मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग १० )

 उगवतीचे रंग 

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग १० )

 सहजता ' हा रवींद्रनाथांच्या शिक्षणाचा प्राण

मी आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केलं. पण रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक विचार मलाही अंतर्मुख करून गेले. आपले डोळे आणि कान उघडे असतील,तर माणूस आयुष्यभर शिकतच असतो. आणि असंच आपण शिकलं पाहिजे असं रवींद्रनाथांना वाटायचं. एकदा शांतिनिकेतनात आलेली मुलं आपलं शिक्षण पूर्ण करून शांतिनिकेतनच्या बाहेर पडली तरी मनानं त्यांनी तेथेच असावं. आयुष्यभर विद्यार्थीच राहावं आणि नवनवीन गोष्टी आत्मसात करीत राहाव्यात असं त्यांना वाटायचं. लहान मुलांपासून ते विश्वविद्यालयात शिक्षण घेणारी सर्व प्रकारची मुले त्यांच्या शांतिनिकेतन आणि विश्वभारतीत होती. मुलांनी शिक्षण घेता घेता त्यांचे आपापसातील भेद मावळावेत, आपण सर्व एक आहोत अशा प्रकारची बंधुत्वाची जाणीव त्यांच्यात निर्माण व्हावी अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे 

 हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर आपणचि जाला ।।

अशीच त्यांचीही भावना होती. त्यासाठीच विश्वभारतीची स्थापना त्यांनी केली होती. पण आपण आपल्या कार्यात फारसे यशस्वी ठरलो नाही अशा प्रकारची खंतही त्यांनी एका ठिकाणी व्यक्त केली आहे. त्याचे प्रमुख कारण त्यांनी फार सुंदर सांगितले आहे. ते म्हणतात, ' आम्ही सगळे ग्रंथोपजीवी झालो आहोत. ग्रंथांच्या किंवा ग्रांथिक ज्ञानाच्या पलीकडे आम्ही काही पाहायलाच तयार नाही. जिथे शरीर आणि मन एकत्र येत नाही असे शिक्षण माणसाला अपूर्ण ठेवते. ' शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम अशी वेगवेगळी शिक्षणाची वर्गवारी त्यांना मान्यच नव्हती. 

' सहजता ' हा रवींद्रनाथांच्या शिक्षणाचा प्राण होता. शिक्षण हसत खेळत, नाचत गात गात सहजतेनं व्हावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी स्वतः मुलांसाठी जी पाठ्यपुस्तकं तयार केली, त्यात कमालीची सहजता आहे. शाळेत येताना किंवा शाळेतून जाताना मित्र मित्र एकत्र जमून जातात. ते आपसात कसे बोलत असतील, त्यांच्या आनंदाच्या कोणत्या कल्पना असतील हे केंद्रस्थानी ठेवून त्यांनी पुस्तकांची रचना केली. त्यामुळे मुलं जेव्हा ही पुस्तकं वाचतं तेव्हा त्यांना आपण वेगळं काही वाचतो आहोत किंवा ' अभ्यास ' करतो आहोत असं वाटतच नसे. त्या पुस्तकांमध्ये धडे होते पण मुलांना मुद्दामहून ' धडे ' द्यायचा प्रयत्न त्यांनी केला नव्हता. 

त्यांनी तयार केलेली पुस्तकं प. बंगालमध्ये मुलं, पालक आणि शिक्षक आजही आनंदानं वापरतात. मध्यंतरी मार्क्सवादी सरकार आलं. त्यांनी ही पाठ्यपुस्तकं बदलण्याचा प्रयत्न केला पण प. बंगालमधील जनतेचा त्याला प्रचंड विरोध झाला. म्हणून आजही ही पुस्तकं अनौपचारिकरीत्या मुलांना सहज शिक्षण देण्याचं कार्य करतात. 

' A thing of beauty is joy forever ' असं जॉन किट्स या कवीनं म्हटलं आहे. रवींद्रनाथांच्या पाठ्यपुस्तकांना, त्यांच्या शिक्षणविषयक विचारांना हे वाक्य तंतोतंत लागू पडतं. कारण चांगल्या गोष्टी, चांगली मूल्ये कालातीत असतात. ती कधीही कालबाह्य होत नाहीत. शिक्षणाला कोणत्याही चौकटीत बसवू नका. मुलांना मुक्तपणे वावरू द्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ द्या . त्यांची बुद्धी आणि हात यांना एकत्र काम करू द्या. शिक्षण म्हणजे मनाविरुद्ध, जबरदस्तीने करण्याची गोष्ट आहे असे त्यांना वाटता कामा नये. आनंदातून शिक्षण आणि शिक्षणातून आनंदनिर्मिती व्हावी असं त्यांना वाटे. 

युरोपात होत असलेल्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल त्यांना उत्सुकता आणि आदर होता. त्यासाठी नवनवीन गोष्टी आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी माहिती करून घ्याव्यात असं त्यांना वाटायचं. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ जगदीशचंद्र बोस हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. टागोरांच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक आजूबाजूच्या खेड्यातील शाळांमध्ये विज्ञानविषयक जागृती करण्यासाठी जात असत. तेथील विद्यार्थी आणि शिक्षक शांतिनिकेतनमध्ये येत असत. ज्ञानाचे, माहितीचे असे आदानप्रदान होत होते. पण हे सगळे करताना ते सहजतेने, आनंदाने कसे होईल याकडे त्यांचे लक्ष असायचे. नाचत गात, हसत खेळत विज्ञानातील नवीन गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात. या नाचगाण्यात शिक्षकही समरसून सहभागी होत. विज्ञान शिकवण्यासाठी आपल्या सहकारी शिक्षकांकडून त्यांनी साध्या सोप्या भाषेत पाठ्यपुस्तके लिहून घेतली. स्वतःही काही पुस्तके लिहिली. 

म. गांधी आणि रवींद्रनाथ ही दोघेही थोर माणसे. पण दोघांच्या जीवनदृष्टीत आणि विचारात काही बाबतीत फरक होता. म. गांधी शिक्षणाच्या उपयुक्ततेला जास्त महत्व देत होते. शिक्षणातून बेकारी दूर झाली पाहिजे असं गांधीजींना वाटे. तर रवींद्रनाथांच्या दृष्टीने शिक्षण हे केवळ बेकारी दूर करण्यासाठी असू नये. त्या शिक्षणाने जीवनदृष्टी दिली पाहिजे, केवळ उपयुक्ततेला महत्व देण्यापेक्षा जीवनातील सत्य, शिव आणि सुंदरतेची मूल्यं त्यातून विकसित झाली पाहिजेत अशी त्यांची कल्पना होती. मुलांचे हात नृत्य, नाट्य, शिल्प यांच्या निर्मितीत गुंतले पाहिजेत. जीवन जगण्यासाठी त्यांच्या हातात एखादी नवनिर्मितीची कला असावी. केवळ उपयुक्त तेवढेच शिकावे असे त्यांना वाटत नव्हते. चित्र, नृत्य, नाट्य, शिल्पकला यासारख्या कला केवळ कला म्हणून कलेच्या जागी ठीक आहेत. त्या जीवन जगण्यासाठी उपयुक्त नाहीत हा समज रवींद्रनाथांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण आजही या कला जीवन जगण्यासाठी आणि जीवन आनंदाने, सौंदर्यदृष्टी जोपासून जगण्यासाठी आवश्यक आहेत अशी आपल्या समाजाची मानसिकता तयार झालेली नाही. 

रवींद्रनाथ हे खरोखरीच ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. त्यांची निरिच्छता किती होती ते एका प्रसंगावरून सहज लक्षात येते. १८९३ सालची गोष्ट आहे. रवींद्रनाथ आपल्या सहकाऱ्यांसोबत शांतिनिकेतनमध्ये फेरफटका मारत होते. त्याचवेळी त्यांना त्यांच्या ' गीतांजली ' या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी मिळाली. या पुरस्काराची रक्कम त्यावेळी साधारणपणे एक लाख तीस हजार रुपये इतकी होती. रवींद्रनाथांना ही बातमी सांगणारी तार आली होती. ती तार आपले सहकारी नेपाळबाबू यांच्या हातात देत ते म्हणाले, ' हे घ्या पैसे. आपल्या आश्रमातील ड्रेनेजचं काम पैशाअभावी अर्धवट पडलं होतं ना, त्याची सोय झाली. ' पैसे हाती पडण्यापूर्वीच त्यांनी ते दान केले होते. 

आज रवींद्रनाथाचं शांतिनिकेतन, विश्वभारती पूर्वीसारखं चैतन्यानं रसरसलेलं नाही. तिथेही राजकारण आलं आहे. आज शाळांच्या उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत पण शिक्षणाची उंची कमी होते आहे. विद्यापीठांमध्ये ज्ञानदानापेक्षा पदवीदानाला महत्व आले आहे. शाळांच्या फी भरमसाठ वाढल्या आहेत, जीवनमूल्यं महाग झाली आहेत. पण या सगळ्या काळ्या ढगालाही आशेची रुपेरी किनार आहे. आजही चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करणारे शिक्षक आहेत. विद्यार्थी हित मनात ठेवून कार्य करणाऱ्या काही मोजक्या संस्था आहेत. रवींद्रनाथांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांचा मागोवा घेऊन आपल्या शिक्षणपद्धतीत योग्य ते बदल करणे अशक्य नाही. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१४/७/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...