उगवतीचे रंग
मी फुल तृणातील इवले
सध्या मे महिना सुरु आहे. वैशाख वणवा अंगाची लाही लाही करतो आहे. माणूस, झाडे, वेली, पशुपक्षी सारेच या दाहक वातावरणात होरपळत आहेत. मी गावाहून आलो तेव्हा माझ्या बागेतील गुलाब, जास्वंद आणि इतर फुलझाडे कोमेजून गेलेली दिसली. जणू ती मला म्हणत होती, ' तुम्ही छान ए सी, फॅन किंवा कुलर मध्ये बसता. थंडगार पाणी, सरबत, लस्सी, आईस्क्रीम खाता. आम्हाला काही पर्याय आहे का ? आम्हाला जागेवरून हलताही येत नाही. बागेत झाडांच्या बाजूला लावलेली इवली इवली लिलीची फुले तर कोमेजून गेली होती. मला आठवली ती मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर कविता. ' मी फुल तृणातील इवले...'
पाडगावकर खरोखरच एक सिद्धहस्त कवी. जीवनावर प्रेम करायला शिकवणारा, निसर्गावर प्रेम करायला शिकवणारा. प्रेमाची परिभाषा सांगणारा, प्रेम कुणावरही करावं असं सांगणारा. प्रेम करताना कुठलाही भेदभाव नसतो. तुमचं अन आमचं सेम असतं असं म्हणताच सगळ्या भेदांच्या भिंती गळून पडतात. ' सलाम ' सादर करताना त्यांच्यातील बंडखोरपणा आणि वेगळी वृत्ती आपल्याला भावते. अशा त्यांच्या विविध कविता आपलं जीवन अन भावविश्व समृद्ध करतात. एक नवीन दृष्टिकोन देतात. थोड्याशा संकटांनी खचून जाणाऱ्या, निराश होणाऱ्यांना ' या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ' म्हणत जगण्याचा अर्थ अन महत्व ते समजावून सांगतात. तर ' श्रावणात घननीळा बरसला ' सारख्या कवितेतून निसर्गाकडे पाहण्याचा, त्याचं सौंदर्य टिपण्याचा एक सुंदर दृष्टिकोन बहाल करतात. ' मी फुल तृणातील इवले' ही कविता तर कसं जगावं हे समजावून सांगते असं मला वाटतं. जे काही आपल्याजवळ आहे, त्याचा अभिमान बाळगावा, स्वत्व, स्वाभिमान कधीही विकू नये. समोरची व्यक्ती, शक्ती कितीही बलाढ्य असली तरीही !
' मी फुल तृणातील इवले ' या कवितेत ते फुलंच जणू आपल्याशी बोलतं आहे, आपलं मनोगत व्यक्त करतं आहे. आपण लक्ष दिलं तर ते आपल्या लक्षात येईल. ते म्हणतं
जरी तुझीया सामर्थ्याने
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.
जगाला प्रकाश आणि जीवन देणारा सूर्य. केवढा तेजस्वी आणि केवढा सामर्थ्यवान ! त्याच्या पराक्रमाने जणू दशदिशा उजळून निघतात. पण त्याचा प्रकाश, त्याचा अंगार, उष्णता माझ्यासारख्या छोट्या, नाजूक गवतफुलाला सोसवणारा नाही. त्यामुळे चराचराला जीवन देणाऱ्या हे भास्करा, तुझ्या तेजाने मी उमलणार नाही. ते फुल पुढे त्याला म्हणते आहे
शक्तीने तुझीया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?
हे तेजोनिधी भास्करा, तुझी शक्ती, तुझे सामर्थ्य खरोखरच प्रचंड आहे रे ! त्या सामर्थ्यापुढे सगळेच नतमस्तक होतील. तुला अदबीनं मुजरा करतील. पण जर आतूनच म्हणजे मनापासून सुंदर आणि आनंदी गाणं ओठांवर यायचं असेल तर ते असं बळजबरी नाही येत रे ! तुला सांगू ...?
जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नाते
तुझ्या तुलनेत दवबिंदू तो काय ! तृणाचे पाते, वारा हे सुद्धा तुझ्या दैदिप्यमान शक्तीपुढे यःकश्चित ! पण एक सांगतो. ते मला जिंकून घेतील. माझे होतील, माझं मन प्रसन्न करतील. तू नक्कीच विचारशील की असं काय आहे त्यांच्यात ? पण तुला सांगतो, ' त्यांच्यातील हळुवारपणा, प्रेम आणि स्वतःला विसरून माझ्याशी नातं जोडणं या गोष्टी मला खूप आवडतात. तुला सांगतो, ' आता लवकरच उन्हाळा संपेल. जलधारांचा वर्षाव होईल. आषाढ येईल, श्रावण येईल.
कुरवाळीत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारा
त्या श्रावणाच्या जलधारा कशा येतील माहितीये तुला ? त्या प्रेमाने हळुवार येतील. मला कुरवाळतील, शीतल, सुखद गारवा माझ्यासाठी घेऊन येतील, माझा दाह शांत करतील. त्या श्रावणसरींच्या वर्षावात भिजलेली, न्हालेली ' सजल ' पाने प्रेमाने माझ्याशी बोलतील, मला हळुवार स्पर्श करतील. पुढे ते गवतफूल सूर्याला उद्देशून म्हणते
रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे ?
मला मान्य आहे की तू अत्यंत सामर्थ्यवान आहेस, शक्तिशाली आहेस, तेजस्वी आहेस पण मला सांग की तुझ्या शक्तीपुढे, सामर्थ्यापुढे मी स्वतःला विसरून जाऊ का ? मी जरी तुझ्यापुढे क्षुद्र असलो तरी माझे स्वत्व मला कसे विसरता येईल ? मला परमेश्वराने, निसर्गाने जी काही शक्ती, सामर्थ्य अन वैशिष्ट्य दिले आहे त्याला मी दृष्टीआड कसे करू ? मी जर तुझ्या शक्तीपुढे नतमस्तक होऊन स्वतःला विसरलो तर निसर्गानं मला बहाल केलेलं रंग अन गंधांचं गीत मी कसं गाऊ शकेन रे ? ही तर माझीच माझ्याशी प्रतारणा होईल ना ! पण तुला माझ्याकडे यायचेच असेल आणि माझं व्हावं असं वाटत असेल, तर असा येशील का ?
येशील का संग पहाटे
किरणांच्या छेडीत तारा;
उधळीत स्वरातुनी भवती
हळू सोनेरी अभीसारा?
पहाटेच्या वेळी तू ये. मृदू, कोमल किरणांच्या मधुर तारा, स्वर छेडीत ये. तुझ्या रेशमी, कोवळ्या, मुलायम, सोनेरी किरणांतून प्रेमाचे गीत मला ऐकू दे. तुला यायचेच असेल तर असाही ये...
शोधीत धुक्यातुनी मजला
दवबिंदू होउनी ये तू
कधी भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधीत हेतू!
सगळीकडे धुकं दाटलं असताना त्या धुक्यातून दवबिंदूंचा ओलावा, रेशमी स्पर्श होऊन तू ये ना माझ्याकडे. श्रावणसरींनी माती भिजली आहे, सुगंधित झाली आहे, तिच्या मनातील नवनिर्मितीच्या, उमलून, फुलून येण्याच्या ज्या भावना आहेत, त्या समजून घेऊन ये ना ! तू असा आलास तर मला हवाच आहेस ! तू असा आलास ना, तर आपल्या दोघांमध्ये एक अनोखं नातं निर्माण होईल रे ! पण त्यासाठी..
तू तुलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे
त्यासाठी तुला एवढंच करावं लागेल. तू माझ्याकडे येताना स्वतःला विसरून ये. म्हणजे तू मोठा आहेस हे मला माहिती आहे पण माझ्यासारख्या सामान्याकडे येताना तू तुझा मोठेपणा जरा बाजूला ठेवून आलास तर मला किती आनंद होईल म्हणून सांगू ! मी सुद्धा स्वतःला तुझ्यात विसरून जाईन, एकरूप होईन. आपल्या दोघांमध्ये अशाने जे नातं निर्माण होईल ना, ते अगदी अनोखं असेल. तू हळुवारपणे हसत हसत मला फुलवशील आणि मी माझ्याही नकळत सुंदर उमलून येईन माझ्या रंगगंधासह.
पण मित्रा पुन्हा एकदा सांगतो
पण तुझीया सामर्थ्याने
ढळतील दिशा जरी दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.
तुझा हा मोठेपणा, सामर्थ्य जरी दशदिशा उजळून टाकणारा असला तरी मला तो काही कामाचा नाही. त्यापुढे दबून जाऊन मी माझे स्वत्व विसरणार नाही. त्या मोठेपणापुढे मी उमलुच शकणार नाही.
ही कविता खूप काही सांगून जाते. मला वाटतं गवतफुल हे प्रातिनिधिक आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या भावना ते व्यक्त करतं. त्याचबरोबर नकळत आपल्याला शिकवणही देतं. कोणाच्या मोठेपणापुढे दबून जाऊन उगाचच नतमस्तक होऊ नका, आपलं स्वत्व, स्वाभिमान कोणत्याही परिस्थितीत गहाण ठेवू नका. लहान मुलांमध्ये लहान होऊन मिसळावे लागते. एखादी व्यक्ती कितीही मोठी असली, कोणत्याही अधिकारपदावर असली तरी जोपर्यंत ती स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून त्या बालकांत सहभागी होत नाही, तोपर्यंत मुलं सुद्धा त्यांच्यात खेळणार नाही. आपण मंदिरात जाताना जशी पादत्राणं बाहेर काढून ठेवतो, तसाच आपला मोठेपणाही बाहेर काढून ठेवता यायला हवा, नम्र होता यायला हवे. तुकाराम महाराज म्हणतात, ' नम्र झाला भूतां, तेणें कोंडिले अनंता. '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/५/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासह अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा