उगवतीचे रंग
रवींद्रनाथ वारसा आणि कार्य : भाग ३६
थोर देशभक्त रवींद्रनाथ
रवींद्रनाथ टागोरांना आपण थोर कवी, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि एक महान प्रतिभाशाली व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो. त्यांच्या ' गीतांजली ' या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार मिळाला हेही आपल्याला माहीत असते आणि आपले राष्ट्रगीत जनगणमन हे त्यांनी लिहिले हेही आपण जाणतो. परंतु या पलीकडे जाऊन रवींद्रनाथांची ओळख एक रोमारोमात देशभक्ती असलेली व्यक्ती म्हणूनही आहे हे आपल्याला फारसे माहिती नसते. त्यांचा देशाभिमान, स्वराज्य आणि स्वदेशी बद्दलचे असलेले प्रेम आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करणारे महान व्यक्तिमत्व म्हणून परिचय करून देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये आहे.
रवींद्रनाथांच्या जडणघडणीत त्यांच्या कुटुंबाची असलेली पार्श्वभूमी अतिशय महत्त्वाची आहे. त्यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर म्हणजे कलकत्त्यातील अतिशय प्रभावशाली असे व्यक्तिमत्व होते. ' राजा ' या उपाधीने त्यांचा गौरव केला जात होता. प्रसिद्ध समाज सुधारक राजा राममोहन राय यांच्या सती विरोधी मोहिमेत त्यांचा सहभाग होता. ' प्रेस ऍक्ट ' जो काळा कायदा म्हणून ओळखला जात होता त्याच्या विरोधात झालेल्या चळवळीतही द्वारकानाथ अग्रभागी होते. त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेजसारख्या अनेक मोठ्या संस्थांचे संस्थापकही ते होते. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ हे अत्यंत सचोटीने वागणारे आणि ऋषितुल्य जीवन जगणारे व्यक्ती होते. त्यामुळे लोक त्यांना महर्षी याच नावाने ओळखत.
रवींद्रनाथांच्या जोराशंको या वाड्यात अनेक नामवंत कलाकार, गायक, लेखक, तत्त्वज्ञ आणि त्या काळातील प्रतिष्ठित लोक हजेरी लावीत. त्यामुळे संगीत, नृत्य, नाट्य इ. कला आणि त्यासोबतच देशप्रेमाचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्या मनावर झाले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या साहित्याने बंगालमधील लोकांमध्ये देशप्रेमाची भावना जागवली होती. त्यांचे वंदे मातरम आणि आनंदमठ ही कादंबरी देशप्रेमाची प्रेरणा देणारी होती. या सगळ्या वातावरणात रवींद्रनाथ स्वतःला अलिप्त ठेवू शकले नाहीत. स्वातंत्र्यलढ्याशी ते आपोआप जोडले गेले. अनेक स्वातंत्र्य लढ्यात पुढाकार घेऊन काही चळवळीचे नेतृत्वही त्यांनी केले.
ज्या ज्या वेळी प्रसंग आला त्या त्या वेळी इंग्रजांवर सडकून टीका करण्याचे रवींद्रनाथांनी सोडले नाही. इंग्रजांनी भारतीयांचे स्वत्वच नाहीसे केले याचा संताप त्यांच्या उरात दाटला होता. खरंतर तो स्वातंत्र्यापूर्वीचा काळ इंग्रजांचा विरोध करणाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक होता. केव्हा दरवाज्यावर थाप पडेल आणि इंग्रज अधिकारी अटक करून नेतील याची खात्री देता येत नव्हती. अशा परिस्थितीतही रवींद्रनाथांनी वेळ पडली तेव्हा इंग्रजांना आणि प्रसंगी आपल्याकडील काँग्रेसच्या पुढार्यांना खडे बोल सुनावले होते. याचे एक उदाहरण पु ल देशपांडे यांनी आपल्या रवींद्रनाथ : तीन व्याख्याने या पुस्तकात दिले आहे.
१८८४ मध्ये काँग्रेसचे नेते इंग्रजांसमोर agitation करायला चालले होते. त्याबद्दल लिहिताना रवींद्रनाथ म्हणतात, " इंग्रजांसमोर agitate करायला जायचं काय ? रस्त्यातून चालताना समोरून इंग्रज आला की आम्ही संकोचून बाजूला होऊन त्याला मोकळी वाट करून देतो. ऑफिसात इंग्रज मालकाच्या शिव्या सहन करतो. त्याच्या घरात गेलो, तर त्याला मायबाप म्हणून त्याच्या पायाशी उमेदवारी करतो. त्याचाच खानसामा एखादा रसूल बक्ष असतो त्याला सलाम खासाहेब चाचा म्हणून खुश ठेवतो. सरकारी बागेत आम्ही बाकावर बसलो तर इंग्रज आमचं मानगुट धरून उठवायला लागतो. इंग्रज त्याच्या क्लबात आम्हाला प्रवेश करू देत नाही. आगगाडीत इंग्रजांचे डबे निराळे, gentleman या शब्दाचा अर्थ इंग्रज आणि बाबू म्हणजे शाई जीवी भित्रा ( कारकून ) असाच तो करतो. इंग्रज आमच्या प्राण्यांची किंमत त्याच्या ताटात पडणाऱ्या पशूच्या प्राणाहूनही कमी मानतो, आमच्या घरात येऊन आमचा अपमान करून जातो. आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही. अशा इंग्रजांपुढे agitate करायला जाऊन आम्ही त्याला सांगणार आहोत की आम्हाला तुमच्या जोडीने बसायचं आसन द्या. इंग्रजांशी बरोबरी करायची मागणी करायला हात जोडून त्याच्या पुढे जायचं हा कसला तमाशा ?" हे सगळं लिहिलं तेव्हा रवींद्रनाथ केवळ २४ वर्षांचे होते.
याच लेखांमध्ये रवींद्रनाथ पुढे लिहितात," आम्ही आमच्या देशाची प्रतिष्ठा स्वतः होऊन वाढवणार नाही ? स्वतःच्या देशात शिक्षणाचा प्रसार करणार नाही ? स्वतःच्या देशाच्या अपमानाला प्रत्युत्तर देणार नाही ?अवहेलना दूर करणार नाही ? स्वतःचा मान जे राखत नाहीत त्यांचा मान राखायला काय परके येणार आहेत ? आम्हीच का म्हणून स्वदेशाची घृणा मनात बाळगतो ? का म्हणून स्वभाषेत बोलत नाही ? का स्वदेशी वस्त्र वापरत नाही ? इंग्रजांचा हातरुमाल पडला तर तो उचलून देताना गो-लोकप्राप्तीच सुख लाभल्यासारखं मानतो. आम्ही आमच्या भाषेत, आमच्या साहित्यात अशी प्रगती का करू इच्छित नाही की ज्यामुळे आमची भाषा आणि आमचं साहित्य हे परम श्रद्धेय होऊन जाईल ? "
रवींद्रनाथांचं स्वभाषेचे प्रेम केवळ बोलण्यापुरतं नव्हतं त्यांना स्वतःला उत्तम इंग्रजी येत असूनही त्यांनी फक्त बंगालीतूनच लिहिणं आणि बंगालीतूनच भाषण करणं पसंत केले. अनेक पाश्चात्य कवींच्या कविता त्यांनी आपल्या देशवासीयांना उत्तम साहित्याची माहिती व्हावी म्हणून बंगालीत भाषांतरित केल्या. संस्कृत मंत्रातली सुंदरता लक्षात यावी म्हणून अनेक संस्कृत मंत्रांचं बंगालीत भाषांतर केलं. तुकारामांच्या काही मराठी अभंगांचं बंगालीत भाषांतर केलं. त्यांचं इंग्रजांशी असणारं वैर इंग्रज माणसांच्या त्यांनी आपल्या देशावर आणि देशबांधवांवर केलेल्या अन्यायाविरुद्ध होतं. सामान्य इंग्रज माणूस त्यांचा शत्रू नव्हता.
साधारणपणे १९०७-०८ मध्ये रवींद्रनाथ हे सक्रिय राजकारणापासून दूर झाले तरी देखील संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी देणाऱ्या वंगभंग विरोधी चळवळीचे नेतृत्व सुरुवातीला त्यांनी केले होते. त्या आंदोलनाच्या सुरुवातीला त्यांनी दोन देशभक्तीपर गीत रचनाही केल्या होत्या. त्यांचा वंगभंगविरोधी आंदोलनात असलेला पुढाकार म्हणजे कर्झनच्या दडपशाही वृत्ती विरोधातली तीव्र प्रतिक्रिया होती. पण ही प्रतिक्रिया एकाएकी आलेली नव्हती. कारण त्यापूर्वीही जवळपास २०-२२ वर्षे रवींद्रनाथ स्वातंत्र्यासाठी सुरू असणाऱ्या विविध चळवळींमध्ये आणि लढ्यांमध्ये सहभागी होते.
राष्ट्रीय सभेच्या मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले व्योमेशचंद्र बॅनर्जी हे बंगालमधीलच होते. त्यामुळे राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन ज्यावेळी १८८६ मध्ये कलकत्त्यात झाले, त्यावेळी स्वतः रवींद्रनाथांनी गायलेले ' अमरा मिले छे आज मायेर डाके ' हे गीत विशेष गाजले होते. आणि त्यानंतर कलकत्त्यातच पुन्हा झालेल्या १८९६ च्या अधिवेशनात रवींद्रनाथांनी त्यांच्या अनेक रचना इंग्रज सरकारच्या रोषाची भीती न बाळगता धाडसीपणाने सर्वांसमोर सादर केल्या.
१८९७ मध्ये इंग्रज सरकारने लोकमान्य टिळकांवर राजेद्रोहाचा खटला दाखल केला. त्यावेळी रवींद्रनाथांनी बंगालमध्ये लोकमान्य टिळकांच्या बचावासाठी पुढाकार घेऊन त्या चळवळीचे नेतृत्व केले. त्यासाठी अमृतबझार पत्रिकेच्या कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेला रवींद्रनाथ उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या बचावासाठी निधी जमवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नंतर लोकमान्य टिळकांना जेव्हा अठरा महिन्यांची शिक्षा झाली, तेव्हा लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. लोकांचा हा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने १८९८ मध्ये सेडिशन बिल तयार केले. इंग्रज सरकारच्या या गोष्टीचा जाहीर सभांमध्ये विरोध होऊ लागला. अशाच झालेल्या एका सभेत कलकत्त्यामध्ये रवींद्रनाथांनी ' कंठरोध ' या नावाचा जहाल लेख लोकांसमोर वाचून दाखवला.
लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सूत्री लोकांना सांगितली. तिचाच अवलंब पुढे महात्मा गांधींनी केला. या चतु:सूत्रीची बंगालमध्ये सुरुवात करणाऱ्यांमध्ये रवींद्रनाथ अग्रभागी होते. कलकत्त्यामध्ये त्यांनी त्यासाठी स्वदेशी वस्तू भांडार सुरू केले. तिथे होणाऱ्या सार्वजनिक सभांमध्ये इंग्रजीचा वापर न करता बंगालीचा वापर करावा असा आग्रह धरला.
१८९८ मध्ये देशात आणि कलकत्त्यामध्ये प्लेगची भयंकर साथ आली. या साथीच्या रोगामुळे बंगालमधील लोक हादरले. या लोकांना धीर देण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता पुढे सरसावल्या. त्यांच्या मदत कार्यामध्ये रवींद्रनाथही स्वयंस्फूर्तीने सामील झाले. डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांच्यासारख्या वैज्ञानिकांच्या पाठीशी कठीण प्रसंगांमध्ये रवींद्रनाथ ठामपणे उभे राहिले.
इंग्रजांनी आपले राज्य करताना फोडा आणि राज्य करा ( डिव्हाइड अँड रुल ) या नीतीचा अवलंब केला. यावेळी लॉर्ड कर्झन हा भारताचा व्हाईसरॉय होता. इंग्रज सरकारने हिंदू आणि मुसलमानांची वस्ती असलेल्या बंगालची राज्यकारभाराच्या सोयीसाठी म्हणून दोन भागात फाळणी करण्याचा निर्णय घेतला. पण इंग्रज सरकारचा अंतस्थ हेतू वेगळाच होता. हिंदू आणि मुसलमानात फूट पाडण्याचा त्यांचा डाव होता. या बंगालच्या फाळणी विरोधात लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यासाठी आयोजन केले गेले. या सभेत फाळणीचा निषेध करून स्वदेशीची शपथ सर्वांनी घेतली. ' वंदे मातरमचा ' जयघोष सर्वांच्या मुखी निनादू लागला. वंगभंग विरोधाची चळवळ ही केवळ बंगाल पुरती मर्यादित न राहता तिला देशव्यापी स्वरूप प्राप्त झाले.
१६ ऑक्टोबरच्या दिवशी हजारो लोक गंगा नदीच्या काठावर जमले आणि बंधूभावाचे प्रतीक म्हणून एकमेकांना राखी बांधू लागले. वंदे मातरम चा घोष सर्वत्र निनादत होता. या जनसमुदायाच्या अग्रभागी होते रवींद्रनाथ. या ठिकाणी वंगभंग आंदोलन विरोधी एक सभा घेण्यात आली. या सभेत रवींद्रनाथांनी लिहिलेले एक नवीन गीत प्रार्थनेच्या स्वरूपात गायले गेले. या गीताचे शब्द होते
बांगलार माटी, बांगलार जल, बांगलार वायू, बांगला फल
पुण्य होउक, पुण्य होउक, पुण्य होउक, हे भगवान.
हे गीत स्वतः रवींद्रनाथ आपल्या पहाडी आवाजात गात होते आणि हजारो लोक त्यांच्या सुरात सूर मिसळून गात होते. रवींद्रनाथ हे या दिवसाचे खरे नायक ठरले.
बंगालच्या फाळणी नंतर झालेली मुस्लिम लीगची स्थापना आणि हिंदू मुस्लिमात वाढत जाणारी दरी यामुळे रवींद्रनाथांचे संवेदनशील मन कमालीचे अस्वस्थ झाले होते. पुढे या स्वातंत्र्यासाठी होणाऱ्या चळवळीत अरविंद घोष देखील सामील झाले. अरविंद घोष यांच्यासारख्या महान व्यक्तीच्या आगमनाने स्वातंत्र्य चळवळीला आणि वंगभंग विरोधी आंदोलन चळवळीला एक योग्य नेता मिळाला असे रवींद्रनाथ यांना वाटले आणि राजकीय चळवळीतून निवृत्त होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. असे असले तरी रवींद्रनाथ हे बंगाली जनतेच्या हृदयाचे अनभिषिक्त सम्राट होते. १९११ च्या डिसेंबर महिन्यात कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात त्यांनी जन-गण-मन हे गीत सादर केले. जन-गण-मन हे गीत लोकांसमोर सर्वप्रथम येण्याचा हा ऐतिहासिक दिवस होता. त्यांच्या काव्य प्रतिभेने सर्वच लोक प्रभावित झाले होते. त्यांनी लिहिलेल्या जन-गण- मन मध्ये असलेला ' भारत भाग्यविधाता ' कोण ? तर या देशाचा भाग्यविधाता कोणी ब्रिटिश राजा नव्हे तर खुद्द ईश्वर आहे हे मी सांगतो अशी रवींद्रनाथांची स्पष्ट भावना होती.
रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर इंग्रज सरकारने त्यांचा गौरव करण्यासाठी १९१५ मध्ये त्यांना ' सर ' हा किताब दिला. पण जेव्हा जनरल डायरने जालियनवाला बाग हत्याकांडात निष्पाप लोकांचे बळी घेतले हे रवींद्रनाथांना समजले तेव्हा ते कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी या हत्याकांडाचा वैयक्तिक पातळीवर तीव्र निषेध तर केलाच पण त्याबद्दलचे आरोपपत्र तयार करून ते व्हाईसरॉय लॉर्ड चेमस्फर्ड यांना पाठवले आणि ब्रिटिशांनी दिलेली ' सर 'ही पदवी परत केली.
रवींद्रनाथ आपल्या आयुष्यातील अखेरच्या घटका मोजत असताना त्यांनी इंग्लंडमधून आलेल्या मिस एलिनोर राथबोन या बाईंच्या पत्राला अत्यंत जळजळीत उत्तर दिलं. ते पत्र बहुतेक सर्व इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं होतं. त्या पत्रात ते लिहितात, " आम्ही ब्रिटिशांबद्दल कशासाठी कृतज्ञता बाळगायची ? आम्हाला भाकरी देणं जमत नसलं तरी कायदा आणि बेड्या यांचं रक्षण केलं म्हणून ? चारी बाजूला पहा दंगेधोपे, दडपशाही. हवे तितके लोक ठार मारले जात आहेत. आमची संपत्ती लुटली जाते आहे. बायकांच्या जीविताला धोका. तरीही शक्तिमान इंग्रज त्यांच्या संरक्षणासाठी जराही हालचाल करीत नाही. उलट आम्हालाच आमच्या कुटुंबाचं रक्षण करता येत नाही अशी परदेशात बसून आरडाओरड करतो आहे. आमच्या देशातला दरिद्री, निःशस्त्र शेतकरी - रडून आक्रोश करणाऱ्या मुलाबाळांच्या भाराने वाकून गेलेला शेतकरी, हजारो गुंडांपासून आपलं संरक्षण न करू शकल्यामुळे जीवाला भिऊन पळतो आणि इंग्रजी सरकारी अधिकारी त्याची भयग्रस्त अवस्था पाहून फिदीफदी हसत आहेत. या सगळ्या गोष्टीतून त्यांच्यातील निर्भिडपणाचा आणि जाज्वल्य देशभक्तीचाच प्रत्यय आपल्याला येतो.
आपल्या आयुष्याच्या पुढील काळात रवींद्रनाथ जरी राजेकीय क्षेत्रात सक्रिय सहभागी नसले तरी त्यांनी साहित्य आणि शिक्षणासहित विविध क्षेत्रात जे काही कार्य केले त्यातून त्यांची जाज्वल्य देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, स्वदेशी आणि स्वभाषेबद्दलचे प्रेमच प्रकट होते.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२७/११/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा