मुख्य सामग्रीवर वगळा

आमची पहिलीवहिली युरोप वारी -भाग पाच

 उगवतीचे रंग 


आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग पाच


पॅरिसला उतरल्यानंतर आमचा पुढील प्रवास एका अतिशय आरामदायी अशा बसने होणार होता. मर्सिडीज बेंझ या कंपनीची ती अत्यंत आधुनिक अशा प्रकारची बस होती. ही बस वातानुकूलित होती आणि आमचा ड्रायव्हर ती अतिशय स्वच्छ ठेवत होता. प्रवाशांची जागा पुढे असो की मागे, प्रत्येकालाच बाहेरचा व्ह्यू अतिशय छान दिसत होता. बसच्या काचा अतिशय स्वच्छ होत्या. बसमध्ये साऊंड सिस्टिम असल्यामुळे आमचे टूर मॅनेजर राहुल देसाई यांना वेळोवेळी आम्हाला सूचना देणे सोयीचे जात होते. बसचा हा ड्रायव्हर इंग्लंडमधीलच होता. तो अतिशय तरुण, उत्साही, आनंदी आणि जवळपास साडेसहा फूट उंच होता. आम्हा सगळ्यांशी हसून खेळून तो बोलत होता. त्याचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे तो अतिशय वक्तशीर होता. आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी तो वेळेवर हजर असायचा. 

पॅरिस हे फॅशनचे माहेरघर आहे. हे शहर अतिशय देखणे आणि स्वच्छ आहे. या शहरातून आमची बस जात होती. सगळीकडे स्वच्छता, जुन्या ऐतिहासिक बांधणीच्या इमारती नजरेस पडत होत्या. बसने आम्ही शॉन्स लिझे या भागात आलो.

 फ्रान्समध्ये सगळीकडे सूचना फ्रेंच भाषेतच लिहिलेल्या असतात. या भाषेच्या वापरासाठी जरी इंग्रजी लिपी वापरली जात असली तरी फ्रेंच भाषेत शब्दांचे उच्चार आणि अर्थ अतिशय वेगळे होतात. आता हेच बघा ना. शान्स लिझे असा उच्चार असलेल्या या रस्त्याच्या नावाचं स्पेलिंग Champs Elysees असे आहे. मात्र ही भाषा आपल्याला कळत नसली तरी कानाला मात्र तिचे उच्चार गोड वाटतात. या भाषेत कठोर उच्चारांचे शब्दच फारसे नाहीत. इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये भौगोलिक अंतर जरी फारसे नसले तरी फ्रेंच माणसाला आपल्या भाषेचा अतिशय अभिमान आहे आणि शक्यतो ते इंग्रजी भाषेचा वापर करणे टाळतात. 

द्वारकानाथ संझगिरी यांच्या पूर्व -अपूर्व या पुस्तकात मी एक गमतीदार प्रसंग वाचला होता. तो या निमित्ताने आठवला. त्यांचा एक मित्र पॅरिसमधील एका दुकानात डेंचर ( दातांची कवळी )विकत घ्यायला गेला. त्या दुकानदाराला त्याने डेंचर म्हणजे काय हे नाना प्रकारे समजावून सांगितलं. परंतु त्या दुकानदाराच्या अजिबातच लक्षात येईना. शेवटी हताश होऊन तो पुटपुटला, " अरे, दातांची कवळी पाहिजे रे , " आणि मग त्या दुकानदाराच्या डोक्यात प्रकाश पडला. 'ओ हो कॉवली कॉवली दाताची कॉवली ' असं म्हणत तो आत गेला आणि दाताची कवळी घेऊन बाहेर आला. आणि त्या क्षणापासून त्यांच्या मित्राने इंग्रजी बोलणे सोडले आणि मराठीत बोलणं सुरू केलं. कुठेतरी मायमराठी आणि फ्रेंच मावशीचं नातं जुळलं होतं पण ते सदा सर्वकाळ तसेच असेल असं मात्र नाही.

आम्हाला अर्थातच आकर्षण होते ते जगप्रसिद्ध अशा आयफेल टॉवरचे. पॅरिसमध्ये फिरताना आयफेल टॉवरचे दुरून कुठूनही दर्शन होऊ शकते. आतापर्यंत सिनेमातून, फोटोतून हा टॉवर पाहिला होता, त्याबद्दल ऐकले होते. कधी काळी ऐकलेल्या या टॉवरला प्रत्यक्ष भेट देण्याचा योग येईल असे वाटले नव्हते.  पण आता तो प्रत्यक्ष पाहण्याची संधी चालून आली होती. फ्रेंच राज्यक्रांतीची शताब्दी साजरी करण्यासाठी हा टॉवर उभारला गेला. हा टॉवर उभारण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्थांकडून तो कसा असावा याचे आराखडे मागवले गेले. जवळपास ७०० आराखड्यांमधून आज प्रत्यक्षात असलेल्या टॉवरच्या आराखड्याची निवड करण्यात आली. हा आराखडा गुस्ताव्ह आयफेल या इंजिनिअरने पाठवला होता. त्याचेच नाव या टॉवरला देण्यात आले आहे. 

आयफेल टॉवरचा हा परिसर अत्यंत विशाल आणि रमणीय आहे. या टॉवरच्या परिसरातच एक रम्य उद्यान आहे. पर्यटकांसाठी विविध दुकाने आहेत. आपण पॅरिसमध्ये फिरत असताना दुरूनसुद्धा आयफेल टॉवरचे दर्शन घडते. पण जवळ गेल्यावर त्याच्या भव्यतेची कल्पना येते. ही मानवाने केलेली अद्भुत निर्मिती पाहून थक्क व्हायला होते. हा टॉवर तयार करण्यासाठी ७००० टन लोखंडाचा वापर केला गेला आहे. आणि त्याची उंची १०६३फूट एवढी आहे. संपूर्ण टॉवर तीन मजली आहे. शेवटच्या म्हणजे सर्वात उंच असलेल्या टप्प्यावर आम्हाला जाता आले तर किती मजा येईल आणि तिथून पॅरिस शहर किती छान दिसेल असे मला वाटत होते. या टॉवरवर चढण्यासाठी पायऱ्यांची पण व्यवस्था आहे. काही हौशी आणि उत्साही पर्यटक त्या पायऱ्यांचा वापर करीत होते. पण आमचे नशीब बलवत्तर होते. टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होती तरी लवकरच आम्हाला लिफ्टचे तिकीट मिळाले. लिफ्ट आम्हाला थेट वरच्या मजल्यापर्यंत घेऊन गेली आणि पॅरिस शहराचा मनमोहक नजारा आम्ही त्या उंचावरून पाहिला. या टॉवरच्या प्रत्येक मजल्याच्या भोवती एक विशाल गॅलरी आहे. तेथे उभे राहून आपण आजूबाजूच्या दृश्याचे निरीक्षण करू शकतो. अत्यंत नेत्रसुखद असे हे दृश्य होते. दोन्ही बाजूला पसरलेले पॅरिस शहर, त्यातील सुंदर रस्ते, त्यावरून खेळण्यांसारखी दिसणारी वाहने, इमारती, मधोमध वाहणारी सीन नदी, त्यातून जाणारी जहाजे असा सर्व परिसर खूप छान दिसत होते. फोटोसाठी सतत कॅमेरे सुरूच होते. 

युरोपात कुठेही गेलो तरी आपल्याला गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय लोक दिसतात. या कृष्णवर्णीय लोकांसाठी आमचे टूर मॅनेजर राहुल देसाई यांनी एक फार सुंदर आणि मजेशीर शब्द वापरला होता. ते त्यांना ' श्यामसुंदर ' म्हणायचे. पॅरिसमध्ये तर विविध पर्यटनस्थळांना भेट देताना प्रत्येक ठिकाणी हे ' श्यामसुंदर ' आपल्याला भेटतात. आपल्या उपजीविकेसाठी ते विविध वस्तू विकतात. आपणही तेथे गेल्याची आठवण म्हणून या वस्तू त्यांच्याकडून घेतो. आपल्या भारतातील बरेचसे पर्यटक नेहमीच या ठिकाणी जात असल्यामुळे बऱ्याच श्यामसुंदर मंडळींना हिंदी भाषेचे देखील जुजबी ज्ञान झाले आहे. आम्ही आयफेल टॉवर पाहून खाली आल्यावर लगेच या श्यामसुंदर मंडळींनी आम्हाला गराडा घातला. त्यांच्याशी देखील बार्गेनिंग करावे लागते. आम्ही सुद्धा त्यांच्याकडून आठवण म्हणून काही वस्तू घेतल्या.

नंतर आमची पॅरिसची ओरिएन्टेशन टूर सुरु झाली. बसमध्ये आम्हाला आमचे टूर मॅनेजर विविध गोष्टी सांगत होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपला पासपोर्ट सांभाळा असे त्यांचे वारंवार सांगणे होते. खरोखरच युरोपात आपला पासपोर्ट ही अत्यंत महत्वाचा गोष्ट आहे. तो हरवला तर पुढील प्रवास आणि परतीचा प्रवास आपण करूच शकत नाही. बसमध्ये गप्पांच्या ओघात राहुल देसाई यांनी फ्रेंच माणसांच्या स्वभावाबद्दल एक गमतीदार गोष्ट आम्हाला सांगितली. फ्रेंच माणसांना प्रश्न विचारलेले आवडत नाही. अमुक एक गोष्ट अशीच का , किंवा इथे अमुक गोष्टीला परवानगी का नाही किंवा हे बंद का आहे ? असं काही आपण विचारलं तर त्यांना ते रुचत नाही. ते ' हुई ' म्हणून आपले खांदे उडवतात. ' हुई ' म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ' मै करू या ना करू मेरी मर्जी ' असं म्हणता येईल. मग प्रवासात बऱ्याच वेळा आमचा गमतीने ' हुई ' या शब्दाचा वापर सुरु होता. पण हे ' हुईवाले ' केवळ फ्रान्समध्येच आहेत असे नाही बरं का. त्यांचे बरेच भाऊबंद आपल्याकडेही आपल्याला वेळोवेळी आढळतातच. आपण त्यांना काही विचारायचं नाही. विचारलं तर' तुम्हाला काय करायचं ? हा माझा प्रश्न आहे. मी असंच वागणार. मेरी मर्जी. ( फ़्रेंचाच्या भाषेत ' हुई. ' असंच ते म्हणतील. )

 पॅरिसमधील या शान्स लिझे रस्त्याचे जगभरातील सर्वात सुंदर रस्ता असे म्हणून कौतुक केले जाते आणि खरोखरच या केवळ दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर आपण जेव्हा फेरफटका मारतो तेव्हा हे कौतुक किती सार्थ आहे ते आपल्या लक्षात येतं. फार पूर्वी या ठिकाणी शेतं आणि बागा होत्या पण नंतर या ठिकाणी दोन्ही बाजूला झाडांच्या रांगांची अतिशय सुंदर किनार उभारली गेली आणि हा देखणा रस्ता तयार झाला. या रस्त्याच्या पश्चिम टोकाला एक भव्य असं सर्कल आहे  यालाच प्लेस डी कॉंकॉर्ड चौक म्हणतात. हा ऐतिहासिक चौक आहे. याच चौकात फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सोळावा लुई, त्याच्या दोन राण्या आणि अनेक सरदार आदी मंडळींचा शिरच्छेद केला. या चौकाच्या मध्यावर एक भव्य दगडी स्तंभ आहे. हा स्तंभ दोनशे टन वजनाचा असून इजिप्तमधील लक्सॉर मंदिराजवळून तो ( पळवून ?) आणण्यात आला आहे असे सांगितले जाते. या ठिकाणी बारा रस्ते येऊन मिळतात. या चौकापासून ते प्लेस चार्ल्स द गॉल या चौकापर्यंत शान्स लिझे हा रस्ता जातो. या रस्त्यावर सिनेमागृह, कॅफे आणि भव्य दुकाने आहेत. त्यामुळे या रस्त्याला आपोआपच एक देखणे रूप प्राप्त झाले आहे. याच चौकाच्या मध्यावर आर्क द ट्रम्फ ही भव्य कमान उभारण्यात आली आहे. आपल्या सेनेने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ नेपोलियनने ही कमान उभारली. या कमानीच्या दोन्ही बाजूला उत्कृष्ट शिल्पचित्रे आहेत. ही कमान पाहताना आपल्याला दिल्लीतील इंडिया गेट ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 

या शांन्स लिझे रस्त्याकडे पाठ करून उभे राहिले की आपल्याला दिसतात त्या ट्वीलरीज गार्डन्स, छोटी आर्क ऑफ द ट्रम्फ, त्यापलीकडे भव्य राजवाड्यात असलेले लुव्र म्युझियम तर डाव्या हाताला फ्रेंच नेवल मिनिस्ट्री आणि हॉटेल क्रायलॉन यांच्या भव्य इमारती. या दोन इमारतींच्या मधून चर्च ऑफ मॉडलीन डोकावत असते आणि उजव्या हाताला  दिसतो पॅलेस बुरबोन. आता या ठिकाणी फ्रान्सची नॅशनल असेम्ब्ली भरते.  पॅलेसच्या मागे हॉटेल इनवॅलिड्सच्या जवळ नेपोलियनच्या थडग्याचा सोनेरी घुमट दिसतो. रात्रीच्या वेळी या चौकात उभे राहून पॅरिस शहर अतिशय नयनरम्य दिसते. 

रम्य अशा पॅरिसची भटकंती करून आम्ही संध्याकाळी सीन नदीवर आलो. नुकतंच आता जिथे ऑलिम्पिक स्पर्धांचं उदघाटन झालं आणि नौकानयन स्पर्धा सुरु आहेत अशी ही सीन नदी. फ्रान्समधील महत्वाच्या नद्यांपैकी एक. लंडनमधील थेम्स नदीप्रमाणेच हाही परिसर कमालीचा स्वच्छ ठेवला आहे. इथे आमची एका तासाची क्रूझमधून सफर होती. त्याचेही विशेष आकर्षण आम्हाला होतेच. आमच्यापैकी काही मंडळी क्रूझमध्ये खाली बसून पर्यटनाचा आनंद घेत होती तर बरीच मंडळी वरच्या डेकवर असणाऱ्या खुर्च्यांवर बसून या जलप्रवासाचा आनंद लुटत होती. क्रूझमधून दोन्ही बाजूला असलेल्या पॅरिसमधील विविध इमारती, कार्यालये दिसत होती. आपला आयफेल टॉवर मधून मधून डोकावत होताच. काही क्रूझवर उपाहारगृहेही होती. सायंकाळची वेळ, थंडगार वारा, नयनरम्य नजारा आणि सीन नदीतून प्रवास या सगळ्यांचं एक मनोहारी मिश्रण मनाला सुखावून जात होतं. सारखं शम्मीकपूरच्या चित्रपटातलं ' देखो देखो देखो ॲन इव्हिनिंग इन पॅरिस ' हे गाणं मनात रुंजी घालत होतं. मोहम्मद रफीचा जादुई आवाज कानात घुमत होता. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा ? 

हे सगळं डोळ्यात साठवून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये परतलो. जेवण झाल्यानंतर आमच्यातील काही मंडळींनी पॅरिसची रात्रीची भटकंती करायचं ठरवलं होतं. दिवसा पॅरिस जेवढं छान दिसतं त्यापेक्षाही जास्त सुंदर ते रात्रीच्या वेळी दिसतं असं आमच्यातील काहींचं म्हणणं होतं. रात्री पॅरिसमध्ये दिव्यांचा, विद्युत रोषणाईचा जो झगमगाट असतात तो पाहून डोळे तृप्त होतात. आयफेल टॉवरवर लक्ष लक्ष दिवे लागलेले असतात. आपण दिवसा पाहिलेला आयफेल टॉवर तो हाच का असा प्रश्न पडावा इतका तो सुंदर दिसतो. शिवाय पॅरिसमधील नाईट लाईफ, नाईट क्लब्स प्रसिद्ध आहेत. पर्यटक आपल्या वेळेप्रमाणे, ऐपतीप्रमाणे त्यांचा आस्वाद घेऊ शकतात. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर तयार होऊन व्हर्सायचा राजवाडा पाहायला गेलो. इथं सुद्धा दरवर्षी लाखो पर्यटक येतात. आम्ही गेलो तेव्हा प्रचंड गर्दी होती. पण आमच्याकडे तिकिटे असल्यामुळे आम्हाला फार काही थांबावं लागलं नाही. तेथीलच एक स्थानिक गाईड आम्हाला माहिती सांगणार होत्या. सगळ्यांकडे हेडफोन सारखे एक उपकरण दिले होते. त्यामुळे त्या गर्दीतही आम्हाला त्या गाईडचे बोलणे ऐकू येत होते. शाळेत असताना व्हर्सायच्या तहाबद्दल वाचले होते. आता तो राजवाडा प्रत्यक्ष बघायला मिळत होता. व्हर्सायच्या राजवाड्याचा परिसर अतिशय विशाल आणि भव्य आहे. बाहेरून आणि आतूनही ही वास्तू अतिशय देखणी आहे. फ्रान्सचा लोकप्रिय असलेला सम्राट चौदावा लुई याने हा भव्य राजवाडा बांधला आणि तो पॅरिस सोडून इथे राहायला आला. या राजवाड्यातील सर्वच दालने अप्रतिम आहेत पण त्यातीलही ' हॉल ऑफ मिरर्स ' हे दालन अतिशय सुंदर. तिथल्या वैभवाने डोळे दिपून जातात. सोन्याचांदीच्या वस्तू, भिंतीवरील आणि छतावरील विविध जगन्मान्य अशा नामवंत कलाकारांनी काढलेली अतिशय जिवंत वाटणारे पेंटिंग्स आहेत. पहिले महायुद्ध संपल्याचं जाहीर करणारा तह इथेच झाला. 

या राजवाड्याच्या भोवती असलेल्या बागा तर फारच प्रेक्षणीय आहेत. इथे अनेक मनमोहक कारंजी आहेत. ल नोत्र या कल्पक इंजिनिअरने अडीचशे एकरच्या विस्तीर्ण परिसरात फुललेलं हे नंदनवन पाहताना आपण त्यातच रमून जातो. इथे हौस म्हणून तयार करण्यात आलेले कालवे, पुष्करिणी आणि त्यांच्या काठावर उभी असलेली विविध कलात्मक शिल्पे पाहत राहावीत अशी आहेत. हा सगळं परिसर पाहताना तीनचार तास कसे निघून जातात ते कळत नाही. या सर्व गोष्टी डोळ्यात साठवून आम्ही आमच्या बसकडे निघालो. हॉटेलमध्ये परतल्यावर आम्ही जेवण घेतले आणि सामानाची बांधाबांध करून ठेवली. आता आम्हाला पुढच्या प्रवासाचे वेध लागले होते. ( क्रमशः ) 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२/८/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...