उगवतीचे रंग
दक्षिण भारतातील अप्रतिम मंदिरे - भाग एक
मुलाची बदली बंगलोर येथे झाल्यामुळे आम्ही ही २०२४ ची दिवाळी बंगलोर येथे घालवण्याचे ठरवले. मुलालाही दोन तीन दिवस सुटी असल्याने बंगलोर येथून साधारणपणे २०० किमी अंतरावर असलेल्या हसन येथे जाऊन आम्ही तेथील मंदिरे पाहण्याचे ठरवले. मंदिरे पाहण्याचे काही नियोजित नव्हते पण ही सुदैवाने ही संधी चालून आली. मंदिरे पाहिल्यानंतर आपण योग्य तोच निर्णय घेतला याचा आनंद झाला. या मंदिरांबद्दल पूर्वी कधीतरी ऐकलेलं होतं पण ती पाहण्याचा योग आता जुळून आला होता. या मंदिरांची वास्तूरचना, बांधणी, त्यावरील अप्रतिम शिल्पकाम पाहून थक्क झालो. त्यांच्या अनुपम सौंदर्याचे वर्णन करणे आणि शब्दातून ते सांगण्याचा प्रयत्न करणे खरोखर कठीण आहे कारण ती पाहण्याची आणि अनुभवण्याचीच गोष्ट आहे. तरी देखील माझ्या दृष्टीला ती जशी वाटली तशी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न आहे. साधारणपणे हजार बाराशे वर्षांपूर्वी ज्या होयसळ राजांनी ती बांधली त्यांच्या रसिकतेचे, कलाप्रेमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हजार-बाराशे वर्षांपूर्वीचा इतिहास आज आपल्या डोळ्यासमोर या मंदिरांच्या रूपाने उलगडतो. मंदिरे, मूर्ती, मंदिरातील भिंतीवर कोरलेले प्रसंग यातून इतिहास जिवंत होतो. आपण या प्राचीन गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार बनतो.
आमची ही प्रेक्षणीय सफर १ ते ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत झाली. ही मंदिरे पाहण्यासाठी हसन हे जिल्ह्याचे ठिकाण सोयीचे होते. त्यामुळे त्याच ठिकाणी एका हॉटेलमध्ये मुक्काम करून दोन दिवस मंदिरे पाहण्यात घालवले. कर्नाटकातील या हसन जिल्ह्याला अत्यंत प्राचीन उज्ज्वल असा वारसा आहे. हा प्रदेश म्हणजे परंपरा, कला आणि या मंदिरांसारख्या भव्य ऐतिहासिक वास्तूंचे माहेरघर म्हणता येईल. त्याचप्रमाणे निसर्ग सौंदर्याचे अप्रतिम वरदानही या प्रदेशाला लाभले आहे. हिरवीगार वनराई डोळ्यांना सुखावते. या भागात होऊन गेलेले होयसळ राजे अत्यंत रसिक, कलाप्रेमी आणि कलाकारांना उत्तेजन देणारे होते. मंदिरांवर कोरलेल्या चित्रांवरून त्यांच्या काळात शिल्पकला, नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी कलांना आश्रय मिळालेला दिसतो. त्यांच्या काळात मंदिराच्या भव्य वास्तू अस्तित्वात आल्या. आपल्या दोनशे वर्षांच्या कारकिर्दीत कर्नाटकसह इतर ९५२ ठिकाणी या राजांनी १५२१ मंदिरे बांधली. यावरूनच त्यांनी केवढा भव्य वारसा मागे ठेवला आहे, त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. या मंदिरांपैकी ४५२ मंदिरे आजही सुस्थितीत आणि अत्यंत प्रेक्षणीय अशा अवस्थेत आहेत. भारतीय पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली असलेल्या या स्थळांना जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे. हा वारसा काळजीपूर्वक जतन केल्यानेच आज आपल्याला सुस्थितीत बघायला मिळतो. देश विदेशातील अनेक पर्यटक आवर्जून ही मंदिरे पाहण्यासाठी इथे गर्दी करतात. आपला प्राचीन भव्य ऐतिहासिक वारसा जाणून घ्यायचा असेल तर या मंदिरांना अवश्य भेट दिली पाहिजे.
हसन जिल्ह्यातील बेलूर, हळेबीड आणि दोड्डानागडवल्ली येथील मंदिरे आम्ही पाहिली. बेलूर येथील चेन्नाकेशव मंदिर, हळेबीड येथील होयसाळेश्वर मंदिर आणि दोडानागडवली येथील लक्ष्मीदेवी मंदिर ही ठिकाणे आम्ही पाहिली. या लेखात आपण बेलूर येथील चेन्नाकेशव मंदिराची माहिती घेऊया.
