उगवतीचे रंग
जीना यहाँ मरना यहाँ
असं म्हणतात की सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धाला त्याच्या वडिलांनी जीवनातील दुःखाचं दर्शन घडू नये म्हणून त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला हवी ती सगळी सुखं दिली. पण जीवनातील सत्याला प्रत्येकाला सामोरं जावेच लागतं. तसे त्यालाही जावं लागलं. पण काही काळ का होईना पण सिद्धार्थला जीवनातील दुःखांपासून दूर ठेवण्यात शुद्धोधन यशस्वी झाला. कारण तो राजा होता. पण आज आपल्याला मात्र असे करणे शक्य नाही. जीवनातील चांगले आणि वाईट, सत्य आणि असत्य, सुंदर आणि बीभत्स अशा सगळ्याच गोष्टी नित्यनियमाने काहीशा एकत्रितपणे आपण अनुभवत असतो. ' जिंदगी के रंग कई रे ' असं एक सुंदर गाणं आदमी और इन्सान या चित्रपटात आहे. खरोखरच डोळे उघडे ठेवले तर आयुष्याचे अनेक रंग अनुभवायला मिळतात. काही रंग आनंद देणारे, काही उदास करणारे, काही भीतीदायक तर काही धीर देणारे.
झालं असं की परवा एका लग्नानिमित्त आयोजित केलेल्या स्वागत समारंभासाठी गेलो होतो. बड्या घरचं कार्य असल्यानं एका भव्य अशा फार्महाऊसमध्ये सोहळ्याचं आयोजन केलं होतं. प्रवेशद्वारापासूनच कार्यक्रमाची श्रीमंती आणि थाटमाट नजरेत भरत होता. वाळ्याच्या सुगंधाचं अंगावर शिंपण होत होतं. उपस्थितांच्या करमणुकीसाठी आत प्रवेशल्यावर एका बाजूला एक बहारदार अशी ऑर्केस्ट्राची मैफल सुरु होती. वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजच्या खाली लांबपर्यंत रांग होती. जेवणासाठी तर विविध प्रकारच्या स्वादिष्ट व्यंजनांची रेलचेल होती. आपल्या आवडीनुसार हव्या त्या पदार्थांचा आस्वाद उपस्थित घेत होते.
जीवनाचं उत्सवी दर्शन या कार्यक्रमातून घडत होतं. जीवन म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य, मौज असाच संदेश हा सोहळा जणू उपस्थितांना देत होता. वधूवरांचे तरुण मित्र मैत्रिणी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांचे पोशाख, वागणे, बोलणे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. वधूवरांचे जवळचे आप्तही या वेळी उपस्थित राहून उपस्थितांचे स्वागत करीत होते. वधूवरांच्या एका नव्या जीवनाची आनंदी सुरुवात होत होती.
जिथे हा मंगल सोहळा सुरु होता, त्याच्या पाठीमागेच काही अंतरावर एक स्मशानभूमी होती. तिथे त्याचवेळी कोणाच्या तरी जीवनाचा शेवट होत होता. अल्पशा आजाराने मृत्यूला कवटाळणाऱ्या एका दुर्दैवी जीवाचा अंत झाला होता. त्याची आजाराशी झुंज अयशस्वी ठरली होती. जीवन आणि मृत्यू यांच्यातील संघर्षात मृत्यूचे पारडे जड ठरले होते. हातातोंडाशी आलेला तरुण मुलगा एकाएकी जीवघेण्या आजाराचे निमित्त होऊन हे जग सोडून गेला होता. त्याच्या आईवडिलांचा शोक पाहवत नव्हता.
एकीकडे ऑर्केस्ट्राचे स्वर वातावरण धुंद करीत होते. दुसरीकडे दुःखाचा आर्त टाहो. एकीकडे आनंद, सुगंधाची लयलूट होत होती, तर दुसरीकडे शोकाकुल वातावरण. एकीकडे मिष्टान्नावर ताव मारणारे लोक होते तर दुसरीकडे एवढे प्रचंड दुःख होते की त्यात कोणाला भूक तहानेची शुद्ध नव्हती. एकीकडे नवीन जीवनाची सुरुवात होत होती तर दुसरीकडे एका उमलू पाहणाऱ्या जीवनाचा शेवट झाला होता.
त्याच फार्महाऊसच्या बाजूला एक सुंदर बाग आहे. तिथे तर वेगळेच दृश्य बघायला मिळत होते. कुठल्यातरी कोपऱ्यात तरुणतरुणींचे एकमेकांशी हितगुज चालले होते. बागेतल्या बाकांवर काही जोडपी स्थानापन्न झाली होती. ती तेथील वातावरणाचा आनंद घेत होती. कोणीतरी आजीआजोबा आपल्या नातवाला खेळवीत होते. लहान मुले विविध खेळांचा आनंद घेत होती. मुलांसाठीचे झोके, सीसॉ चैतन्याने फुलले होते.
या तिन्ही दृश्यानी मला विचारप्रवण केले. मी मनात म्हटले, ' बा जीवना, किती विविध रंग तुझे ! एकीकडे तू जगण्याची आस निर्माण करतोस. जीवन म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य असं वाटत असताना दुसऱ्या बाजूला त्याच जीवनाचा फोलपणा सुद्धा तू दाखवून देतोस ! पैशानं, श्रीमंतीनं, सौंदर्यानं वा आणखी कशानंही गर्वाचा फुगा फुगला असेल तर, तो एक दिवस तो फुगा फुटणारच हे निश्चित ! ' असेच तुझे जणू आम्हाला सांगणे असते ना !
तुझं सांगणं बरोबरच आहे. तू आम्हाला सुरुवात आणि शेवट दाखवतोस. जीवनाचे खरे स्वरूप नजरेस आणून देतोस. पण तुला म्हणून सांगतो. हा मानव हार मानणारा नक्कीच नाही. तू सांगतोस ' तुमच्या जीवनाची ही आनंदी सुरुवात, आणि हा असा शेवट. तेव्हा काय समजायचे ते समजा. ' पण मी काय करतो ? तू जे सांगतोस ना त्याच्या उलट विचार करतो. मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे मला माहिती आहे पण जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान जीवन नावाचा एक सुंदर प्रवास आहे रे ! तो कसा सुंदर आणि सार्थ करायचा हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
तू आम्हाला लाख सांगशील, ' जीना यहाँ मरना यहाँ ' पण आम्ही पडलो जीवनावर प्रेम करणारे. आम्ही म्हणतो, ' या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ' तू दाखवलेल्या जीवनाच्या भयंकर सत्याने निराश होणारे आम्ही नक्कीच नाही. आमचे पाडगावकर म्हणतात, ' कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी ' आम्ही माणसात परमेश्वर पाहणारे, निसर्गातील फुलात, खेळणाऱ्या मुलात, वाहणाऱ्या झऱ्यात, झुळझुळणाऱ्या वाऱ्यात चैतन्य अन आनंद शोधणारे. परमेश्वर इथेच आहे. त्यामुळे जे जीवन आहे ते आम्ही आनंदानं जगू. कोलंबसाचे गर्वगीत आम्ही शिकलो आहोत. लाख संकटं आली तरी येऊ देत. कुसुमाग्रज म्हणतात, ' अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. ' कर्तव्यमार्गावर सतत कार्यरत राहण्याची शिकवण देणारा भगवान श्रीकृष्ण आमचा आदर्श आहे. तेव्हा हे जीवना, तुझ्या सगळ्या रूपांचे स्वागत आहे. फक्त तू सुद्धा आमच्या पाठीवर हात ठेवून फक्त ' लढ म्हण. '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२०/५/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा