उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ७ )
शिक्षण कसे असावं याबद्दल टागोरांच्या स्वतःच्या कल्पना होत्या. जीवन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. एखाद्या उद्यानात फेरफटका मारणं, तेथील शीतल हवेचा स्पर्श, फुलांचा सुगंध, एखाद्या नदीच्या खळाळत्या पाण्यात डुंबण्याचा आनंद, त्या पाण्याच्या स्पर्शाची शरीराला होणारी जाणीव, एखादं गाणं म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद या सगळ्या गोष्टी आपण जेवढ्या आनंदानं आणि सहजपणे करतो, तेवढ्याच आनंदानं आणि सहजतेनं मुलांना शिकता यावं असं त्यांना वाटे. मलयानील, दक्षिणेकडील वारा मुलांना शिकवताना आधी मुलांना तो वारा प्रत्यक्ष अनुभवायला लावणे, नंतर भूगोलाच्या तासाला तो पाठ शिकवणे असं तिथं केलं जाई. नदी, समुद्र, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय या गोष्टी प्रत्यक्ष दाखवणं आणि नंतर त्यासंबंधीची माहिती मुलांना सांगणं हे त्यांच्या कल्पनेतील शिक्षण होतं. ' मुलांनो, काल आपण नदीवर गेलो होतो. ही नदी कुठून कशी वाहते, तिच्या काठावर कोणकोणती गावं आहेत, ती कुठल्या समुद्राला जाऊन मिळते हे आपण आता पाहू या. ' असं वर्गात म्हटलं की नदी केवळ भूगोलाच्या पुस्तकात न राहता सजीव होई आणि मुलांच्या मनात कायमची जाऊन बसे.
सूर्य आपल्याला जसा रोज नवीन प्रकाश, ऊर्जा देतो तसाच ज्ञानाचा नवीन प्रकाश, ऊर्जा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिली पाहिजे असं त्यांना वाटे. सूर्याकडून आपण जशी रोज प्रकाशाची अपेक्षा करतो, तसेच विद्यार्थी सुद्धा शिक्षकाकडून करतात. असं करताना शिक्षकाला स्वतःच्या वैयक्तिक अडचणी, सुखदुःखें निश्चितपणे असू शकतील, पण विद्यार्थ्यांचं ते कळण्याचं वय नसतं. त्यांना आपल्या शिक्षकांनी आपल्याला रोज काहीतरी नवीन सांगावं अशी अपेक्षा असते आणि शिक्षकांनी सुद्धा ती पूर्ण करायला हवी.
रवींद्रनाथांची शाळेची कल्पना आपल्या प्रचलित शाळेच्या कल्पनांना आजही छेद देणारी आहे. हे सगळे वाचल्यावर कुणाला असं वाटू शकेल की रवींद्रनाथांची शाळा म्हणजे अशीच शिस्त नसलेली, मुले कशीही वागताहेत आणि मौजमजेत काळ चालला आहे असे ठिकाण असावं. पण आपल्याला असं वाटत असेल तर आपण चुकतो आहोत. केवळ शिस्त आणि धाकदपटशा म्हणजे शाळा नव्हे. केवळ आनंद आणि मौजमजा म्हणजेही शाळा नव्हे. शाळा म्हणजे असे ठिकाण की जेथे ज्ञान आणि मनोरंजन, स्वातंत्र्य आणि स्वयंशिस्त, सौंदर्य आणि उपयुक्तता, समर्पण आणि सेवाभाव, ज्ञानाची श्रीमंती आणि मनाची श्रीमंती यासारख्या अनेक गोष्टी हातात हात घालून चालताहेत. शिकायला येणारी मुलं मुक्त मनानं शिकली पाहिजे. आनंद हा त्यांचा स्थायीभाव असला पाहिजे असे रवींद्रनाथांना वाटत असे. धाक आणि विकास या गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत असे त्यांचे मत होते. शिकण्यासह सगळी कामं आनंदात गात गात सहज होऊन जातात. पंढरीच्या वाटेवरील वारकरी विठुरायाच्या नामस्मरणात, भजनात तल्लीन होऊन जातात. त्या भजनात आणि टाळ मृदूंगाच्या नादात चालताना पंढरी किती दूर आहे, वारा, ऊन, पाऊस आहे का यासारख्या गोष्टी त्यांच्या मनात येऊन त्यांचं मन विचलित होत नाही. रस्त्यातील खडे त्यांना बोचत नाहीत. रस्ता चांगला असो की खाचखळग्यांचा, घाट असो वा उतरण त्यांना काही फरक पडत नाही. पांडुरंगाच्या दिशेने होणारी त्यांची वाटचाल केवळ आनंदाची होऊन जाते. वारी म्हणजे जीवन जगण्याचं तत्वज्ञान साध्या सोप्या पद्धतीनं प्रत्यक्ष उलगडून दाखविणारी पाठशाळाच आहे.
त्यांच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी सेवा, त्याग आणि नवनिर्मिती करण्यात आनंद मानत होता. शिक्षण घेता घेता हातामध्ये झाडू घेऊन शाळेची, परिसराची साफसफाई करणे, शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेणे, त्यासाठीची तयारी करणे, आपल्या हातांनी आश्रमासाठी म्हणजेच शाळेसाठी उपयोगी वस्तू तयार करणे, त्यातूनच जीवनोपयोगी कलाकौशल्य प्राप्त करणे यासारख्या अनेक गोष्टी शिकत होता. त्यातूनच श्रमाची प्रतिष्ठा जपली जात होती. आमच्या प्रचलित शिक्षणपद्धतीत विद्यार्थी जसजसा शिकून मोठा होतो, तसतशी श्रम करणे ही गोष्ट त्याला कमीपणाची वाटू लागते. आपलं शिक्षण त्याचं बालपण हरवून घेतं, लहानपणीच शिस्तीच्या नावाखाली त्याला प्रौढ बनवतं. आम्ही त्याला केवळ मार्कांच्या शर्यतीत पुढे धावायला लावतो. पण गुणांच्या, जीवनमुल्यांच्या शर्यतीत तो मागे पडतो.
आपल्याकडे सण उत्सवानिमित्त गावोगावी यात्रा भरतात. या यात्रा किंवा जत्रांना धार्मिक अधिष्ठान असतं. रवींद्रनाथांनी आपल्या शाळेत ' पौष जत्रा ' भरवायला सुरुवात केली. जत्रांचं धार्मिक अधिष्ठान काढून टाकून त्या जागी निसर्गाची प्रतिष्ठापना केली. वृक्षारोपणाचा उत्सव सुरु झाला की त्यात बाल तरूची पालखी निघायची. त्यासाठी रवींद्रनाथांनी सुंदर सुंदर गाणी लिहिली. शाळेच्या परिसरात अशा झाडांची लागवड व्हायची. तीही समारंभपूर्वक ! त्या झाडांशी, लतावेलींशी केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर शाळेतील शिक्षकांचे, त्यांच्या कुटुंबियांचे नाते जुळायचे. तुकोबांच्या अभंगातील ' वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ' हे तिथे प्रत्यक्षात आले होते.
महान कवी आणि नोबेल पुरस्कार विजेता असलेले रवींद्रनाथ कितीही महत्वाच्या कामात असले तरी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ काढत असत. छोट्या मुलांच्या वर्गावर जाऊन शिकवत. काय शिकवायचं त्याच्याही नोट्स काढत. लहान मुलांनी दिलेली उत्तरे, त्यांची गाणी आवर्जून ऐकत. त्यांच्या प्रश्नांचं समाधान करीत. त्यांच्याबरोबर गाणी म्हणत, नाटकात भाग घेत. या सगळ्या गोष्टी करण्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नव्हता. मी एवढा मोठा कवी, मग मुलांबरोबर कसा खेळू असा प्रश्न त्यांना कधीही पडला नाही. त्यांच्यातील बालक नेहमी जागृत असायचे. तोच त्यांचा मोठेपणाही !
टागोरांच्या शाळेबद्दल कुणीतरी एका जाणकार व्यक्तीने फार सुंदर उद्गार काढले आहेत. ते म्हणतात, ' शांतिनिकेतन ही रवींद्रनाथांची Tangible Poem आहे. ' कविता ही अमूर्त असते. त्यातील गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही. पण शांतिनिकेतन म्हणजे ' मूर्तिमंत काव्य. ' ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता. टागोरांच्या शाळेत दिलं जाणारं ज्ञान प्राचीन, अर्वाचीन, ऐतिहासिक, भौगोलिक अशा वेगवेगळ्या प्रकारात बसणारं नाही. ते एकजिनसी, आनंददायी आणि अनुभूतीतून आलेलं आहे. बुद्धदेव बसू हे बंगालमधील थोर साहित्यिक आणि विचारवंत होते. ते शांतिनिकेतनबद्दल बोलताना म्हणतात की शांतिनिकेतन म्हणजे ' शब पेयेछिर देश. ' शब पेयेछिर म्हणजे जिथं सगळं काही मिळतं, कशाचीही उणीव राहत नाही असा देश, असं ठिकाण. यापेक्षा शांतिनिकेतचं वर्णन करणारे सुंदर उद्गार कोणते असू शकतील ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
४/७/२००४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा