मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - ( भाग ८ )

उगवतीचे रंग  

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ८ )

शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच

रवींद्रनाथांच्या काळातील एक प्रसंग आहे. बिहारमध्ये एकदा एका मोठ्या शाळेच्या इमारतीची पायाभरणी होती. या कार्यक्रमाला तत्कालीन व्हॉईसरॉय साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. या कार्यक्रमात बोलताना त्या साहेबांनी म्हटले की उत्तम शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी शाळेची इमारत उत्तम हवी. सर्व भौतिक सुविधांनी युक्त असं ते ठिकाण असायला हवं. अर्थातच रवींद्रनाथ व्हॉईसरॉय साहेबांच्या या मताशी अजिबात सहमत नव्हते. या साहेबांच्या विधानावर टीका करताना त्यांनी फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, ' जेवणासाठी चांदीचे ताट असले तर उत्तमच ! पण महत्वाचे असतात ते ताटातील पदार्थ. ते पदार्थ उत्तम आणि स्वादिष्ट असतील तर जेवणासाठी केळीचे पान सुद्धा चालते. भारतातील लोकांना याची चांगली जाण आहे. श्रीमंत असो वा गरीब, केळीच्या पानावरही ते आनंदाने जेवतात. जेवण सुग्रास आणि रुचकर असलं म्हणजे झालं. 

दुर्दैवानं रवींद्रनाथांनी जे अनेक वर्षांपूर्वी सांगितलं ते आजही जसंच्या तसं आमच्या काही शाळांना आणि आमच्या मनोवृत्तीला लागू पडतं. आज अनेक शाळा सर्व सुखसोयींनी युक्त अशा इमारती बांधतात. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करतात. विद्यार्थ्याना शाळेत जाण्यासाठी बस, रुबाबदार आणि महागडा स्कुल युनिफॉर्म आदी सगळ्या गोष्टी असतात. त्यासाठी या शाळा जबर फी आकारतात. पालक देखील आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळेल या आशेने मुलांना अशा शाळेत घालतात. पण अशा सुंदर, देखण्या आणि चकचकीत इमारतीतून खरोखरच दर्जेदार शिक्षण दिले जाते का प्रश्न पडतो. 

रवींद्रनाथांच्या काळात बऱ्याचशा विद्यापीठांचे पदवीदान समारंभ इंग्रजीतूनच होत असत. आजही त्यात फारसा फरक झालेला नाही. रवींद्रनाथांना एकदा कोलकाता विद्यापीठातील पदवीदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. त्या काळातील परंपरा म्हणून ते इंग्रजीतच आपले भाषण करतील अशी उपस्थितांना अपेक्षा होती. पण रविंदनाथांनी आपले भाषण बंगालीतूनच केले. लोक काय म्हणतील याची त्यांना पर्वा नव्हती. बहुधा पदवीदान समारंभाला स्थानिक भाषेतून भाषण करणारे रवींद्रनाथ पहिलेच असावेत. 

शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये जे अंतर पडले आहे, ते या साहेबांच्या भाषेमुळेच असे त्यांचे मत होते. इंग्रजी भाषा ही बंगालमधील बाबू लोकांची भाषा होती. इंग्रजांनी त्यांच्यासाठी जी शिक्षणाची व्यवस्था केली होती त्यातून शरीराने भारतीय पण मनाने इंग्रज असे लोक तयार व्हावेत हा त्यांचा उद्देश होता. असे लोक त्यांना राज्यकारभार चालवण्यासाठी हवे होते. 

इंग्रजी शाळेतील दिले जाणारे हे शिक्षण म्हणजे बंदिस्त खोलीतील सूर्यप्रकाशासारखे होते. चार भिंतींच्या आड कोंडून ठेवलेला प्रकाश जसा बाहेर जात नाही, तसे हे शिक्षण शहरी सीमांचा उंबरठा ओलांडून ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकत नव्हते. किंबहुना ग्रामीण भागाचा कोणी विचारच केला नव्हता. त्यातूनच शहरी आणि ग्रामीण भागात एक मोठी दरी निर्माण होत चालली होती. खरा भारत समजून घ्यायचा असेल, तर तो शहरात नसून ग्रामीण भागात वसलेला आहे असे त्यांना वाटे. 

इंग्रजी भाषेबद्दल रवींद्रनाथांच्या मनात द्वेष होता असे नाही. पण शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असावं असं त्यांना वाटायचं. इंग्रजी भाषा कितीही चांगली असली आणि तिला वाघीणीचं दूध म्हटलं जात असलं तरी कोणतीही गोष्ट अति झाली की त्याची माती होते. ते आवश्यक तेवढेच हवे. दूध मग ते वाघिणीचे असो वा गायीचे, अति झाले की त्याचे विषच होणार. 

आपण ज्या वातावरणात वाढतो, ज्या भाषेत बोलतो, ऐकतो, ज्या भाषेत गाणी ऐकतो, नाटक सिनेमा पाहतो, तीच भाषा शिक्षणाचं माध्यम असावी. इंग्रजीसारखी परकी भाषा मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि विचारशक्तीला वाव देऊ शकत नाही. जी भाषा आजूबाजूला बोलली जाते, त्या भाषेचे संस्कार मुलांच्या मनावर सहज होतात. त्यांच्या डोळ्यांपुढे सहजपणे चित्र उभे राहते. इंग्रजी भाषेतील निसर्गकवी वर्डस्वर्थ याची डॅफोडिल्स ही कविता सुंदर आहे. पण आपल्या मुलांना डॅफोडिल्स कुठे माहिती आहेत ? ती त्यांनी कधी पाहिली तरी का ? मग त्यांचे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभे तरी कसे राहणार ? इंग्रजी माध्यमाला प्रतिष्ठा मिळाल्यामुळे साध्या, सहज आणि सोप्या मातृभाषेतील शिक्षणाला मुले वंचित झाली. ज्या मुळानी जीवनरस झाडापर्यंत पोहोचवणे अपेक्षित असते, ती मुळेच उखडून टाकण्याचा हा प्रकार आहे. मग झाडाची निकोप वाढ कशी होईल ? 

भाषेसंबंधी बोलताना रवींद्रनाथ आणखी एक महत्त्वाचा विचार मांडतात. तो म्हणजे भाषा केवळ ती नव्हे की जी फक्त शहरी लोक बोलतात. त्या भाषेच्या उपभाषा त्याचप्रमाणे ग्रामीण भागात बोलली जाणारी बोलीभाषा या सगळ्या प्रकारच्या भाषा त्यांना मान्य होत्या. भाषेतील केवळ उच्चाराच्या आणि शुद्धाशुद्धतेच्या कल्पना त्यांना फारशा मान्य नव्हत्या. तसे पाहिले तर त्यांचा व्याकरणशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. विधुशेखर शास्त्री या व्याकरणतज्ञांबरोबर बसून त्यांनी पाणिनीचे व्याकरणशास्त्र अभ्यासले होते. 

आपल्या साहित्यात त्यांनी बंगाली बोलीभाषेचा वापर करायला सुरुवात केली त्यांच्या या लेखनावर अशुद्ध बोलीभाषेतील लेखन म्हणून तत्कालीन विद्वानांनी टीका केली. एकदा तर रवींद्रनाथांच्या साहित्यातील उतारा एका विद्यापीठातील परीक्षेला हा उतारा शुद्ध करून लिहा म्हणूनही टाकला गेला होता. म्हणून रवींद्रनाथ म्हणतात की भारतीय विद्यापीठे म्हणजे केवळ पदव्या वाटणारे कारखाने आहेत. आजही इतक्या वर्षानंतर या वस्तुस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. 

रवींद्र नाथांच्या वागण्या बोलण्याचा प्रभाव मात्र तत्कालीन अनेक लोकांवर पडला होता. अनेक विद्वान त्यांचे मित्र होते. त्यांच्या कार्यपद्धतीने भारावून जाऊन त्यांच्या कार्याला वाहून घेतलेले अनेक लोक स्वयंस्फूर्तीने शांतीनकेतनमध्ये सेवा देण्यासाठी आले होते. ही सगळी मंडळी अत्यंत समर्पित भावनेने काम करणारी होती. अत्यंत कमी मानधनामध्ये ते हे काम करीत असत. अशा लोकांमध्ये ब्रह्मबांधव उपाध्याय यांच्यासारखे विद्वान होते. या उपाध्याय यांनी रवींद्रनाथ यांना गुरुदेव ही उपाधी बहाल केली. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत कालीमोहन घोष, जगदानंद, नेपाळचंद्र राय हे सहकारी शिक्षक होते. अभिजात संगीत शिकवण्यासाठी भीमराव शास्त्री हे महाराष्ट्रातून तिथे गेले होते. विधुशेखर शास्त्री हे संस्कृत पंडित यांच्यासारखी प्रचंड गुणी माणसे रवींद्रनाथांनी जोडली होती. या सगळ्यांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी उत्तमोत्तम साहित्य लिहिण्याची, संशोधन करण्याची, चित्रनिर्मितीची, नवनिर्मितीची प्रेरणा दिली. त्यांच्यामध्ये मनुष्यधर्माची जागृती निर्माण केली. निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली आणि विकासाच्या अनेक वाटा त्यांच्यासाठी मोकळ्या करून दिल्या. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

९/७/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...