष्मीर परीक्षा ' हे नाटक तर त्यांनी शांतिनिकेतन मध्ये शिकायला येणाऱ्या मुलींसाठी खास करून लिहिले. या नाटकात सगळी स्त्री पात्रेच आहेत. त्यात भूमिका करणाऱ्या देखील मुलीच होत्या. या नाटकात रवींद्रनाथांची सून प्रतिभादेवी हिने देखील भूमिका केली होती. हे नाटक पाहणाऱ्या देखील फक्त स्त्रियाच असाव्यात असे त्यांना वाटत होते. त्यामुळे सुरुवातीला या नाटकाला फक्त स्त्रियाच येत. स्वतः रवींद्रनाथांनी पडद्याआडून हा प्रयोग पाहिला आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांचे कौतुक केले होते. परंतु पुढे केवळ स्त्रियांनीच हे नाटक पहावे हा नियम त्यांनी काढून टाकला. या नाटकात त्यांनी निर्दयी, अन्यायी सामाजिक प्रथांवर प्रहार केले.
पुढील काळात लिहिलेल्या काही नाटकांमध्ये त्यांनी अध्यात्मिक विषयांना हात घातला. याचे कारण म्हणजे त्यांची स्वतःचीही आध्यात्मिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. त्याचे प्रतिबिंब या नाटकांमध्ये उमटलेले दिसते. अशा नाटकांमध्ये ' शारदोत्सव ', ' राजा ' यासारख्या नाटकांचा समावेश आहे. त्यांचे ' राजा ' हे नाटक आजच्या परिस्थितीवर देखील भाष्य करणारे आहे. आपण प्रजाहितदक्ष असल्याचा आव आणून राजे लोक आपला स्वार्थ कसा साधतात आणि आपली सत्ता कशाप्रकारे राखण्याचा प्रयत्न करतात हे यात दाखवले आहे. आजच्या राज्यकर्त्यांना देखील हे लागू पडते.
' अचलायतन ' आणि ' डाकघर ' या नाटकांमध्ये रवींद्रनाथांनी शिक्षणाच्या पारंपारिक पद्धतीवर कोरडे ओढल आहेत. शिक्षणाची पारंपारिक आणि प्रचलित पद्धती त्यांना मान्य नव्हतीच. त्यामुळेच त्यांनी शांतीनिकेतनची स्थापना केली होती हे आपल्याला माहिती आहे. ' अचलायतन ' या नाटकात त्यांनी शिक्षणाच्या नावाखाली मुलांची कोवळी मने मारली जातात, त्यांच्या विचारशक्तीला वाव दिला जात नाही, त्यांच्याकडून सक्तीने घोकंपट्टी करवून घेतली जाते आणि त्यालाच शिक्षण असे गोंडस नाव दिले जाते हे प्रभावीपणे दाखवले आहे. शिक्षणातील यासारख्या गोष्टी म्हणजे केवळ औपचारिकता. हे शिक्षण नव्हे असे त्यांनी या नाटकातून स्पष्ट केले आहे. ' डाकघर ' या नाटकात एक मुलगा आजारी असल्यामुळे घरातच कोंडून राहतो. त्या मुलाचे भावविश्व आणि त्याच्या भोवतालची परिस्थिती त्यांनी प्रभावीपणे चित्रित केली आहे.
१९१६ मध्ये त्यांचे ' फाल्गुनी ' हे नाटक आले. हे नाटक अनेक अर्थांनी आगळे वेगळे आणि जीवनाचे रहस्य सांगणारे आहे. निसर्गातील वसंत ऋतू म्हणजे मन प्रसन्न करणारा, चैतन्य देणारा आणि सर्वांचा आवडता असतो. तो दरवर्षी नित्य नियमाने येतो आणि पुन्हा जातो. हे सांगतानाच रवींद्रनाथ मानवी जीवनातील वसंताचे रहस्य देखील सांगतात. मानवी जीवनातील वसंत देखील असाच फुलत राहतो. मानव जर नीती नियमानुसार आपले वर्तन चांगले ठेवील आणि आलेल्या अनुभवातून शहाणा होत जाईल तर त्याच्या जीवनातील वसंत देखील फुलतच राहील. वृद्धापकाळमुळे माणसाच्या डोक्यावरील केस भलेही शुभ्र होतील पण त्याच्या अनुभवानी तो परिपक्व झालेला असेल आणि प्रौढतेतून प्रकट झालेले त्याचे हे तारुण्य स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी जगणारे, इतरांच्या उपयोगी पडणारे असे असेल. हे एक प्रकारचे चिरयौवनच. मग मनुष्याच्या जीवनातील वसंत कधीही मावळणार नाही अशा प्रकारचा सुंदर संदेश या नाटकातून त्यांनी दिला आहे. या नाटकातून कला आणि सौंदर्य यांचे पुजारी असलेल्या रवींद्रनाथांचे दर्शन आपल्याला घडते. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१९/११/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा