उगवतीचे रंग
बाग फुलवणारा एक योगी अवलिया
कधी कधी सामान्य व्यक्तीतही असामान्यत्वाचे दर्शन घडते. फक्त आपल्याजवळ ते पाहण्याची दृष्टी हवी. तुमच्या माझ्यासारख्या सुशिक्षित माणसांना पुस्तकं वाचता येतात. पण समोरचा माणूसही वाचता यायला हवा. त्यासाठी आपले नेहमीचे चष्मे बाजूला काढून ठेवावे लागतात. आपल्याला सवय असते ती आपल्या एका ठरविक मोजपट्टीतून माणसं मोजण्याची. त्यात जो बसला, तो चांगला. त्यात न बसणारी व्यक्ती आढळली की आपल्याला ती व्यक्ती खटकते. मी बऱ्याच वेळेला माझे पूर्वग्रह बाजूला ठेवतो. एका भेटीत किंवा अगदी दोनचार भेटीतही एखादी व्यक्ती आपल्याला कळतेच असे नाही. त्यासाठी काही ठराविक काळ जावा लागतो. मग अशा व्यक्तींच्या स्वभावाचे कंगोरे, गुणदोष आपल्याला कळत जातात.
आम्ही चाळीसगावला नवीन घरात राहायला आलो, तेव्हाची गोष्ट. आता साधारणपणे वीस वर्षे झाली असतील. आमच्या घरासमोर छोटीशी बाग करण्यासाठी पुरेशी मोकळी जागा होती. मला आणि आमच्या सौभाग्यवतीला बागेची फार आवड. त्यामुळे आम्ही ती मोकळी जागा बागेसाठी वापरायची असे ठरवले. सुरुवातीला मोठया हौसेनं वेगवेगळी झाडं लावत गेलो. काही चांगली वाढली. काही जगली नाही. खरं तर बाग विकसित करायची तर ती नियोजनबद्ध रीतीने करायला हवी. बागच काय पण जीवनातील अनेक गोष्टी करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते.
आमच्या घरासमोरच एक मोठा बंगला होता. त्या बंगल्याच्या पुढील विस्तीर्ण भागात सुंदर बाग होती. पाठीमागे घर होते. त्यामुळे त्या घराला वेगळीच शोभा आलेली होती. मला ती बाग फार आवडायची. एके दिवशी त्या बागेत एक व्यक्ती मला झाडांची कापणी करताना दिसली. मी तिथे जाऊन चौकशी केली तेव्हा तो बागकाम करणारा माळी होता आणि तो साधारणपणे पंधरा दिवसांनी त्यांच्याकडे यायचा हे कळले. मग मी त्या व्यक्तीला माझ्याकडे सुद्धा येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे ठरल्या दिवशी ती व्यक्ती माझ्याकडे हजर झाली आणि त्या अवलियाचा आणि माझा परिचय झाला.
सुरुवातीला मला त्याच्या काही अटी ऐकून घ्याव्या लागल्या. मी अमुक दिवशी अमुक वेळेला येईन. एक तास काम करीन. अमुक इतकेच पैसे घेईन वगैरे वगैरे. असे काम करणारी दुसरी व्यक्ती तोपर्यंत माझ्या दृष्टीपथात नसल्याने मी त्याच्या सगळ्या अटी मान्य केल्या. हा गृहस्थ बरोबर ठरल्या वेळी यायचा. एका तासात त्याचे सगळे काम करून निघून जायचा. सुरुवातील मला वाटलं की हा फार थोडे काम करतो आणि निघून जातो. पण नंतर माझ्या लक्षात यायला लागले की त्याचा काम करण्याचा वेग जास्त होता. कधी कधी तो स्वतःबरोबर त्याच्या मुलाला किंवा दुसऱ्याही इतर एखाद्या मुलाला घेऊन येई.ती मुलं शाळा शिकता शिकता बागकामही करीत. त्याच्याबरोबर काम करता करता त्या मुलांची बागकामाची दृष्टी विकसित झाली. पुढे ते दुसरीकडेही स्वत्रंतरीत्या काम करू लागले. या मुलांची त्याला त्याच्या कामात मदत तर व्हायचीच पण त्यांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे बागकामाचे कौशल्य त्याने शिकवले. त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायला मदत केली.
या भल्या माणसाचं नाव संजय गायकवाड असं आहे. तो फार काही शिकलेला नाही पण कामापुरतं जुजबी लिहिणं वाचणं त्याला अवगत आहे. मध्यम बेताची उंची, साधे पण स्वच्छ कपडे, चेहऱ्यावर समाधानाचे भाव असे त्याचे व्यक्तिमत्व. संजयच्या घरची परिस्थिती तशी अगदीच सामान्य. एक मुलगा आणि एक मुलगी. त्याची पत्नी शेतात मजूर म्हणून कामाला जाई. पण आपल्या परिस्थतीबाबत त्याने कधी तक्रार केली नाही.
कामाला येताना स्वतःबरोबर कोमट पाण्याची बाटली तो घेऊन येतो. चहा तो कधीच घेत नाही. कधी काही खायचं विचारलं तर, त्यालाही नकार असतो. पहाटे पाच पासून त्याचा दिवस सुरु होतो. घरी ध्यान, प्राणायाम करून मग तो आपल्या कामावरजातो. सकाळी सात वाजल्यापासून त्याचं कामं सुरु होतं. सगळी कामं करून साडेदहा अकरा वाजेपर्यंत तो आपल्या घरी जातो. तोपर्यंत कडकडून भूक लागलेली असते. घरी गेल्यावर साधे भाकरी भाजीचे जेवण. दुपारी थोडा वेळ आराम. संध्याकाळची वेळ त्याची हक्काची. त्या वेळी जवळच्या एका निर्जन ठिकाणी असलेल्या मंदिरात तो ध्यानाला जाऊन बसतो. त्यावेळी कोणाचाही फोन न घेणे, समोरची व्यक्ती कितीही मोठी असली तरी, आपल्या दिनक्रमात बदल न करणे या गोष्टी त्याच्यासाठी नित्याच्याच. त्या वेळेत कोणाकडे लग्नकार्य असलं तरी तिथे तो आपल्या बायको मुलाला पाठवणार.
पुढे पुढे तो माझ्याकडे दर आठवड्याला कामासाठी म्हणून येऊ लागला. बाहेर बागेत काम करताना तो मोबाईलवर भजनं ऐकायचा. त्यात विशेष करून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे अभंग, कबीर, मीराबाई यांच्या रचना आदींचा समावेश असायचा. बागेतील झाडेसुद्धा त्याच्याबरोबर त्या भक्तिरसात तल्लीन व्हायची. भजनाव्यतिरिक्त इतर गाणी कधी ऐकताना तो कधी दिसला नाही. मग बऱ्याच वेळा माझ्या आणि त्याच्या गप्पा जमायच्या. विषय आध्यात्म हाच असायचा. त्याने त्याच्या परीने स्वतःशी बाळगलेली अशी काही तत्त्वं होती. मद्यपान करणाऱ्या, गैरमार्गाने पैसा कमावणाऱ्या व्यक्तींनी त्याला कितीही पैसे देऊ केले तरी तो त्यांच्याकडे कामाला जात नसे. अशा व्यक्तींकडील पाणी सुद्धा तो घेत नसे. मीच त्याला म्हणायचो, ' तुम्हाला अशा ठिकाणी जायला काही हरकत नाही. भलेही तुम्ही त्यांच्याकडील काही खाऊ पिऊ नका. तुमचे काम करा आणि पैसे घ्या. ' पण आपल्या मनाशी ठरवलेल्या तत्वांशी तो कमालीचा एकनिष्ठ होता. पैशासाठी, लोभासाठी आपल्या तत्वांशी त्याने प्रतारणा कधीच केली नाही. कधी कधी त्याचं याबाबतीत स्पष्ट बोलणं, अशा लोकांशी फटकून वागणं यामुळे काही लोकांना तो फटकळ, लहरी आणि अप्रिय वाटायचा. पण अशा लोकांशी त्याला काही देणंघेणं नव्हतंच.
त्याचं बोलणं, त्याची भाषा बऱ्याच वेळेला अशुद्ध, ग्राम्य अशी असायची. पण तो जे काही सांगायचा ते मात्र फार मोलाचे. तो खरं तर बागकाम करणारा एक माळी. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर झाडांचा डॉक्टर. पण ज्या व्यक्तीला झाडांचे आरोग्य कळते, त्या व्यक्तीला मानवी आरोग्यही बऱ्यापैकी समजते. निसर्ग, प्राणी आणि माणूस यांच्यात आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं तर बरीचशी तत्व सारखीच आहेत. जे त्यांच्यासाठी आरोग्यदायी आहे, ते माणसाला देखील लागू होते. आमच्या या संजयजवळ ती दिव्य दृष्टी नक्कीच होती. बऱ्याच आजारांवर घरगुती उपचार तो सहज सांगायचा. त्याने सांगितलेल्या उपचारांचा लोकांना फायदाही होताना दिसायचा.
माझा व्यस्त दिनक्रम पाहून ' दादा, तुम्ही निवांत व्हा. ' असा प्रेमळ सल्ला तो मला वारंवार द्यायचा. पण मला कधी त्याच्यासारखे निवांत होणे जमलेच नाही. निवांत होणं म्हणजे आपल्या सगळ्या व्यापातून बाजूला होऊन स्वतःसाठी वेळ देणं असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता. प्राणायामातले बरेच बारकावे त्याने मला सांगितले. ध्यान करणं म्हणजे काय हे त्याच्याकडून छान ऐकायला मिळायचं. तो एका जागी ध्यान लावून बसला, तर तासनतास हालचाल न करता बसू शकत असे. विचारशून्य होणं, निर्विचार होणं म्हणजे ध्यान असं त्याचं सांगणं. तुम्हाला असं निर्विचार होणं किंवा विचारशून्य होण्याची अवस्था जमली की तुम्हाला देवपूजा, स्तोत्र, मंत्र आदी काही करण्याची जरुरी नाही असे त्याचे सांगणे. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, वाणीचे चार प्रकार - परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी यासारखे शब्द त्याच्या बोलण्यात सहज येत. तो फारसा शिकलेला नव्हता आणि खरंतर त्याने आध्यात्माची कुठलीही पुस्तके वाचली नव्हती. पण त्यातील सार मात्र त्याला स्वानुभवाने आणि स्वतः केलेल्या साधनेने त्याला कळले होते. ' वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा ' असं जे तुकाराम महाराज म्हणतात, त्याचं प्रत्यंतर अशा व्यक्तींकडे पाहिलं की येतं. सर्वसामान्य माणसांमधील ओळखू न येणारा हा ' योगी ' आहे.
आजही हा संजय नावाचा अवलिया माझ्याकडे दर आठवड्याला नियमितपणे येतो. तो मला बोलवतो आहेच.आता त्याच्या सहवासात संध्याकाळचा काही काळ घालवावा असा विचार मी करतो आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२१/०४/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा