मुख्य सामग्रीवर वगळा

 उगवतीचे रंग 

स्वातंत्र्यसंग्रामावर आधारित दोन प्रेरणादायी पुस्तके...

 या महिन्यात १७ नोव्हेंबर २०२४ या दिवशी डॉक्टर मीना श्रीवास्तव यांनी हेमंत सामंत यांच्या मराठी लेखांच्या केलेल्या हिंदी अनुवादाची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यातील पहिले म्हणजे भारतीय स्वतंत्रता आंदोलन की अनकही कहानिया आणि दुसरे पुस्तक आहे ते म्हणजे भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण. मुंबईतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि ज्यांनी आपल्या वयाची १०० वर्षे पूर्ण केले आहे असे डॉ. जी जी पारिख यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले ही विशेष आनंद आणि अभिमानाची गोष्ट. ज्येष्ठ साहित्यिक हेमंत बावनकर यांनी या पुस्तकांना प्रस्तावना लिहिली आहे.

आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण नुकताच साजरा केला. आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली, आपल्या सुखावर, घरादारावर तुळशीपत्र ठेवले. ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, त्यांची आठवण ठेवणे, त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आणि त्यांनी केलेल्या बलिदानाची जाणीव ठेवून आपल्या देशाप्रती आपले कर्तव्य बजावणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे.

स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले असे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे नेते आणि स्वा. सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, राजगुरू यांच्यासारखे महान स्वातंत्र्य सैनिक आपल्याला परिचित असतात परंतु आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अशा हजारो तरुणांनी बलिदान दिले आहे की ज्यांची नावेही आपल्याला माहिती नसतात. अशा अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांची माहिती करून देण्याचे मोलाचे कार्य या पुस्तकांनी बजावले आहे. आपल्या स्वातंत्र्यवीरांनी केलेला त्याग आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पुस्तके मोलाची भूमिका बजावतील यात शंकाच नाही.

या दोन्ही पुस्तकात प्रत्येकी ३८/३८ ज्ञात अज्ञात अशा स्वातंत्र्यसैनिकांचा परिचय थोडक्यात परंतु अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी अशा भाषेत करून देण्यात आला आहे. मूळ मराठी लेखन जरी प्रा. हेमंत सामंत यांचे असले तरी हिंदी भाषेतील ही पुस्तके अनुवादित आहेत असे कुठेही जाणवत नाही हेच डॉक्टर मीना श्रीवास्तव यांच्या अनुवादाचे कौशल्य आहे.

' अनकही कहानिया ' या पुस्तकात आपण ज्यांची नावे ही कधी ऐकली नसतील अशा उल्लाल येथील राणी अब्बक्का, जंगल महल येथील चुआड विद्रोह, गोहाथाईनचा तागी राजा, सर्वप्रथम मानवी बॉम्बचा वापर करणारी तामिळनाडूची राणी वेलु नचियार, दरोडेखोरांच्या भीतीने शस्त्रविद्या आत्मसात करणारी झाशीची झलकारी बाई, संबळपूर जिल्ह्यातील इंग्रजांना पळती हुई थोडी करणारे उलगुलान आंदोलन यासारख्या अनेक अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या स्वातंत्र्यसनानींची ओळख हे पुस्तक आपल्याला करून देते. केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी परदेशातही ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्याग केला अशाही स्वातंत्र्यवीरांची माहिती हे पुस्तक आपल्याला करून देते. आपल्यासाठी तो काळ जणू जिवंत होतो इतक्या सुंदर पद्धतीने या सत्यकथा आपल्यासमोर साकार होतात.  स्वातंत्र्याच्या बलिदानाच्या या कथा आपल्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीत. त्यांची ओळख हे पुस्तक करून देते म्हणूनच या पुस्तकाचे ' अनकही कहानिया ' हे नाव अतिशय सार्थ आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उर्मीने संपूर्ण देश जागृत झाला होता. देशांमध्ये ठिकठिकाणी स्वातंत्र्यासाठी लढा सुरू होता. अशा ठिकाणांची आणि तिथे सुरू असलेल्या लढ्यांची प्रेरणादायी ओळख ' अनदेखे समरांगण ' हे पुस्तक आपल्याला करून देते. जेथे स्वातंत्र्याचे धगधगते आंदोलन पेटले होते अशा ३८ ठिकाणांची माहिती हे पुस्तक आपल्याला करून देते. यामध्ये कित्तूर येथील राणी चन्नम्मा, बराकपूर येथे मंगल पांडे यांनी केलेला विद्रोह, नरगुंड येथे भास्करराव भावे यांनी केलेला विद्रोह, मलेरकोटला येथील कुका विद्रोह, कलकत्त्यातील गुप्त बैठकींचे असलेले माणिकटोला बाग हे स्थान, त्याचप्रमाणे सन फ्रान्सिस्को येथील युगांतर आश्रम, चंपारण्य आंदोलन, फिजी येथील इंडियन इंपिरियल असोसिएशन, अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांड, चौरी चौरा येथील असहकार आंदोलन आदी स्वातंत्र्यासाठी झालेल्या विविध आंदोलनांचा, लढ्यांचा आणि संघर्षाचा रोमहर्षक परामर्श या पुस्तकात घेण्यात आला आहे. 

या पुस्तकाच्या आपल्या प्रस्तावनेत डॉ मीना श्रीवास्तव म्हणतात की आज ज्या स्वातंत्र्याचा आपण आनंद उपभोगतो आहोत ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या प्राण्यांचे बलिदान दिले. यामध्ये स्त्रीपुरुष, तरुण, वृध्द, लहान मुले कोणीही मागे राहिले नाही. त्यांच्या अतुलनीय त्यागामुळेच आज भारत स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र झाले आहे. परंतु अशा स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाला आपण विसरत चाललेलो आहोत. त्यांच्या जयंती, पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो, त्यादिवशी त्यांच्यावर भाषणे करतो, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आपण विसरून पण जातो. आपल्या भागामध्ये कोणते स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले आहेत, त्यांनी स्वातंत्र्यासाठी कोणते बलिदान दिले आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नसते अशी खंत त्या व्यक्त करतात.  तर ही पुस्तके शाळाशाळातील मुलांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि त्यांना स्वातंत्र्याचा हा धगधगता इतिहास माहिती झाला पाहिजे असे आपल्या मनोगतात हेमंत बावनकर यांनी म्हटले आहे. डॉ. मीना श्रीवास्तव यांनी ही पुस्तके या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले आहे अशा क्रांतिकारकांना अर्पण केली आहेत. यातून त्यांनी आपली या क्रांतिकारकांप्रती असलेली तळमळ  आणि देशभक्तीचा परिचय करून दिला आहे. त्यांची ही पुस्तके आबालवृद्धांपर्यंत पोहोचावीत, विशेषतः तरुणांनी ही पुस्तके वाचून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो. या पुस्तकांच्या उपलब्धीसाठी डॉ मीना श्रीवास्तव यांच्याशी 99201 67211 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२६/११/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...