उगवतीचे रंग
जाते थे जापान...
' चलती का नाम गाडी ' या चित्रपटात किशोरकुमारचं एक धमाल मस्ती गाणं आहे. तशी त्या चित्रपटातील सगळीच गाणी अप्रतिम. अगदी ' हाल कैसा हैं जनाब का...' पासून. मधुबाला, किशोरकुमार यांचा अप्रतिम अभिनय आणि एस डी बर्मन यांचं कर्णमधुर संगीत. या त्रिकुटाचा फॉर्म्युला एखाद्या घट्ट बासुंदीसारखा जमून आला आहे. आपण फक्त वाटी तोंडाला लावायची. किशोरदांच्या जोडीला आशा भोसलेंचा खेळकर, अल्लड आणि चंचल आवाज. चित्रपट संगीताच्या रसिकांना आणखी काय हवं ? ऐकणाऱ्याचे कान १००% तृप्त होणारच याची फुल गॅरंटी !
पण तुम्हाला सांगू का मला या चित्रपटाबद्दल किंवा या गाण्यांबद्दल मुळीच बोलायचं नाही. मग तुम्ही म्हणाल ' जाते थे जापान पहुंच गये चीन समझ गये ना...' या गाण्याचा सुरुवातीलाच उल्लेख करायचं काय कारण ? या गाण्याची आठवण का आली ? खरं तर केवळ याच गाण्याची नाही तर ' ज ' वरून जी जी गाणी आहेत, ती ती आम्हाला आठवायला लागली. नव्हे डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागली. तुम्ही म्हणाल आता जी काय भानगड आहे ती जरा स्पष्ट करून सांगा की. हो हो, काळजी करू नका. ' जे आहे ते ' स्पष्ट सांगतो. तर मंडळी माझं असं मत झालं आहे की जी काही आपली भाषा आहे, म्हणजे मायमराठी हो, तिचा फार विकास होतो आहे. नव्याने त्यात सारखी नवी नवी भर पडते आहे. जे जे ऐकावे ते ते नवलच ! ज्या पद्धतीने, वेगाने विकास आणि अस्खलित वापर केला जातो, त्यावरून आमचं हे मत झालं आहे.
मराठी भाषेतील असल्या बदलांची दखल घेणारी पूर्वीची दिग्गज लेखक मंडळी आता नाहीत. पु ल देशपांडे, मधुकर तोरडमल, प्रा. लक्ष्मण देशपांडे वगैरे. ती असती तर त्यांना आपल्या लेखनासाठी कितीतरी नवनवीन विषय मिळाले असते ! पण जाऊ द्या. ते जरी आता आपल्यात देहरूपाने नसले तरी त्यांना ज्या गोष्टी आवडल्या असत्या, त्याची थोडी तरी दखल घेणं आपलं कर्तव्य आहे. त्यांना आपल्यामागेही अशी दखल घेणारे भूतलावर जे कोणीतरी आहेत, असं कळले तर आनंदच होईल.
झालं असं की परवा आम्ही टीव्ही लावला होता. तसा रोजच लावतो म्हणा. तर झालं काय की आम्ही जे कोणतंतरी न्यूज चॅनल पाहत होतो, त्यावरचा निवेदक जे काही चाललं होतं, त्यावर धमाल कॉमेंट्री करत होता. आपला वर्ल्ड कप जिंकलेला विश्वविजेता संघ भारतात परतला होता. मुंबईत त्याचं आगमन झालं होतं. उघड्या बसमधून त्यांची विजयी मिरवणूक सुरु होती. हा सगळा सोहळा लाईव्ह दाखवत होते. आता निवेदकाची धमाल कॉमेंट्री साधारपणे अशी चालली होती, " आपला जो विश्वविजेता संघ आहे तो भारतात आला आहे. आपले पंतप्रधान जे की नरेंद्र मोदीजी आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली आहे. हा जो संघ आहे, त्याला राज्य सरकारच्या वतीने जे काही बक्षीस होतं, ते जाहीर करण्यात आलं आहे. विश्वविजेत्या संघातील जे काही खेळाडू आहेत, त्यांना जो काही चषक मिळाला आहे, तो उंचावून लोकांच्या शुभेच्छांचा स्वीकार जो काही आहे, तो ते करत आहेत. मिरवणुकीमध्ये सामील असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर जो काही उत्साह आणि आनंद आहे, तो आपल्याला बघायला मिळतो आहे. " असं सगळं सुरु होतं. मग त्यानंतर जो काही कार्यक्रम झाला तो वानखेडे स्टेडियमवर. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे की एकनाथजी शिंदे आहेत, त्यांनी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांचा जो काही सत्कार होणार होता, तो केला. तर मंडळी, असा जो काही गौरव सोहळा ज्या विश्वविजेत्या संघाचा होणार होता तो संपन्न झाला.
हे सगळं ऐकून कान तृप्त झालेच होते. पण त्यात काहीतरी कमी राहून गेली असावी. आज पुन्हा टीव्हीवरील बातम्या ऐकल्या. विश्वविजेत्या संघाची जी काही बातमी होती ती काल दाखवून झाली. आता सध्या जी काही वारी सुरु आहे, तिचा सोहळा लाईव्ह दाखवताहेत. परत निवेदकाची धमाल कॉमेंट्री ऐकायला मिळाली. " आता माउलींची जी काही पालखी आहे, ती नीरा नदीच्या तीरावर पोहोचली आहे. माउलींच्या ज्या काही पादुका आहेत, त्यांना नीरा स्नान घालण्यात येत आहे. वारीला सगळे वारकरी जे काही आहेत, ते विठूनामाचा गजर करत आहेत. माउलींच्या पालखीचा नीरा स्नानाचा जो काही स्वर्गीय सोहळा आहे, तो बघायला मिळतो आहे. "
जे जे पाहावे आणि ऐकावे ते ते जबरदस्त ! मग आम्हाला तुकाराम महाराजांचा अभंग आठवू लागला. ' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...' यात थोडा बदल करून आम्हाला ' जेथे जातो तेथे ' ज ' माझा सांगाती ' असे म्हणावेसे वाटू लागले. आता ज्याला ज्याला ' ज ' वापरायचा आहे, त्याच्यासाठी ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानातील शब्द आठवले. माउलींनी तर आधीच म्हणून ठेवलं आहे ' जो जे वांच्छिल तो ते लाहो.' बहुधा माउलींना पुढे असं होणार याची कल्पना असावी. तो आशीर्वाद त्यांनी आधीच देऊन ठेवलाय.
मी सुरुवातीलाच वर म्हटलं ना की मराठी भाषा प्रगती करीत आहे, त्यात नवनवीन भर पडत आहे. पुलं असते तर त्यांच्या व्यक्तिचित्रणात आणखी एखादी जी काही भर पडली असती. पण वाचक त्याला आता मुकले आहेत. ' वऱ्हाडवाले ' प्रा लक्ष्मण देशपांडे आता असते तर त्यांच्या वऱ्हाडात आणखी ' जी ' काही धमाल आली असती आणि लंडनपर्यंत पोहोचली असती, त्यालाही रसिक मुकले. आणि आपले ते हे हो. कोण बरं ? हां ते मधुकर तोरडमल. त्यांच्या ' तरुण तुर्क म्हातारे अर्क ' मध्ये आणखी जी काही भर पडली असती, ती आता पडणार नाही. कदाचित त्यांनी ' ज ' च्या बाराखडीचा वापर करून एखादे नवीन नाटक पण लिहिले असते जे अतिशय लोकप्रिय झाले असते.
माझं असं मत झालं आहे की सध्या टीव्हीवर करमणुकीचे किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम जे काही कार्यक्रम सुरु असतात, ते पाहण्यापेक्षा बातम्या वगैरे पाहिल्या की छान मनोरंजन होते. त्यांनी एकमेकांना दिलेल्या उपमा, शेलक्या शिव्या यांनी जरी आपल्या भाषेत मोलाची भर पडत असली तरी तो एक वेगळा विषय आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी बोलत नाही. पण आपल्या बऱ्याच नेतेमंडळींची भाषणं ऐकताना ' या ठिकाणी ' चा किती वापर होतो हे पाहणे मनोरंजक ठरते. ' या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर इथपासून जी काही ' या ठिकाणी ' ची सुरुवात होते ती या ठिकाणी मी आता थांबतो ' पर्यंत कायम असते असं मी तुम्हाला ' या ठिकाणी ' सांगतो. एकदा तर एका वक्त्याच्या भाषणात इतक्या वेळा ' या ठिकाणी ' आलं की मी ते भाषण ऐकण्याऐवजी हे किती वेळा ' या ठिकाणी ' म्हणतात हे एक कागद आणि पेन घेऊन मोजत बसलो होतो. त्या कागदावर एकदा ' या ठिकाणी ' म्हटलं की मी एक रेघ ओढायचो. त्या वक्त्यांनी ' या ठिकाणी ' चं शतक तर केव्हाच पार करून आपल्या क्रिकेटपटूंना सुद्धा मागे टाकलं असं या ठिकाणी सांगतो.
तर असा भाषेचा विकास फार म्हणजे फारच होतो आहे. अभिजात, अर्थपूर्ण काव्यपंक्तीचा जमाना केव्हाच मागे पडलाय. आणि अभिजात, अर्थपूर्ण अशा काव्यपंक्ती समजायला पण खूप कठीण असतात ना ! त्याऐवजी कसे सोपे सोपे बोलीभाषेतील शब्द वापरावेत. मग खरी मजा येते. ' पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ... ' किती कठीण या ओळी ! त्याऐवजी ' काय झाडी, काय डोंगर ! ' किती साधं सोपं नाही का ? अशी भाषेत सध्या खूप प्रगती होते आहे. प्रतिभावान लोकांची कमी नाही.
पण जाऊ द्या. जे काही मला वाटलं ते तुम्हाला सांगितलं. खरं म्हणजे वर ज्या ज्या वाक्यात ' ज ' ची जी काही बाराखडी आहे ती काढून टाकली तरी अर्थात काही फरक पडत नाही असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आता मी जे काही सांगितलं ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आपल्या मुलांपुढे, येणाऱ्या पिढीपुढे जी काही चांगली भाषा आहे तिचा आदर्श ठेवावा असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. नाहीतर ' जाते थे जापान पहुंच गये चीन समझे ना ? अशी अवस्था व्हायची.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
६/७/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा