उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग १ )
कौटुंबिक पार्श्वभूमी
प्रख्यात लेखक पु ल देशपांडे यांचे ' रवींद्रनाथ : तीन व्याख्याने ' या नावाचे एक छोटेखानी सुंदर पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर पुलंच्या व्यासंगी व्यक्तिमत्वाची आपल्याला कल्पना येते. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या पुलंनी केवळ विनोदी साहित्य निर्माण केले नाही तर आपल्याला विचारप्रवण करील अशा प्रकारची साहित्य निर्मिती देखील त्यांनी केली आहे याची साक्ष हे पुस्तक देते. त्या पुस्तकाच्या केलेल्या वाचनातून, काही माझ्या विचारातून आणि अन्य काही माहितीच्या आधारे रवींद्रनाथ, त्यांना लाभलेला वारसा आणि त्यांचे कार्य विशेषतः शांतिनिकेतनाच्या संदर्भात आपल्यासमोर काही भागातून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
टागोर हे मुळात ठाकूर. इंग्रजांनी त्या नावाचा उच्चार ' टागोर ' असा केला आणि ते ठाकूरचे टागोर झाले. रवींद्रनाथ हा माणूस काय नव्हता ! कवी, लेखक, देशभक्त, तत्वज्ञ, शिक्षक, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ, संगीताचे जाणकार आणि खरं सांगायचं तर एक अत्यंत समृद्ध व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती. भारत आणि बांगलादेश या दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिण्याचा बहुमान त्यांच्या नावावर आहे. असे हे समृद्ध, संपन्न व्यक्तिमत्व एकाएकी घडले नाही. त्यासाठी त्यांना जी पार्श्वभूमी लाभली तिचा त्यात मोठा वाटा आहे. ज्या बंगाल प्रांताने आपल्या देशाला अनेक क्रांतिकारक, साहित्यिक, कलाकार दिले त्याच बंगालने रवींद्रनाथ नावाचे हे रत्न आपल्या देशाला दिले. या ' रवीच्या ' प्रकाशाने केवळ बंगालच नाही तर भारत प्रकाशमान झाला. परदेशातही हा प्रकाश पोहोचला आणि भारतमातेचा गौरव त्यांच्या रूपाने जगभर पसरला. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वातील समृद्ध वारसा त्यांचे आईवडील, आजोबा त्यांच्याकडे आला. आपल्या मुलांना कसे घडवावे याचे दर्शन त्यांच्या आईवडील, आजोबा यांच्याकडे पाहिले की घडते. त्यांनी आपल्या मुलांना ज्या प्रकारचे वातावरण घरात उपलब्ध करून दिले ते पाहिल्यानंतर ही गोष्ट लक्षात येते.
कोलकात्याजवळ जोराशंको वाडी हे टागोर कुटुंबियांचे निवासस्थान. सांपत्तिक स्थिती उत्तम. जमीनदार असलेलं हे घराणं. या कुटुंबाला लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्हींचा वरदहस्त लाभलेला. अशा या कुटुंबात रवींद्रनाथांचा जन्म झाला. त्यांच्या या कौटुंबिक वारशाला समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन परिस्थिती डोळ्यासमोर आणावी लागेल. रवींद्रनाथांची जडणघडण आणि कार्य ज्या काळात झाले तो काळ म्हणजे साधारणपणे १९ व्या शतकाचा उत्तरार्ध आणि २० व्या शतकाचा पूर्वाध. या काळात इंग्रज सत्ता भारतात स्थिरस्थावर झाली होती. इंग्रजी भाषा, इंग्रजी शिष्टाचार भारतीयांच्या अंगवळणी पडले होते. इंग्रजी शिक्षणातून नवनवीन गोष्टी, तत्वज्ञान, शोध यांचा परिचय भारतीयांना होत होता. इंग्रजी भाषा बोलणे, पाश्चात्य शिष्टाचारांचे पालन करणे यात नवशिक्षित वर्ग विशेषतः शहरी वर्ग धन्यता मानत होता. इंग्रजांना आपलं राज्य चालवण्यासाठी कारकून वर्ग हवा होता. इंग्रजांच्या या जाळ्यात शहरी आणि बुद्धिजीवी वर्गातील बरोबर अडकले. बंगाली भाषेत अशा लोकांना ' मोशीजीवी ' म्हटलं जाई. मोशीजीवी म्हणजे शाईजीवी. आपल्या लेखणीवर म्हणजेच कारकुनीवर उपजीविका करणारे. इंग्रजी भाषा उत्तम प्रकारे बोलता, लिहिता, वाचता आली की सर्व सुखांची किल्लीच जणू आपल्या हाती आली असं मानणारा हा वर्ग होता.
असे सगळे वातावरण असले तरी याचा अर्थ असा नव्हता की आपल्या भारतीय भाषा, संस्कृती, प्राचीन भारतीय वाङ्मय या सगळ्या गोष्टी टाकाऊ किंवा कालबाह्य झाल्या होत्या. पण दुर्दैवाने साहेबांच्या भाषेत शिक्षण घेणाऱ्या, त्याचे अनुकरण करणाऱ्या मंडळींना आपल्याच या गोष्टी कालबाह्य वाटू लागल्या होत्या. आपली भाषा समृद्ध असताना आणि सर्वत्र बोलली जात असताना ती बोलण्यात कमीपणा वाटणे, इंग्रजीतच बोलणे, लिहिणे आणि भाषण करणे यात मोठीच प्रतिष्ठा वाटत होती. आपल्याकडे विशिष्ट कारणाने दरवर्षी भरणाऱ्या जत्रा, धार्मिक उत्सव, पूजापाठ, पारायणे आदी गोष्टी म्हणजे थोतांड वाटू लागले होते. अर्थात गोऱ्या साहेबाचा या गोष्टीला हातभार होताच.
या सगळ्या पार्श्वभूमीवर रवींद्रनाथांच्या कुटुंबातील वातावरण कसे होते हे जाणून घेणे मोठे मनोरंजक आणि तितकेच बोधप्रद आहे. टागोरांच्या पूर्वजांचे आणि इंग्रजांचे अतिशय उत्तम संबंध होते. इंग्रजी भाषा, इंग्रजी शिष्टाचार या गोष्टींशी त्यांचा अतिशय उत्तम परिचय होता. एवढेच नव्हे तर टागोर अँड कंपनी च्या जहाजातून परदेशात मालाची चढउतार आणि व्यापार होत होता. एवढं सगळं असलं तरी या कुटुंबानं आपलं स्वत्व कधीच सोडलं नाही. ब्रिटिशांच्या सत्तेच्या प्रभावाला भुलून आपली संस्कृती त्यांनी कधीच त्याज्य मानली नाही. इंग्रजी भाषा, विज्ञानातील नवनवीन शोध, इंग्रजी वाङ्मय या गोष्टींशी त्यांचा उत्तम परिचय होता पण या गोष्टींचा स्वीकार करताना आपलं ते त्याज्य किंवा वाईट असा ग्रह या कुटुंबाने कधीच करून घेतला नाही. वेद, उपनिषदे आणि आपल्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टी आणि परंपरा यांचे पालन त्यांनी केले. त्यात आपल्या रूढीपरंपरांचे आंधळेपणाने पालन करण्याची वृत्ती मात्र नव्हती. नव्यातील चांगले ते स्वीकारणे आणि जुन्यातील कालबाह्य झालेल्या गोष्टींचा त्याग करणे हे करण्यासाठी जो डोळस विवेक लागतो, तो त्यांच्यापाशी उत्तम होता.
रवींद्रनाथांच्या आजोबांचं नाव होतं द्वारकानाथ. घरची जमीनदारी आणि खानदानी ठाकूर घराणे यामुळे त्यांची राहणी अत्यंत थाटामाटाची असायची. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळे आणि वागण्याबोलण्याच्या पद्धतीमुळे ते ' प्रिन्स द्वारकानाथ ' म्हणून ओळखले जात. इंग्रज राजघराण्यात त्यांची उठबस होती. व्हिक्टोरिया राणीच्या पंक्तीला बसण्याचा मान त्यांना मिळत होता. पण असे असले तरी हा माणूस आपलं स्वत्व राखून होता. भारतीय धर्म, परंपरांचा जाज्वल्य अभिमान त्यांना होता. त्या काळातील थोर समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांचे ते मित्र आणि अनुयायी होते. आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतानाच आंधळ्या रूढीपरंपराचे पालन करणे त्यांना मान्य नव्हते. राजा राममोहन रॉय यांची ही सुधारक विचारसरणी त्यांना मान्य होती. आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टींना विरोध करताना त्यांनी बोटचेपी भूमिका कधीच घेतली नाही. भिक्षुकशाहीवर टीका करताना केवळ हिंदू धर्मातीलच भिक्षुकशाहीवर टीका न करता ब्रिटिश धर्मप्रसारक पाद्री यांच्यावरही टीका करण्याचे, त्यांच्यातील दोष दाखवण्याचे धैर्य द्वारकानाथांजवळ होते.
युरोपातील थोर तत्त्ववेत्ते आणि समाजसुधारक यांच्या कार्याचीही त्यांना उत्तम माहिती होती. त्याचा अभ्यास होता. त्यांच्या विचारांचा उपयोग भारतीय समाजातील अंधश्रद्धा आणि दोष घालवण्यासाठी करावा असे त्यांना वाटत होते. युरोपातील लागलेले शोध आणि वैद्यकीय प्रगती यांचा उपयोग आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी व्हावा याची तळमळ द्वारकानाथांना होती. त्या तळमळीतूनच त्यांनी कोलकात्याला मेडिकल कॉलेज काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या काळात त्यांनी या कॉलेजसाठी चार लाखांची देणगी दिली. मेडिकल कॉलेजमध्ये दाखल होणारे विद्यार्थी अभ्यास म्हणून प्रेतांची केली जाणारी चिरफाड करायला घाबरतात असे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्या ठिकाणी ते स्वतः उभे राहून विद्यार्थ्यांना ते करण्यासाठी प्रोत्साहन देत असत.
त्या काळातील बंगालमधील सनातनी लोकांची मनःस्थिती पाहता हे कार्य सोपे नव्हते. प्रेतांची चिरफाड करायला सनातन्यांचा तीव्र विरोध होता. प्रेताला शिवणे हे निषिद्ध मानले जात होते. ब्रिटिशांचे अंधानुकरण करणाऱ्या लोकांनी ही गोष्ट मात्र स्वीकारायला विरोध केला होता. कालीमातेला बोकडाचा बळी देणे मात्र त्या लोकांना चालत होते. असहाय विधवांचा समाज छळ करीत होता. या सगळ्या गोष्टींविरुद्ध द्वारकानाथ ठामपणे उभे राहिले. मात्र त्यामुळे समाजाची उपेक्षा आणि छळ टागोर कुटुंबियांना सहन करावा लागला. पण द्वारकानाथ आणि त्यांच्या कुटुंबियातील अन्य सदस्य मात्र आपल्या मतावर ठाम होते. प्रवाहाबरोबर वाहत न जाता स्वयंप्रज्ञ वागणे कसे असते त्याचा प्रत्यय या टागोर कुटुंबीयांकडे पाहिले की आपल्याला येतो.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२३/०५/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा