उगवतीचे रंग
आमची पहिलीवहिली युरोपवारी ( भाग १ )
आयुष्यात एकदा तरी युरोपला जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण सगळ्यानांच ते शक्य होईल असं नाही. माझ्या मनात अनेक वर्षांपासून युरोपवारीचे स्वप्न घोळत होते. त्यासाठीच्या पैशाची व्यवस्था कशी करावी याचा मोठा प्रश्न होता. युरोपवारी म्हणजे किमान काही लाख रुपयांचा खर्च ! पण जायचं हे तर मनात होतंच. सुदैवाने तो योग जुळून आला. आणि मग परदेशवारीच्या स्वप्नांना पंख फुटले. सुरुवातीला सिंगापूर, मलेशिया, थायलंड ही ट्रीप करावी असे वाटत होते पण मुलांनी त्याऐवजी आम्ही युरोप ट्रीपलाच जावे असा आग्रह धरला आणि आमची त्यासाठीची संशोधन मोहीम सुरु झाली. मग वीणा वर्ल्डची जाहिरात पाहण्यात आली. त्यात साधारणपणे दहा दिवसात युरोपातील चार देश दाखवणार होते. इंग्लंड, फ्रांस, स्वित्झर्लंड आणि इटली. आम्ही या ट्रीपची निवड केली. ट्रीप २ जून ते १० जून २०२४ अशी होती. सुरुवातीचे पैसे भरले. आणि मग पुढील धावपळ सुरु झाली.
या देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असते. त्यासाठी त्याआधी तुमचा पासपोर्ट तयार असावा लागतो. आमच्याकडे तो होता. आम्ही पुण्यातूनच बुकिंग केले होते. व्हिसाची अपॉइंटमेंट आम्हाला शक्यतो पुण्यात मिळावी अशी इच्छा होती. योगायोगाने ती मिळाली. युके (इंग्लंड ) साठी स्वतंत्र आणि पुढील देशांसाठी आणखी वेगळा असे दोन प्रकारचे व्हिसा काढावे लागणार होते. इंग्लंडव्यतिरिक्त दुसऱ्या युरोपीय देशांमध्ये जाण्यासाठी जो व्हिसा लागतो, त्याला शेंगेन व्हिसा म्हणतात. या दोन्ही व्हिसासाठी वीणा वर्ल्डने आमची तयारी करून घेतली. सगळी कागदपत्रे तयार करून एक फाईल आमच्या हाती दिली. ही कागदपत्रं सादर करताना मात्र आमच्या नाकीनऊ आले. पासपोर्ट, बँक अकाउंट स्टेटमेंट, इन्कम टॅक्स भरल्याची प्रत, पॅन कार्ड, सेवानिवृत्तीच्या आदेशाची प्रत, वीज बिलाची प्रत असे विविध कागदपत्र सादर करावे लागले. एका व्हिसासाठी जे बँक स्टेटमेंट्स घेतले होते ते दुसऱ्या व्हिसासाठी चालणार नव्हते. पुन्हा नव्याने ताजी प्रत त्यांना लागणार होती. पुण्यातून चाळीसगावच्या बँक अधिकाऱ्यांना फोनवरून नवीन स्टेटमेंट पाठवण्याची विनंती केली. त्यांनी आठ दिवसांपूर्वीच ते दिल्याचे सांगितले. पण ते आजच्या तारखेचे पुन्हा हवे आहेत असे सांगितले. मोठ्या मिनतवारीने ते मिळवले. त्यावेळी ' चलो, बॅग भरो निकल पडो ' असे म्हणण्याइतकी परदेशवारी सोपी नाही हे लक्षात आले.
त्यानंतर सुरु झाली ती प्रवासाची तयारी. बॅगेत अमुक इतके किलो एवढेच वजन नेता येईल हे सांगितले गेले. लगेज बॅग मध्ये २३ किलो आणि केबिन बॅगमध्ये ७ किलो एवढेच वजन नेता येईल हे कळले. युरोपात खूप थंडी असते आणि तुम्हाला खास गरम कपडे न्यावे लागतील हेही सांगितले गेले. त्याशिवाय प्रवासाला लागणाऱ्या खास बॅग्स, त्यांच्यासाठीच आंतरराष्ट्रीय मानदंड असलेली कुलुपं, तिकडे विजेची सॉकेट्स वेगळी असतात. आपले फोन चार्जर्स तिकडे चालणार नाहीत अशा सगळ्या एकेक गोष्टी कळत गेल्या. त्याशिवाय स्पोर्ट्स शूज, गॉगल्स, चष्म्याच्या दोन जोड्या बरोबर घ्यायला सांगितले गेले.
पुण्यात या सगळ्या वस्तू खरेदी केल्या. विदेशात आपल्यासारखी चहा कॉफीची दुकाने नाहीत. चहा मिळेलच याची खात्री नाही. त्याशिवाय आपल्याकडील जेवण, नाश्ता कधी मिळेल तर कधी मिळणार नाही असेही कळले. त्यामुळे रेडिमेड चहाच्या पुड्या ज्या फक्त गरम पाण्यात टाकल्या की चहा तयार होतो, शिवाय हल्ली इन्स्टंट उपमा, पोहे वगैरेची पाकिटे मिळतात. तशी ती दोनचार घेऊन जवळ ठेवली. शिवाय आपल्याजवळ चिवडा, वेफर्स अशा सारखे पदार्थ जवळ असू द्या अशाही सूचना होत्या. त्यामुळे बरोबर तीही बेगमी करून घेतली.
अशी एकेक तयारी सुरु होती. दोन्ही व्हिसाच्या अपॉइंटमेंट छान पार पडल्या. त्यामुळे चला आता एका महत्वाच्या गोष्टीतून सुटलो अशी भावना मनात होती. दोन जून तारीख जसजशी जवळ येत होती, तसतसे मनावरील दडपण वाढत होते. प्रा लक्ष्मण देशपांडे यांच्या ' वऱ्हाड निघालं लंडनला ' सारखी अवस्था झाली. ' कसं हुईल, काय हुईल.. ? लांबचा पल्ला आहे ' अशी धाकधूक मनात होती. आता बॅगा भरायला सुरुवात झाली. या बॅगेत हे चालत नाही, ते त्या बॅगेत ठेवा. नाहीतर विमानतळावर ते काढून फेकून देतात वगैरे गोष्टी कानावर पडत होत्या. त्यामुळे गोंधळात भरच पडत होती. या बॅगेतील सामान काढ, त्या बॅगेत टाक असा प्रकार ३/४दिवस सुरु होता. शेवटी एकदाच्या बॅग भरून झाल्या. आता जे होईल ते पाहू असा मनाचा निर्धार केला.
२जूनला दुपारी दोन वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे थेट लंडनला जाणारे विमान होते. साडेनऊ तासांचा प्रवास होता. विमानतळावर आम्हाला चार तास आधी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्याच काळात मध्यरेल्वेचे काही काम सुरु असल्याने दोन तीन दिवसांपासून मेगा ब्लॉक होता. त्यामुळे रस्त्याने मुंबईला जाणाऱ्यांची गर्दी होती. वाहतुकीमुळे खोळंबा होऊन उशीर होऊ नये म्हणून २ तारखेला सकाळी पाच वाजता कॅब करून आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो. आम्ही सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विमानतळावर दाखल झालो. वीणा वर्ल्डतर्फे युरोप ट्रीपला जाणारा जो आमचा ग्रुप होता, त्यात ३५ जण होते. त्यातील विमानतळावर दाखल होणारे बहुधा आम्ही पहिलेच होतो. पण लवकर पोहोचल्याचा फायदा झाला. विमानतळावरील तपासणीच्या सर्व सोपस्कारातून लवकर बाहेर पडून आम्ही लवकर मोकळे झालो.
तेवढ्यात आमचे टूर गाईड राहुल देसाई तिथे आलेच. त्यांना भेटल्यावर आपला प्रवास छान होणार याची खात्री वाटली. त्यानंतर आमच्या युरोप ट्रीपला बरोबर येणारी काही ग्रुपमधील मंडळी भेटली. त्यामुळे खूपच हायसे वाटले. श्री आणि सौ फडतरे, श्री आणि सौ लोहार, श्री आणि सौ ओक आदी मंडळींशी ओळख झाली. ही मंडळी साधारणपणे समवयस्क असल्याने त्यांच्याशी लगेच सूर जुळले. गप्पागोष्टीत दोन केव्हा वाजले ते कळले नाही.
आता एअर इंडियाच्या विमानात बसण्यासाठी आम्ही रांगेत दाखल झालो आणि सगळ्या सोपस्कारातून पार पडून विमानात प्रवेश केला. हवाई सुंदरींनी आम्हा सर्व प्रवाशांचे अगत्यपूर्वक स्वागत केले आणि आम्हाला आसनाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. लवकरच विमान सुटणार अशी सूचना झाली. सीट बेल्ट बांधले गेले आणि काही क्षणातच लंडनच्या दिशेने विमानाने हवेत झेप घेतली. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१३/७/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा