उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग २६
नाटककार रवींद्रनाथ - भाग एक
रवींद्रनाथांनी ज्या ज्या साहित्याच्या प्रांतात आणि कलेच्या शाखेत स्वच्छंदपणे मुशाफिरी केली, त्याचा यथाशक्ती आढावा आपण घेत आहोत. खरे तर त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे साहित्य यांची व्याप्ती सागरासारखी अमर्याद आहे. त्याचा थोडक्यात आढावा घेणे म्हणजे ओंजळीत समुद्र घेण्याचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. या आधीच्या काही भागांमध्ये आपण त्यांच्या कविता, कथा आणि कादंबरी याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या भागात या आणि पुढील भागात आपण त्यांच्या नाटकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
भारतीय नाट्यसृष्टीत रवींद्रनाथांचे योगदान एवढे प्रचंड आहे की त्यांना भारतीय नाट्यसृष्टीचा तारणहार म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. रवींद्रनाथ ज्या कालखंडात जन्माला आले आणि वाढले त्या कालखंडामध्ये आपल्या देशावर इंग्रजांची सत्ता होती. भारतावर राज्य करण्यासाठी आपल्या देशाची सांस्कृतिक अस्मिता नष्ट करणे त्यांना आवश्यक वाटत होते आणि त्यांनी सर्व बाजूंनी तो प्रयत्न केला. त्यातून पूर्वीच्या काळी समृद्ध परंपरा असलेल्या भारतीय रंगभूमीला ग्रहण लागले होते. पण रवींद्रनाथ म्हणजे चालती बोलती नाट्यसंस्था होती असे म्हटले तरी चालेल त्यांच्या रूपाने भारतीय रंगभूमीला संजीवनी मिळाली आणि ती पुन्हा भक्कमपणे पाय रोवून उभी राहिली.
कोलकत्यातील रवींद्रनाथांचे निवासस्थान जोराशंकोवाडी म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाचे माहेरघरच होते. कलेची आणि साहित्याची आवड या कुटुंबात पूर्वापार होतीच. ती रवींद्रनाथांकडे वारशाने आली. त्यांचे मोठे बंधू ज्योतिरिंद्रनाथ यांना नाटकाची प्रचंड आवड होती. त्यांच्या नाटकांमध्ये भूमिका करता करता रवींद्रनाथ पुढे स्वतःही नाटके लिहू लागले. वयाच्या केवळ १२ व्या वर्षीच त्यांनी शेक्सपियरच्या ' मॅकबेथ ' या नाटकाचे भाषांतर केले होते. ही गोष्ट त्यांच्या रक्तात नाटकाची आवड लहानपणापासूनच किती भिनली होती हे दर्शवते. त्यांनी काव्यलेखनाला जेवढा न्याय दिला तेवढाच नाटकांना देखील दिला. त्यांनी केवळ नाटके लिहिलीच नाहीत तर आपण लिहिलेल्या नाटकांमध्ये भूमिका करणे, ती नाटके विविध कलाकारांकडून बसवून घेणे, त्याचे दिग्दर्शन करणे इत्यादी गोष्टी त्यांनी शेवटपर्यंत आवडीने केल्या. त्यांना अगदी नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतरही शांतिनिकेतन मध्ये सादर होणाऱ्या नाटकांमध्ये ते स्वतः भूमिका करीत असत. त्यांच्या नाटकांची नेमकी संख्या किती आहे हे अधिकृतपणे सांगता येत नसले तरी ती ५० ते ५२ असावी. याशिवाय ज्या नाटकांची त्यांच्या लिखित साहित्यात नोंद नाही अशी आणखीही काही अप्रकाशित किंवा अप्रसिद्ध नाटके असू शकतील.
रवींद्रनाथ स्वभावाने कवी होते परंतु त्यांनी साहित्याचे सर्व प्रकार हाताळले. त्यांच्या कथा आणि कादंबरी यात जसे काव्य आढळते, तसेच त्यांच्या नाटकातही गद्य आणि पद्य यांचा सुरेख संगम झालेला आपल्याला दिसतो. पण असे करताना नाटकातील कथावस्तूचे आणि सौंदर्याचे भान त्यांनी सुटू दिले नाही. त्यांनी लिहिलेली काही नाटके ही त्यांच्या आधीच्याच कथा, कादंबऱ्या आणि कवितांचा आशय घेऊन लिहिली आहेत. तर काही नाटके ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर आधारित आहेत. त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी गीत आणि संगीताचा वापर चपखलपणे केलेला आढळतो. संगीत, नृत्य आणि नाट्य यांच्या मिलनातून त्यांच्या नाटकांचा एक आगळावेगळा अविष्कार आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे त्यांनी पारंपारिक नाटकांची चौकटच बदलून टाकली. रंगभूमीला एक नवीन ऊर्जा आणि नवीन रूप दिले. काही नाटकांचे विषय ऐतिहासिक, पौराणिक किंवा तत्कालीन असले तरी त्यांनी त्यांना आधुनिक परिस्थितीचा संदर्भ दिला असल्यामुळे ही नाटके कधीच जुनी होत नाहीत. ती चिरतरुण वाटतात. आजही त्यांच्या नाटकांचे बंगालमध्ये आणि बंगालच्या बाहेरही प्रयोग होत असतात त्याचे रहस्य हेच आहे.
रवींद्रनाथांनी नाटकांचे सर्व प्रकार हाताळले. त्यात नृत्यनाटिका, एकांकिका, प्रहसने, सांगितिका यासारख्या अनेक प्रकारांचा समावेश आहे. रवींद्रनाथांच्या जीवनकालात भारतीय नाटकांना घरघर लागली होती, नाट्य संस्कृती लयास चालली होती. अशा नाट्य संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. रवींद्रनाथांनी इंग्रजी नाटके पाहिली आणि अभ्यासली होती. इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला होता. तसेच भारतीय साहित्य, वेद, शास्त्र, पुराणे आदींचेही वाचन केले होते. त्यांच्या अभ्यासातून, विचारमंथनातून, चिंतनातून पारंपारिक नाटकांचे स्वरूप बदलून टाकणारी नवीन नाटके जन्माला आली. प्रयोगशील आणि स्वयंभू रंगभूमीचा जन्म झाला. रवींद्रनाथांच्या नाटकांमध्ये देशी, विदेशी, पारंपारिक अशा सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींचा मिलाफ झालेला आपल्याला दिसतो. त्यांची नाटके विचारांना नवी दिशा देतात, समाजाला प्रगतीच्या दृष्टीने मार्गदर्शन करतात, राष्ट्रभक्ती निर्माण करतात हे त्यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
रवींद्रनाथांचा मूळ पिंड हा कलाकाराचा होता. साहित्य निर्मिती करताना रसिकांच्या मनाचा ठाव घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे एक नाटककार म्हणून प्रेक्षकांना काय हवे आहे किंवा त्यांना काय दिले पाहिजे त्याची उत्तम जाणीव त्यांच्या ठायी होती. त्यातून ते कवी असल्यामुळे त्यांच्या नाटकांचे सौंदर्य वाढले तर ते उत्तम कथाकार आणि कादंबरीकार असल्यामुळे त्यांची नाटके आशयसंपन्न झाली. मानवी स्वभावाचा उत्तम अभ्यास असल्यामुळे आपल्या नाटकातून मानवी भावविश्व त्यांनी उत्तम प्रकारे उलगडून दाखवले. म्हणूनच त्यांची नाटके आणि एकूणच साहित्य निर्मिती ही अजरामर झाली आहे. त्यांच्या काही नाट्यकृतीचा थोडक्यात आढावा पुढील काही भागांमध्ये घेऊया.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/११/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा