उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग २ )
समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी
या भागात रवींद्रनाथ टागोरांना आपल्या घरातच समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी कशी लाभली ते आपण पाहणार आहोत. त्यातूनच त्यांचे विविधांगी आणि अत्यंत समृद्ध असे व्यक्तिमत्व कसे विकसित होत गेले हेही आपल्या लक्षात येईल.
टागोरांच्या काळात ब्रिटिश सत्ता भारतात स्थिरस्थावर झाली होती. बंगालमधील शहरी भागात इंग्रजांच्या अनेक गोष्टींचे अनुकरण करण्यात धन्यता मानणारा नवशिक्षित वर्ग होता. बंगालमधील लोककला, लोकनाट्ये, लोकगीते इ. गोष्टींना इंग्रजी नाटकांप्रमाणे अत्याधुनिक स्टेज, पडदे, सजावट आदी गोष्टी नव्हत्या. पण त्यातील कला, अभिनय आणि शब्दफेक मात्र पहिल्या दर्जाची होती आणि प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारी होती. पण इंग्रजांना याची जाण नसल्याने आणि त्यांना ते जाणून घ्यायचेही नसल्याने त्यांनी या ग्रामीण बंगालमधील लोककलांना ग्रामीण, उठवळ आणि रानटी अशा प्रकारचा शिक्का त्यावर मारला. इंग्रजी शिक्षण घेऊन नुकतेच शिक्षित झालेल्या शहरी लोकांना सुद्धा मग आपल्या देशातील, प्रांतातील ही लोककला ' क्रूड, अनपॉलीश्ड ' वगैरे वगैरे वाटायला लागली. पण बंगालच्या ग्रामीण भागात या लोककला आपले अस्तित्व टिकवून होत्या. कोलकात्यासारख्या शहरी भागातील वर्ग मात्र इंग्रंजांच्या नाट्यपरंपरेचे अनुकरण करण्यात धन्यता मनात होता. शहरी आणि ग्रामीण भागात पडणारी ही दरी रवींद्रनाथांच्या फार लवकर लक्षात आली होती. या सगळ्या गोष्टींचे मूळ इंग्रजी शिक्षणात आहे असे त्यांचे मत झाले होते.
कोलकात्याजवळील टागोरांचे निवासस्थान जोराशंको वाडी म्हणजे कला, संस्कार आणि वारसा यांची पाठशाळाच होती. टागोरांच्या घरातील मंडळी आणि त्यांचे पूर्वज कलांचे चाहते होते. कलेचा कोणताही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. जितक्या तन्मयतेने त्यांच्या घरी भजने गायिली जात, तितक्याच समरसतेने लोकगीते, नृत्य, नाट्य इ. चा सुद्धा आस्वाद घेतला जाई. त्यांच्या घरातील पुरुष कुठल्या ना कुठल्या तरी कलेत निपुण होते. कोणाच्या हाती चित्रकाराचा कुंचला असायचा तर कोणाच्या हाती लेखणी. कोणाच्या हाती एखादे वाद्य असायचे तर कोणी अभिनयात निपुण होता. धार्मिकतेचे उगीचच अवडंबर नव्हते. टागोरांच्या जोराशंको वाडीत एक विद्वज्जन समागम सभा ' भरत असे. या सभेसाठी साहित्यिक, तत्वज्ञानी आणि कलावंत मंडळींची हजेरी मोठया प्रमाणात असायची. यात नाट्य, काव्य, नृत्य आणि विविध प्रकारच्या कलाविषयांवर मुक्त चर्चा होत असे.
त्या काळात मुलींना, स्त्रियांना नाटकात काम करण्यास बंदी होती. मुलींनी नाटकात काम करणे, नृत्य करणे म्हणजे जणू फार मोठा अपराध होता. धर्म बुडवण्यासारखेच होते. टागोर कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या घरातील मुली नाचवणे म्हणजे तत्कालीन समाजाच्या दृष्टीने फार मोठा अपराध होता. टागोर कुटुंबीय मात्र असे मानत नव्हते. मुलींना, महिलांना सुद्धा सगळ्या कला शिकण्याची संधी दिली पाहिजे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊन ते समृद्ध झाले पाहिजे असाच त्यांचा दृष्टिकोन होता. सुधारक म्हणून प्रौढी मिरवायची आणि घरातील महिलांचा सन्मान करायचा नाही असला दांभिकपणा त्यांच्याजवळ औषधालाही नव्हता. स्वतः टागोरांनी आपल्या एका मुलाचे लग्न एका बालविधवेशी लावून दिले होते आणि आपल्या आधुनिक विचारांचा परिचय दिला होता. त्यांचे सुधारणावादी विचार फक्त बोलण्यापुरते नव्हते. तर त्याप्रमाणे वागणारे ते आणि त्यांचे कुटुंबीय होते. पण त्या काळातील लोकांना टागोर कुटुंबियांचे असे वागणे धर्मद्रोह वाटत होते. त्याची परिणीती टागोर कुटुंबियांना वाळीत टाकण्यात झाली होती.
टागोरांना आपल्या नाटकांची बीजे भोवतालच्या सामाजिक परिस्थितून, रामायण, महाभारतासारख्या ग्रंथातून मिळाली होती. वयाच्या केवळ बाराव्या वर्षी त्यांनी शेक्सपिअरच्या ' मॅकबेथ ' नाटकाचे भाषांतर केले होते तर वयाच्या विसाव्या वर्षी ' वाल्मिकी प्रतिभा ' या नावाचे अतिशय अप्रतिम असे गीतनाट्य त्यांनी लिहिले. आजकाल ज्यांना आपण प्रायोगिक नाट्यप्रयोग म्हणतो अशा प्रकारची अनेक प्रायोगिक नाटके टागोरांनी लिहिली, बसवली आणि रंगभूमीवर सादर केली. त्यांना जागतिक कीर्ती प्राप्त झाल्यानंतरही आपल्या स्वतःच्या नाटकांमध्ये अभिनयासाठी ते स्वतः उभे राहत.
टागोरांच्या नाटकांचे एक वैशिष्ट्य होते. लोकांना नाटके हवी म्हणून त्यांनी कधीच नाटके लिहिली नाहीत. त्यांचे नाटक त्यांना आलेल्या अनुभूतीतून आले. जे आतून स्फुरले तेच त्यांनी लिहिले. एखादे नाटक बसवायचे म्हणून नाटक लिहिणारे लेखक आणि केवळ आपल्याला वाटते ते उत्स्फूर्तपणे शब्दबद्ध करणारे रवींद्रनाथ हा फरक त्यांच्यात आणि इतर नाटककारांमध्ये सांगता येईल. प्रेक्षकांना काय हवे आहे त्याचा त्यांनी विचार केला नाही. प्रेक्षकांना जे हवे ते देण्यापेक्षा जे आपल्याला वाटले ते त्यांनी लिहिले आणि त्यांनी आपल्या स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार केला हे त्यांचे मोठेपण आहे. नाटकात गीते हवीत म्हणून मुद्दामून गीते न लिहिता, त्यांना ज्यावेळी प्रेक्षकांना नात्याची काव्यात्म अनुभूती द्यावीशी वाटेल, त्यावेळी त्यांनी ती गीतनाट्यातून दिली. त्यातील काव्य एखाद्या सुंदर फुललेल्या फुलाप्रमाणे त्यांच्या अंतरंगातून उमलून येत असे. त्यातूनच त्यांचे रवींद्र संगीतही जन्मले. रंगभूमीवरील प्रथितयश नट आपल्या नाटकात घेण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या परिवारातील, परिसरातील, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, सेवक आदींना त्यांनी संधी दिली आणि त्यांच्यातून अप्रतिम असे कलाकार घडवले.
जीवनातील सत्याबरोबरच रवींद्रनाथ हे जीवनातील सौंदर्याचेही उपासक होते. निसर्गातील रौद्र रूपातही सौंदर्य पाहणारा हा माणूस होता. त्याशिवाय जीवनाची एकात्म अनुभूती येत नाही असे त्यांना वाटत असे. प्रख्यात आंग्ल नाटककार शेक्सपिअरने म्हटले आहे की ' जग ही एक रंगभूमी आहे आणि आपण सगळे या रंगभूमीवरील कलाकार आहोत. प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. ' या सत्याचा साक्षात्कार त्यांना होत होता आणि त्यांच्या केवळ साहित्यकृतीतूनच नव्हे तर वागण्याबोलण्यातून हा अविष्कार प्रकट होत होता. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३०/०५/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा