उगवतीचे रंग
वस्त्र विणिले पांडुरंगे...
कवी पी सावळाराम यांचं ' धागा धागा अखंड विणू या ' हे अतिशय अप्रतिम गाणं आशा भोसले यांनी इतकं गोड आणि जीव ओतून म्हटलं आहे की त्यातील भाव थेट मनाला भिडतो. कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटतं. या गाण्यात म्हटल्याप्रमाणे
अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे
विविधरंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे
पांडुरंगाचं केलेलं हे वर्णन आपल्या भारतवर्षाला फार चपखल लागू पडतं. केवढा विशाल हा देश ! आसेतु हिमाचल पसरलेला. विविध राज्यं, विविध भाषा, विविध संस्कृती. पण विठ्ठलरूपी धाग्यानं हा देश अखंड जोडला गेला आहे. आषाढी एकादशी जसजशी जवळ येते, तसतसे वारकऱ्यांना वेध ते विठुरायाच्या दर्शनाचे. आणि या वारीने भारतदेश जोडला गेला आहे. पंढरपूर महाराष्ट्रात आहे, आणि वारीही होते महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर. पण म्हणून केवळ महाराष्ट्रातीलच लोक वारीला जातात असा आपला समज असेल तर तो चुकीचा आहे. म्हणूनच वरील गीतात म्हटल्याप्रमाणे या देश विठ्ठलभक्तीचा उभ्या आडव्या धाग्यांनी जोडला गेला आहे. विठ्ठलानेच हे सुंदर वस्त्र विणलं आहे.
भारतातील जवळपास सगळ्याच राज्यातील लोक वारीला येतात. वारीत भारताच्या एकात्मतेचे दर्शन घडते. सारे भेद मावळतात. सगळ्यांची जात एक, सगळ्यांचा धर्म एक. सगळ्यांची जात वारकरी. सगळ्यांचा धर्म, कर्म, मर्म आणि वर्म फक्त एक तो पांडुरंग. कर्ममार्गाचा काळा आणि ज्ञानमार्गाचा गोरा रंग एक होतो त्या सावळ्याच्या रंगात. सगळे त्या सावळ्या सगुण रूपात रंगून जातात. ' भेटीलागे जिवा लागलीसे आस ' असं तुकाराम महाराज म्हणूनच म्हणतात. विटेवर उभा असलेला हा सावळा विठल कसा आहे त्याचं वर्णन तुकोबाराय फार सुंदर करतात.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनिया ।।
तुलसीहार गळा कासे पितांबर ।
आवडे निरंतर हेचि रूप ।।
मकर कुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभ मणी विराजित ।।
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ।।
असा हे सावळे परब्रह्म ज्या पुंडलिकामुळे विटेवर उभे राहिले, त्याचे सगळे संत ऋणी आहेत. त्याच्यामुळे गेली ' युगे अठ्ठावीस विटेवरी ' तो उभा आहे. भक्तांना दर्शन देतो आहे, त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो आहे. ज्ञानेश्वर माउलींनी तर त्याला ' कानडा हो विठ्ठलु ' असं म्हटलं आहे. हा अभंग ऐकल्यानंतर आपल्याला असे वाटते की विठ्ठल हा मूळचा कर्नाटकातील असावा. पंढरपूरपासून कर्नाटकाची सीमा जवळच आहे. कर्नाटकातील विजयनगर साम्राज्याची जी हंपी ही राजधानी होती, तिथे विठ्ठलाचे सुंदर मंदिर आहे. कर्नाटकमधील संत पुरंदरदास हे विठठलभक्त होते. त्यांच्या प्रत्येक अभंगाचा शेवट ' पुरंदरविठ्ठला ' या शब्दाने होते. या मंदिरात किंवा या ठिकाणी विठ्ठलाने वास्तव्य केले होते असे कर्नाटकमधील भाविक मानतात. परंतु ' कानडा ' या शब्दाचा अर्थ संत साहित्याचे अभ्यासक आणि प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर म्हणतात त्याप्रमाणे ' कानडा ' म्हणजे अगम्य, न कळणारा असा असावा. म्हणूनच संत नामदेव म्हणतात, ' वेदांसी कानडा श्रुतीसी कानडा '. वेद आणि श्रुतींनाही न कळणारा असा तो आहे. पांडुरंग म्हणजेच श्रीविष्णूचा आठवा अवतार असे मानले जाते. विष्णू या शब्दावरून विष्टु, इट्टू, विठू, विठोबा असे अपभ्रंश होत गेले. तो विटेवर उभा आहे म्हणूनही त्याला विठ्ठल म्हटलं जातं.
पण काही असो, या सावळ्या विठूरायानं भक्तांना वेड लावलं आहे. कर्नाटकामधून आजही हजारो भाविक नियमितपणे वारीला येतात. पण केवळ कर्नाटकच नव्हे, तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, तसेच उत्तर प्रदेश, पंजाब अशा विविध राज्यातून हजारो भक्त नियमितपणे या वारीसाठी येतात. शेकडो मैलाचे अंतर ते पार करतात. आळंदीला येतात आणि तेथून वारीबरोबर निघतात. म्हणूनच विठ्ठलनामाने अवघा भारत जोडला आहे. ही पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी परदेशातूनही भाविक येतात. आणि म्हणूनच वारी केवळ महाराष्ट्राची न राहता विश्वव्यापक होते.
वारीची परंपरा जे पाळतात, ते वारीचा नेम चुकू देत नाहीत. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात
पंढरीची वारी आहे माझे घरी ।
आणिक न करी तीर्थव्रत ।।
व्रत एकादशी करीन उपवाशी ।
गाईन अहर्निश मुखे नाम ।।
नाम विठोबाचे घेईन मी वाचे ।
बीज कल्पांतीचे तुका म्हणे ।।
तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेली ही भावना भक्तिभावानं वारी करणाऱ्यांच्या अंतरंगात दृढ असते. एक पंढरीची वारी, एकादशी व्रत आणि मुखी विठ्ठलाचे नाम यापलीकडे त्यांना काही करावेच नाही. इतकं सगळं साधं सोपं. मग नाना व्रते, तपाचरण, पूजाअर्चा, जपजाप्य वेगळं करण्याची गरज नाही. विठ्ठलभक्तीत सगळं आलं.
आमचे नामदेवराय म्हणतात
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ।।
त्यांना दुसरे काही नकोच आहे. ते पुढे म्हणतात
हेचि घडो मज जन्मजन्मांतरी ।
मागणे श्रीहरी नाही दुजे ।।
पंढरीचा वास आणि चंद्रभागेचे स्नान आपल्याला जन्मोजन्मी घडो हेच नामदेवराय देवाकडे मागतात. त्यांना धनसंपत्ती, मोक्ष मुक्ती वगैरे काही नकोच आहे. अष्टौप्रहर मुखात पांडुरंगाचे नाम असावे, विठुरायाच्या चरणी लीन झालेल्या संतांचा सहवास घडावा आणि जनता जनार्दनामध्येच पांडुरंग आहे असा मनाचा नित्य भाव असावा. खरंच, किती साधं सोपं मागणं मागताहेत नामदेवराय पांडुरंगाकडे. पण एकदा हे आनंदनिधान गवसलं की मग यापरते सुख दुसरे नाही. त्या आनंदाला सीमा नाही.
मुखी नाम सदा संतांचे दर्शन ।
जनीं जनार्दन ऐसा भाव ।।
पांडुरंगाच्या महाद्वारी नित्य प्रेमाने कीर्तनाचा गजर होवो आणि तो पाहण्याचे, ऐकण्याचे भाग्य मला लाभो हीच त्यांची इच्छा.
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ।
कीर्तन गजरी सप्रेमाचे ।।
सगळ्या संतांचे याबाबत एकमत आहे. विठ्ठलाचे दर्शन आणि नामस्मरण यापरते त्यांना काही नकोच आहे. नियमितपणे पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना तरी वेगळे काय हवे असते ? ऊन, पाऊस, तहानभूक यासारखे भौतिक ताप सहन करून वारकरी पंढरीला जातो, तो विठ्ठलाच्या ओढीनेच. अंगात पांढरा पोशाख, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंध बुक्का तो धारण करतो. हेच त्याचे अलंकार. विठ्ठलनामाचा गजर हाच त्याचा धर्म. वारीमध्ये श्रीमंत गरीब, उच्चनीच, स्त्रीपुरुष, आबालवृद्ध सहभागी होतात. पण तिथे सगळे भेद मावळतात. सगळे एकमकांसाठी पांडुरंगाचे रूप असतात. प्रत्येकजण दुसऱ्याला माउली संबोधतो. वारी ही समानतेचं शिक्षण देणारी बिन भिंतींची पाठशाळा आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी एवढे कष्ट सोसून जाणारा आमचा वारकरी किती अल्पसंतुष्ट आहे ! विठुरायाचं दर्शन होईल न होईल, तो केवळ मंदिराच्या कळसाचे दर्शन झालं तरी समाधान पावतो. रस्त्यानं चालताना होणाऱ्या विठू नामाच्या गजरामुळे, टाळ मृदूंगामुळे वातावरणात एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा तो अंतरी साठवत असतो. नामस्मरणाने अंतःकरण पवित्र होत जातं. नाचत नाचत, गात गात वाटचाल करताना पंढरी केव्हा जवळ येते ते कळत नाही. रस्त्यावरील काटेकुटे, दगड यांची जणू फुलं होत जातात. आपल्या साऱ्या काळज्या, विवंचना तो विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो. विठूमाऊली त्याचं हृद्गत समजून घेते. कारण ती भक्तांची माउली आहे. भक्तांना ती प्रेमानं जवळ घेते. हाती कोणतंही शस्त्र नसलेलं देवाचं एक अनोखं रूप म्हणजे विठ्ठल. प्रेम आणि भक्तिभावाची शिकवण देणारं हे विठ्ठलाचं रूप आपल्या भारतीय संस्कृतीचं एक वैशिट्य आहे.
लाखो भक्तांचा सागर तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जमतोच पण जे भक्त पंढरीला जाऊ शकत नाहीत असे कोट्यवधी भक्त गावोगावच्या मंदिरात जाऊन त्याचं ' कर कटेवर असलेलं सावळं रूप ' डोळ्यात साठवून घेतात. विठ्ठल फक्त पंढरीतच आहे असं नाही, तो सर्वव्यापी, सर्वसाक्षी आहे. तो निर्गुणही आहे आणि सगुण साकारही आहे. फक्त आपल्याजवळ ' दृष्टी ' असली की त्याला पहाता येईल.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
८/७/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा