उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य- भाग ३०
नाटककार रवींद्रनाथ - भाग पाच
रवींद्रनाथांनी निर्माण केलेली नाट्यसंपदा गेल्या काही भागांपासून आपण पाहत आहोत. आज प्रामुख्याने त्यांच्या दोन महत्त्वाच्या नाटकांची कथानके आपण जाणून घेऊया. ही दोन नाटके आहेत ' रक्तकरबी ' आणि ' रथेर रशी '. मुळातच कवी हृदयाचे असलेल्या रवींद्रनाथांचे मन कमालीचे संवेदनशील होते. एखादे छोटेसे दृश्य किंवा निसर्गातील एखादी छोटीशी घटना देखील त्यांच्यासारख्या प्रतिभाशाली साहित्यिकाला प्रेरणा देण्यासाठी पुरेशी ठरायची.
' रक्तकरबी ' या नाटकाच्या निर्मितीची कथा तर मोठी मनोरंजक आहे. ' रक्तकरबी ' म्हणजे लाल कण्हेर. हे लाल कण्हेरीचे झाड आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाने पाहिलेले असते. पण रवींद्रनाथांना ते ज्या परिस्थितीत आढळले ती परिस्थिती अतिशय वेगळी होती. शांतिनिकेतन मध्ये असलेल्या आपल्या पर्णकुटीच्या बाहेर ते एकदा बसलेले होते. ती सकाळची वेळ होती. पलीकडच्या बाजूला निरुपयोगी लोखंड आणि लाकडांचा एक ढिगारा पडलेला होता. त्या ढिगार्यातून डोके वर काढून रक्तकरबीचे एक झाड फुलले होते आणि त्याला चक्क फुले आली होती. ते पाहून रवींद्रनाथांना खूपच आश्चर्य वाटले. एवढा जड भार वर असताना देखील हे झाड त्यातूनही वर आलं होतं आणि चक्क फुललं होतं. जणू ते संदेश देत होतं की मला तुम्ही कितीही दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तरी मी मरणार नाही, आशा सोडणार नाही. फुलांच्या रूपाने मी फुलतच राहणार, माझा आनंद व्यक्त करीतच राहणार. यातून निसर्गाचाच संदेश व्यक्त होत होता की जडानं चैतन्याला दाबून टाकण्याचा, मारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते चैतन्य दबले जाणार नाही, मारले जाणार नाही, ते उसळी मारून वर येणारच ! हा त्याचा जीवनधर्म आहे. आपले फुलण्याचे आणि आनंद देण्याचे काम तो करीतच राहणार. याच गोष्टीचा आधार घेऊन रवींद्रनाथांनी आपल्या या नाटकाची रचना केली.
' रक्तकरबी ' हे प्रतीकात्मक नाटक आहे. या नाटकात एक राजा दाखवला आहे. तो पोलादी पडद्याच्या आड राहून श्रमिकांना सोन्याच्या खाणीमध्ये काम करण्यासाठी सक्ती करतो. आपण अधिकाधिक श्रीमंत व्हावे आणि गरिबांनी अधिक गरीब व्हावे, त्यांनी काम करीतच राहावे आणि त्यातच त्यांचा अंत व्हावा अशा प्रकारची त्याची महत्त्वाकांक्षा असते. या कथेची नायिका नंदिनी आहे. नंदिनी ही स्त्रीस्वातंत्र्याचे प्रतीक आहे. ती आभूषणे म्हणून रक्तकरबीची फुले परिधान करीत असते. रंजन नावाच्या तिच्या प्रियकराची आठवण म्हणून ती ही आभूषणे परिधान करीत असते. नंदिनी ही निसर्गाच्या सौंदर्याचे, प्रदूषण मुक्त वातावरणाचे, खळाळत वाहणाऱ्या सुंदर नदीचे जणू मूर्त रूप आहे. स्वतः पडद्याआड सुरक्षित राहून श्रमिकांचे शोषण करणाऱ्या राजावर ती कडाडून टीका करते. या नाटकातून सत्ताधीश श्रमिकांचे कसे शोषण करतात ते रवींद्रनाथांनी दाखवले आहे. सुरुवातीला या नाटकाचे नाव ' यक्षपुरी ' असे होते. ते ' प्रवासी ' नावाच्या एका मासिकात आधी प्रसिद्ध झाले होते.
रवींद्रनाथांची अशी धारणा होती की पुरुष सारखा सुखाच्या मागे धावत असतो. सुखाच्या शोधासाठी तो नवनवीन शोध लावत असतो. त्याची त्यासाठी सतत धावपळ सुरू असते. कितीही नवीन शोध लावले तरी त्याचे नवीन शोधाकडे धावणे सुरूच असते. त्याची ही धावपळ न संपणारी असते. पण या धावपळीत तो जगणे विसरून जातो. असे वेळी स्त्री त्याच्याकडे आपले निर्व्याज प्रेम, आपल्या नाजूक आणि कोमल भावना घेऊन येते. त्याच्या त्या रुक्ष आणि धावपळीच्या जीवनात ती चैतन्य आणि आनंद आणते. त्याची सतत ओढ असते ती बाहेरच्या दिशेला आणि तिची ओढ असते ती आतल्या दिशेला. तो जणू जडाचं प्रतीक आणि ती म्हणजे चैतन्य आणि आनंदाचं प्रतीक. पुरुष आणि स्त्री जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच संसाराला परिपूर्णता प्राप्त होते. स्त्री शिवाय पुरुष अपूर्णच ! ती प्रेम आणि आनंद घेऊन येते. पुरुषी शक्तीचा जड आघात सोसते. अंतरात रक्त स्त्रवत असतानाही तो त्रास सोसून ती आनंदरुपी पुष्प घेऊन येते. तिच्या स्त्रवणाऱ्या रक्ताच्या लाल रंग त्या लाल कण्हेरीप्रमाणे किंवा करबी पुष्पाप्रमाणे तिच्या आनंदपुष्पावरही उमटतोच पण त्याला रक्ताचा दर्प नसतो. हाच तिचा सर्वोच्च त्याग, तिची महत्ता तिची थोरवी असते. जडाचे चैतन्याशी मिलन झाल्याशिवाय मुक्ती नाही, परिपूर्णता नाही असेच त्यांना जणू यातून सुचवायचे आहे.
या नाटकाचे देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी प्रयोग झाले. टीकाकारांनी गौरवलेले हे रवींद्रनाथांचे अतिशय लोकप्रिय असे नाटक आहे. या नाटकावर अनेक चित्रपट देखील निघाले लंडनमध्ये ' रेड ऑलीएंडर ' या नावाने या नाटकाचे प्रयोग झाले.
' रथेर रशी ' हे देखील प्रतिकात्मक नाटक आहे. ' रथेर रशी ' म्हणजे रथाची दोरी. विविध धार्मिक कारणांमुळे विविध ठिकाणचा रथोत्सव आपल्याला माहिती असतो. अनेक भाविक श्रद्धेपोटी या रथाची दोरी ओढत असतात. या नाटकात देखील असाच एका गावी रथोत्सव असलेला दाखवला आहे. यात सामील होण्यासाठी लांबून लांबून लोक येत आहेत. रथ निघण्याची वेळ होते आणि लोक रथाची दोरी ओढायला सुरुवात करतात. परंतु रथ जागचा हालत नाही. त्यानंतर रथ हालावा म्हणून पुरोहित येऊन मंत्र म्हणतात तरी देखील रथ हलत नाही. मग सैनिक येतात आणि आपली शक्ती पणाला लावतात आणि रथ हलवण्याचा प्रयत्न करतात परंतु तरी देखील रथ आपल्या जागीच असतो. गावातील धनिक लोक पुढे येऊन रथ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात परंतु तरीदेखील रथ हलत नाही. या प्रकाराने गावातील लोक भयभीत होतात आपल्या गावावर देवाचा कोप झाला आहे अशी त्यांची भावना होते.
या सगळ्या प्रकारानंतर त्या गावातील कष्टकरी लोक रथ ओढण्यासाठी पुढे येतात आणि काय आश्चर्य तो रथ खरोखरच पुढे सरकतो. रथ नेहमीच्या राजमार्गाने पुढे न जाता श्रमिकांच्या घराकडील रस्त्यांवरून जातो. रथ ओढणाऱ्या प्रत्येकाला असे वाटते की हा रथ आपल्याच घराच्या बाजूने जाणार आहे. त्या नाटकाचा नायक याप्रसंगी तेथे उपस्थित असतो. त्यालाच सारे जण या घटनेचा अर्थ विचारतात. तेव्हा तो म्हणतो, " रथाचा हा दोर सगळ्यांना एकत्र आणणारा आहे. तो धुळीत टाकून चालणार नाही किंवा सैल सोडूनही चालणार नाही. सर्वांना एका रांगेत बसवणारा, एका बंधनात बांधणारा हा दोर आहे. हा दोर आत्मीयतेचा आहे. त्यातूनच सर्वांचा विकास साधणार आहे. राष्ट्राचा भाग्यविधाता या रथाचे सारथ्य करीत आहे. सर्वांच्या सहकार्यानेच हा रथ पुढे जाणार आहे. आज आपण ' जे सबका साथ, सबका विकास ' म्हणतो ते या नाटकातून रवींद्रनाथांनी प्रत्यक्षात आणले होते.
या नाटकाबद्दल रवींद्रनाथ एका ठिकाणी म्हणतात, " हा रथ म्हणजे प्रगतीचे निदर्शक आहे. रथ थांबला म्हणजे प्रगती थांबली. गतिहीनता म्हणजे मानवी समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव. रथाचा दोर म्हणजे मनुष्यमात्राला एकत्रित ठेवणारा एक धागा, एक बंधन. या एकत्र ठेवणाऱ्या धाग्याला भेदाच्या, विषमतेच्या, असत्याच्या अनेक गाठी पडल्यामुळे हा दोर रथाला प्रगतीच्या दिशेने नेण्याच्या उपयोगाचा राहत नाही. म्हणूनच रथ पुढे सरकत नाही. जेव्हा मानव समाजातील भेदाभेद, विषमता दूर होईल, तेव्हाच प्रगतीचे प्रतीक असलेला हा रथ पुढे जाईल."
पुढे रवींद्रनाथांनी चित्रांगदा, चंडालिका, श्यामा यासारखे अनेक नाटके लिहिली. त्यांची नाट्य सपदा मोठी आहे आणि त्यांच्या सर्वच नाटकांचा आढावा घेणे शक्य नाही. परंतु त्याच्यातील एक समान सूत्र असे सांगता येईल की त्यांच्या नाटकांमध्ये कथानक कोणतेही असले तरी ' माणूस ' प्रधान आहे. ज्याप्रमाणे त्यांच्या कथा, कविता, कादंबरी या साहित्यामध्ये माणूस आणि माणसातील परस्पर संबंध, समाज, राष्ट्र यांना महत्त्व दिले आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या नाटकात देखील मानव्याचाच उद्घोष केलेला आपल्याला आढळतो. रवींद्रनाथ हे सौंदर्यपूजक होते. त्यामुळे आपल्या नाटकांमध्ये त्यांनी जीवनातील सौंदर्य दाखवण्याबरोबरच जीवनातील कुरूपतेवरही प्रहार केले आहेत. त्यांच्या नाटकांमध्ये मुक्तीचाही विचार आपल्याला आढळतो. पण त्यांना अभिप्रेत असलेली मुक्ती म्हणजे जीवनापासून पळून जाणे नसून जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगण्यासाठी येणाऱ्या समस्या, अनिष्ट प्रथा, रुढी, परंपरा यावर मात करून प्रगतीकडे वाटचाल करणे असा आहे. माणूस निसर्गाशी एकरूप झाला तरच तो सुखी होईल अशी त्यांची भावना होती. त्यांचे सर्व साहित्य याच उदात्त भावनेचा उद्घोष करते.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२४/११/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा