मुख्य सामग्रीवर वगळा

पिओ तो जानो...

उगवतीचे रंग  

पिओ तो जानो... 

" दादा, इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला याल का ? " माझी लेक आणि जावई मला पुण्यातील चांदणी चौकात असलेल्या इराणी कॅफेमध्ये जाण्यासाठी आग्रह करीत होते. मग एके दिवशी सकाळी आम्ही चौघं तिथं गेलो. पाहिलं तर तिथे तरुणाईची ही गर्दी. ! इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी सकाळी सकाळी एवढी गर्दी पाहून मला आश्चर्य वाटलं. मग मला कळलं की हे हॉटेल अष्टौप्रहर सुरु असतं. चहाच्या अशा काही ठराविक दुकानांवर प्रचंड गर्दी कायम असते. 

मी विचार करू लागलो. प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरींनी ' एकच प्याला ' हे संगीत नाटक दारूचे दुष्परिणाम दाखवण्यासाठी लिहिले आणि ते अजरामर झाले. त्या वेळी तळीरामांचे प्रमाण समाजात वाढले होते. ( आजची परिस्थिती मला माहिती नाही. कारण मी त्या वाटेला जात नाही.नाहीतर  काही मंडळी उगीचच आज काय हे प्रमाण कमी आहे का असे म्हणतील. )  शंभर दीडशे वर्षांपूर्वी भारतात फार कमी लोकांना चहा माहिती होता. इंग्रजांनी भारतात ज्या काही चांगल्या ( ? ) गोष्टी आणल्या, त्यात चहाचा पण समावेश करायला हवा. तर शंभर दीडशे वर्षांपूर्वी ज्यांना चहा माहितीही नव्हता, अशी मंडळी खरोखर दुर्दैवी म्हणायला हवी कारण त्यांना क्षणात उत्साह,स्फूर्ती आणि तरतरी देणारे हे पेय माहिती नव्हते. गडकरींच्या काळातही फार कमी लोकांना त्याची आवड असावी नाहीतर त्यांनी त्यानंतर चहावर एखादे नाटक नक्कीच लिहिले असते. 

ब्रिटिशांनी जो चहा भारतात आणला, त्या मूळ चहा नावाच्या पेयात भारतीयांनी बरेच बदल केले. खास दुधाचा चहा, आले, वेलची घातलेला चहा, गवती चहा असे अनेक प्रकार निघाले. त्यातील आले, वेलची आणि गवती चहाचा वापर करून बनवलेला चहा तर सर्दी, खोकला इ. आजारांवर आवर्जून घेतला जातो. सध्या तर ब्लॅक टी, ग्रीन टी यासारखे चहाचे अनेक प्रकार निघाले आहेत. खरे तर चहा पावडर, दूध आणि साखर हे चहाचे मूळ घटक. पण जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चहा नावाचे एक वेगळेच रसायन तयार होते. चहाच्या दुकानांची नावे सुद्धा मोठी गमतीदार आहेत. अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, गुळाचा चहा इ. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची घोषवाक्ये सुद्धा भारी आहेत. एकदा प्याल तर पुन्हा याल, पिऊन तर पहा, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो वगैरे वगैरे. नुसत्या चहाच्या व्यवसायात तर आजकाल करोडोंची उलाढाल होते आहे. 

आता तर हा एकच प्याला (चहाचा हो ) एवढा लोकप्रिय झाला आहे की त्याच्या लोकप्रियतेचे वर्णन करायला शब्द कमी पडतील. आमचे पंतप्रधान सुद्धा त्यांना काही ' मन की बात ' सांगायची असली की ' चायपे चर्चा ' करतात. हिंदी सिनेमात तर नायकाला लग्नाची मागणी घालण्यासाठी नायिका त्याला ' चायपे बुलाया हैं ' म्हणून गाणंच म्हणते. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात बहुधा चहाने होते आणि शेवटही गोड ( चहाने ) होतो. कॉफी ही चहाची धाकटी बहीण ! पण चहाला जी लोकप्रियता लाभली, ती तिला लाभली नाही. जे खरे चहाबाज असतात, त्यांना वेळेला चहाच लागतो. त्या वेळी दूध, लस्सी, ताक, कॉफी असे विविध पर्याय उपलब्ध असले तरी खरा चहाप्रेमी निवड करतो ती चहाचीच. 

आपल्याकडे लग्नाच्या वेळी मुलगी दाखवण्याचा जो कार्यक्रम होतो, त्या कार्यक्रमात प्रामुख्याने चहा, पोह्यांचा समावेश असतो. अस्मादिकांच्या लग्नात तर चहाने मोठीच भूमिका बजावली. एक कप चहा काय करू शकतो त्याचे प्रत्यंतर आले. त्याचे झाले असे की आमच्या सौ. चे वडील तिला दाखवण्यासाठी जेव्हा आमच्या घरी घेऊन आले, तेव्हा मी माझे वडील, तिचे वडील आदी मंडळी बाहेरच्या हॉलमध्ये गप्पा मारत बसलो होतो. ही आतून चहा, पोहे घेऊन आली. चहा पिताना वृद्धापकाळामुळे तिच्या बाबांच्या हातातील कपबशी थरथरत होती. त्याच वेळी अस्मादिकांनी निर्णय घेऊन टाकला की आता यांना जास्त फिरवायचे नाही. आणि आम्ही आमची पसंती जाहीर करून टाकली. 

मी शिक्षक म्हणून शाळेत काम करत असतानाचा चहाबद्दलचा गमतीदार अनुभव आहे. मी पडलो भाषाविषयांचा शिक्षक. मला प्रत्येक वर्गावर खूप बोलावे लागायचे. बोलून बोलून घसा कोरडा पडायचा. प्रत्येक तासाला घोट दोन घोट पाणी प्यायलं तरी गरमागरम चहाने घसा शेकावा असे वाटायचे. पण बाहेर जाता यायचे नाही. आमच्या शाळेत फक्त मधल्या सुटीत एकदा चहावाला यायचा. मग अस्मादिकांनी एक युक्ती शोधून काढली. आमच्या शाळेतील एक ज्येष्ठ शिक्षक जे अधिकारी होते (आणि मी विद्यार्थी असताना माझे शिक्षकही होते, त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसायचो. ) ते चहाचे फार चाहते होते. ते चहाला कधी नाही म्हणत नसत. ( कोणीतरी असं म्हटलेलं मी ऐकलेलं आहे की बाईने कुंकवाला आणि पुरुषाने चहाला कधी नाही म्हणू नये ) मी त्यांच्याकडे गेलो की ते बेल मारून शाळेच्या सेवकाला बोलवायचे आणि चहा आण म्हणून आज्ञा करायचे. मी आपला उगीचच ' राहू द्या हो सर ' म्हणायचो. पण सरांनाही चहा हवाच असायचा. त्यामुळे आमच्या दोघांच्या चहाचा प्रश्न अशा रीतीने सुटायचा. 

एक कप चहाने काय होत नाही महाराजा ? एखाद्या तरुणाचे एखाद्या तरुणीवर प्रेम असले की तो प्रथम तिला चहाचे आमंत्रण देतो. चहाच्या एका कपाच्या साक्षीने त्यांची प्रेमकहाणी सुरु होते. अनेक महत्वाच्या चर्चा, बोलणी, सभा, वाटाघाटी चहाच्या साक्षीने सुरु होतात. परीक्षेसाठी रात्र रात्र जागून अभ्यास करणारे विद्यार्थी चहाच्या साहाय्याने झोपेवर नियंत्रण मिळवतात. एखाद्या सरकारी कचेरीत तुमचे काम होत नसले तर चहा ते काम सहज करून टाकतो. (तुम्ही भाग्यवान असाल तर तेथील कर्मचारीच तुमच्यासाठी चहा मागवतात. अर्थात आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या बाबतीत अशी शक्यता फार कमी असते. ) पण तसे नसेल तर ' चहापाण्यासाठी ' हात जरा सैल सोडला की तुमचे काम होऊन जाते. चहापाण्यासाठी पैसे देणे हे काही लाच किंवा भ्रष्टाचार या प्रकारात मोडत नाही असे या कामातील काही तज्ज्ञ लोकांचे म्हणणे आहे. तो एक शिष्टाचार असतो. 

' राम गावा राम ध्यावा, राम जिवीचा विसावा ' असं समर्थ रामदास म्हणतात. त्यात थोडा बदल करून आणि समर्थांची क्षमा मागून ' चहा घ्यावा चहा द्यावा, चहा जिवीचा विसावा ' अशीच भावना अट्टल चहाप्रेमींची असते. पूर्वीच्या काळी चहाच्या साधारणपणे दोनच वेळा असायच्या. एक सकाळी आणि दुसरी संध्याकाळी साधारण चार वाजता. पण काही हुशार लोकांनी प्रवासात रेल्वे स्टेशनवर, एस टी स्टॅण्डवर दिवसाचे चोवीस तास चहा विक्री करायला सुरुवात केली आणि त्यांना चहाप्रेमींनी निराश केले नाही. दिवस असो, रात्र वा पहाट असो, गाडी एखाद्या स्टेशनवर थांबली की खरा चहाप्रेमी चहा घेण्यासाठी खाली उतरतोच. आपल्या खासगी वाहनाने प्रवास करणारे लोकही तास दोन तासांनी चहाचा ब्रेक घेतातच. गाडी चालवताना पेंगुळलेल्या आणि कंटाळलेल्या ड्रायव्हरला चहा म्हणजे संजीवनी असते. त्यामुळे तात्काळ तरतरी, हुशारी वगैरे येऊन त्याची झोप कुठल्याकुठे पळून जाते आणि प्रवास सुरक्षित पार पडतो. 

ऑस्टेलियातील लोक कॉफी पिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशा ठिकाणी चहाला लोकप्रियता मिळवून देण्याचं काम भारतीय वंशाच्या उपमा बिरदी या तरुणीने केलं आहे. उपमा खरं तर वकील आहे. पण तिला चहाची प्रचंड आवड. भारतीय चहाला लोकप्रियता मिळवून देण्याचं काम तिने ऑस्ट्रेलियात केलं आहे. ती तिथे ' चायवाली ' म्हणून प्रसिद्ध आहे. ती तिथे ' बिझिनेस वुमन ऑफ द इयर ' ठरली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून आलेला सोमनाथ गिराम या तरुणाची कथा वेगळीच आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. शिक्षणासाठी सुद्धा पैसे नाहीत पण शिकण्याची जिद्द अफाट. सोमनाथ शिक्षणासाठी पुण्यात आला. पैसे नाहीत म्हणून त्याने सदाशिव पेठेत टी स्टॉल सुरु केला. त्यातून वेळ मिळेल तसा अभ्यास केला. अपार कष्ट केले. त्याच्या कष्टाला फळ आले. सोमनाथ चक्क सी ए झाला. आता तो महाराष्ट्र शासनाच्या ' कमवा व शिका ' या योजनेचा ब्रँड अम्बॅसडर बनून तरुणांना प्रेरणा देतो आहे. 

असे हे चहापुराण ! कितीही सांगितले तरी कमीच ! त्यावर अधिक चर्चा करण्यापेक्षा आता गरमागरम मस्तपैकी एक फर्मास चहा घेऊ या. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२/५/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...