या मंदिरांची माहिती घेण्याआधी एक गोष्ट आपण जाणून घेऊया ती म्हणजे या मंदिरांमधील मुर्त्या तयार करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा दगड वापरला गेला. त्याला सोपस्टोन असे म्हटले जाते. हा दगड बेलूर पासून १६१ कि.मी. अंतरावर असलेल्या तुमकुर येथील खाणीतून काढण्यात आला. या दगडाचे वैशिष्ट्य हे की तो मृदू असल्याने त्यावर कोरीव काम करणे किंवा त्यातून मूर्ती निर्माण करणे हे त्यामानाने सोपे जाते परंतु एकदा का या दगडाचा संपर्क वातावरणाशी आला की तो लोखंडासारखा अत्यंत कठीण होतो आणि त्यामुळे त्यावरील शिल्पकाम दीर्घकाळ टिकते. खरोखरीच असा दगड शिल्पकामासाठी निवडणे, वाहतुकीची फारशी साधने नसताना आणि कच्चे रस्ते असताना तो एवढ्या लांबवर वाहून नेणे आणि त्यातून चिरकाल टिकणाऱ्या अभंग मूर्ती घडवणे हे सगळे पाहिले की आपल्या पूर्वजांचे विलक्षण कौतुक वाटते. त्यातूनही छिन्नी हातोड्यासारखी पारंपरिक साधनेच केवळ हाताशी असताना इतक्या जिवंत वाटणाऱ्या मूर्ती, अत्यंत नाजूक नक्षीकाम हे त्यांनी कसे केले असेल याचे आश्चर्य वाटते. असे सांगितले जाते की या मंदिरातील मुर्त्यांना आणि शिल्प कामाला दहा वर्षातून एकदा रासायनिक पदार्थांचा मुलामा दिला जात असे. त्यामुळे शिल्पांचा आणि मुर्त्यांची चकाकी आणि जिवंतपणा आजही टिकून राहिलेला दिसतो.
बेलूर ही पूर्वी होयसळ साम्राज्याची राजधानी होती. या शहराला बेलापूर किंवा बेल्लुर असेही म्हटले जात होते. होयसळ राजांसाठी हे ठिकाण अत्यंत पवित्र होते आणि या ठिकाणाला पृथ्वीवरचे वैकुंठ किंवा भगवान विष्णूचे निवासस्थान किंवा दक्षिण काशी/ वाराणसी असेही म्हटले जात होते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे विजयनारायण म्हणजेच चेन्नकेशव मंदिर होय. विजयनारायण हा विष्णूंच्या २४ अवतारांपैकी एक समजला जातो. अर्थातच हे चेन्नकेशव मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि वैष्णवांचे अत्यंत पवित्र स्थान. कानडी भाषेत चेन्न याचा अर्थ होतो सुंदर आणि केशव म्हणजे विष्णू. सुंदर अशा विष्णूचे मंदिर म्हणजेच चेन्नकेशव मंदिर ! चेन्नकेशव हे नाव नुसते ऐकायला देखील किती छान वाटते ! होयसळ राजांच्या काळात हे मंदिर बांधले गेले आणि हे मंदिर बांधण्यासाठी १०३ वर्षे लागली असे म्हणतात. यावरूनच या मंदिराच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येऊ शकेल. या मंदिराचे आवार अतिशय भव्य आहे आणि या मंदिरात नित्य नियमाने भगवान विष्णूंची पूजा सुरू असल्यामुळे ती पवित्र स्पंदने सक्रिय आहेत असे जाणवते.
होयसळ घराण्यातील कलाप्रेमी विष्णुवर्धन या राजाने चोला राजांवरील लढाईत मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी या मंदिराचे बांधकाम सुरू केले आणि नंतर विष्णुवर्धनचा मुलगा नरसिंह पहिला आणि नातू वीरबल्लाळ दुसरा यांनी या मंदिराचे उर्वरित बांधकाम पूर्ण केले. असे तीन पिढ्यांनी हे बांधकाम पूर्ण केले आहे. या ठिकाणी असणारे गोपूर हे हरिहर दुसरा याचा सेनापती गुंडा याने बांधले. या मंदिरावर काळाच्या ओघात अनेकदा आक्रमण झाले, त्याची नासधूसही करण्यात आली परंतु तरीदखील वेळोवेळी त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. यासाठी ज्यांनी ही पुनर्बांधणी वेळोवेळी केली त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. शेकडो वर्षांपासून या ठिकाणी नित्य पूजा आणि धार्मिक उत्सव साजरे केले जातात. हे मंदिर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे.
अतिशय भव्य असलेल्या परिसराच्या मध्यभागी चेन्नकेशवाचे सुंदर मंदिर आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून त्याच दिशेला आणखी एक प्रवेशद्वार आहे मंदिराच्या परिसराला उंच दगडी भिंतीचे संरक्षण आहे मंदिरासमोर असलेल्या गरुड स्तंभावर गरुडाची मूर्ती हात जोडलेल्या स्थितीत मंदिराकडे तोंड करून उभे आहे ही मूर्ती अत्यंत देखणी आणि प्रमाणबद्ध आहे. पाठीवर पसरलेले पंख, हातावरील बाजूबंदांमध्ये असणारे सर्प, बोटांमधील अंगठ्या, पाठीमागे असलेली प्रभावळ, धनुष्याकृती भुवया, डोक्यावर असलेला मुकुट आणि मानवी देह धारण केलेलं गरुडाचं रूप आपलं लक्ष वेधून घेतं. ही मूर्ती पाहिल्यानंतर हात आपोआप जोडले जातात. या मुख्य मंदिराच्या परिसरातच आणखी मंदिरे, मंडप आणि ओवऱ्या आहेत. मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि मंदिराच्या मागील भिंतीवर असलेले नक्षीकाम किंवा शिल्पकामाचे निरीक्षण करण्यासाठी, पाहण्यासाठी विस्तीर्ण जागेची सोय आहे. हे मंदिर तीन फूट उंच जगतीवर उभे आहे. जगती म्हणजे उंच चौथरा. मंदिराच्या आवारातच गरुड स्तंभाखेरीज आणखी एक स्तंभ उभा आहे. हा एकाश्म आहे म्हणजे एकाच दगडातून घडवलेला आहे. ४२ मी. उंची असलेल्या या स्तंभाला पाया नसून तो त्याच्या स्तःच्या वजनावर उभा आहे हे विशेष ! या स्तंभाला गुरुत्वाकर्षण स्तंभ असेही म्हटले जाते.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मकर तोरण आढळते मकर म्हणजे एक पौराणिक प्राणी असून त्याचा देह अनेक प्राण्यांपासून बनलेला आहे असे त्या शिल्पावरून दिसते. या शिल्पाच्याच जोडीला भगवान विष्णूंचे मत्स्य, कुर्म, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे दहा अवतार कोरलेले दिसतात. इथेच आपल्याला सिंहावर विजय मिळवणाऱ्या राजाचं शिल्प ही बघायला मिळतं. होयसळ राजे हे अत्यंत शूर होते. त्याचा हा पुरावाच म्हटला पाहिजे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला रती आणि मदनाचं शिल्प देखील पाहायला मिळतं. पण हे शिल्प एकत्र नसून वेगवेगळे आहे. त्याचा अर्थ असा की कामासारखे विकार मंदिराच्या बाहेरच ठेवूनच पवित्र मनाने आपण मंदिरात प्रवेश करावा.
हे मंदिर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दर्शवणाऱ्या मूर्तींनी समृद्ध आहे. या मंदिरात मोहिनीच्या मुख्य मूर्तीसह इतरही मूर्ती आहेत. भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले होते. मोहिनी म्हणजे अदृश्य अशा आकर्षणाचे प्रतीकच ! भगवान विष्णूंच्या या रूपाला नाभी नाही. गुरुत्वाकर्षणाची ओढ येथील अनेक शिल्पकामातून दिसते. मोहिनीच्या एका हातातून बांगडी खाली येताना दिसते तर वर उचललेल्या पायातील पैंजण खाली झुकलेले दिसतात. येथील सरस्वती देवीची मूर्ती देखील गुरुत्वाकर्षणाचे भान ठेवूनच बनवली आहे. या मूर्तीच्या मस्तकावर पाण्याचे थेंब पडले तर ते नाकाच्या खालून उजवीकडून येऊन उजव्या हाताच्या तळहातावरून डाव्या पायाच्या तळव्यावर पडतात आणि तिथून उजव्या पायावर पडतात. हे पाणी खाली पसरत नाही तर थेट खाली पडते ते गुरुत्वाकर्षणामुळेच ! हे सगळे पाहिले की या मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांचे कौशल्य आणि ज्ञान पाहून आपण थक्क होतो. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३०/११/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा