उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य भाग - २७
नाटककार रवींद्रनाथ - भाग दोन
एखाद्या साहित्यिकाने साहित्यनिर्मिती किती केली किंवा त्याच्या साहित्यकृतीची संख्या किती आहे त्यापेक्षाही त्या कशा आहेत हे जास्त महत्त्वाचे. म्हणूनच साहित्यनिर्मिती हा हृदयसंवाद आहे असे रवींद्रनाथ म्हणत. ऋषिकेश मुखर्जींच्या ' आनंद ' या चित्रपटात राजेश खन्नाच्या तोंडी एक वाक्य आहे, " जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये." थोडक्यात म्हणजे आयुष्य असो की साहित्य, त्याच्या लांबीपेक्षा त्याची खोली, सकसता अधिक महत्त्वाची. या अर्थाने रवींद्रनाथांच्या सगळ्या साहित्यकृती लार्जर दॅन लाईफ अशा आहेत असं म्हणता येईल. त्यातही त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, त्यांची सौंदर्यासक्ती, जीवनाचे आणि जगण्याचे तत्त्वज्ञान उलगडून सांगणारा त्यांच्यातील तत्त्वचिंतक या सगळ्या गोष्टींना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी नाटक हे सशक्त माध्यम होते आणि त्याचा त्यांनी अतिशय सुयोग्य वापर करून घेतला.
रवींद्रनाथ म्हणजे बहुश्रुत व्यक्तिमत्व होते. लोकसाहित्य, लोकनाट्य, परंपरा, रामायण महाभारतासारख्या विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. त्याशिवाय त्यांच्या घरातील वातावरण त्यांच्या साहित्यनिर्मितीसाठी पूरक ठरले. लहानपणी लोकनाट्याचे अनेक प्रयोग त्यांनी पाहिले होते. त्याचप्रमाणे अनेक संस्कृत नाटके वाचली होती, अभ्यासली होती. या सगळ्यांच्या निरीक्षणातून त्यांची स्वतःची एक वेगळी नाटकाची मांडणी, वेगळी शैली जन्माला आली पारंपारिक रंगमंच आणि नेपथ्याच्या मर्यादा ओलांडून त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या नाटकांची मांडणी केली. त्यांचा मुळातच असलेला कवीचा पिंड या मांडणीसाठी पोषक ठरला.
वयाच्या केवळ २० व्या वर्षी त्यांनी लिहिलेले ' वाल्मिकी प्रतिभा ' हे संगीत नाटक रंगमंचावर आले. या नाटकात त्यांनी स्वतः वाल्मिकीची भूमिका केली होती तर त्यांची पुतणी प्रतिभा हिने सरस्वतीची भूमिका केली होती. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला तत्कालीन श्रेष्ठ बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चटर्जी उपस्थित होते.
वाल्मिकी प्रतिभा ' हे नाटक अनेक अर्थांनी आगळेवेगळे आहे. वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी होण्याआधी एक दरोडेखोर होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मदेव आणि नारदांच्या आज्ञेनुसार त्यांनी ' रामायणाची ' रचना केली. परंतु ही रचना करण्याआधी त्यांनी क्रौंच पक्षाचे एक जोडपे एका झाडावर बसलेले पाहिले. त्या आपल्या आनंदात निमग्न असणाऱ्या एका पक्ष्याला एका शिकाऱ्याने बाण मारला. त्यामुळे त्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप पाहून वाल्मिकींचे हृदय द्रवले आणि त्यांच्या तोंडून रामायणातील तो प्रसिद्ध श्लोक बाहेर पडला.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।।
कधी नव्हे तो आपल्या तोंडून अशा प्रकारची सुंदर रचना कशी काय बाहेर पडली याचे त्यांना नवल वाटले. त्यानंतर त्यांनी ब्रम्हदेव आणि नारदांच्या आशीर्वादाने रामायणाची रचना केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही जी मूळ घटना आहे, ती रवींद्रनाथांना मान्य होती. पण आपल्या नाटकात त्या घटनेला त्यांनी वेगळीच कलाटणी दिली.
त्यांच्या ' वाल्मिकी प्रतिभा ' या नाटकात वाल्या आणि त्याचे साथीदार यांची दरोडेखोरांची एक टोळी असते. ही सगळी मंडळी अत्यंत क्रूर आणि आडदांड असतात. ते प्रतिभा नावाच्या एका निरागस मुलीला पकडून आणतात आणि कालीमातेपुढे तिचा बळी देण्याचं ठरवतात. या निष्पाप मुलीचा आक्रोश ऐकून वाल्याचे हृदय द्रवते. तो आपल्या साथीदारांशी वैर पत्करून तिची सुटका करतो. टोळीतील सहकाऱ्यांना सोडून देऊन तिला घेऊन रानोमाळ भटकतो. त्यातूनच त्याचे हृदयपरिवर्तन होते. तो स्वतः विषयी विचार करू लागतो. अंतरात्म्याचा शोध घेतो. त्याची ही तळमळ पाहून ती मुलगी म्हणजे प्रतिभा आपल्या खऱ्या रूपात त्याच्यासमोर प्रकट होते.
ती म्हणजे प्रत्यक्ष साहित्य, कला आणि विद्येची देवता सरस्वती असते. ती त्याला म्हणते, ' तुझ्यातील माणुसकी जागृत होते की नाही याची परीक्षा मी पाहिली. त्यासाठी मीच बालिकेचे रूप घेतले होते. तुझ्या पाषाणहृदयाला ज्या आर्त करुणेच्या स्वरांमुळे पाझर फुटला, त्याच तुझ्या हृदयातून आणि वाणीतून आता माणुसकीचे संगीत जन्म घेईल आणि लक्षावधी मनांना कोमल भावनांनी शुद्ध करेल. तुझी वाणी देशोदेशी चिरकाल घुमत राहील आणि त्यातून अनेक कवींना प्रेरणा मिळेल. '
रवींद्रनाथांनी ज्या काळात हे नाटक रंगमंचावर सादर केले त्या काळात स्त्रियांच्या शिक्षणावर, बाहेर पडण्यावर बंदी होती. स्त्रियांनी नाटकात काम करणे ही तर फार दूरची गोष्ट होती. मुलींनी नाटकात काम करणे हे प्रतिष्ठेचे मानले जात नव्हते. थोडक्यात म्हणजे त्या काळात स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधने होती. अशा काळात रवींद्रनाथांनी आपल्या कुटुंबातील मुलींना रंगमंचावर आणून स्त्री स्वातंत्र्याचा मानवतावादी विचार आपल्या नाटकातून मांडला. हे त्यांचे मोठेच धाडस म्हणता येईल.
या नाटकाला दुसराही एक संदर्भ आहे. या नाटकात रवींद्रनाथांनी वाल्या कोळी लुटारूंपासून सरस्वतीला मुक्त करतो हे जे दाखवले आहे, ते प्रतिकात्मक आणि अतिशय महत्वाचे आहे. त्याचा अर्थ असा की ' सरस्वती ' आज साहित्यरूपाने लुटारुंच्या, धनदांडग्यांच्या ताब्यात आहे. तिला त्यांच्यापासून मुक्त केले पाहिजे. समाजाला बळ देणारे साहित्य आणि एकूणच साहित्य आणि कलाक्षेत्र हे साहित्यिक आणि कलावंतांच्याच ताब्यात असले पाहिजे. राजकारणी, धनदांडगे यांच्यापासून ते मुक्त असले पाहिजे. तरच ते सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल. समाजाच्या प्रगतीची दिशा त्यामुळे सापडू शकेल. साहित्यिकांना मोकळे आकाश मिळेल. रवींद्रनाथांनी त्याकाळी जे प्रतिकात्मक रूपाने सुचवले ते आजदेखील तेवढेच महत्वाचे आहे.
या नाटकाने रवींद्रनाथांनी जणू प्रायोगिक रंगभूमीची पायाभरणी केली. अनेक गोष्टी नवीन आणल्या. त्या काळी नाटकांवर इंग्रजी नाट्यभूमीचा प्रभाव होता, संगीताचा आणि रागदारीचा प्रभाव होता, त्या चौकटीतून नाटकाला बाहेर काढण्याचाच त्यांचा हा प्रयत्न होता. त्यांचे हे नाटक म्हणजे सुरांचा आणि स्वरांचा अविष्कार होता. त्याला एक प्रकारची आंतरिक लय होती. गाण्याच्या आणि रागदारीच्या बंधनांपासून काही अंशी मुक्त होत आपल्याला हवा तसा नाट्याविष्कार सादर करण्याचे आणि स्वरांच्या प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य त्यांनी घेतले होते. ते नुकतेच इंग्लंडहून परतल्यामुळे या त्यांच्या प्रायोगिक नाटकावर काही अंशी पाश्चात्य संगीत आणि आयरिश संगीताचा प्रभावही होताच. हे नाटक केवळ वाचण्यासाठी नव्हेतच तर ते पाहावे आणि अनुभवावे अशा प्रकारचे होते. या नाटकाने वयाच्या केवळ विसाव्या वर्षी रवींद्रनाथांचे नाटककार म्हणून दमदार पदार्पण झाले.
या नाटकातूनच साहित्यिक म्हणून आपल्या पुढील प्रवासाची दिशा रवींद्रनाथांना गवसली असे म्हणता येईल. आपली पुढील वाटचाल कशी असेल याची झलकच जणू त्यांनी या नाटकाद्वारे दाखवली. दरोडेखोरांच्या किंवा धनदांडग्यांच्या तावडीतून सरस्वतीला मुक्त केल्याशिवाय कलावंताला सरस्वती प्रसन्न होत नाही हे त्यांना जाणवले होते. वाल्मीकींच्या अंतःकरणात जो दयेचा, करुणेचा झरा वाहू लागला, त्यामुळे जगाकडे आणि त्यातील क्रौर्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाल्मिकींना प्राप्त झाली. बालिकेला दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवणे म्हणजेच सरस्वतीला नको असलेल्या व्यक्तींच्या ताब्यातून मुक्त करणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले. ' वाल्मिकी प्रतिभा ' हे नावच खरोखर अगदी सुंदर आहे. त्याच्या नावातच रवींद्रनाथ यांच्या प्रतिभेचाही विलास आपल्याला दिसतो. त्यांच्या प्रतिभेची झेप आपल्याला दिसते.
' वाल्मिकी प्रतिभा ' हे नाटक म्हणजे एक संगीत नाटिका होती. त्यामुळे त्यात नाटकाच्या गरजेनुसार रवींद्रनाथांनी संगीताचा वापर केला. तो करीत असताना भारतीय आणि विदेशी राग यांचे अनोखे मिश्रण केले. रागातील कित्येक पदे प्रथमच शुद्ध हिंदीत बसवली होती. ही पदे लिहिण्यात त्यांना त्यांचे जेष्ठ बंधू ज्योतिरिंद्रनाथ यांचेही सहकार्य लाभले. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१२/११/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा