मुख्य सामग्रीवर वगळा

सावध ऐका पुढल्या हाका


उगवतीचे रंग 

सावध ऐका पुढल्या हाका 

काही घटनांनी समाजमन ढवळून निघते. असे काही घडले की या समाजाचे, देशाचे पुढे काय होणार असा विचार मनात येतो. केशवसुतांची ' तुतारी ' कविता आठवते. त्या कवितेतली ' सावध ऐका पुढल्या हाका ' ही ओळ तर प्रकर्षाने सारखी आठवत राहते. गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रात, समाजमाध्यमात ज्या दोन घटनांची प्रामुख्याने चर्चा सुरु आहे, त्या अशा. एका धनदांडग्याच्या एका मुजोर मुलाने दारूच्या नशेत वेगात मोटार चालवून दोन निष्पापांचा बळी घेतला. दुसऱ्या एका घटनेत एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ३० मुलंमुली नको त्या अवस्थेत सापडले. त्यातील बहुसंख्य मुली या हिंदू समाजाच्या तर मुले मुस्लिम समाजातील असल्याचे जो व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरतो आहे, त्यातून लक्षात येतं. दोन्ही घटनात दोषी आहेत ते देशातील तरुण. या दोन्ही घटना ज्या शहराला आपण विद्येचं माहेरघर समजतो अशा पुणे शहरात घडलेल्या आहेत. पण शहर पुणे, मुंबई, दिल्ली यासारखे कोणतेही असो, या घटना तरुणाई ज्या दिशेने चालली आहे त्याच्या प्रातिनिधिक आहेत. ज्यांच्या हाती देश द्यायचा, त्यांची अशी अधोगती होताना पाहून भविष्याची चिंता वाटते. मन विषण्ण होतं. 

एका फ्रेंच कवीनं असं म्हटलं होतं की तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत ते मला सांगा. मी तुमच्या देशाचे भविष्य सांगतो. अगदी बरोबरच आहे. जे मनात आहे तेच ओठावर येणार. कृतीतही तेच उतरणार. या देशातली तरुणाई जर क्लब, पब मध्ये जाणारी असेल, नको त्या वयात जर मदिरा आणि मदिराक्षीच्या आहारी जाणारी असेल, तर या देशाचे भविष्य सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही. हुक्का पार्लर, रेव्ह पार्टी या सारखे शब्द आधी माहितीही नव्हते. आता मीडियामध्ये वारंवार त्याचा उल्लेख आल्यामुळे ते ज्ञात झाले आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात येते ती अशी की अशा ठिकाणी जाणारी मुलंमुली बहुधा सामान्य मध्यमवर्गीय घरातील नसावीत. पण तरीही शक्यता नाकारता येत नाही. 

आपण सारा दोष मुलांकडे ढकलून देऊन नामानिराळे होऊ शकत नाही. आपल्या जबाबदारीतून सुटका करून घेऊ शकत नाही. ज्या वेळी आपलं एक बोट मुलांच्या चुका दाखवण्याकडे असतं, त्या वेळी उरलेली चार बोटं आपल्या स्वतःकडे अंगुलीनिर्देश करीत असतात. आपण म्हणजे पालक, शिक्षक आणि ज्या ज्या घटकांवर मुलांना घडवण्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदारी आहे, ते सगळे घटक यासाठी जबाबदार आहेत. पण प्रामुख्याने ही जबाबदारी येते पालकांवर. असं म्हटलं जातं की एकवेळ आईवडील होणं सोपं आहे पण जबाबदार पालक होणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. 

वरील दोन घटनांमध्ये किंवा त्यासारख्या अन्य घटनांमध्ये ज्यांची ज्यांची अडकलेली असतील, त्यांनी थोडं तरी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. पालक म्हणून आपण कुठे चुकतो आहोत का, कमी पडतो आहोत याचा जरूर विचार व्हायला हवा. आपण आपल्या उत्तम आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुलांना हवे ते देऊ शकतो. त्यांनी केलेले हट्ट पुरवू शकतो. पण त्याबरोबर संस्कारांचं बीजारोपण आपण करतो का ? आपल्या मुलाने किंवा मुलीने एक उत्तम नागरिक, चांगला माणूस व्हावं म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करतो का ? आपण त्यांना हव्या त्या गोष्टींसाठी केवळ पैसे देऊन मोकळे होतो. पण या पैशांचा विनियोग तो किंवा ती कशासाठी करताहेत याकडे कितपत लक्ष ठेवतो ? त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत, ते घरातून बाहेर पडल्यावर खरोखरच शाळा, कॉलेज किंवा ज्या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जायचे तिथे जातात का ? जात असतील उरलेल्या वेळेत कुठे जातात ? या गोष्टींकडे पालक म्हणून आम्ही लक्ष ठेवायलाच हवे. डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी आमची गत होते आहे का ? पाठीवर काठी बसल्यावरच आम्हाला जाग येणार का ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. 

आज आम्ही भौतिक सुखसुविधांमध्ये प्रमाणाबाहेर स्वतःला गुरफटून घेतले आहे. त्या पलीकडे आम्हाला काही दिसतच नाही. माझ्याकडे पैसा आहे, मी काय हवे ते करीन. माय लाईफ, माय रुल्स. असे खुशाल ते म्हणतात. पण जी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत माणसे असतात, ती ही गोष्ट गृहीत धरून चालतात की लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्हीही हातात हात घालून चालतात आणि चालल्या पाहिजेत. पैशाबरोबरच माणुसकीचा संस्कार आला पाहिजे. जिथे माणुसकी, संवेदनशीलतेचा अभाव असतो, अशी माणसं म्हणजे आत्मा हरवलेली कलेवरच. 

आपल्या देशाला साधुसंतांची, ऋषीमुनींनी थोर परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महापुरुषांनी तरुण वयातच केवढे कार्य केले ! शिवाजी महाराजांनी तर स्वराज्याचे तोरण ऐन तारुण्यातच बांधले ना ! ही इतिहासातील उदाहरणे झाली तर आजही तरुण वयातच नेत्रदीपक कार्य करणाऱ्या तरुणांची आपल्या देशात कमी नाही. डोळे उघडे ठेवले तर आपल्या भोवतीच अनेक उदाहरणे दिसतील. डॉ राधाकृष्णन एका ठिकाणी असं म्हणाले होते की आपण माणूस अर्धवटच घडवला. म्हणजेच आपल्या मुलांना माणूस म्हणून पूर्णांशाने घडवण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. अशा माणसांच्या ताब्यात पुढे आपल्याला देश द्यायचा आहे. आज राजकारणी ,अधिकारी, नेते, मंत्री, उद्योगपती जो तो केवळ आपला स्वार्थ पाहताना दिसतो आहे. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना जोपर्यंत स्वतःपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत मला काय त्याचे अशा सोयीस्कर प्रवृत्तीने गप्प बसत आहेत. पण जेव्हा शेजाऱ्याच्या घराला आग लागलेली असते, तेव्हा त्या आगीचा धोका आपल्याही घराला कधी ना कधी होऊच शकतो हे विसरून चालणार नाही. अशा वेळी हातावर हात धरून बसून राहणे चालणार नाही. संकट आपल्यापर्यंत येईल याची वाट न पाहता वेळीच त्याचा प्रतिबंध करायला हवा. 

अशा काही घटना घडल्या की आम्ही वरवरची मलमपट्टी करतो. मुलाचं वय गाडी चालवण्यायोग्य नसताना, त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसतानाही आपण त्याच्या ताब्यात गाडी देतो. तो बारमध्ये, पबमध्ये किंवा आणखी कुठे जातो हे माहित असूनही त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करतो. माझा मुलगा आहे, म्हणून त्याच्यासाठी वेगळे नियम असावेत अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो ? कायद्यापुढे सगळे समान असतात असं आपण नुसतं म्हणतो, पण खरंच कायदा सगळ्यांसाठी समान असतो का ? पोलीस, अधिकारी, नेते, सगळ्या गुन्हेगारांना समान वागणूक देतात का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत हे सुज्ञास सांगण्याची आवश्यकता नाही.

 आपण वरवरच्या फांद्या छाटतो. पण मुळापर्यंत आपण कधी जाणार ? या सगळ्या समस्यांचे मूळ मुलांना लहानपणापासून दिल्या जाणाऱ्या संस्कारात आहे हे आपल्या कधी लक्षात येणार ? नुसते सांगून मुलं ऐकत नाहीत. आईवडिलांनी आपल्या स्वतःच्या वागण्याने त्यांच्यापुढे आदर्श उभा करावा लागतो. त्यासाठी आईवडिलांनी पालक म्हणून त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते. संयमाचे, संस्कारांचे बाळकडू मुलांना द्यावे लागते. आपले पाल्य नुसते शिक्षित होऊन चालणार नाही, तर ते सुशिक्षित झाले पाहिजेत. सुशिक्षित होता होताच सुसंस्कारित झाले पाहिजेत. 

बुद्धिभेद, जातीभेद यासारख्या गोष्टींमुळे चांगल्या गोष्टींची सुद्धा आम्ही माती केली आहे. मनाला घडवणारे, वळण लावणारे मनाचे श्लोक आम्हाला नको आहेत. जीवनात आपल्या कर्तव्याला प्रमाण मानून कशी वाटचाल करावी हे सांगणारी भगवद्गीता आम्हाला नको आहे. आम्ही त्यावर धार्मिक वगैरे शिक्का मारून ते नाकारतो आहोत. अशा प्रकारची लेबले लावण्यात आम्ही पटाईत आहोत. सगळ्याच जुन्या गोष्टी त्याज्य नसतात आणि सगळ्याच नवीन गोष्टी स्वीकारार्ह नसतात हे आम्ही जाणून आहोत. पण त्याकडे डोळस दृष्टीने बघत नाहीत. अर्थात सर्वच परिस्थिती वाईट आहे असा निष्कर्ष मी अशा घटनांवरून काढणार नाही. अनेक जागरूक पालक, शिक्षक आपल्या अवतीभवती सुद्धा आहेतच. विधायक कामात आणि स्वतःला घडवण्याच्या कार्यात गुंतलेली तरुणाई सुद्धा आहेच. ' प्रत्येक काळ्या ढगाला एखादी रुपेरी किनार असतेच. त्यामुळे आशावादी तर राहू या पण भूमिका जागरूक पालकाची, नागरिकाची आणि जागल्याची घेऊ या. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२६/०५/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...