उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग २८
नाटककार रवींद्रनाथ - भाग तीन
१८८१ ते १८८२ च्या दरम्यान रवींद्रनाथ इंग्लंडमध्ये राहून भारतात कोलकत्याला परत आले होते. त्या काळात त्यांच्यावर युरोपियन ऑपेरांचा प्रभाव होता. पण त्या प्रभावात ते कधीच वाहून गेले नाहीत. त्यातील चांगले तेवढे त्यांनी घेतले आणि भारतीय परंपरेशी त्याचा सुंदर मिलाफ घडवून आणला. त्यांची दोन नाटके याच कालावधीत निर्माण झाली. ती म्हणजे प्रतिभा विलास आणि कालमृगया.
' प्रतिभा विलास ' या संगीत नाटिकेबद्दल मागील भागात आपण जाणून घेतले. या भागात ' कालमृगया ' आणि ' मायेर खेला ' या दोन नाटकाबद्दल जाणून घेऊया. प्रतिभा विलास आणि कालमृगया ही दोन्हीही नाटके म्हणजे एक प्रकारचे ऑपेराच आहेत. संगीत नाटिका आहेत. रवींद्रनाथांनी कवितेसह साहित्याचे सर्व प्रकार जरी हाताळले असले तरी त्यांची मूळ प्रकृती ही कवीची होती. त्यामुळे त्यांच्यातील नाटककार हा प्रामुख्याने कवी आहे. त्यामुळे त्यांची नाटके पाहताना प्रेक्षकांनी हे भान ठेवणे आवश्यक आहे. या नाटकांमधील संगीत आणि काव्याचा आस्वाद जर घेता आला तर त्या नाटकांचा आनंद अनेक पटींनी वाढतो. गीत आणि संगीताच्या माध्यमातूनच या नाटकांमध्ये कथानक पुढे सरकते. किंबहुना काही नाटकात तर कथानक दुय्यम असून गीत आणि संगीत नाटकाचा प्राण आहे.
ही नाटके रवींद्रनाथांनी जवळपास १४५ वर्षांपूर्वी लिहिलेली असली तरी आजही ती ताजी टवटवीत वाटतात. आजही त्यांचे प्रयोग होत असतात. या नाटकांच्या माध्यमातून रवींद्रनाथांनी जो संदेश त्या काळात दिला तो आजही कालबाह्य झालेला नाही. रामायणातील एका घटनेवर आधारित ' कालमृगया ' हे त्यांचे संगीत नाटक आहे. या नाटकात त्यांनी एक अंध असलेल्या संताचा आज्ञाधारक मुलगा दाखवला आहे. त्याला ऋषीकुमार असे म्हटले गेले आहे. आपल्याला रामायणातील ही कथा श्रावणबाळाची कथा म्हणून परिचित आहे. परंतु या कथेला रवींद्रनाथांनी वेगळा आयाम दिला. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या कथेला ' रवींद्र टच ' लाभला आहे.
दशरथ राजा मृगयेसाठी म्हणजेच शिकारीसाठी अरण्यात येतो. एका हरणाच्या पाडसाचा पाठलाग तो करीत असतो. शरयू नदीच्या काठावर तो येतो. हरीण जंगलातच कुठेतरी अदृश्य होते. याच सुमाराला ऋषिकुमार आपल्या अंध पित्यासाठी पाणी घेऊन जाण्यासाठी नदीकाठी येतो. हे दिवस पावसाळ्याचे आहेत. शरयू नदी दुथडी भरून वाहत आहे. विजा चमकत आहेत. त्याचे वडील त्याला अशा वातावरणात पाणी आणण्यासाठी बाहेर पडू नकोस असे सांगतात तरी देखील आपल्या तहानलेल्या पित्यासाठी पाणी घेऊन जाण्यासाठी हा ऋषीकुमार नदीकाठी येतो. आपल्या घागरीत तो पाणी भरतो. तो आवाज हरणाच्या पाडसाचा आहे असे दशरथ राजाला वाटते आणि तो शब्दभेदी बाण सोडतो. ऋषीकुमाराला हा बाण लागून तो जखमी होऊन पडतो. आपल्या हातून एका निरपराध ऋषीकुमाराला बाण लागला आहे हे पाहिल्यावर दशरथ राजाला प्रचंड धक्का बसतो आणि दुःख होते. शेवटच्या अवस्थेत असलेला ऋषीकुमार आपल्याला आपल्या वडिलांकडे घेऊन जावे अशी विनंती दशरथ राजाला करतो. त्याप्रमाणे दशरथ राजा अंतिम घटका मोजत असलेल्या त्या ऋषीकुमाराला त्याच्या अंध पित्याकडे घेऊन जातो. अर्थातच आपल्या पुत्राला त्या अवस्थेत पाहून त्या अंध पित्याला अपरंपार शोक होतो. दशरथ राजा वारंवार क्षमायाचना करतो. पण आपल्या पुत्राच्या मृत्यूने शोकाकुल झालेला तो अंध पिता दशरथाला तुझा देखील पुत्रशोकाने मृत्यू होईल असा शाप देतो. रामायणातील ही कथा आपल्याला परिचित आहे.
या नाटकात दशरथ राजा, अंध संत आणि त्यांचा मुलगा यांचे संवाद काव्यात्मक जरी असले तरी त्यांना एक प्रकारची गद्य लय आहे त्यामुळे ते संवादासाठी, अभिनयासाठी आणि गायनासाठी सुलभ होतात. या नाटकात ऋषीकुमार आणि दशरथ राजा यांचे कथानक जरी प्रमुख असले तरी यात एक दुसरेही उपकथानक आहे. आणि त्यामुळेच हे नाटक वेगळे ठरते.
या नाटकात रवींद्रनाथांनी शिकारी जंगलातील प्राण्यांची शिकार करताना दाखवले आहेत. जंगलातील वृक्ष, प्राणी, पक्षी आदींचा ते विनाश करतात. पूर्वीच्या काळी राजे लोक आपल्या इच्छेसाठी जंगली प्राण्यांची शिकार करीत किंवा मृगयेसाठी बाहेर पडत असत. आज मानव आपल्या आवडीखातर आणि उपभोगासाठी जंगलांचा नाश करतो आहे हे या नाटकात त्यांनी दाखवले आहे. आज जंगलतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिगसारखी परिस्थिती उद्भवली आहे. पर्यावरण उध्वस्त होत आहे आणि याचे भयंकर परिणाम मानवाला भोगावे लागत आहेत. यातूनही जर मानव सावध झाला नाही तर भविष्यकाळामध्ये आणखीही भयानक अनर्थ ओढवू शकतो. हे या नाटकातून रवींद्रनाथांनी सूचित केले आहे.
या नाटकात वनदेव आणि वनदेवता दाखवले आहेत. त्यांची गाणी म्हणजे उत्तम अशा प्रकारचे पद्य आहे. त्यातून पर्यावरणाचा संदेश दिला आहे. दशरथ राजाच्या शिकारीचे दृश्य आजूबाजूच्या वातावरणाचा आणि आवाजांचा उत्तम वापर करून परिणामकारकपणे साधले आहे. जंगलात शिखर करण्यासाठी येणाऱ्या शिकाऱ्यांचा समूह हा विनाशाचे प्रतीक आहे तर वनदेवी आणि वनदेवता निसर्गाचे मूर्त स्वरूप आहेत या नाटकात निसर्गाची अभिजातता भारतीय शैलित टिपली आहे तर विनाशाचे प्रतीक असलेले शिकारी आणि त्यांचे नृत्य पाश्चात्यशैलीत चित्रीत केले आहे. यातूनच पाश्चात्य संस्कृतीचा भारतीय संस्कृतीवर कसा प्रभाव पडतो हे रवींद्रनाथांनी सुचित केले आहे आंधळेपणाने पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यापेक्षा आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि पाश्चात्य संस्कृतीतील जे जे चांगले आहे ते घेऊन पौर्वात्य आणि पाश्चिमात्य शैलींचा संगम साधायला हवा म्हणजे आपण एक सुंदर अशा नवीन जगाची निर्मिती करू शकू असेच जणू रवींद्रनाथ सुचित करतात.
१८८४ मध्ये त्यांनी ' प्रकृतीर प्रतिशोध ' हे नाटक लिहिले. त्यानंतर ' मायार खेला ' हे त्यांचे १८८८ मध्ये आलेले चौथे नाटक. हे नाटक इतर नाटकांपेक्षा थोडे वेगळे आहे. या नाटकात प्रेमाचा त्रिकोण दाखवला आहे. हेही संगीत नाटकच आहे या नाटकात स्वतः रवींद्रनाथ आणि त्यांची पुतणी अभिज्ञादेवी यांनी प्रमुख पात्रांची भूमिका केली आहे. रवींद्रनाथांच्या अभिजात अशा गानलकेरींना जेव्हा अभिज्ञादेवींच्या सुरांची साथ लाभत असे तेव्हा सारे नाट्यगृह सुरांच्या वर्षावात न्हाऊन निघे आणि रसिक या काव्यसंगीताच्या आनंदात चिंब भिजत असत.
या सुरुवातीच्या नाटकांमधून एक नाटककार म्हणून रवींद्रनाथ घडत होते. नाटकाच्या पारंपरिक कल्पना आणि मर्यादा रवींद्रनाथांमधला कवी फारसा मानत नव्हता. तर आपल्याला हवे तसे रंगरूप या नाटकांना ते देत होते. हेच नाटककार म्हणून रवींद्रनाथांचे श्रेष्ठत्व आहे. नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकांनी नाट्यरसिक होण्यापेक्षाही काव्यरसिक होऊन या नाटकांचा आनंद घ्यायला हवा. ' मायार खेला ' हेही संगीत नाटकच आहे. या नाटकात रवींद्रनाथांनी इटालियन ऑपेरा आणि आयरिश संगीताचा सुरेख संगम साधला आहे. या नाटकात अमर, प्रमदा आणि शांता अशी तीन पात्रे आहेत. शांताने आपले हृदय आधीच अमरला अर्पण केले आहे परंतु त्याला तिचे आकर्षण नाही. तो एका वेगळ्या अशा आदर्श जीवनसाथीच्या शोधामध्ये असतो. अशावेळी त्याची भेट प्रमदाशी होते. पण प्रमदा हिच्या मनात अमरविषयी खरे प्रेम नाही. ती तिच्या सौंदर्याने अमरला मोहित करण्याचा प्रयत्न करते. एक प्रकारे हा ' मायार खेला ' म्हणजे भ्रम आहे. शेवटी अमरला प्रमदाच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते आणि शांताचे महत्व त्याला कळते. तो पुन्हा शांताकडे परत येतो अशी ही कथा आहे. शांता ही खऱ्या प्रेमाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे. ( क्रमशः)
©विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/११/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा