मुख्य सामग्रीवर वगळा

आमची पहिलीवहिली युरोप वारी - भाग ३

 उगवतीचे रंग 

आमची पहिलीवहिली युरोप वारी - भाग ३ 

दिवसभराच्या प्रवासाने गाढ झोप लागली होती पण सकाळी लवकर उठून लंडन शहर पाहण्यास जायचे असल्यामुळे पाच वाजेचा अलार्म लावला होता. सात वाजेपर्यंत सर्व आवरून खाली नाश्त्यासाठी गेलो. एवढ्या सकाळी नाश्ता करण्याची सवय नव्हती परंतु लंडन शहर पाहण्यासाठी जायचे असल्यामुळे नाश्ता करावा लागला. कारण जेवण केव्हा मिळेल ते सांगता येत नव्हते. खाली हॉलमध्ये नाश्त्याची व्यवस्था केलेली होती. सकाळचे प्रसन्न वातावरण होते. विविध गौरवर्णीय, कृष्णवर्णीय आणि पर्यटनासाठी आलेल्या लोकांची त्या ठिकाणी धावपळ सुरू होती. नाश्त्यासाठी ब्रेडचे विविध पदार्थ होते त्याचप्रमाणे चहा, कॉफी, दूध त्याचप्रमाणे विविध प्रकारचे कॉर्न फ्लेक्स ब्रेकफास्टसाठी ठेवलेले होते. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेज पदार्थही उपलब्ध होते. आठ वाजेपर्यंत आम्ही सर्व आवरून आमच्या मर्सिडीज बेंझ या सुंदर अशा बसमध्ये जाऊन बसलो आणि आमची बस लंडन शहराची सफर सुरू झाली.

स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला होता. सर्वत्र अतिशय प्रसन्न वातावरण होते. स्वच्छ सूर्यप्रकाश असला की लंडनमधील लोक कमालीचे खुश असतात. बरेच जण पायी फिरण्याचा आनंद घेतात. लंडन शहरात पायी भटकणे यासारखा दुसरा आनंद नाही. रस्ता चुकला तरी घाबरण्याचे काही कारण नसते. काही अडले तर लंडनचा सुप्रसिद्ध ' बॉबी ' पोलीस आपल्या मदतीला असतोच. पण अर्थातच लंडनमध्ये पायी फिरण्याचा योग आम्हाला नव्हताच. काही स्त्री व पुरुष सायकल वरूनही जाताना आढळत होते बरेच लोक सायकल चालवताना पाहून खरोखरीच आश्चर्य आणि आनंद वाटला. लंडन शहराची माहिती देण्यासाठी वीणा वर्ल्डने एका स्थानिक स्त्री मार्गदर्शकाची नेमणूक केली होती. आमची बस ज्या ज्या भागातून जात होती त्या त्या भागाची माहिती त्या अतिशय सुंदर सहज सोप्या आणि ओघवत्या इंग्रजीतून आम्हाला देत होत्या. असे सुंदर इंग्रजी बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाल्यामुळे खूपच छान वाटत होते. 

लंडनच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत आमची बस टॉवर ऑफ लंडन या ठिकाणी पोहोचली. त्या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. आम्ह रांगेत उभे राहिलो परंतु लवकरच आमच्या तिकिटांची व्यवस्था झाली. टॉवर ऑफ लंडन या नावावरून आम्हाला असे वाटले की ही एखादी उंच आणि भव्य इमारत असावी परंतु प्रत्यक्षात हा एक जुना किल्ला आहे. इ.स. १०७८ मध्ये सर विल्यम द काँकरर यांच्या देखरेखीखाली बांधली गेलेली ही सर्वात जुनी वास्तू आहे. इतिहासातील अनेक भल्या भल घटनांची ही वास्तू साक्षीदार आहे. या वास्तूत अनेक शिरच्छेद झालेले आहेत तसेच काही गुन्हेगारांना यातनादेखील दिल्या गेल्या आहेत ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ हिला देखील या ठिकाणी तुरुंगवास सहन करावा लागला होता. या ठिकाणी अनेक दुर्दैवी अशा व्यक्तींचा ज्या कुऱ्हाडीने शिरच्छेद करण्यात आला होता आणि ज्या लाकडी ठोकळ्यावर तो करण्यात आला होता तो ठोकळा आणि ती कुऱ्हाड अजूनही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. हे सगळे पाहताना अंगावर काटा येतो. या परिसरात एकेकाळी नाणे तयार करण्याचा कारखाना देखील होता असे ऐकण्यात आले. त्या भोवती खंदक होता. इंग्लंड आणि एकूणच युरोपमधील ऐतिहासिक वास्तू पाहताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे या लोकांनी हा सगळा वारसा जीवापाड जपला आहे. कोठेही पेन, पेन्सिल किंवा कर्कटकने कोरून ठेवलेली नावे आणि विद्रुप केलेल्या वास्तू दिसत नाहीत. 

टॉवर ऑफ लंडनचे प्रमुख आकर्षण म्हणजे तिथे असलेले जड जवाहिर, सोने आणि मौल्यवान वस्तू. या वस्तूंचा लखलखाट अक्षरशः डोळे दिपवणारा आहे. राजे रजवाड्यांच्या काळातील अनेक सोन्या-चांदीच्या वस्तू, भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या सोन्या चांदीच्या नक्षीदार प्लेट्स, राजेचिन्हे, राजदंड, राजमुकुट, विविध आभूषणे, रत्नजडित तलवारी यासारख्या अनेक गोष्टी तिथे पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्या देशाची आठवण करून देणारी सर्वात मौल्यवान वस्तू जर कोणती बघायला मिळाली असेल तर ती म्हणजे कोहिनूर हिरा. इंग्लंडमधील हा सगळा खजिना पाहून डोळे दिपून जात असले तरी जगभरातील विविध देशांवर राज्य करून इंग्लंडने हा सगळा कुबेराचा खजिना भरला आहे. त्यात भारताचाही मोठा वाटा नक्कीच आहे. त्यामुळे त्याचे काही विशेष वाटले नाही.

 टॉवर ऑफ लंडनच्या परिसरात आपले लक्ष वेधून घेणारी आणखी एक गोष्ट म्हणजे इथले योमन वॉर्डर्स. लाल निळ्या राजेशाही पोशाखात हे वॉर्डर्स इकडून तिकडे हिंडत असतात. टॉवर ऑफ लंडन च्या परिसरात अनेक नामवंत शैक्षणिक संस्था आहेत. त्यापैकी एक म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक ज्यांना मिळाले ते अमर्त्य सेन याच ठिकाणी प्राध्यापक होते. या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स भारताच्या दृष्टीने आणखी एक वेगळे महत्त्व आहे ते म्हणजे याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली.

हे सगळे पाहण्यात दोन-तीन तास कसे निघून गेले ते कळले नाही. नंतर आम्हाला लंडन शहर दाखवण्यासाठी आमची बस निघाली. ती एक ओरिएंटेशन टूर होती. लंडन शहरातील काही महत्त्वाची ठिकाणे आम्ही उतरून पाहिली तर काही ठिकाणे वेळेअभावी बस मधूनच पहावी लागली. गाईड आम्हाला वेळोवेळी माहिती सांगतच होती. आमची बस पिकॅडीली सर्कस या भागातून जात होती. या ठिकाणाची माहिती घेताना असे समजले की सतराव्या शतकात शर्टला फ्रील ( झालर ) असलेल्या कॉलरची लंडनमध्ये फॅशन आली होती. त्या कॉलरचे नाव पिकॅडीली होते. अशा प्रकारची कॉलर शिवून देणारा राजर बेकर या नावाचा टेलर या भागात राहत होता. त्याच्या या कौशल्यामुळे त्याला भरपूर काम मिळाले आणि पैसाही मिळाला. या भागात असलेल्या चौका भोवती सर्व रहदारी गोलाकार फिरते त्यामुळे या भागाला पिकॅडिली सर्कस असे नाव पडले आहे. या चौकात सात रस्ते येऊन मिळतात. या ठिकाणी ब्राँझ या धातूमध्ये बनवलेले एक कारंजे आहे. त्याच्या मध्यभागी इरॉस या ग्रीकदेवतेचा पुतळा बघायला मिळतो.

यापुढील ठिकाण म्हणजे प्रसिद्ध ट्रॅफलगार स्क्वेअर. इ.स. १८०५ मध्ये इंग्लंडचा सेनाप्रमुख नेल्सन याने स्पेनमधील ट्रॅफलगार या ठिकाणी फ्रेंच सैन्याचा पराभव केला होता. त्याचे स्मरण म्हणून या ठिकाणी 170 फूट उंचीचा स्तंभ उभारून त्यावर अठरा फुटी नेल्सन यांचा भव्य पुतळा उभा आहे. या स्तंभाच्या चौथर्‍यावर चार मोठ्या सिंहाचे ब्राँझ चे पुतळे बसवले आहेत. हा एक मोठा चौक असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सभा घेतल्या जातात. आमची बस बेकर स्ट्रीटवरून जात असताना आमच्या गाईडने आम्हाला त्याबद्दल माहिती दिली. बेकर स्ट्रीट हा लंडनमधील एक प्रसिद्ध रस्ता. शेरलॉक होम्सच्या पुस्तकात या बेकर स्ट्रीटचा उल्लेख येतोच. 

त्यानंतर आम्ही बकिंगहॅम पॅलेस पाहिला. अर्थात बाहेरूनच. इंग्लंडच्या राजाचे हे निवासस्थान. या राजवाड्याची बांधणी अतिशय सुरेख आहे. आतूनही तो अतिशय आलिशान असा नक्कीच असावा. हा परिसर अतिशय विशाल असा आहे. या पॅलेसच्या बाहेर जे गार्ड्स उभे असतात, त्यांचे पोशाख आपले लक्ष वेधून घेतात. लाल जाकीट, काळी पॅन्ट, बूट, डोक्यावर काळी फेअरी कॅप अशा वेशात ते शोभून दिसतात. इथल्या चेंज ऑफ गार्ड्सची खूप ख्याती आहे. या पॅलेसबद्दल बरेचदा ऐकले आणि वाचले होते. तो प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला. या पॅलेस समोर एक मोठा चौक आहे. त्यात दोन मोठे स्तंभ आहेत. त्यातील एका स्तंभावर तेथील राष्ट्रध्वज फडकत असतो. प्रिन्सेस डायनाबद्दल आपण वाचलेले असते, टीव्ही वर तिच्यासंबंधीच्या अनेक बातम्या आपण पाहिलेल्या असतात. त्यामुळे हा पॅलेस पाहत असताना प्रिन्सेस डायनाची सुद्धा आठवण होते. 

युरोपातील शहरात फिरत असताना आपल्याला जर वॉशरूम वापरायचे असेल तर पैसे द्यावे लागतात. काही ठिकाणी विनाशुल्क देखील ही सुविधा उपलब्ध आहे. ते बऱ्याच वेळा माहिती नसते. पण आमच्यासोबत असलेले आमचे टूर मॅनेजर राहुल देसाई यांना मात्र या सगळ्या भागाची खडानखडा माहिती होती. त्यामुळे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी असे विनाशुल्क स्वच्छतागृह उपलब्ध असेल, त्या त्या वेळी आम्हाला त्याची सूचना दिली. त्यासाठी त्यांचा एक गमतीदार कोडवर्ड होता. इथे ' चकटफू ' आहे. ज्यांना जायचं असेल त्यांनी जाऊन या. त्यामुळे आमच्यापैकी क्वचितच कोणाला पेड वॉशरुम्स वापरण्याचा प्रसंग आला. 

यानंतर आमची बस पार्लमेंट स्क्वेअर, टॉवर ब्रीज अशा भागातून गेली. पार्लमेंट स्क्वेअरच्या भागात बिग बेन टॉवर, व्हिक्टोरिया टॉवर , पंतप्रधानांचे निवासस्थान, विविध देशांच्या प्रतिनिधींची कार्यालये आहेत. बिग बेन टॉवर वर १५० वर्षांपूर्वी लावलेले एक मोठे घड्याळ आहे. विशेष म्हणजे हे घड्याळ अजूनही उत्तम स्थितीत सुरु आहे. याच स्क्वेअरमध्ये इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा एक भव्य पुतळा आहे. लंडनमधील थेम्स नदीवर असलेला टॉवर ब्रीज सुद्धा प्रेक्षणीय आहे. ही वास्तू देखील साधारणपणे १५० वर्षे जुनी आहे. त्या काळात लंडनचा इतर देशांशी व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला होता. मोठमोठी जहाजे बंदरात येत. त्यांना पुलाखालून जाता यावे म्हणून हा उघडझाप होणारा पूल बांधण्यात आला. मोठी जहाजं यायची असतील, तर हा पूल वर उचलला जातो. 

लंडनमध्ये चुकवू नये अशी बरीच ठिकाणे आहेत. त्यातील एक म्हणजे मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम. या म्युझियम बद्दल बरेच काही ऐकले होते. फोटोही पाहिले होते. पण आता ते प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला होता. या ठिकाणी आपल्याला जगभरातील नामवंत व्यक्तींचे हुबेहूब बनवलेले मेणाचे पुतळे बघायला मिळतात. यात अनेक चित्रपट कलाकार, संगीतकार, वैज्ञानिक आदींचा समावेश होतो. त्यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान आदी भारतीय कलाकार देखील आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकरचा पुतळा तर हातात बॅट उंचावून आकाशाकडे पाहतानाचा पुतळा तर अप्रतिम आणि सर्वांना आवडेल असा आहे. या पुतळ्याजवळ आम्ही फोटो काढले. मादाम तुसाँ ही फ्रेंच शिल्पकार होती. तिच्या आईचे मित्र डॉ फिलिप कर्टीयस यांनी तिला मेणाचे पुतळे बनवण्याची कला शिकवली. वर उल्लेख केलेल्या बेकर स्ट्रीट वरच हे म्युझियम आहे. 

या म्युझियम मधून बाहेर पडताना एक अंधाऱ्या गुहेसारखा भाग लागतो. त्यातून जाताना खरोखरच भीती वाटते. त्याला नावही ' चेंबर ऑफ हॉरर्स ' असे आहे. एका रिक्षेसारख्या वाहनात बसून ही सफर होते. इंग्लंडमधील प्राचीन काळातील लोक, कारागीर आदींचे दर्शन आपल्याला घडते. सगळ्यात जास्त हा भाग आम्हाला रोमांचकारी वाटला. येथून बाहेर पडताना आपल्याला आपला फोटो दाखवतात. तो घ्यायची आपली तयारी असेल तर तो विकतही मिळू शकतो. मात्र त्याचे दर खूपच असतात. सकाळपासून ही सगळी भ्रमंती सुरु होती. आम्ही थकलो होती. भूकही लागली होती. युरोपात बऱ्याच शहरात भारतीय रेस्टारंटही आहेत. त्याची माहिती मात्र हवी. आमचे गाईड आम्हाला अशाच एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. तेथे भारतीय पद्धतीचे जेवण आम्ही घेतले. 

एव्हाना साडेतीन चार वाजले होते. आता आणखी एक प्रेक्षणीय ठिकाण पाहायचे होते. ते म्हणजे ' लंडन आय '. हा एक महाप्रचंड असा पाळणा ( जायंट व्हील  ) आहे. थेम्स नदीच्या दक्षिण काठावर याची उभारणी केली आहे. हा प्रचंड पाळणा पाहिल्यावर आमच्यातील काहींना भीती वाटू लागली. काहींनी चक्क यात बसणार नाही म्हणून सांगितलं. पण हा पाळणा अत्यंत संथ गतीने फिरतो. साधारणपणे एका सेकंदाला दहा इंच इतका. त्यामुळे त्यात बसणाऱ्यांना कोणताही त्रास होत नाही. या व्हीलमध्ये ३२ केबिन्स आहेत. प्रत्येक केबिनमध्ये सुमारे २५ लोक बसू शकतात. केबिन सर्व बाजूनी बंद आणि सुरक्षित असते. केबिनमध्ये लावलेल्या काचेतून भोवतालचा डोळ्यांचा पारणे फेडणारा नजारा आपण पाहू शकतो. त्या पाळण्यातून थेम्स नदी, त्यातून जाणारी जहाजे, दोन्ही बाजूला असलेल्या लंडन शहरातील इमारती, रस्ते आदी इतके छान दिसते की आपले डोळे अगदी तृप्त होतात. आपल्या हातात असलेल्या कॅमेऱ्यात कोणते दृश्य टिपू आणि कोणते नको अगदी अशी अवस्था होते. ज्याच्या कोणाच्या डोक्यात ही ' लंडन आय ' ची कल्पना आली असेल, त्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. त्याशिवाय ही कल्पना ज्यांनी प्रत्यक्षात आणली, त्यांचेही कौतुक करावे तेवढे कमी आहे. पर्यटकांना मिळणारी ही चिरस्मरणीय भेट आहे. 

थोडा वेळ थेम्स नदीच्या काठावर भटकंतीही केली. आपल्याकडे नदीकिनारी किती घाण आणि अस्वच्छता असते ! इथे तर स्वच्छता आणि सौंदर्य यांचा संगम बघायला मिळाला. ब्रिटिशांकडील शिस्त, स्वच्छता आणि वक्तशीरपणा या खरोखरच वाखाणण्यासारख्या आणि अनुकरणीय गोष्टी आहेत. आपण मात्र त्यांच्या नको त्या गोष्टींचे अनुकरण केले आहे. दिवसभराचे असे थकलेले पण लंडनमधील प्रेक्षणीय स्थळे पाहून आनंदित झालेले आम्ही आमच्या हॉटेलवर मुक्कामासाठी परत आलो. सकाळी खूप लवकर आम्हाला पुढील प्रवासासाठी निघायचे होते. लंडन शहरातील खूप गोष्टी पाहिल्या तरी खूप काही पाहायचे राहिले याची जाणीव मनाला होत होती. पण आता आमचा लंडनमधील मुक्काम संपणार होता. लंडनमधील लॉर्ड, विम्बल्डन, रॉयल अल्बर्ट हॉल आदी गोष्टी आम्ही बसमधूनच पाहिल्या. शेक्सपिअरचे गाव, सावरकर राहिले होते ते ठिकाण, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आदी विद्यापीठे आणि आणखी खूप काही ठिकाणे पुन्हा कधीतरी बघायची इच्छा मनात ठेवून आम्ही इंग्लंडमधील आमचा मुक्काम हलवणार होतो. ( क्रमशः ) 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२३/७/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...