मुख्य सामग्रीवर वगळा

जे तुझ्याचसाठी होते...

 उगवतीचे रंग 

जे तुझ्याचसाठी होते... 

काही गाणी मनाला स्पर्शून जातात. तसेच हे गीत. ' जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले, वाटेत तुझ्या मी फुल ठेवुनी गेले. ' परवा सहज रेडिओ लावला आणि हे गीत कानावर पडले. यापूर्वीही मी हे गाणं ऐकलं होतं. पण ते पुन्हा खूप दिवसांनी ऐकायला मिळालं. पूर्वी मला त्यातली न जाणवलेली गोडी, आर्तता, तरल भावना सगळं सगळं काही मनाला स्पर्शून गेलं. मंगेश पाडगावकरांची ही अवीट गोडीची रचना. त्या शब्दांना जिवंत केलं आहे उषा मंगेशकर यांनी. या गीताला संगीताची सुरेल साथ आहे संगीतकार विश्वनाथ मोरे यांची. 

कविता नसती तर मानवी जीवन किती निरस झाले असते ? या अशा सुंदर गीतातून स्रवणारा मकरंद कधी चाखायला मिळाला असता ? गीत आणि संगीत आणि साहित्य म्हणजे मानवाला मिळालेलं दैवी वरदानच आहे. एका उच्च प्रकारच्या आनंदाची अनुभूती देण्याचं सामर्थ्य त्यात आहे. मानवी भावना, जाणिवा समृद्ध करण्याचं सामर्थ्य त्यात आहे. ' वाटेत तुझ्या मी फुल ठेवुनी गेले...' या गीताचे शब्दच फार गोड आहेत. कधी कधी आपल्याला खूप आवडणारी एखादी प्रसिद्ध व्यक्ती असते. आपण नकळतच अशा व्यक्तीवर प्रेम करायला लागतो. पण अशा व्यक्तीला त्याची खबरबात सुद्धा नसावी ? ही प्रीती ( प्रेमापेक्षाही आणखी सुंदर तरल भावना हा शब्द व्यक्त करतो ) अबोल असते. व्यक्त करता येत नाही. सगळ्यांना सांगता येत नाही. यात असते ते केवळ समर्पण ! हृदयातील देव्हाऱ्यात मांडलेली आपल्या देवाची अबोल पूजा. पहिल्या दोन ओळीत ती विरहिणी आपली व्यथा मांडते, ते शब्द इतके बोलके आहेत की हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. 

जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले 

वाटेत तुझ्या मी फुल ठेवुनी गेले. 

एखादं फुल परमेश्वराच्या चरणीच अर्पण होण्यासाठी उमलावं. तेच त्याचं जीवनध्येय आणि जीवनातील इतिकर्तव्यता असावी. तशीच ही एकतफी, अबोल प्रेम करणारी प्रेयसी. जणू तिचा जन्मच त्याच्यावर प्रेम करण्यासाठी झाला ! त्याला त्याची जाणीव असो वा नसो, ती त्याच्यावर प्रेम करत राहणार. ती म्हणते, ' वाटेत तुझ्या मी फुल ठेवुनी गेले ' हे फुल म्हणजे तिच्या हृदयाचं प्रतीक. 

पुढे ती आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते 

रथ ऐश्वर्याचा या वाटेने गेला 

जयघोष तुझा मग सर्व जगाने केला 

मी दूर एकटी, माझे डोळे ओले... 

त्या प्रसिद्ध व्यक्तीवर ज्याच्यावर तिचे मनापासून प्रेम आहे, त्याचं जीवन ऐश्वर्यसंपन्न आहे. त्याची वाटचाल, त्याचा मार्ग वेगळाच आहे. त्या मार्गावर सगळेच त्याचा जयघोष करताहेत. हिच्याकडे लक्ष कसे जाणार ? ती तर दूर एकटी एका कोपऱ्यात उभी आहे. जिने आपल्या जीवनाचं फुल त्याच्या पायी ठेवलं, त्याला त्याची जाणीव नाही. जाणीव होण्याचीही शक्यता नाही. या तिच्या अबोल भावना त्याच्यापर्यंत कशा पोहोचणार ? तिच्या डोळ्यात पाणी आहे. 

आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणते 

त्या फुलासारखीच अबोल माझी प्रीत 

ती अबोल पूजा माझ्या या हृदयात 

नच ओठांवरती नाव तुझे कधी आले 

फुल काही बोलते का ? त्याला तर फक्त समर्पण माहिती असते. आपल्या पूर्ण शक्तीनिशी, सौंदर्य लेवून ते उमलते, ते अर्पण होण्यासाठीच. तशीच प्रीतीची अबोल पूजा या विरहिणीच्या मनात सुरु आहे. ज्याच्यावर ती प्रेम करते, ती एवढी प्रसिद्ध, मोठी व्यक्ती आहे की आपल्या ओठांवर त्याचे नावही ती कधी घेऊ शकत नाही. 

या कवितेच्या शेवटच्या कडव्यात ती म्हणते 

तुज कसे कळावे ? देवा नाही कळले !

मी दूर अलक्षित तुजसाठी तळमळले 

त्या फुलात माझे हृदय ठेवुनी गेले. 

माझी अबोल प्रीत तुला कशी समजावी ? माझ्या अंतरीच्या या भावना तुझ्यापर्यंत कशा पोहोचाव्या  हे मलाच समजले नाही. मी मात्र दूरच, एकाकी. मी कशी आहे ? त्यासाठी कवीने फार सुंदर शब्द योजला आहे. ' अलक्षित ' हा शब्द खूप काही सांगून जातो. अबोल प्रीत, अबोल पूजा, अबोल समर्पण आहे. आपल्या प्रीतीचं उघड, बोलकं प्रदर्शन तिला करता येत नाही. कदाचित म्हणूनच ती ' अलक्षित ' आहे. पण तिचा समर्पण भाव ? तो अनमोल आहे. त्याची किंमत करता येणार नाही. म्हणून ती फक्त आपल्या प्रीतीचं फुल त्याच्या वाटेवर ठेवून त्यात धन्यता मानणारी आहे. 

या गीतात दुसराही एक अर्थ आहे. या गीतात जशी अबोल प्रीत दडलेली आहे, तशीच परमेश्वरावरील अबोल भक्ती सुद्धा. त्याची अबोल पूजा तिच्या हृदयात आहे. तिच्या हृदयाचं फुल तिनं त्याला अर्पण केलं आहे. ते केवळ त्याच्यासाठीच फुललं आहे. समर्पणभाव असाच असतो. त्याला फक्त देणं माहिती असतं. परतीची अपेक्षा नसते. अशा या सुंदर, तरल भावना मंगेश पाडगावकरांनी आपल्या शब्दातून मांडल्या आहेत. उषा मंगेशकरांनी त्या शब्दातील आर्तता, भावना जणू जिवंत केल्या आहेत. एक अजरामर असं भावगीत रसिकांना त्यांनी जणू अर्पण केलंय. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२६/०४/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...