मुख्य सामग्रीवर वगळा

मी का लिहितो ?

 उगवतीचे रंग

मी का लिहितो ?
मध्यंतरी मला कोणीतरी हा प्रश्न विचारला होता की मी का लिहितो ? हा प्रश्न म्हणजे मी अन्न का खातो, मी पाणी का पितो, मी श्वास का घेतो असे विचारण्यासारखे आहे. मी का खातो, का पितो आणि का श्वास घेतो या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. आणि ते म्हणजे जगण्यासाठी. जगण्यासाठी या तीन गोष्टी जर आवश्यक असतील तर माझ्या दृष्टीने आणखी काही गोष्टींची भर त्यात घातली पाहिजे. त्या म्हणजे वाचणे, लिहिणे, साहित्याचा आस्वाद घेणे, मनमुराद भटकंती करणे, संगीत ऐकणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समोरच्याशी संवाद साधणे . मला माहिती आहे की, या सगळ्या गोष्टी नाही केल्या तरी माणूस जगू शकेल. ' लेकिन ये जीना भी कोई जीना है ' अशी आपली अवस्था होईल. इतर प्राणी आणि माणसाच्या जगण्यात फरक राहणार नाही. ज्याला मन आहे तो माणूस. आणि आपण माणूस आहोत. एक चिनी म्हण आहे, ' तुम्हाला दोन पैसे सापडले तर, एक पैशाची भाकरी घ्या आणि एका पैशाचे गुलाबाचे फुल घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल , आणि कसे आणि का जगायचे हे गुलाबाचं फुल शिकवेल.
काय शिकवतं बरं गुलाबाचं फुल आपल्याला ? गुलाब काट्यांवर फुलतो. काट्यांची पर्वा न करता. आतूनच कसा फुलून येतो. कसा खुलतो. आधी असणाऱ्या नाजूक, दिमाखदार कळीचं कसं फुल होतं हे सगळं बघण्यासारखं असतं . या साठी नजर हवी. त्याचं फुलणं तनामनात साठवून घेता यायला हवं. त्याच्या पाकळ्या बघा, किती तलम , रेशमी, मऊ, मुलायम. त्या पाकळ्यांवरचे रंग बघा. कुठे गडद,कुठे फिके तर कुठे एकमेकात मिसळलेले. कुठून आणलं त्यानं हे सौंदर्य ? तर हे आतून आलं. त्याच्यामध्ये जी फुलण्याची क्षमता आहे, त्या पूर्ण क्षमतेनिशी ते फुल फुलून आलंय . काट्यांची, वारा , वादळाची, पावसाची पर्वा न करता. टेनिसन नावाचा एक इंग्रजी कवी म्हणतो, ' एक फुल जाणणे म्हणजे सारे विश्व जाणणे .' खरंच आहे. या फुलाच्या जन्माचे, फुलण्याचे रहस्य तुम्हाला समजले, तर जीवनाचे रहस्यही तुम्हाला उलगडेल.
ते गुलाबाचं फुल आपल्याला जणू सांगतंय की परिस्थितीची पर्वा करू नका. आपल्या अवतीभवती काटेकुटे असू द्या. अनंत संकटे असू द्या. आपल्या पूर्ण क्षमतेनिशी फुलून या. स्वतःला व्यक्त करा. व्यक्त व्हा. अव्यक्तातून व्यक्त व्हा. लिखाण करणे किंवा लिहिणे हे व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. समोरच्या व्यक्तीशी प्रभावी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. समर्थ रामदास म्हणतात, ' दिसामाजी काहीतरी लिहावे. ' कशासाठी लिहायचं ? लोकांसाठी ? त्यांना काही सांगण्यासाठी ? हा तर माझ्या लिखाणाचा नक्कीच उद्देश नाही. मी का लिहितो या प्रश्नाचं प्राथमिक उत्तर म्हणजे ' स्वान्तसुखाय '. मला आनंद होतो म्हणून मी लिहितो. माझ्या लिखाणातून मी व्यक्त होतो. कुठल्याही अभिव्यक्तीचं अगदी ताबडतोब आणि तात्काळ मिळणारं फळ म्हणजे आनंद, ती व्यक्त करण्याचे समाधान. ते समाधान माझ्या लिखाणातून मला मिळते.
एखाद्या चित्रकाराने खूप मेहनत करून एखादे चित्र काढावे, एखाद्या वास्तुविशारदाने दिवसरात्र खपून एखादी सुंदर वास्तू उभी करावी, एखाद्या मुर्तीकाराने मोठ्या परिश्रमपूर्वक एखादी मूर्ती घडवावी आणि आपल्या निर्मितीकडे बघावे. त्यावेळी त्याला जो आनंद असतो ना, तोच नवनिर्मितीचा आनंद एखाद्या लेखकाला आपल्या साहित्यकृतीच्या निर्मितीनंतर होत असतो. एखाद्या मातेने बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाकडे पाहताना जसे तिच्या सर्व श्रमाचे सार्थक होते, तसा आनंद ही नवनिर्मिती लेखकाला मिळवून देते.
ही नवनिर्मिती जर मनापासून केली असेल, म्हणजेच आतून आली असेल, आणि वर्डस्वर्थसच्या शब्दात सांगायचे तर ' Spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility ' असेल तर समोरच्याला ती नक्की आवडतेच. म्हणजेच त्या वेळी माझे लिखाण मला तर आनंद देतेच, पण समोरच्याला सुद्धा आनंद देण्याची क्षमता त्यात असते. मोर स्वतःच्या आनंदासाठी नाचतो पण त्याचा फुललेला मोरपिसारा कोणाला आवडत नाही ! मग माझे लिखाण दुसऱ्याला जर आनंद देणारे असेल तर मी का लिहू नये ? माझे लेखन माझ्या भावना, माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोहचवण्याचे एक माध्यम आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं तर ' ये हृदयीचे ते हृदयी घातले ' अशी ही गोष्ट असते. आणि जेव्हा मला लक्षात येते की माझे लिखाण लोकांना आवडते आहे, तेव्हा मला मग लिखाणासाठी आणखी उत्साह येतो. मग मी मला त्यांच्यासमोर व्यक्त करीत जातो.
मी पस्तीस वर्षे शिक्षक म्हणून काम केले. एखाद्या वर्गात जेव्हा मी मुलांना तल्लीन होऊन शिकवीत असे, त्या माध्यमातून पूर्ण व्यक्त होत असे त्या वेळी होणारा आनंद काही वेगळाच असायचा. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, समाधान माझा आनंद द्विगुणित करीत असे. अशा वेळी मला वेळेचे भान राहत नसे. तास संपल्यानंतर तृप्त मनाने मी वर्गाबाहेर पडत असे. या समाधानाची सुवर्ण मौक्तिके मी माझ्या आनंदाच्या जीवनकोशात अनेकदा जमा केली आहेत. सेवेत असताना मला लिखाणासाठी फारसा वेळ मिळत नसे. निवृत्त्तीनंतर तो मिळू लागला. मी सहज माझ्या आनंदासाठी लिहू लागलो. अशा वेळी इंटरनेट आणि फेसबुक सारखा सोशल मीडिया माझ्या हाताशी उपलबध होता. त्याचा मी वापर करू लागलो. मलाही कुठे तरी व्यक्त व्हायला माध्यम हवे होते, ते या रूपाने अनायासे मिळाले. मग जवळपास वर्षभर ' प्रभातपुष्प ' नावाचे सादर नियमित लिहीत होतो. ते वाचकांना आवडू लागले. ते त्याची मागणी करू लागले, त्यावर प्रतिक्रिया देऊ लागले. एखादे दिवशी जर काही कारणाने लेखन झाले नाही, तर विचारणा करू लागले. मग पुढे त्यांच्याच आग्रह आणि सूचनेवरून या लेखांचे ' कवडसे सोनेरी..अंतरीचे ' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. आणि आजतागायत दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा, आनंद अवघा वाटावा. असे हे आनंदरूप होणे, म्हणजे लिहिणे. म्हणून मी लिहितो. माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा.

©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९/७/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...