मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ६ )

उगवतीचे रंग

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ६ )
१९०१ च्या सुमारास रवीन्द्रनाथांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. तिला आपण आज आपल्या भाषेत भलेही शाळा म्हणू या पण त्यांच्या दृष्टीने तो एक आश्रम किंवा गुरुकुल होते. पण अशा प्रकारची शाळा सुरु करणे आणि ती चालवणे हे त्यांच्यासाठी अनेक प्रकारे आव्हान होते. ते स्वतःच या शाळेबद्दल बोलताना म्हणतात, ' मी स्वतःच शाळेतून पळून आलेला मुलगा. शिकवायचं कसं हे मला ठाऊक नव्हतं. मला मुलांनी जसं शिकावं असं वाटत होतं, त्याला योग्य अशी पाठ्यपुस्तके नव्हती. त्यामुळे माझ्यापाशी आपली मुलं पाठवायला कोणीही तयार नव्हता. सरकारी शाळाखात्याने मंजूर केलेला अभ्यासक्रम नव्हता. शहरातल्या सोयींपासून दूर अशा ठिकाणी मी शाळा काढली होती. ' आश्रम ' म्हटल्यावर मुलांना आणि शिक्षकांना एकत्र कामे करावी लागत. '
त्याशिवाय रवींद्रनाथांची शाळा म्हणजे ब्रिटिश सरकारशी द्रोह आहे. कारण त्यात इंग्रजीला प्राधान्य नाही. मातृभाषेतून शिक्षण, बंगालची संस्कृती, लोककला, लोकसाहित्य आदी गोष्टींना स्थान आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकार तर या शाळेकडे संशयाने पाहत होतेच पण स्थानिक बंगाली बाबूंची देखील नाराजी रवींद्रनाथांना पत्करावी लागली होती. कारण ब्रिटिशांची गुलामगिरी करण्याची सवय अंगी बाणली होती, इंग्रजी भाषा येणे, तीत व्यवहार करता येणे यात सामान्य बंगाली माणूस भूषण मानत होता. शहरी, शिक्षित आणि इंग्रजांची चाकरी करणाऱ्या बंगाली बाबूंनी आपल्या मुलांना रवींद्रनाथांच्या शाळेत घालू नये असा गुप्त फतवा इंग्रज सरकारने काढला होता.
ही सगळी आव्हाने तर होतीच पण आर्थिक आव्हानही खूप मोठे होते. ही शाळा काढण्याच्या सुमारास रवींद्रनाथांची आर्थिक स्थिती खालावली होती. शाळा उभारणीसाठी त्यांचा त्याग फार मोठा होता. जगन्नाथपुरीचा समुद्रकिनारा त्यांना फार आवडायचा. त्या ठिकाणी निवांत लेखन, वाचन करता यावे म्हणून समुद्रकाठी त्यांनी एक घर बांधलं होतं. पण त्यांना तिथे कधी राहायला मिळालंच नाही. शाळेचा खर्च भागवण्यासाठी हे घर त्यांना विकावं लागलं. त्यांच्या पत्नी मृणालिनीदेवी यांनी सुद्धा पतीच्या या कार्यात तनमन धनाने साथ दिली. या शाळेसाठी आपले दागिने त्यांनी विकले. सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना येथे जेवणखाण, राहणे आदी मोफत होते. शाळेची कोणतीही फी नव्हती.
रवींद्रनाथ आणि मृणालिनीदेवी आपला कोलकात्यातील सुखाचा संसार सोडून या शाळेचा संसार करण्यासाठी आले. इथं त्यांचं कुटुंब शांतिनिकेतनात आलं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलं, रथींद्र आणि शमींद्र आणि मुलगी मीरा आले होते. रथींद्र चौदा वर्षांचा, मीरा दहा वर्षांची आणि शमींद्र आठ वर्षांचा होता. हेच या शाळेचे पहिले विद्यार्थी होते. चांगल्या गोष्टींची सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते. ती रवींद्रनाथ आणि मृणालिनीदेवींनी केली. खरं तर मृणालिनीदेवी या प्रतिष्ठित उच्च कुटुंबातून आलेल्या. त्यातही कोलकात्यात प्रतिष्ठित अशा जमीनदार ठाकूर घराण्याच्या त्या स्नुषा. पण त्यांच्या स्वभावात मोठेपणाचा तोरा नव्हता. आश्रमातील मुलांचा आणि शिक्षकांचा स्वयंपाक त्या स्वतः करायच्या. त्या सगळ्यांच्या आई झाल्या.
परंतु शाळा सुरु होऊन जेमतेम एक वर्ष झालं असेल नसेल तोच मृणालिनीदेवींनी या जगाचा निरोप घेतला. आता मुलांवरील मातृछत्र हरपले होते. आश्रमाची मातृवत काळजी घेणारी माता त्या सगळ्यांना सोडून गेली होती. रवींद्रनाथांना आता आईचीही भूमिका पार पाडावी लागत होती. संकटे यायला एकदा सुरुवात झाली की ती एकामागून एक येतात. मृणालिनीदेवी गेल्या त्याच वर्षी रवींद्रनाथांची मोठी मुलगी बेला वारली. आणखी काही वर्षे जात नाहीत तोच त्यांचा शमींद्र हा मुलगा कॉलऱ्याच्या आजाराने दगावला. वास्तविक शमींद्र हा अतिशय बुद्धिमान, प्रतिभावान आणि अतिशय देखणा मुलगा होता. पण दैवापुढे कोणाचेच काही चालत नाही. कलकत्त्यातील एक बुद्धिमान तरुण आपलं वैभव सोडून रवींद्रनाथांबरोबर त्यांचा सहकारी म्हणून शांतिनिकेतनात आला होता. त्याचं नाव सतीशचंद्र. या सतीशचंद्रावर रवींद्रनाथांचा फार जीव होता. पण तोही कुठल्यातरी आजाराचं निमित्त होऊन हे जग सोडून गेला. त्याच्या मृत्यूने रवींद्रनाथ फार हळहळले. आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत ते त्याची आठवण काढीत असत.
संकटांची अशी मालिका सुरूच होती पण जीवनातील सत्य, शिव आणि सौंदर्याचा पूजक असलेला हा माणूस त्यामुळे खचला नाही. जीवनातील वास्तवाचा स्वीकार करून पुढे जायचं आणि ते करीत असताना आपली मूळ आनंदी वृत्ती कायम ठेवायची याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्रनाथ होते. एखाद्या पूर्ण विकसित कमळाप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्व होते. पाकळी पाकळी उमलून आली होती. असाच विकास आपल्या विद्यार्थ्यांचाही व्हावा ही त्यांची आंतरिक इच्छा होती. त्या काळात पालक आपल्या मुलांना ' शाळा ' नावाच्या यंत्रात घालत असत. अशा यंत्रांमध्ये मुलांच्या आनंदाला फारसा वाव नसतो, त्यांच्या प्रतिभेचे, कल्पनेचे पंख छाटले जातात, हातांना नवनिर्मितीचा आनंद दिला जात नाहीत, पंचज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये तिथे हातात हात घालून काम करीत नाहीत असे त्यांचे मत होते. म्हणूनच शांतिनिकेतन ही केवळ मुलांना लिहिण्यावाचण्याचे शिक्षण देणारी शाळा नव्हती. तर जीवनाचा आनंद घेता घेता शिक्षण देणारी चैतन्याने रसरसलेली ती एक अभिनव संकल्पना होती. याठिकाणी सुजाण नागरिक घडत होता.
साहित्य, संगीत, कला यातील आनंद तर मुले घेत होतीच पण विज्ञान शिकताना देखील मानवी मूल्ये दृष्टीआड केली जात नव्हती. कुठलेही ज्ञान हे केवळ कोरडे, मूल्यविहीन आणि भावनाशून्य असू शकत नाही यावर रवींद्रनाथांचा विश्वास होता. सौंदर्यपूजक असलेला हा महाकवी सकाळी उमलणारं फूल पाहायला निसर्गाकडे धाव घ्यायचा. ते फूल पाहून कमालीचा आनंदित व्हायचा. त्यांच्या तोंडून सहज उदगार बाहेर पडायचे, ' आमार प्रथम फुलेर । पावो प्रोशादखानी ताई भोरे उठे छि । ' म्हणजे आज पहिल्या फुलाचा प्रसाद मला मिळणार आहे म्हणून तर मी पहाटे उठलोय. हाच आनंदरूपी प्रसाद आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना पोहोचवायचा होता.
रवींद्रनाथांनी ' देश ' नावाच्या संकल्पनेबद्दल त्यावेळी जे सांगितलं, ते आजही पूर्णपणे जसेच्यातसे आपल्याला लागू होते. ते म्हणतात, ' खरा देश म्हणजे काय याची आम्हाला ओळखच नाही. आमच्या बोलण्यात मात्र देशभक्तीपर भाषणांचा सुकाळ असतो. दारुड्याला जशी अन्नापेक्षाही दारू अधिक प्रिय तशी आम्हाला प्रत्यक्ष देशहितापेक्षा देशभक्तीची नशा अधिक प्रिय वाटते. त्यामुळे भारतमाता प्रत्यक्ष कशी आहे हे ठाऊक करून घेण्याची गरज वाटत नाही. आम्ही भारतलक्ष्मीच्या नशेतच गुंग. बायरनच्या कविता, गरिबाल्डीचं चरित्र वगैरे वाचून पॅट्रिऑटिझमच्या कल्पनेत आम्ही दंग होतो. पण प्रत्यक्षात जो आमचा देश, त्याची भाषा विसरून, त्याच्या इतिहासाचा अपमान करून, त्याच्या सुखदुःखाला स्वतःच्या जीवनयात्रेपासून दूर करून आम्ही देशभक्त झालो आहोत. भारतमाता म्हणजे हिमालयाच्या दुर्गम शिखरावर शिलासनावर विराजमान होऊन केवळ करुण सुरांनी वीणा वाजवणारी देवी नव्हे. ' ( क्रमशः )
Ⓒविश्वास देशपांडे, चाळीसगाव
२/७/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...