मुख्य सामग्रीवर वगळा

मोहिनी स्वरगंधर्वाची

 उगवतीचे रंग 

मोहिनी स्वरगंधर्वाची 

नुकताच प्रदर्शित झालेला ' स्वरगंधर्व सुधीर फडके ' हा चित्रपट परवा पाहिला आणि खूप दिवसांनी एक अप्रतिम चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले. लता मंगेशकर, आशा भोसले, पं भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे अशा दिग्गज मराठी गायकांच्या मांदियाळीत आपल्या कर्तृत्वाने एक आगळेवेगळे आणि मानाचे स्थान प्राप्त करणारा गायक म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी. त्यांचे मूळ नाव रामचंद्र. बालगंधर्व, पु ल देशपांडे, आचार्य अत्रे यासारख्या कलाकार आणि साहित्यिकांनी मराठी रसिकांच्या हृदयाकाशात जे मानाचे स्थान पटकावले आहे, त्यातीलच विलक्षण तेजाने तळपणारा एक ध्रुवतारा म्हणजे बाबूजी. 

अशा एखाद्या व्यक्तिमत्वावर चित्रपट काढणे आणि तो रसिकांच्या पसंतीला उतरणे ही गोष्ट तशी दिव्यच म्हणावी लागेल. अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करणे हे त्या त्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांच्यासाठी एक प्रकारचे आव्हानच असते. पण हे आव्हान सुरेखरित्या पेलण्यात ' स्वरगंधर्व सुधीर फडके ' हा चित्रपट यशस्वी झाला आहे. मराठी संस्कृती, मराठी माती, मराठी संगीत, मराठी साहित्य यासारख्या गोष्टींवर प्रेम करणाऱ्या रसिकांनी आवर्जून पाहावा असा हा चित्रपट. आपल्या कर्तव्याची, राष्ट्रभक्तीची जाणीवही हा चित्रपट करून देतो. 

सुधीर फडके यांच्यासारख्या एखाद्या लोकोत्तर कलाकाराचे जीवन अवघ्या तीन तासांच्या मर्यादित कालावधीत रसिकांसमोर मांडणे ही म्हटली तर खूप अवघड गोष्ट. पण योगेश देशपांडे यांनी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे. त्यात त्यांची कल्पकता वाखाणण्यासारखी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे सुधीर फडके यांचे आदर्श. त्यांच्या जीवनावर चित्रपट निर्माण करणे हे त्यांच्या जीवनातील त्यांनी पाहिलेले सर्वात महत्वाचे आणि भव्यदिव्य असे स्वप्न. अथक प्रयत्नांती हे स्वप्न ते पूर्ण करतात. सावरकरांवरील चित्रपटाची निर्मिती त्यांच्या हातून होते. 

चित्रपटाची सुरुवात या सावरकरांवरील चित्रपटाच्या दृश्याने होते. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. लोक रांगेत तिकिटे घेत आहेत. आणि या रांगेत चक्क निर्माते सुधीर फडके ललिताबाईंसह स्वतः उभे राहून तिकीट घेत आहेत. आशा भोसले पण हा चित्रपट पाहायला येणार आहेत. बाबूजी तीन तिकिटे खरेदी करतात. तिथे त्यांना ओळखणारे लोक विचारतात, ' बाबूजी, हा तुमचाच चित्रपट. तुम्ही कशाला तिकीट घेताय ? ' तेव्हा ते म्हणतात, ' मी सुद्धा एक सामान्य रसिक म्हणूनच हा चित्रपट पाहायला आलो आहे. मग मला तिकीट घ्यायला नको का ? ' इथेच त्यांच्या निरपेक्ष वृत्तीचा प्रत्यय आपल्याला येतो. डॉ अशोक रानडे बाबूजींची मुलाखत घेतात. त्या प्रश्नांची उत्तरे देताना बाबूजी जणू आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. फ्लॅशबॅक तंत्राने आणि सुरेख अशा समयोचित निवेदनातून हा चित्रपट रसिकांसमोर उलगडत जातो. 

सुधीर फडके यांचे वडील म्हणजे कोल्हापुरातील प्रसिद्ध वकील विनायकराव फडके. ते कायदेतज्ज्ञ असले तरी त्यांच्या कायदा घरातील सदस्यांवर अन्याय करणारा नाही. अतिशय सहृदय असलेला हा पिता कोरडा कायदपंडित नाही. आपल्या मुलातील संगीताची आवड ते जाणतात. एखादा कुशल माळी जसं वृक्षाला काय हवं नको ते पाहतो आणि ते पुरवतो, मगच तो वृक्ष जमिनीतून उंच भरारी घेऊन गगनचुंबी होतो, लोकांना सावली, फळे, फुले देतो. तसेच बाबूजींच्या वडिलांनी त्यांच्यातील गायनाची आवड ओळखून त्याच्यावर योग्य संस्कार होतील अशी काळजी घेतली. या छोट्या रामला ते स्वतः कोल्हापुरातील गांधर्व संगीत विद्यालयात पं वामनराव पाध्ये यांच्याकडे घेऊन जातात. 

वडिलांनी वाट तर दाखवली आहे पण मार्गक्रमण करायचे आहे ते छोट्या रामला. ही वाटचाल त्याच्यासाठी अजिबात सोपी नाही. गायनाची आवड तर आहे पण जवळ पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे. पाध्येबुवांकडे संगीत शिकताना खरोखरच त्याचा कस लागतो. हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व यांचं गाणं तो रस्त्यावर बाहेर उभा राहून ऐकतो. एकलव्याप्रमाणेच त्यांच्या गायनकलेची आराधना करतो. या दरम्यानच त्याची आणखी एका विनायकाशी भेट होते. हे दुसरे विनायक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकर त्याच्यातील गायन कौशल्य ओळखतात. त्याला आपलं ' मोपल्यांचं बंड ' हे पुस्तक भेट म्हणून देतात आणि संगीतक्षेत्रात नाव कमव, खूप मोठा हो असा आशीर्वाद देतात. सावरकरांचे हे शब्द त्याच्यासाठी प्रेरणा ठरतात. 

पुढे तो संगीताची शिकवणी घ्यायची ठरवतो. पण त्यासाठी जागा मिळत नाही. गावोगाव भ्रमंती करतो. या काळात कधी उपाशी राहावे लागते तर कधी कडू अपमानाचे घोट रिचवावे लागतात. अनेकदा निराशाही येते. आपण कशासाठी जगतो आहोत असे वाटून आत्महत्येचे विचार मनात येतात. पण जगात जशी वाईट माणसे असतात, तशीच चांगली, मदत करणारीही माणसेही असतात. अशी माणसे कधी मित्र बनून तर कधी अनोळखी व्यक्तींच्या रूपाने धावून हा अनुभव त्यांना येतो. 

त्यांच्या एका गायनाच्या कार्यक्रमात त्यांच्या मूळ ' रामचंद्र ' या नावाऐवजी त्यांना आयोजक न. ना. देशपांडे हे ' सुधीर ' म्हणून हाक मारतात. खरोखरच गायनामध्ये धीर, धैर्य असणारा हा ' राम ' पुढे सुधीर म्हणूनच ओळखला जातो. पुढे ते कलकत्त्याला गेले असताना त्यांना ' बाबूजी ' म्हणून हाक मारली जाते आणि ते रसिकांचे लाडके बाबूजी होतात. 

बाबूजींना आपल्या अत्यंत संघर्षमय अशा सुरुवातीच्या आयुष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठाच आधार मिळतो. त्यांची डॉ हेडगेवार, गोळवलकर गुरुजी अशांसारख्या महान व्यक्तिमत्वांशी भेट होते. त्यातूनच पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते बनतात. दादरा नगरहवेलीच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतात. 

तीन तासांचा हा चित्रपट आपल्याला अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवतो. बाबूजींनी संगीतबद्ध केलेली आणि गायिलेली सुरेख गाणी त्यांच्याच जीवनपटाचा एक भाग म्हणून ऐकताना आपण अंतर्बाह्य थरारून जातो. ' हा माझा मार्ग एकला, संथ वाहते कृष्णामाई, एक धागा सुखाचा, पोटापुरता पसा पाहिजे ही गाणी जणू पुन्हा जिवंत होतात. बाबूजींच्या लग्नात मंगलाष्टके म्हणणारा मो. रफी, त्यांच्या घरी येऊन धिंगाणा घालणारा, चहा, भजी हक्काने खाणारा किशोरकुमार आपल्याला आनंदाची सुखद अनुभूती देतात. किशोरकुमार यांच्याच आवाजातील ' खुश हैं जमाना आज पहिली तारीख हैं ' हे गाणं पडद्यावरील त्याचा अभिनय पाहताना ऐकायला खूप छान वाटतं. सुधीर फडकेंच्या संगीतातील ताकद कळत जाते. लता मंगेशकर यांच्या आवाजातील ' ज्योती कलश छलके ' हे भाभी कि चुडियां या चित्रपटातील गीत सुधीर फडके यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील बाबूजींचा प्रभाव दाखवण्यास पुरेसे आहे. आशा भोसले, माणिक वर्मा आदी गायकही या चित्रपटात आपल्याला बाबुजींबरोबर गाताना दिसतात. अपूर्वा मोडक यांनी आशा भोसले पडद्यावर सुरेख साकारल्या आहेत. राजा परांजपेही आपल्याला या चित्रपटात बाबुजींसोबत दिसतात. मराठी रसिकांना आनंदाची अनुभूती देतील असे अनेक प्रसंग या चित्रपटात आहेत. 

सुधीर फडके यांचे यश आपल्याला दिसते पण त्यांनी लहानपणी केलेला प्रचंड संघर्ष फार कमी लोकांना माहिती असतो. या चित्रपटातील तो संघर्ष कधी डोळ्यात पाणी आणणारा आहे, तर श्वास रोखून धरायला लावणारा आहे तर आनंदाचे रोमांच उभे करणारा आहे. सुधीर फडके यांच्या बालपणीची भूमिका अधीश वैद्य याने जिवंत केली आहे. त्याचा चेहरा, डोळे अतिशय बोलके आहेत. तर बाबूजींची तरुणपणाची आणि प्रौढावस्थेतील भूमिका सुनील बर्वे या गुणी कलाकाराने साकारली आहे. हे दोन्हीही कलाकार बाबूजींचे निर्मळ, नितळ व्यक्तिमत्व ठसठशीतपणे आपल्यासमोर उभं करतात. बाबूजींच्या जीवनात त्यांच्या पत्नी ललिताबाईंचे फार मोठे योगदान आहे. त्यांची भूमिका मृण्मयी देशपांडे यांनी साकारली आहे. दुधात साखर मिसळून जावी तशा बाबूजींच्या जीवनात ललिताबाई मिसळून गेल्या आहेत. सुनील बर्वे यांना ललिताबाई म्हणून  मृण्मयीने सुरेख साथ दिली आहे. त्यांच्यातील सहजीवनाचे अनेक प्रसंग अतिशय हृद्य स्वरूपात पडद्यावर साकार झाले आहेत. 

मुलगा ( श्रीधर फडके ) जाणता संगीतकार झाल्यावर त्याला संपूर्ण स्वातंत्र्य देणारे वडील बाबूजींच्या रूपाने या चित्रपटात पाहायला मिळतात. एवढेच नव्हे तर त्याच्या संगीतनिर्देशनात ते गीतगायनही करतात. स्वातंत्र्यवीरांवरील चित्रपटासाठी घरोघरी फिरून मदतीचे आवाहन करणारे बाबूजी आपल्याला पाहायला मिळतात. या चित्रपटातील आणखी एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सुधीर फडके आणि गदिमा उर्फ कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची भेट. या दोघांची भेट म्हणजे जणू समसमा संयोग जाहला. शब्द गदिमांचे आणि संगीत बाबूजींचे. बाबूजींच्या स्वरांनी तर गदिमांच्या शब्दांचे सोने केले आहे. गीतरामायण म्हणजे या दोघांच्या जीवनातील जणू सुवर्णाध्याय. गीतरामायणाला अफाट लोकप्रियता लाभली. पण ते करताना किती अडचणी आल्या आणि या दोघांनी ते आव्हान कसे पेलले याचंही सुरेख चित्रीकरण या चित्रपटात पाहायला मिळतं. 

बाबूजींचं ' पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ' हे गाणं ऐकायला सावरकर आवर्जून येतात. हे गीत ऐकताना त्यांच्या डोळ्यात होणारी अश्रूंची दाटी आपल्याला पाहायला मिळते. १९८३ मध्ये संघाच्या शिबिरात स्वयंसेवकांकडून गाणं बसवून घेणारे बाबूजी आपल्याला पाहायला मिळतात. बाबुजींबद्दल बोलणारे अटलजी आणि त्यांचे शब्द आपल्या अंगावर रोमांच उठवतात. एकंदरीतच बाबूजींच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडणारा आणि त्यांच्या संगीत कारकिर्दीचा सुरेख आढावा घेणारा हा चित्रपट आहे. त्यांच्याच जीवनाचा त्यांच्याच संगीताच्या रूपाने आढावा घेणारा हा ' संगीत स्वरगंधर्व सुधीर फडके ' आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या चित्रपटाचा प्रभाव श्रोत्यांवर एवढा दिसला की चित्रपट संपला तरी श्रोते आपल्या जागेवरून लवकर उठायला तयार होत नाहीत. मराठी संगीतावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आवर्जून पाहावा असा हा चित्रपट. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

६/५/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...